नवीन लेखन...

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. माझी झांझीबारच्या रस्ते वाहतूक, जलमार्ग व हवाई वाहतूकीची कृतियोजना अहवाल तयार करून सरकारला सादर करण्यासाठी नेमणूक झाली. यासाठी दोन वर्षे सहज लागणार होते. मी म्होरक्या म्हणजे ‘टीम लीडर’ होतो. नेहमीप्रमाणे माझ्या टीममध्ये देशोदेशीच्या परिवहन क्षेत्र विशेषज्ञांचा समावेश होता.

आता मनाला आणि पायाला चक्क भिंगरी लागली. तशी परदेशात ‘पाट्या टाकायला’ जाण्यासाठी मी काही अगदीच ‘पहिलटकरीण’ नव्हतो. तरीपण रंगीत अॅटलसचे लठ्ठ पुस्तक हातात घ्यायला लागलेच. यावेळी झांझीबारचे प्रकल्प -ऑफिस उभे करण्याचे काम पण माझ्याकडे आले होते. टेबल, खुर्च्या, स्टेशनरी, खिडक्यांचे पडदे, चहा-कॉफीच्या पॅंट्रीतल्या कपबश्या, किटलीपासून गाळणीपर्यंत सारा संसार मांडायचा. मुख्य म्हणजे स्थानिक मदतनीस सहकार्‍यांची निवड करायची होती. त्यात सेक्रेटरी, हिशेब तपासनीस, लेखापाल व गाडीचा ड्रायव्हर हे आलेच. तसे हे काम कटकटीचे नसते. पण परदेशीयांची इंग्रजी बोलण्याची लकब, उच्चार, बोलण्यातला ठसका,विनोद बुध्दी. म्हणजे नुकत्याच देशात आलेल्याला जरा नवखेच. आमचे सदस्य वेगवगळ्या देशातून येणार. त्यांना ‘राम राम मंडळी’ करण्याचा व मैत्री जोडण्याचा सोहळा पण मोठा अभूतपूर्व ठरणार होता. ते सर्वजण एकत्र एका वेळीच येत नाहीत म्हणून जरा बरे. कामाला तर काय ते येण्यापूर्वीच सुरूवात झालेली असते.

मग अंमलदारांच्या गाठीभेटीच्या कामाला प्रारंभ होतो आणि तेव्हा कामाला अधिकृतपणे प्रारंभ होतो. खरं तर तसा आफ्रिका हजारो मैलावरचा देश. पण धंद्याच्या म्हणजे कार्यपध्दतीच्या गप्पा निघाल्या की वाटते माहेरीच आलो. त्यातून मंत्रालयातल्या बर्‍याच अंमलदारांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, चेन्नईच्या विद्यापीठात एक दोन वर्षे काढलेली असतात. त्यांना भेटणे म्हणजे तर एक  पर्वणीच. एक जण हमखास विचारतो, चर्चगेट स्टेशन जवळचा वडापाववाला अजून तिथेच उभा असतो? चर्चगेटच्या पुरोहीत रेस्टॉरंटमधल्या श्रीखंडाची चव साहेबांच्या जिभेवर अद्याप रेंगाळत असते. दुसर्‍याला पुण्याच्या चितळ्यांची चिक्की आठवते. तिसर्‍याला दिल्लीचा पेठा.

सर्व टीम ऑफीसला बुट्टी मारून निरोप देण्यासाठी विमानतळावर आली.

परिवहन मंत्रालयात किबावे सर भेटले आणि गप्पांना विशेष रंग चढला. ते दिल्लीत दीड वर्ष राहिले होते. संगीतामध्ये त्यांना विशेष रस. इंडियन फिल्मी गाण्यातली त्यांना दोन गीते आवडायची. पहिले गीत ‘लक्ष्य’ या चित्रपटातले हृतिक व प्रीती यांच्यावर चित्रीत झालेले, ‘‘कितनी बाते याद आती है, तस्वीरेसी बन जाती है, मै कैसे इन्हे भूलू, दिल को क्या समझाऊ’’. साधनाताई व हरिहरनच्या स्वरातले थेट काळजाला भिडणारे बॉलिवूडचे हे अविस्मरणीय गीत. युध्दाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या प्रियकराला निरोप देतांना गायलेले. झांझीबारी उच्चारात सांगताना सर इतके रंगून जायचे. त्यांचे दुसरे आवडीचे गीत होते ‘हम दोनो’ चित्रपटातले, ‘‘अभी ना जाओ छोडके’’. देव आनंद व साधनावर चित्रीत झालेले. या गीतातल्या सिगारेट लायटरवरचे सूर होते सरांच्या खूप पसंतीचे. अगदी न राहवून सरांनी एकदा विचारले, ‘‘असा लायटर इंडियात मिळेल?’’. मी नंतर लायटरचा मुंबईत शोध केला. पण १९६१ सालातल्या या गीतातला लायटर मिळाला नाहीच. किबावे सर म्हणजे बॉलिवूडने विश्वमैत्री संपादन केलेला एक मित्र. सरांना गीतातला शब्दन् शब्द अर्थ कुणीतरी समजावून सांगितलाही असेल पण खरं तर गीतातले नादब्रह्म त्यांना वेड लावायचे. ही तर ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ ची साक्षात् प्रचीती. सगळयाच देशात हमखास भेटतात असे हे बॉलिवूडचे वेडे मित्र. किबावे सरांसारखा असा कुणी भेटला की थेट साक्षात्कार होतो, ‘अवघा रंग एकचि झाला’.

झांझीबार परिवहन सुधारणांची जंत्री तयार झाली. एथिओपियात आदिस अबाबाला भेटलेल्या विश्वबँकेतला जपानी परिवहन तज्ज्ञ ‘मिनाटो’ने सांगितलेली यातली एक खुबी आठवली. त्याच्याशी लगेच फोनवर बोलून घेतले आणि त्याने तर बॅंकेचा नुकताच प्रसिध्द झालेला सारा अहवालच पाठविला. खूप उपयोग झाला त्याचा. हॉलंडहून आलेल्या रॉनने सार्वजनिक परिवहन संस्था स्थापण्याचे आमच्या अहवालातले एक ऐटबाज प्रकरण लिहिले. मंत्रालय खूष झाले. झांझिबारचे डॉ. राव सर, दारेसालामचे पर्यावरण तज्ज्ञ प्रोफेसर पॉल मांडा सरांनी त्यांच्या झांझीबारी शैलीत एक सुरेख सादरीकरण केले. माझा टीम सदस्य इंजिनिअर गॉडविनने छान काम केले. अॅनास्टीसीसने अर्थ विषयाचा आढावा सादर केला व पुढील कृतीयोजना सांगितल्या, दिल्लीहून खास आलेले मलीक सर आणि अन्य सभासदांच्या सहाय्याने झांझीबार अहवालाचा जगन्नाथ रथ अगदी लीलया नाही पण रूबाबात ओढला.

सेक्रेटरी अडॉल्फीना देखणी आणि हरकामात चुणचुणीत. साधी डॉलरची मोड म्हणजे चेंज घेऊन यायला सांगितल्यावर तीन चार परकीय चलन ब्यूरोत जाऊन चांगला भाव देणार्‍याकडून झांझीबारी नोटा घेऊन येत असे. पण तिच्या बाबतीत खरे सांगायचे म्हणजे दुकानात आलेल्या या देखण्या मुलीचे सर्वच दुकानात स्वागत व्हायचे. असे भारतातच घडते असं नाही.. झांझीबारमध्येही होते. माझी पत्नी सुट्टीसाठी झांझीबारला आली असतांना अॅडॉल्फीना व जॉइसने कुंकवाच्या टिकल्या मागून घेतल्या आणि दोघींनी कपाळाला चिकटवल्या. मग दिवसभर ऑफीसमध्ये बिनधास्त मिरवत बसल्या. अॅडॉल्फीना तर थेट मंत्रालयात गेली व फोरहेडवरचा इंडियन रेड मार्करूबाबात फातिमाला दाखवून आली.

ही डायरी लिहितांना दिनकर गांगलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच “मराठीसृष्टी.कॉम”चे निनाद प्रधान यांचे बहुमोल सहाय्य लाभले. मुंबई सकाळचेसंपादक पद्मभूषण देशपांडे व त्यांचे सहकारी वैशाली रोडे व सीमा राऊत यांचे पण मोलाचे सहाय्य मिळाले. सकाळने तर झांझीबार डायरीलिहीत असतानाच क्रमवार सकाळच्या स्तंभात प्रसिध्द केली.

प्रकल्पाची २०१२ आणि २०१३ अशी दोन वर्षे संपली. मुंबईला परतण्याचा दिवस जवळ आला. सर्व टीम निरोप द्यायला विमानतळावर आली. मला सारखे भरून येत होते. झूबे तर भावनाविवश झाला होता आणि रडत होता.  त्याने धावत येऊन कडकडून मिठी मारली. विमानाने झेप घेतल्यावर वातानुकुल वार्‍याचा थंडगार स्पर्श झाला.  खांदा तर पार गारठला होता. झूबेच्या आसवांनी तो पार माखला होता.

झांझीबारचे दिवस मंतरलेले होते. हिंदी महासागराच्या पलिकडल्या काठावरची आपलीच माणसे झांझीबारला भेटली होती. खूप माया लावणारी… आपल्याच माणसांसारखीच. खरं तर दोन वर्षांचा तो सोहळा होता.

रंगी रंगला श्रीरंग
अवघा रंग एकचि झाला

— अरूण मोकाशी   

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..