नवीन लेखन...

पावती

 

त्या वेळी मी पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रासाठी काम करीत होतो. अर्थात, माझ्या कामाची जागा पुणे नव्हे, तर कोल्हापूर होती. या शहरात या दैनिकाची नवी आवृत्ती सुरू झाली होती. ती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, यशस्वी व्हावी, असं मला वाटणं स्वाभाविक होतं. या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्यात तर संस्थेचा असा मी एकमेव प्रतिनिधी होतो. त्यामुळं आपलं काम केवळ बातमीशी संबंधित आहे, असं वाटलं नव्हतं. तसं वाटावं असं संस्थेतही वातावरण नव्हतं. एकूण माझं कोल्हापुरात व्यवस्थित चालू होतं. याच काळात निपाणी इथं शेतकरीनेते शरद जोशी यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मी आंदोलनाच्या वृत्तसंकलनासाठी रोज निपाणीला जाऊ लागलो. सकाळी निपाणीला जायला निघावं अन् सायंकाळपर्यंत परत यावं, असा तो शिरस्ता होता. निपाणी शहराच्या अलीकडेच शेकडो बैलगाड्या रस्त्यात उभ्या करण्यात आलेल्या असायच्या. बैल विश्रांती घेत, तर आंदोलनकर्ते रस्ता पूर्ण बंद कसा राहील, याच्या विवंचनेत असायचे. दुचाकीसुद्धा या बंदोबस्तातून बाहेर पडणं कठीण झालं. कोल्हापूर-बेळगाव मार्गावरचे अनेक व्यवहार बंद पडायची वेळ आली. काही आडमार्ग, काही लांबचे मार्ग शोधण्याचाही प्रयत्न झाला; पण अशा ठिकाणीही अचानक ‘रस्ता बंद’ आंदोलन केलं जायचं. या आंदोलनाचा जो परिणाम व्यावसायिकांवर व्हायचा, तसाच तो वृत्तपत्रांवरही होत होता.

 

निपाणीला तीस-पस्तीस हजारांचा जमाव असतानाही तिथं वृत्तपत्र येऊ शकत नव्हतं. आंदोलनाच्या प्रारंभीच माझ्या दैनिकानं या आंदोलनाच्या सविस्तर बातम्या दिल्या होत्या; पण आंदोलकांपर्यंत त्यातलं काही पोहोचत नव्हतं. बातमी द्यायची; पण ती आवश्यक त्या वाचकापर्यंत जात नाही, याची खंत वाढत होती. काही तरी करायला हवं होतं. बातमीसाठी मी रोज येतच होतो. निपाणीच्या एजंटनं एक माणूस रोज माझ्याकडे पाठवायचा आणि मी कोल्हापूरहून अंक घेऊन यायचं, असा तोडगा त्यावर काढला. शरद जोशींनाही त्याची कल्पना दिली. आपण दिलेली बातमी संबंधित माणूस वाचतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो, हा मोठ्या आनंदाचा भाग असतो. तो आनंद मिळवायला पत्रकारच व्हायला हवं; पण हा आनंद मी घेऊ लागलो. माझ्या स्कूटरला रोज दोन-तीनशे अंकांचा गठ्ठा बांधायचा आणि तो निपाणीला एजंटकडे द्यायचा, असं सत्र सुरू झालं. आपण संस्थेसाठी वेगळं काहीतरी करीत आहोत, असं काही वेळा वाटायचं, तर काही वेळा हे तर माझं कर्तव्यच आहे, असं वाटायचं. काही वेळा या आनंदाची तुलना कराविशीही वाटत नसे. माझं काम वाढलं होतं; पण त्याचं काही वाटत नव्हतं. रोजच्या रोज अंकाचा हिशेब व्यवस्थापकाला दिला जायचा. एक दिवस असा आला की, या यंत्रणेत काही बिघाड झाला. मी दोनशे अंक घेऊन आलो; पण ते घ्यायला कोणी फिरकलं नाही. आता काय करायचं? दुपारचे बारा वाजत आले होते. एका कार्यकर्त्यास बसवलं अंक विकायला. त्यानं ते काम केलंही; पण त्याला काही सर्व अंक विकता आले नाहीत. १००-१२५ अंक उरले असावेत. सायंकाळी चार वाजता मी कोल्हापूरला जाण्यासाठी परतत असे. आता या अंकांचं ओझं घेऊन परत जायचं? विचार केला, ज्यांच्यासाठी हे अंक आणले होते त्यांनाच वाटून टाकले तर? नाहीतरी आता चार वाजता त्याला कोण घेणार आहे? विचार पक्का झाला अन् त्याच कार्यकर्त्याला सांगितलं अंक वाटून टाक. मी कोल्हापूरला निघे पर्यंत अंक वाटले गेले होते. इतकच नव्हे, तर वाचनासाठी जागोजागी गटही पडले होते. खूप बरं वाटलं. मी कोल्हापूरला निघालो. ऑफिसमध्ये आलो. अंकाचा हिशेब दिला. १२० अंकांची रक्कम नव्हती. मी म्हटलं, एजंटला जसा तुम्ही क्रेडिट मेमो देता तसा द्या; पण इथं प्रश्न आला होता, मी एजंट नव्हतो अन् अंक एजंटला न देता मी तो विकला होता. एवढच नव्हे, तर वाटलाही होता. सकाळी काय ते पाहू, असं ठरलं आणि सकाळी जे झालं ते मला त्या वेळी तरी धक्का देणारच होतं. व्यवस्थापकांनी सांगितलं, ‘‘१२० अंकांचे पैसे भरा; अन्यथा तुमच्या वेतनातून ते कापून घेण्यात येतील.’’ गेले काही दिवस मी करीत असलेलं काम, निष्ठा, अंक वाटण्यामागची भावना, यांना असलेलं मूल्य शून्य तरी होतं किवा ते अमूल्य तरी होतं. ज्या काळामध्ये पत्रकाराला आपलं वेतन सांगायचीही लाज वाटायची, त्या काळात त्या १२० अंकांची रक्कम भरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी पैसे भरले. त्याची पावती माझ्या नावावर घेतली. तो दिवस माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा, निराश करणारा होता. आज जेव्हा मी माझ्या पत्रकारितेतल्या कामाचं दप्तर काढून बसतो तेव्हा त्या पावतीचं पाकीट मला खुणावतं. आज त्यानं मला अस्वस्थता नाही येत. मी त्या काळातही ती रक्कम भरल्याचा अभिमान वाटतो. कोणत्याही प्रमाणपत्रापेक्षा ती पावती मला माझ्या वाचकांबरोबरच्या नात्याची आठवण देते. ते नातं अधिकच दृढ होत जातं.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..