नवीन लेखन...

सेरेंगेटीचे जिराफ

एखादी जिराफीण खूप आवडल्यावर तो आपल्या खोकल्याच्या मर्दानी आवाजाने तिच्यावर जबरदस्त भुरळ घालतो. मग जिराफीण त्याच्याभोवती सारखी घोटाळत राहते – हा प्रणयाराधन-सोहळा जगासमोर आला सेरेंगेटीच्या अगदी ताज्या संशोधनांतून ! जिराफ तसे शांत स्वभावाचे. इतरांशी वेगवेगळ्या आवाजात संवाद साधतात. प्रौढ नर कळपात मिसळून राहतात. मोठे होतात तसे एकलकोंडे बनत जातात. नरांना भटकणे खूप प्रिय म्हणून एका कळपातून दुसर्‍या कळपात ये-जा करतात. कळपाचे अस्तित्व आठवडे-महिन्यांपुरते टिकते. आया पिलांवर सतत नजर ठेऊन असतात. बछडे मस्तपैकी हंबरत इकडे तिकडे बागडतात. जिराफांना खिंकाळायला फार आवडते. काही तर झोपेत पण मस्त घोरतात. जिराफ प्रजोत्पादनासाठी मादीच्या मूत्राची चव चाखून ती तयार असल्याची खात्री करतो. नरांना तरूण माद्याच हव्या असतात. ‘परकरातल्या पोरकट’ पोरी किंवा ‘वयस्कर मावश्यां’कडे दुर्लक्ष करतात. एकदा त्याला मादी आवडली की तिच्याशी लाडीगोडी चालू होते. अन्य नर लुडबुड करायला आलेच तर अजिबात खपत नाही.


बाळ जन्मले की संगोपनाची जबाबदारी सर्वस्वी आईची. लेकूरवाळ्या आया बाळाच्या जवळपास राहतात. गरोदरपण सुमारे ४००-४६० दिवस असते. तिची उभ्यानेच प्रसूती होते. जन्मताना बाळाचे डोके व पुढले पाय प्रथम उदरातून बाहेर येतात. बाळ जमिनीवर पडतांना त्याची नाळ वेगळी होते. आई त्याला लगेच उभे राहायला सांगते. काय ही भगवंताची अगाध करणी! नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईची भाषा समजते? पोटात असल्यापासून आईशी संवाद चालू असतो म्हणतात. जिराफाच्या बाबतीत तरी खरे वाटते. जन्मतः बाळाची उंची १.८ मीटर म्हणजे तब्बल सहा फूट असते. त्याचे बागडणे पाहिल्यावर तो काही तासांपूर्वी जन्माला आला की आहे आपला एक दीड आठवड्याचा, असे वाटावे. बाळ दोन तीन आठवडे सतत आईच्या मागे मागे असते. त्याच्या अंगावरची लव वाढायला सुरूवात होते. आईच्या पोटात असतांना बारीक लव अंगावर पसरलेली असते. जन्मल्यानंतर लगेच केस ताठ व्हायला लागतात.


बरेच कळप जवळ राहायला लागल्यावर चक्क बाळांची ‘नर्सरी’ स्थापन होते. मास्तरणीकडे सोपवून जिराफ-आई दैनंदिन कामाला जाते. वडिलांचा या कार्यात काडीचा सहभाग नसतो. तो बाळाशी दोस्ती करत खेळतांना दिसतो. अन्य पशूंपासून बाळाला धोका असतो. हिंस्त्र प्राणी बाळाजवळ आलाच तर आई बाळाला कुशीत म्हणजे लांब पायांमधे हलकेच घेते. बाळाने वेडे चाळे केले तर त्याला दणकट लाथेने पण प्रेमाने हलकासा धक्का देते. आई बाळाला एक महिना ते वर्षभर अंगावर पाजते.

दक्षिण आफ्रिकेतील आदिवासी रोग बरा करण्यासाठी खास नृत्ये सादर करतात. उदाहरणार्थ, डोक्याचे दुखणे घालविण्यासाठी असते ‘जिराफ नृत्य’. पूर्व आफ्रिकेतल्या एका नृत्यगीतात म्हटले आहे, ‘‘जिराफ एवढा उंच का झाला ते सांगू ?-अहो, त्याने जादूच्या औषधी-मुळ्या खाल्या!’’. १४१४ साली एक जिराफ झांझीबारहून भारतात बंगालला व तेथून चीनमधे नेले. तेव्हापासून जिराफ खूप लोकप्रिय झाला.

