नवीन लेखन...

अखेर पहिले महायुद्ध समाप्त झाले

११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी अकरा वाजता शस्त्रसंधी होऊन पहिले महायुद्ध अखेर समाप्त झाले. या युद्धाने अर्ध्याहून अधिक जग व्यापले होते व भारतीय सैनिकांनीदेखील यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रॅन्झ फर्डिनांड याचा सेरेयावो, सर्बिया येथे १९१४मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येने युरोपमध्ये महायुद्धाची ठिणगी उडाली आणि इच्छा नसताना विविध सामरिक करारांमुळे युरोपचे सर्व देश त्यात खेचले गेले. एकीकडे होते मित्र देश इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि शेवटच्या काळात अमेरिका आणि दुसरीकडे होते सहकारी देश (ॲक्सिस पॉवर्स); जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्य आणि तुर्की, फ्रान्स आणि फ्लँडर्स (बेल्जियमचा भाग), तुर्की साम्राज्याचे अरब प्रदेश आणि पूर्व आफ्रिकेचा काही भाग, ही युद्धाची मुख्य क्षेत्रे होती.

त्या काळी याला महायुद्ध असे संबोधले जाई. कारण कोणालाच कल्पना नव्हती, की दोन दशकांनंतर त्यापेक्षाही भीषण महायुद्ध होईल ज्याचा विस्तार आणखी जगव्यापी असेल.

पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा भारताच्या सैन्याची संख्या सुमारे दीड लाख होती. तेव्हा हवाई दलाचा जन्म झाला नव्हता व रॉयल नेव्ही (इंग्लंडची नौसेना) जगात सर्वांत सामर्थ्यवान होती. भारताकडे नौसेना पण नव्हती. परंतु, भारतीय लष्कर (ज्याच्यात भारतीय वंशाच्या नागरिकांना अधिकारी बनण्याचा अधिकार नव्हता) हे ब्रिटनच्या साम्राज्याचे सामरिक राखीव दल होते. ज्याचा वापर पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे होऊ शकत होता. या युद्धात अनेक नावीन्यपूर्ण शस्त्रे व डावपेचाचे प्रकार वापरले गेले. यात मशिनगन, विषारी गॅस, विमानांचे युद्धाच्या शस्त्रात रूपांतर आणि रणगाड्यांचा समावेश होता. याचा परिणाम रणांगणावर होणाऱ्या हिंसाचारावर झाला व पहिल्यांदा युद्धात एवढे सैनिक मारले गेले आणि जखमी झाले.

युद्धाच्या प्रमुख युरोपीय क्षेत्रात (फ्रान्स आणि फ्लँडर्स) सुरुवातीला जर्मनी आणि सहकारी देशांच्या आक्रमणाने इतक्या वेगाने प्रगती केली, की ब्रिटनला ती लाट थोपवण्यासाठी भारतातून कुमक मागावी लागली. त्यानुसार दोन तुकड्या, लाहोर आणि मेरठ डिव्हिजन, यांना तातडीने सुएझ कालव्यामार्गे फ्रान्सला पाठवण्यात आले. एका डिव्हिजनची संख्या सुमारे १२ हजार सैनिक होती व हेडक्वॉर्टर (मुख्यालय) आणि तीन ब्रिगेडमध्ये त्याची विभागणी होती. प्रत्येक ब्रिगेडमध्ये भारतीय सैनिकांचे तीन युनिट (बटालियन) होते व त्यांच्याबरोबर एक इंग्रजी सैनिकांचे युनिट होते. भारतीय जवानांनी बंड केले, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला गोऱ्या सैनिकांची आवश्यकता साम्राज्याच्या अधिकाऱ्यांना वाटायची!

भारतीय सैनिकांची पहिली तुकडी २६ सप्टेंबर १९१४ फ्रान्सला पोहोचली आणि एका महिन्यात २३ ऑक्टोबर रोजी त्यांना युद्धाचा पहिला अनुभव आला. सुमारे एका वर्षानंतर भारतीय सैनिकांना युरोपमधून परत पाठवण्यात आले. या काळात ३८ हजार २५२ सैनिक मृत्यमुखी पडले किंवा जखमी अथवा बेपत्ता झाले म्हणजे सुरुवातीच्या २४ हजार सैनिकांसाठी किती राखीव सैनिक पाठवावे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो. या काळात भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्याचे दर वेळी प्रदर्शन केले; परंतु श्वेतवर्णीय देशांच्या सैनिकांचा पराभव करताना कृष्णवर्णीय सैनिकांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतील, याची दखल घेऊन त्यांना परत पाठवण्यात आले.

