नवीन लेखन...

द्राक्षे आणि आंबे!

गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता’ अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. आत्मविश्वास आणि अपेक्षाही वाढलेल्या. त्याला मोटरबाईक घ्यायची होती अन् त्यावर मी मुलाला समजावून सांगावे किंवा समजून घ्यावे, अशी त्या दोघांची इच्छा होती. त्या दोघांची परिस्थिती बेताचीच; पण एकुलत्या एका मुलाचा हट्ट कसा नाकारायचा, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. हट्ट स्वीकारायचा, तर मोठे आर्थिक ओझे घ्यावे का, हा प्रश्न होता. मोटरबाईक घ्यायला त्यांचा विरोध नव्हता; पण मुलाला नव्या युगाशी सुसंगत सीबीझेड किंवा करिष्मा हवी होती. खरेतर कोणत्याही कनिष्ठ मध्यवर्गीय घरामध्ये येणारा हा प्रश्न होता. काही वर्षांपूवी मीही या प्रश्नाला सामोरा गेलेलो होतो. इथे प्रश्न होता तरुण मुलाची भूमिका समजावून घेण्याचा आणि त्या दोघांच्या वास्तवाचा विचार करण्याचा. खरेतर असे प्रश्न माझ्यापुढे आले तसे सोडविता येत नाहीत. कारण, त्या सोडवणुकीचे असे काही परिणाम असतात, जसे-येणारा हप्ता, प्रारंभी भरावयाची रक्कम, वाहनाची निवड, किंमत, वाहनाची गरज आणि त्यातून होणारे लाभ किंवा तोटे. यावरचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो. तरीही सल्ल्यासाठी तो माझ्यापुढे होता. तरुण मुलाला वास्तवाची जाण करून देणे महत्त्वाचे आहे. असे मला वाटले; पण त्याची स्वप्ने, त्याच्या आकांक्षा, मित्रपरिवारातील त्याची प्रतिमा यांचा रेटा इतका मोठा होता, की वास्तवाचे भान आणणे म्हणजे संवेदनाहीन होणे. मी थांबलो. मुलाची आई मुलाला मोटरबाईक घेऊन देण्यासाठी उत्सुक होती किंवा मुलाचे मन मोडणे तरी तिला कठीण होत असावे. मुलाचे वडील बहुमतापुढे काही करू शकतील, असे मलाही वाटत नव्हते. माझ्यापुढे आलेला प्रश्न न सोडविताच मी तो नजरेआड केला. कदाचित तरुणाच्या आई-वडिलांची कृतीही प्रश्न सोडविण्यापेक्षा तो टाळणे किंवा लांबणीवर टाकणे, अशीच असू शकेल. एका वेळी तिघेही वर्तमानात राहण्याऐवजी, वर्तमानाला सामोरे जाण्याऐवजी, वर्तमानाच्या आनंदाऐवजी दुःख अन् वेदना जवळ करीत होती. माझ्या आई-वडिलांना माझा, माझ्या भावनांचा विचार करता येत नाही. त्यांना सतत पैसेच अन् अडचणीच दिसतात. अडचणी आहेत म्हणून आनंद घ्यायचा नाही का? असा प्रश्न त्या तरुणाला अस्वस्थ करीत राहणारा होता. `आनंद म्हणजे सीबीझेड किंवा करिष्मा’ असे त्याच्या मनाने ठरवून टाकले होते. अन्य कशातही त्याला आनंद गवसत नव्हता. `माझ्या मुलासाठी मी एवढंही करू शकत नाही.’ या भावनेने आई अस्वस्थ राहणार होती. उद्या मुलाने `ही गाडी नसली तरी चालेल, दुसरी कोणती तरी घेतो,’ असे म्हटले, तरी त्या दोघांच्या आनंदाला दुःखाची मोठी किनार राहणार होती. `आपली ऐपत नाही, अन्यथा रोकडे मोजले असते.’ असे म्हणत मुलाचे वडीलही स्वतच्या नशिबाला आणि मुलाच्या अवास्तव हट्टाला दोष देत राहणार, हे स्वाभाविक होते. एका प्रश्नाची नेमकी सोडवणूक आपल्याला करता आली नाही. याची खंत माझ्या मनात राहणार होती.
वर्तमानात राहणे खरेच खूप अवघड आहे का? मी विचार करू लागलो. मला आठवले, 40 वर्षांपूर्वी मी कोळपेवाडी नावाच्या एका साखर कारखान्याच्या गावी राहत होतो. वय असेल 12-13. त्यावेळी आई आठवडी बाजार आणायची. त्या दिवशी तिने द्राक्षे आणली- पावशेर. त्या वेळी मिळणारी… गोड कमी, आंबट जास्त. आम्हा चौघा भावांना ती दिली. प्रत्येकाच्या वाट्याला आलेली ती 8-10 द्राक्षेही खूप आनंद घेत खाल्ली. आजही त्या आनंदाची कल्पना मी करू शकतो. आज द्राक्षे खाताना आंबे किती महाग आहेत, हा विचार प्रभावी होतो. द्राक्षांचा आनंद तो घेऊ देत नाही. तुम्ही द्राक्षे खाताना आंब्याचा विचार करता की द्राक्षांचा आनंद घेता?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..