प्राण जाई निघून जेव्हा
आत्मा काय करतो
विठ्ठलाच्या नामाचा तो
पांडुरंग होतो!!
अर्थ–
प्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत?
या सगळ्याचा संबंध नक्की कशाशी आहे? विज्ञान की अध्यात्म? नक्की काय? याचा उलगडा करायचा असेल तर एक दिवस तीर्थ पंढरपूर येथे जावे. तेथे जाऊन मंदिरातल्या श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घ्यावे. तेथून बाहेर पडून परतीच्या मार्गास लागावे तेव्हा यासर्वांची उकल आपल्याला होईल. मंदिरातल्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण परत येत असताना जर तो विठुराया आपल्या अंतःकरणात शिल्लक राहिला आणि तर त्या विठ्ठलातला पांडुरंग तुम्हाला सापडला असे म्हणावे लागेल. कारण जो डोळ्यांना दिसत नाही. ज्याचा शोध हा केवळ अंतःकरणात बघून मला नक्की तो कळलाय का? या प्रश्नानेच होऊ शकतो तो पांडुरंग होय म्हणजेच प्राण जरी विठ्ठल असला तरी त्याचा अंश आपल्या आत्म्यात रुजला तर तेथे आत्मिक समाधान मिळते.
प्राण गेला हो त्याचा पण आत्मा काही शांत झाला नाही. भटकत असेल कोठेतरी, काय करणार इतक्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या जाणाऱ्याच्या की कसा मुक्त होणार तो आत्मा. येथे आत्मा आणि प्राण यातला फरक कळून येतो. केवळ श्वास घेणे आणि सोडणे याने मिळणाऱ्या जगण्याला प्राण असलेले जीवन म्हणतात तर त्या जगण्याला जेव्हा चांगल्या कर्माची जोड मिळते, समाधानाची पायरी ते जगणं ओलांडून स्व याला झिडकारून सारे या पायरीवर जाते तेव्हा आत्मा हा जगू लागतो आणि ते जर समाधानी असेल तर जेव्हा प्राण जातो तेव्हा आत्माही समाधानाने त्याबरोबर पुढे जातो. म्हणून केवळ विठ्ठल दर्शनाने मिळत नाही तर त्यांच्यातले माणूसपण पांडुरंगाच्या रुपात आपल्यात यावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply