नवीन लेखन...

सेरेंगेटीतील श्वापदांचे अदभुत स्थलांतर

झांझीबार ते सेरेंगेटी फक्त सहाशे मैलांचा आमचा प्रवास मंतरलेल्या मनाने झाला.

टांझानिया-केनिया सरहद्दीवर होणारे वार्षिक स्थलांतर हा जगातील थक्क करणारा अद्भूत वार्षिक सोहळा आहे. असे स्थलांतर जगात अन्यत्र घडत नाही.

यावेळी वन्य प्राणी मे अखेर टान्झानियाच्या सेरेंगेटीच्या पठारी अरण्यवनातून केनियाच्या मसाई मारा या डोंगराळ टापूकडे नैऋत्य दिशेने धाव घेतात व डिसेंबर महिन्यात पुन्हा सेरेंगेटीला परततात. या जंगली प्राणीसमुदायात सुमारे चौदा लक्ष जनावरे असतात.

प्राणी-यात्रेतली एक अदभुत बाब म्हणजे, बलाढ्य जनावरे घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे दरवर्षी बरोब्बर एकाच वेळी निघतात – अठराशे मैलाच्या यात्रेला. लक्ष्य गाठायचे असते केनियातील हिरव्यागार विस्तीर्ण प्रदेशाचे.

सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात. इकडे वाटेवरच्या तळ्यात मगरी गर्दीत वाट चुकलेल्या प्राण्यांच्या प्रतिक्षेत टपून निपचित पडलेल्या असतात. सेरेंगेटीहून ही पलटण निघाल्यावर हजारो वन्य बैल गुरगुरत या यात्रेत सामील होतात. वनगायींना फटकारत त्यांच्यावर आपल्या पुरूषी मर्दपणाचा निर्लज्जपणे हक्क बजावतात. परिणामतः असंख्य नवे तान्हे प्राणी जन्माला येतात.

हा वन्य प्राणी समुदाय मुख्यत्वे सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान व गोरोंगोरोच्या संरक्षित क्षेत्रात भटकत असतो. प्रत्यक्ष स्थलांतरात बऱ्याच वेळा नदी ओलांडण्याच्या केविलवाण्या धडीपडीत लहान जनावरे पाण्यात पडून मरून जातात. काही खुरडत खुरडत चालताना अन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.

मे अखेर पावसाळा संपल्यावर प्राणी वायव्य दिशेने ग्रुमेती नदी ओलांडून केनियात जाण्याची तयारी करतात. पैलतीरी ते जून अखेर राहतात. ऑगस्टच्या सुरूवातीला सर्व कोरड्या काळात तेथे राहतात. हरणे मुख्यतः पूर्व-पश्चिम दिशांनी वावरतात. नोव्हेंबर महिना उजाडल्यावर परतीची हालचाल सुरू होते. डिसेंबर महिन्यात टांझानियात परतल्यावर त्यांना कोवळे गवत उपलब्ध असते. जानेवारी ते मार्च मध्य दरम्यानच्या  कालावधीत सुमारे पाच लक्ष नवी अर्भके जन्मास येतात. पृथ्वीवरचे हे एक अभूतपूर्व नाट्य असते ! काही आया पूर्ण दिवस भरायच्या आत प्रसूत होतात. त्यामुळे त्यातली अगदी थोडकीच बचावतात. सेरेंगेटीचा भूप्रदेश समुद्रसपाटीपासून ९२० ते १८५० मीटर उंचीवर आहे. सरासरी तपमान १५ ते २५ सेंटिग्रेडच्या  आसपास असते. पावसाळा दोन टप्प्यात येतो. मार्च ते मे आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर. पर्जन्यवृष्टी ५०८ ते १२०० मिमि (२०-४७ इंच) इतकी होते.

टान्झानिया-मसाई मारा जंगलाच्या ८०० किमी प्रवासात सुमारे अडीच लाख श्वापदाचा मृत्यू होतो. एवढ्या मोठ्या संख्येने प्राणी मरण्याचे कारण तहान, भूक, दमछाक किंवा अन्य श्वापदांकडून भक्षण हे असते. अलिकडच्या संशोधनात एक अवलोकन होते, सेरेंगेटी परतीच्या सहा आठवड्याच्या धुमश्र्चक्रीत सर्व माऊल्या बछड्यांना घेऊन खुरडत खुरडत घरी परततात. बाळांचे बाबा पहिले काही दिवस बाळाचे संरक्षण करतात आणि मग गायब होतात. कुठे जातात ते? सेरेंगेटीच्या अरण्यवासात ते आपले खुशाल उंडारत असतात – दुसऱ्या मादीच्या शोधात!