शास्त्रज्ञांनी जिराफांचा उपयोग काही प्रयोगांमध्ये तसेच संशोधन कार्यात पण केला आहे. विशेषतः अंतराळ-वीरांसाठी आणि लढाऊ विमाने चालविणार्‍या वैमानिकांसाठी लागणारे खास सूट जिराफाच्या कातड्याचे करतात. कारण अशा पायलटांना विमान चालवतांना रक्तदाब  वाढतो व रक्त अचानक वेगाने पायाकडे वाहायला लागते. त्यामुळे होणारा त्रास जिराफाच्या कातड्याच्या वस्त्राने कमी होतो. ही प्रक्रिया संगणक शास्त्रज्ञांनी संगणकावर चित्रीत केली आहे. प्राचीन खगोल शास्त्रज्ञांनी आकाशात जिराफ नक्षत्र असल्याचा दावा केला आहे. बोटस्वाना देशवासीयांनी या नक्षत्रात दोन जिराफांची म्हणजे नर-मादीची प्रतिमा असल्याचे म्हटले आहे.

जिराफ प्रथमच नव्या एखाद्या देशात आल्यावर त्या देशाचे नागरिक मोठ्या जिज्ञासेने व उत्साहाने जिराफाचे स्वागत करत. भारतात जिराफ १४१४ साली पूर्व आफ्रिकेतल्या मालीन्दी बंदरातून  आणला होता अशी नोंद आढळते. ‘झेंग’ या चिनी प्रवाशाने हा जिराफ भारतातून थेट चीनला नेला व एका प्राणी संग्रहालयात ठेवला.  भारतात आणि चीनमध्ये जिराफाचे मोठ्या उत्साहाने स्वागत झाले. चिनी लोकांनी तर जिराफ पाहून एखाद्या परीकथेतल्या भूमीत आल्यासारखे वाटले. जेव्हा जिराफ फ्लॉरेन्स शहरात प्रथम आणला तेव्हा शहरवासीयांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. एकोणीसाव्या शतकात जिराफ इराणमध्ये आणला तेव्हा तिथेही नागरिक जिराफ पाहून भान हरपून गेले. त्याच्यावर इराणी लेखकांनी बरेच लिखाण केले.

जिराफांची शिकार ही शिकार्‍यांना असते एक आगळीच पर्वणी

जिराफांची शिकार ही  आफ्रिकन शिकार्‍यांना एक पर्वणी वाटण्याची मुख्य कारणे जिराफाचे शरीर निरनिराळ्या देशात वेगवगळ्या कारणासाठी वापरण्यात येते. प्रथम म्हणजे जिराफाचे मांस स्वादिष्ट म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या शेपटीचे केस बांगड्या, माळा आणि शिवणकामात दोर म्हणून वापरतात. ढालीमध्ये, नगार्‍यामध्ये जिराफच्या कातडीचा उपयोग होतो. तसेच त्याच्या कातडीचा,  हाडांचा वादन उपकरणात वापरतात. युगांडा देशात जळणार्‍या कातडीचा नाकातून होणारा रक्तप्रवाह थांबविण्यासाठी होतो. एकोणीसाव्या शतकात युरोपियन प्रवाशांना जिराफांची शिकार म्हणजे अत्यंत आवडीचा खेळ वाटायचा. जंगलतोडीमुळे आता जिराफांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिराफ तसे इतर प्राण्याबरोबर झगडा न करता मोठ्या आनंदात राहू शकतात.

आफ्रिकेमधील शिकार्‍यांच्या काही क्लबमध्ये खास जिराफांची शिकार करण्यासाठी खास सोयी उपलब्ध केल्या आहेत. फक्त शिकारीसाठी पंधराशे पौंड आणि मदतनीसांसाठी प्रत्येकी दररोज एक हजार पौड असा स्वस्त दर पण उपलब्ध आहे. प्रत्यक्ष एका शिकारीसाठी तीन ते पाच दिवसांचा अवधी द्यावा लागतो. त्यावेळी ‘विंचेस्टर मॅग्नम’ या बनावटीची बंदूक पण भाड्याने मिळण्याची सोय आहे. म्हणजे शिकारीचा संपूर्ण खर्च पाच आकड्यात सहजपणे जातो. जिराफांची संख्या कमी कमी होत चालली हे  ओघाने आलेच.  मात्र एका तज्ज्ञाच्या मते, दक्षिण आफ्रिका, नामेबिया आणि झिंबाब्वे या देशात एके वेळी हा व्यवसाय चांगलाच फळफळला होता. त्याच्या मते, जगातल्या जिराफांची संख्या १९८८ साली एक लाख चाळीस हजार होती. ती आता ऐंशी हजारावर घसरली आहे. यामुळे जिराफ आता लवकरच नष्ट होणार्‍या प्राण्यांच्या यादीत जायला हवा. अंगोला, माली व नायजेरिया या देशात जिराफ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर रूवांडा व स्वाझीलॅंड मध्ये त्यांची संख्या वाढविण्याचे रीतसर प्रयत्न चालू आहेत.

जिराफच्या जवळपास कधी गेलात तर त्याच्या चाव्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र त्याने कधी लाथ मारली तर ती जबरदस्त ठरेल. त्याच्या एका लाथेने सिंहही ठार झाल्याचे मानले जाते. ते शक्यतो हिंस्त्र श्वापदापासून दूरच राहतात. त्यांचे नेहमी तत्व हाणामारीपासून दूर राहायचे. पण कुणी त्यांना मारण्याच्या हेतूने जवळ आलाच तर किंवा त्याच्या बाळाच्या वाटेला गेला तर  त्याचे माथे भडकेल व तर तो मागील पायांनी लाथा झाडायला सुरूवात करेल. निसर्गाने त्यांना लांबलचक मान देऊन उंची दिली ती वृक्षांवरच्या उंचीवरची कोवळी पाने खाण्यासाठी. त्याच्या कवटीचे वजन दहा वर्षांचा झाल्यानंतर वाढायला लागते. दहा वर्षांच्या जिराफाची कवटी सतरा पौंडापेक्षा जास्त वजनाची असते. जिराफाला जन्मापासून शिंग असते. अगदी वेळ आलीच तर तो शिंगांनी प्रतिकारही करू शकतो. युध्द प्रसंगी जिराफ समर आरोळी देतात. ती इतकी कर्कश्श असते की तिचा आवाज एक किलोमीटरवरही ऐकू येतो. मात्र सहसा जिराफ युध्दासाठी समोरासमोर उभे ठाकत नाहीत. शक्यतो ते पळ काढतात. जेव्हा शिकार्‍यांनी जिराफांची झुंज चित्रीत केली तेव्हा त्यांना अशी संधी येण्यासाठी सबंध एक महिना प्रतिक्षा करावी लागली. कारण जिराफ झुंझीला तयारच नसतात. मात्र चित्रीकरणाचे जवळून निरीक्षण केले तेव्हा आढळले की जिराफांचे झुंझीमध्ये एक वेगळे स्वतःचे तंत्र असते. अलिकडे रात्रीच्या अंधारातील चित्रीकरणाचे शास्त्र प्रगत झाले असल्याने हिंस्त्र प्राण्यांच्या झुंजी चित्रीत करणे शक्य झाले आहे.

जिराफांची वंश चिरंजीवीता

एका पशू संवर्धन संस्थेच्या अभ्यासानुसार आफ्रिकेतल्या जिराफांची एकूण संख्या १४००० भरली. त्यातले चाळीस टक्के जिराफ संरक्षित जंगल टापूत आहेत त्यामुळे तसे त्यांना संरक्षण प्राप्त झाले आहे. या जंगलातले जिराफ नष्ट होण्याची शक्यता कमी आहे. आणखी एका संशोधन अभ्यासात जिराफांची संख्या ऐंशी हजार असल्याचे आढळले आहे. म्हणजे जिराफ संख्या झपाट्याने रोडावत चालल्याचे स्पष्ट झाले. अंगोला व पश्चिम आफ्रिकेखेरीज अन्य जंगलातील जिराफ संख्या झपाट्याने घसरत आहे. याचे कारण केवळ चोरटी शिकार एवढेच नाही तर जंगलतोड व माणसांचा जंगल संपत्तीवरील बेछूट हल्ला हे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..