नवीन लेखन...

तुमचं आमचं ‘सेम’ असतं !

देवाने सगळीकडे सारखी माणसे निर्माण केली. चराचर सृष्टीही सारखीच बनवली? एका संध्याकाळी ‘आफ्रिका हाऊस’ समोरच्या कट्ट्यावरून दर्याची शोभा पाहिली. हिंदी महासागरातल्या आणि विषुववृत्ताला खेटून असणार्‍या बेटावर एक अप्रतिम सोहळा रंगला होता. समोर भगवान सूर्यनारायण शेंदरी रंगाच्या रथातून प्रयाणाची सिध्दता करत होते. डावीकडली हिरवी टेकडी बघता बघता करड्या रंगाची झाली. उजवीकडल्या बंदरातली वर्दळ निवली. किनार्‍याकडे येणार्‍या बोटींचे दिवे मालवायला लागले. पाठीमागे झांझीबार शहरात संध्याकाळ होत होती. मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरची संध्याकाळ किती रूबाबदार.. थेट देखण्या मुंबईकर युवती सारखी ! या बेटावरची संध्याकाळ म्हणजे चक्क घुंघट घेऊन दबकत येणारी नववधू. देश वेगळे, शहर पण किती वेगळे. मात्र संध्याकाळचे रूप किती सारखेच गोजिरवाणे !


दुसर्‍या दिवसाच्या उद्याच्या प्रवासासाठी बॅग भरत असताना एका दोस्ताची ई-मेल आली. त्याने परदेश वास्तव्यासाठी शुभेच्छा पाठवताना जुने चित्रपट गीत उल्लेखले होते,

एका रात्री इथून पसार ….. दुसर्‍या रात्री दर्यापार
हुश्शार, भाई हुश्शार! …….. झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटातले वेड्यांच्या इस्पितळातल्या रहिवाशांनी गायलेले मस्त गाणे. मनात आले, त्या मध्यरात्री मुंबईचा एक वेडा शहाण्यांच्या देशाला जाईल – दर्यापार, दर्यापार.

झांझीबारला जाणार्‍या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे. नैरोबीला पहिला टप्पा घेतल्यावर थेट झांझीबारला भरारी. पायलटने वाटेत अचानक घोषणा केली, ‘‘आपण किलिमांजारोच्या शुभ्र पर्वत-माथ्याला प्रदक्षिणा घालत आहोत.’’ हे भगवंताने निर्माण केलेले धरतीवरचे अनोखे रूप मनात साठवत असतानाच झांझीबारला येऊन पोचलो.

आपण परदेशात गेल्यावर अगदी नकळत तुलना करू लागतो – त्यांची व आपली. दुसर्‍या दिवशी जाग आल्यावर कोंबड्याची बांग ऐकून वाटले… अरेच्चा, आमच्या मुरूड-जंजिर्‍याचा कोंबडाही अगदी अस्साच आरवतो. झांझीबारचा कोंबडा मग तो काय ‘स्वाहिली’मधे आरवणार? समुद्रकिनार्‍याजवळच्या नारळ विक्रेत्याकडून शहाळे घेतले. पाण्याच्या चवीत फरक नव्हता. पण विक्रेत्यात होता. भारतात शहाळे सोलतांना दुकानदाराची चपळाई बघायला खूप मजा येते. कोयत्याच्या अचूक घावाने सोलणे. मग शहाळ्याच्याच एका टवक्यातून खोबरे काढण्याचा चपटा चाकू बनवणे आणि चाकूनेच खोबरे खरवडणे. सोहळा पाहतांना दुकानदाराचे कौशल्य समजते. मुरूड-जंजिर्‍याच्या, गोव्याच्या, मुंबईच्या, किंवा कोचीनच्या शहाळे दुकानदारांची चपळाई आणि कसब सारखेच जाणवते. कारण ते केरळचे असावे वा केरळमधून आयात झालेले असते. मात्र झांझीबारच्या शहाळे-विक्रेत्याचा कोयता वेगळा, झटपट वेगळी. मग जाणवते, खरंच देश-विदेशातली माणसे वेगळी असतात? स्वभावात, धर्म-भावनेत, किंवा शकुन-अपशकुन मानण्यात.