या जगप्रसिध्द स्थानांतरात दरवर्षी एकूण सुमारे चौदा लक्ष प्राणी असतात. त्यात केवळ झेब्रा व हरणाची संख्या सुमार दोन लक्षावर असते. या यात्रेच्या सहा आठवड्यांच्या कालावधीत प्राणी चार लक्ष अर्भकाना जन्म देतात. जानेवारी ते मार्च दरम्यान परिसरातल्या हिरव्यागार चाऱ्यावर गुजराण करतात. जनावराचा परतीचा प्रवास जुलै ते ऑक्टोबर कालावधीत होतो.  जानेवारी ते मार्च कालावधीत पर्यटक येतात. वाटेत त्यांना ‘मारा नदी’ ओलांडावी लागते. या नदीत पाण्यातील बरेच हिंस्त्र प्राणी परतणाऱ्या जनावरांच्या प्रतिक्षेत असतात. पण जास्त करून गर्दीत चेंगरून मरणाऱ्या प्राण्यांची संख्या जास्त असते.

या सफरीतल्या जनावरांचे जवळून केलेले अवलोकन फार चित्तवेधक आहे.

जिराफ आपल्या वीस इंच जिभेने सतत कान चाटतांना दिसतात. ती कानांची जणूं आंघोळच असते. मगरीची त्वचा माणसांच्या नखासारखी कडक असते. वनराज सिंहाला भूक लागते त्यावेळी तो पंचाऐशी पौड मांस फस्त करतो. चित्त्याचे तहानेवर खूप नियंत्रण असते. त्याला चार दिवसानंतर एकदा पाणी प्यायला मिळाले तरी चालते. मुंगूस विशेषतः हवाई बेटावर विपुल प्रमाणात आढळते. मात्र या आफ्रिकन स्थानांतरात त्याची हमखास हजेरी असते. साधारणतः श्वापदे त्यांच्या सर्व जीवनप्रवासात सुमारे तीस हजार मैल धावतात. मगरीला खोल पाण्यातही टक्क डोळे उघडे ठेऊन राहता येते. जिराफणीला बाळ होते तेव्हा त्याची उंची तब्बल सहा फूट भरते. सिंह दररोज वीस तास मस्तपैकी विश्रांती घेत पडून असतो. एका हत्तीच्या सोंडेत दहा हजार स्नायू आढळतात मात्र एकही हाड नसते. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या स्थलांतरात अवघ्या सहा आठवड्यात वन्य प्राण्यांची चार लक्ष पिले जन्मतात.

एकदा सेरेंगेटीच्या थेट मध्यातून तीनशे मैल लांबीचा रस्ता बांधण्याचा प्रस्ताव सादर झाला व तो २०१२ साली बांधण्यासाठी घेण्याचे ठरले होते. यामुळे व्हिक्टोरिया सरोवर ते पूर्व टांझानिया दरम्यानचा प्रवास करणाऱ्या स्थानिक लोकांना खूप सोयीचे झाले असते. पण या वार्षिक यात्रेला निघालेल्या प्राण्यांना मात्र रस्ता प्रचंड अडथळा ठरला असता. सरते शेवटी हा प्रस्ताव रद्द झाला. तज्ज्ञांच्या  मते हे स्थलांतर जगातल्या सात आश्चर्यापैकी एक आहे.

केनियातील वन्य प्राणी टापूचे ‘मसाई मारा राष्ट्रीय उद्यान’ असे अधिकृत नाव आहे. सेरेंगेटी श्वापद अरण्यवास सर्व मिळून 14,763 चौ. किमी इतक्या टापूत विस्तारला  आहे. या अरण्यवासाच्या संशोधनाला डॉ. बर्नहार्ड व मायकल ग्रिझमेक या जर्मन पिता-पुत्र जोडीने आरंभ केला. त्यांनी केलेले विस्मयकारक संशोधन ‘सेरेंगेटी कधीच अंत पावणार नाही’ (‘‘सेरेगेटी शॅल नेव्हर डाय’’) या पुस्तकात उपलब्ध आहे. श्वापदांच्या वास्तव्याबरोबरच सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान वर्षभर दुथडी भरून वाहणाऱ्या अनेक नद्यांसाठीही ख्यातनाम आहे. त्या सरितांची नावे आहेत – सेरोनारा, मारा, ग्रुनेटी आणि ओरेंगी.

स्थलांतराअगोदर फेब्रुवारी महिन्यात पाच लक्ष अर्भकांचा जन्म होतो. काही जन्मल्याबरोबर मरतात. कारण ती अन्य वन्य प्राण्यांच्या भक्षस्थानी पडतात. उरलेली पिलावळ मात्र आईसोबत प्रवासाला निघते. पावसाळा एप्रिल अखेर संपतो आणि जनावरे वायव्य दिशेला ग्रुमेती नदीच्या दिशेने प्रवासाला निघतात. या नदीच्या खोऱ्यात ते जून अखेर राहतात. मग जुलैमध्ये श्वापदांच्या मुख्य स्थानांतराला प्रारंभ होतो. त्यातल्या झेब्राचा मोठा कळप उत्तरेला केनियाच्या दिशेने निघतो व त्यांचे वास्तव्य ऑगस्टपर्यंत तिथे असते. त्यातली हरणे मात्र पूर्व-पश्र्चिम दिशेला वळतात. नोव्हेंबर महिना उजाडला की पावसाच्या सरी यायला लागतात आणि सर्व जनावरे मग दक्षिण दिशेने परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात. डिसेंबर महिन्यापर्यंत ती मुबलक गवताच्या दिशेने म्हणजे आग्नेयेकडे वळतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी असतो जनावरांचा प्रसूतीकाल -वासरांना जन्म देण्याची वेळ.

टांझानिया ते केनियाच्या मसाई माराच्या अरण्यापर्यंतचा पल्ला असतो आठशे किलोमीटरचा. या अंतरात अडीच लाख जनावरे मरतात. कारण असते तहान-भूक, दमछाक किंवा हिस्त्र प्राण्यांच्या भक्षस्थानी पडल्यामुळे. पावसाळा दोन टप्प्यात गोरोंगारो प्रदेशात सत्तेचाळीस इंचाच्या व्हिक्टोरिया सरोवराच्या परिसरात विभागला जातो. प्रत्यक्ष सेरेंगेटी अरण्य थंड खोऱ्यात वसले आहे. हा ज्वालामुखीच्या राखेने बनलेला प्रदेश असल्याने तिथे सूक्ष्म किडे-किटाणू मुबलक प्रमाणात आढळतात. या रम्य प्रदेशात कैक डिस्ने चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. वार्षिक वर्तुळाकार स्थलांतराच्या यात्रेतली जनावरे जास्त अवधी सरेंगेटीच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात घालवतात. या परिसरात सत्तर सस्तन प्राण्यांच्या आणि पाचशे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती आढळतात. सेरेंगेटी परिसरात राहणाऱ्या जमातीचे नाव आहे, ‘मसाई.’ ते शौर्याबद्दल प्रसिध्द आहेत. त्यांना क्रूर श्वापदांशी नेहमीच सामना करावा लागतो.  मात्र त्यांचा उदरनिर्वाह पाळीव गुरेढोरांवर चालतो. इंग्रजांना सरेंगेटी संशोधनात त्यांचे मोलाचे सहाय्य लाभले.

मसाई आदिवासी

आदिवासींचे पुनर्वसन गोरोंगोरो या ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विवराच्या परिसरात झाले. राखेच्या परिक्षणानंतर आढळले की या विवराची निर्मिती तीस लक्ष वर्षांपूवी झाली असावी. निर्मितीच्या वेळी विवर पाच हजार आठशे मीटर खोल होते. आता त्याची खोली सहाशे मीटर आहे आणि तळाशी दोनशे साठ मीटर परीघाचा वर्तुळाकार परिसर आहे. हा पृष्ठभाग समुद्रसपाटीपासून अठराशे मीटरवर आहे. येथे दरसाल एकतीस ते सत्तेचाळीस इंच पर्जन्यवृष्टी होते. या परिसरात दाट वृक्षवनराई आहे. फ्लेमिंगो पक्षांचे ते आवडते मुक्कामाचे स्थान आहे. तळ परिसरात सिंह, हत्ती, हिपो, गेंडे यासारखी श्वापदे याचा मुक्त संचार असतो.

जनावरांच्या सेरेंगेटी स्थानांतर यात्रेत कितीतरी अदभूत, भयानक व करूण घटना नित्यनेमाने घडत असतात. काही तर चटका लावणाऱ्या असतात.

मारा नदी पार करण्यासाठी प्राण्यांमध्ये अशी शर्यत लागते. या शर्यतीच्या चेंगराचेंगरीत हजारो प्राणी मरतात. तज्ज्ञांच्या मते हा आकडा प्राण्यांच्या भक्ष मिळवण्यासाठी परस्पर होणाऱ्या झटापटीने मोठा होतो. सेरेंगेटी परिसरातल्या वनम्हशी सहाशे किलोग्रॅम वजनाच्या व जवळपास दीड मीटर उंचीच्या असतात. हा शक्तीमान प्राणी हिपो, गेंडा किंवा हत्तीच्या ताकदीचा असतो. सिंह देखील शक्यतो त्यांच्या वाटेला जात नाही. एकट्या माणसाशी त्या थेट बेधडक सामन्याला सिध्द असतात. स्थानिक लोक तर त्यांना ‘बॉस’ म्हणजे ‘स्वामी’ म्हणतात.