युरोपमधील युद्धात स्थैर्य आले, तेव्हा मित्रदेशांनी मुख्यतः इंग्लंड आणि फ्रान्स यांनी तुर्की ऑटोमन साम्राज्याचा पराभव करून त्यांची सत्ता संपवण्याकडे अधिक लक्ष दिले. सोळाव्या शतकात तुर्कीच्या सलीम प्रथम याने इजिप्त आणि इराण या देशांवर आक्रमण करून साम्राज्याची स्थापना केली व पुढे हे साम्राज्य युरोपमध्ये भूमध्य सागराच्या उत्तरेला स्पेनपर्यंत वाढले होते. काही काळानंतर ऑटोमन साम्राज्याला तडे पडायला लागले. १८६९ मध्ये सुएझ कालवा कार्यरत होईपर्यंत ब्रिटिश शासनाने इजिप्तवर आपली पकड घट्ट केली होती. विसाव्या शतकापर्यंत ऑटोमन सत्ता अत्यंत क्षीण झाली होती व पहिले महायुद्ध सुरू झाल्यापासून अरब जमातींना एकत्र करून त्यांच्या उठावाने ब्रिटन तुर्कीला आव्हान देत होता. हे कार्यक्षेत्र ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’च्या कामगिरीने अधिक प्रसिद्धीत आले होते. १९१७ मध्ये येथील हालचालींना वेग आला व युद्धक्षेत्रात भारतीय सैनिकांनी महत्त्वाचे योगदान केले. या वेळी पश्चिम आशियाच्या सीमा आजच्यासारख्या नव्हत्या व हे युद्धक्षेत्र सुएझपासून ते टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या पात्रापर्यंत आणि आजच्या तुर्कीच्या दक्षिण सीमेपर्यंत विस्तारलेले होते. भारतीय सैनिकांनी सुएझ कालव्याच्या संरक्षणापासून ते आजचे इस्रायल, जेरुसलेम, हैफा आणि दमास्कस या प्रदेशांवरील आक्रमणात भाग घेतला व यशात त्यांचा मोठा वाटा होता. परंतु, युद्ध संपुष्टात आले, तेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी फार प्रसिद्धी न देता साइक्स-पिको; जे इंग्लंड आणि फ्रान्सचे प्रतिनिधी होते; यांच्यात त्यांनी ठरवलेल्या कराराप्रमाणे सध्याच्या सीमा निश्चित केल्या व सौदी अरेबिया, इराक, सीरिया, जॉर्डन, इस्रायल व लेबानॉन हे देश अस्तित्वात आले.

अशी फाळणी करताना त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या, विशेष करून अरब जमातींच्या नात्यांना, भावनांना आणि मतांना काहीही वजन न देता कृत्रिम सीमा अस्तित्वात आणल्या. तेव्हा उत्पन्न झालेले संघर्ष आजही पश्चिम आशियाला सतावत असून आता ते न सुटणारे कोडे झाले आहे. याखेरीज भारतीय सैनिकांनी गॅलिपोलीच्या लढाईत अत्यंत अल्पसंख्येने भाग घेतला होता आणि पूर्व आफ्रिकेत संरक्षणाची भूमिका घेऊन जर्मन प्रभावाला या ठिकाणी वाढू दिले नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर विमानांचा वापर आधी गस्त घालण्यासाठी व नंतर हल्ले करण्यासाठी होऊ लागला होता; परंतु त्या काळची विमाने विशेष विकसित झालेली नव्हती आणि त्यांची दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता अधिक होती. त्या काळचे हवाई दल बाल्यावस्थेत होते. त्यातही भारतीय वंशाचे एकूण पाच वैमानिक होते. त्यात मुंबईचे श्रीकृष्ण चंद्र वेलीणकर (वेलिंगकर?) आणि रत्नागिरीचे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यांचा समावेश होता. वेलीणकर यांचे उड्डाणात अपघाती निधन झाले. पटवर्धन मेकॅनिक होते व त्यांचे काम इतके उत्कृष्ट होते, की त्यांना मानद (ऑनररी) सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.

पहिले महायुद्ध संपले, तेव्हा पंधरा लाख भारतीय सैनिक सेवेत होते. सुमारे ७० हजार मृत्युमुखी पडले व ६५ हजारांहून अधिक जखमी झाले. या वेळी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला गती मिळाली होती व अपेक्षा होती, की एवढ्या प्रचंड आणि महत्त्वाच्या योगदानानंतर ब्रिटिश साम्राज्याचे राज्यकर्ते भारतीय मागण्यांचा सहानुभूतीने विचार करतील. दोन प्रमुख मागण्या होत्या, की लष्करात भारतीय तरुणांना अधिकारी होण्याची संधी मिळावी आणि देशाला पूर्ण स्वातंत्र्य नाही, तर बहुतांश प्रमाणावर स्वायत्तता मिळावी. पहिल्या मागणीवर ब्रिटनने अगदी तुरळक संख्येत लष्करात भारतीय तरुणांना अधिकारी होण्याची संधी दिली व १९२० पासून ब्रिटन येथील सँडहर्स्ट अकादमीत दहा जागा राखीव ठेवल्या. नंतरचे जनरल के. एम. करिअप्पा आणि एस. पी. पी. थोरात या काळचे अधिकारी होते.

स्वातंत्र्याच्या मागणीवर मात्र ब्रिटनच्या सरकारने पाणी फिरवले. उलट रौलट कायदा लागू करण्यात आला आणि कळस म्हणजे १९१९ मध्ये बैसाखीच्या दिवशी जनरल डायरने अमृतसर येथील जालियनवाला बागेत जाणीवपूर्वक हत्याकांड घडवले. यामुळे स्वातंत्र्य चळवळीत अधिक कटुता आली. परंतु, ब्रिटीश सरकारला भारतीय सैनिकांच्या सेवेची दखल घ्यावीच लागली आणि पुढील काळात सैन्यदलात भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांना आणखी जबाबदाऱ्या द्याव्या लागल्या. ज्याचा उपयोग स्वातंत्र्यानंतर परत सैन्यदलांच्या उभारणीत झाला. जेव्हा पहिले सैनिक फ्रान्सला गेले तेव्हा त्याना कल्पना नसेल, की सामाजिक परिवर्तनात ते भाग घेत आहेत. त्यांना आपला प्रणाम!

— आर. आर. पळसोकर

(लेखक निवृत्त ब्रिगेडिअर आहेत.)

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..