शेजारच्या गल्लीत सुलेमानचे किराणा दुकान आहे. एकदा मी सुलेमानला विचारले, गिर्‍हाइकाला माल देताना असा डाव्या हाताला उजव्या हाताने स्पर्श का करतोस? त्याला उत्तर माहीत नव्हते. पण नंतर एकदा मस्त गप्पा मारताना त्याला बर्‍याच आफ्रिकन शुभ व अशुभ शकुनांचे गंमतीचे किस्से आठवले. म्हणाला, ‘‘सर, आमच्यात गरोदर बाईने प्राण्यांचा झू बघायला जायचं नसते कारण वाघोबाला आईच्या पोटातले बाळ दिसते म्हणतात व तो जिभल्या चाटायला लागतो. बाळाचे पहिल्या वाढदिवसापर्यंत केस कापायचे नसतात. बायकोला कधीही बूटाचा जोड भेट द्यायचा नसतो. दिलाच तर ती सोडून जाते’’. मग हसून म्हटले, ‘‘बायको नकोशी झाली की तिला खुश्शाल बुटाचा एक झकास जोड भेट द्यायचा’’. सुलेमान सांगत होता, ‘‘लहान मुलांना घरातला केर करायला कधी सांगू नये कारण त्यामुळे घरात चोर येतील. गप्पात रंगलेल्या सुलेमानने शेवटचा किस्सा सांगतांना म्हटले, साहेब उजव्या पंजाला खाज येत असली की आज हमखास धनलाभ होणार’’. त्यासरशी मला सुखद धक्का बसला. म्हणालो, ‘‘अरे आम्ही पण तेच मानतो’’. एकमेकांपासून वर्षानुवर्षे हजारो मैलांवर राहणार्‍या माणसांचे धर्म वेगळे असतील. पण समजुती-लकबी सारख्या कशा? का खरंच भगवंताने एकाच पिंपातला बचक बचक ‘डीएनए’ जगातल्या आपल्या सर्व बछड्यांना अगदी सारखा वाटला !

“सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर
आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार…”

‘विंचु चावला’ भारूडात सर्वप्रथम डोंगराला वंदन झाले. तर स्थानिक टांझानियन जनता किलीमांजारोला ‘माऊंटन ऑफ गॉड’ मानते. कारण या ज्वालामुखी पर्वताने सारा प्रदेश सुपीक बनवला व लोकांना श्रीमंत केले.

शास्त्रज्ञ सांगतात, ‘माथ्यापासून थेट चारशे मीटर खोल गेल्यावर पर्वताच्या उदरात खदखदणारा लाव्हा रस आढळेल. तसा धरतीपासून ४६०० मीटर उंची गाठणारा हा डोंगर इथल्या धरतीवरचा सर्वात उंच पर्वत.

एक लाख वर्षांपूर्वी पर्वतमाथ्यावर ज्वालामुखीचा नुसता डोंब उसळला होता. अन्य दोन माथ्यावर तर तो अद्याप धुमसत असतो !’

विमानाने धावपट्टीवर उतरण्यापूर्वी आसमंतात एक सुरेख प्रदक्षिणा घेतली आणि त्यावेळी चारही बाजूंनी सागराने वेढलेले आख्खे झांझीबार बेट आणि बेटावरची गर्द झाडी एका दृष्टीक्षेपात सामावली. जणू ते होते या बेटाचे पोर्ट्रेट !

कही दूर दिन ढल जाये – सांज की दुलहन बदन चुराये,

छुपकेसे आये… छुपकेसे आये… !

— अरुण मोकाशी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..