एकदा एका सिंहाने आपल्याच खुशीत चरणाऱ्या झेब्र्यावर पाठीमागून असा हल्ला चढवला. झेब्रा भेदरून किंचाळू लागला. मात्र त्याच्या मदतीला कुणीही येऊ शकले नाही आणि किंचाळत असतांनाच तो गतप्राण झाला. पण झेब्रा हा इतका शक्तीमान प्राणी आहे की त्याने संतापाच्या भरात सिंहाला पार लोळवल्याच्या घटना पण घडल्या आहेत.

आईच्या मृत्यूनंतर एक पिल्लू सैरभैर झाले. मृत देहाकडे बघत आक्रंदन करणाऱ्या हत्तीच्या बछड्याच्या मनातले दुःखाचे कढ कुणाला कसे ऐकू येणार? पण  कोंडलेले शब्द चेहऱ्यावर लिहिले होते. ते जणू सांगत होते, ‘‘घे जन्म तू फिरूनी येईन मीही पोटी !’’ सेरेंगेटीच्या गाईडने गोष्ट संपवली.

आफ्रिकन हत्ती हा चार मीटर उंचीचा सर्वात बलाढ्य प्राणी आहे. त्याचे वजन सात हजार किलो एवढे आढळले आहे. तसे नवख्याला सगळे हत्ती सारखेच दिसतात. पण अनुभवी माहुताला हत्तीच्या सोंडेच्या हालचालीवरून फरक बरोब्बर ओळखता येतो. तो सुळ्यांचा वापर शस्त्रासारखा करतो तर कधी कधी जड ओझे सरकवण्यासाठीही करतो. विशाल कानाच्या पंख्यासारख्या हालचालीने तो शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवतो. आपल्या बळकट पायावर स्वतःच्या शरीराचे वजन पेलतो पण तेही तेवढेच शक्तीमान असतात.

एकदा सेरेंगेटीत एका तान्ह्या हत्तीला तहानेने इतकी कोरड पडली की न राहवून तो जवळच्या तळ्याकडे धावत गेला. पण तळ्यातल्या मगरीने अचानक झडप घालून त्याची सोंड पकडली. मग मात्र चिमुरड्याने सर्वांचा अस्सा धावा केला! त्याबरोबर कळपातल्या हत्तींच्या पलटणी मोठ्या गर्जना करत पिलाला वाचवायला धावत आल्या. त्याबरोबर मात्र मगरीची घाबरगुंडी उडाली. एका झटक्यात सोंडेचा चावा सैल करत तिने तळयात बुडी घेतली. हत्तींचे असे कळप सौहृार्द्य जगप्रसिद्ध आहे. छायाचित्रातील थरारकथा ‘जोहान ओपरमन’ या छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात अलगद टिपली.

‘विसरशील खास मला दृष्टीआड होता’.  सेरेंगेटीत एकदा काय झालं. – एका सिंहीणीचा प्रियकर आपल्या राजेशाही मिजाशीत तिला सोडून निघून गेला. इकडे सिंहीण इतकी उदास झाली. तिने खाणे-पिणे सोडले व ती खंगत गेली. ती त्याची दररोज प्रतिक्षा करत बसली. जणू मनातल्या मनात कण्हत होती. मात्र तो कधीच परतला नाही.

सिंह एकदा भडकला की तो इतक्या क्रूरतेने झडप घालतो व शत्रूची पार वाट लावतो. पण निसर्गतः तो इतका प्रेमभावी म्हणजेच रोमॅन्टीक प्राणी आहे. एखादी आवडीची मैत्रिण त्याला भेटली की त्याचे प्रणयाराधन अस्से रंगात येते!

ही वनगाय काही मिनिटांपूर्वी व्याली. पण बाळ लगेच उभे राहिलेसुध्दा! एक आश्र्चर्य म्हणजे, वनगाईच्या उदरातून उपजल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात चालायला लागते. ही ईश्वराची लीला आहे. कारण अरण्यवनात प्राण वाचवण्यासाठी व ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी’ साक्षात् भगवंताने ही सोय बहाल केली आहे!

आई कुणाचीही असो सरत शेवटी ती ‘आई’च असते.

सेरेंगेटीतल्या सर्व माऊल्या आपल्या लेकरांसमवेत घरी येतात.

वरची ओळ     : 1. झेब्रा, 2. वाघ, 3. चित्ता

मधली ओळ     : 4. जिराफ, 5. गेंडा,  6. हरीण.

खालची ओळ   : 7. हत्ती   8. बबून माकड .

आई पोराला टाकून गेली असती तर तिचे बाळ अन्य श्वापदाने जिभल्या चाटत फस्त केले असते!

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.

त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..