माता, भगिनी, सौ साऱ्या
निसर्गाच्या प्रकृती आकृती
आज पुजूया साऱ्या गौरी
सूर स्वरांनी गाऊनी भक्ती
सूर असुर प्रवृत्ती साऱ्या
आज काढूनी टाकू
गणरायाच्या सप्तसुसुरांनी
सारे जीवन व्यापू!!!
अर्थ–
आज गौरी पूजन, एक अनोखा सोहळा सर्वांसाठीच. श्री गणेश म्हणजे बुध्दीदेवता, चातुर्य, साहस, हिम्मत, धाडसीपणा, आपुलकी, प्रेम, निर्मळता अशा अनेक गुणांची कलांची देवता.
बुद्धी दे रघुनायका म्हणत श्री समर्थांनी साऱ्या जगासाठी श्री प्रभू रामचंद्रांकडे मागणं घातलं तसंच मागणं आपण दरवर्षी श्री गणेशाकडे घालतो. अगदी टाळ- मृदुंगाच्या गजरात आपण आपली भक्ती, प्रेम व्यक्त करतो. मग दिवस येतो गौरी आवाहन, गौरी पूजन आणि मग श्री आणि गौरींचे विसर्जन याचा. आपण सर्वार्थाने या सगळ्या गोष्टी आनंदाने साजऱ्या करतो पण खरंच या पृथ्वीवर असलेल्या गौरी खुले पणाने जगू शकतायत? समोर कर जोडून उभा असलेला असुर तर नाही ना? ही शंका अजूनही अशा कित्येक गौरींच्या मनात तयार होत असते. कुठे कमी पडतोय आपण?
विश्वाची ही घडी बसविली, विविध प्रकारे नटवूनी म्हणणाऱ्या महादेवाला नमन करून अघोरी वागण्याला काय अर्थ आहे? महादेव म्हणजे अघोरी विद्यांचा जनक जरी असला तरी त्याचा वापर स्वबळ वाढवण्यासाठीच समोरच्या व्यक्तीवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी नाहीच हे कधी कळणार आपल्याला?
आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply