नवीन लेखन...

सायकल

त्या वेळी मी पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये काम करीत होतो. पत्रकारितेतला तसा तो उमेदवारीचा काळ. पुणही त्या वेळी आज जसं वाढलेलं आहे, तसं नव्हतं. पेठांच्या मर्यादेत व्यवहार होते आणि पर्वतीही दूर वाटत असे. अशा या काळात मी विठ्ठलवाडी या शहराजवळच्या वस्तीत राहत होतो. बसव्यवस्था अपुरी होती. पुणेकरांच्या हक्काचं वाहन होतं सायकल; अर्थात माझ्याकडे तीही नव्हती. स्वाभाविकपणे विठ्ठलवाडीपासून पुण्यातल्या नातूबागेपर्यंत पायी किवा बसने जाणं हाच पर्याय होता. रात्री कामावर जाणं, अंकाची छपाई सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या मंडईत अन्य पत्रकारांबरोबरच्या गप्पाष्टकात सहभागी होणं आणि उजाडता-उजाडता घरी परतणं असा दिनक्रम होता. अगदीच काही झालं तर संपादकीय विभागात असलेल्या एखाद्या बाकड्यावर रात्री तीन-चार वाजता आडवं होणं आणि सकाळी जाग येईल तेव्हा घराचा रस्ता पकडणं, यातही वेगळं काही वाटत नव्हतं. त्या दिवशी रात्री असाच मी एका बाकावर निद्रिस्त झालो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा कोणी तरी मला उठवीत होतं. समोर पाहिलं तर विनायकराव जोशींची ती मूर्ती होती. विनायकराव जोशी हे काही पत्रकार नव्हते. खर्‍या अर्थानं ते संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते; पण त्यांची काही व्यवस्था असावी म्हणून ते ‘तरुण-भारत’मध्ये प्रादेशिक बातम्यांचं काम पाहत. संपादन शिकण्याच्या काळातही मला एवढं कळत होतं, की विनायकरावांना संपादनाचं फारसं कसब नाहीये; पण संस्थेतला एक ज्येष्ठ सहकारी असं त्यांचं स्थान मान्य करावंच लागत असे. प्रादेशिकला बातम्या नाहीत असं म्हटल्यानंतर त्यांनी एकदा प्रादेशिक बातम्यांची फाईलच कम्पोझला पाठवून दिल्याचं मी पाहिलं, अनुभवलेलं होत. स्वाभाविकपणे एक पत्रकार म्हणून त्यांच्याविषयी आवर्जून आदर वाटावा, असं नातं तयार झालेलं नव्हतं. तर त्या दिवशी त्यांनी मला झोपेतून उठविलं. ‘
थं का झोपलास?’ त्यांचा प्रश्न. मी म्हटलं, ‘रात्री तीन वाजता काम संपलं. घरी जायला बस नव्हती आणि पायी जायचं

तर कुत्र्यांची भीती म्हणून इथं

झोपलो.’ ‘ही काही झोपायची जागा नव्हे,’ त्यांनी सुनावलं अन् माझ्या त्या दिवसाचा सूर्य उगवला. मनातून वैतागलो. थोडं आधी जागी व्हायला हवं होतं असं वाटलं; पण इलाज नव्हता. मी उठलो. फ्रेश झालो आणि घरी निघण्यापूर्वी जातो असं सांगण्यासाठी त्यांच्या टेबलाशी आलो. त्यांनी माझ्याकडे न पाहताच बस म्हटलं. मी बसलो. मग ते म्हणाले, ‘कुठं राहतोस?’ ‘विठ्ठलवाडीला’ मी उत्तर दिलं. ‘येतोस कसा?’ पुन्हा त्यांचा प्रश्न. ‘बसनं किवा पायीही’ माझं उत्तर. ‘सायकल का नाही घेत?’ पुन्हा प्रश्न. त्यावर मी गप्पच. ‘पगार किती मिळतो?’ पुन्हा प्रश्न आला. मी म्हटलं ‘२५० रुपये.’ माझ्या या उत्तरावर ते थांबले. माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘दरमहा दहा रुपये वाचवू शकशील?’ हा प्रश्न मला अनपेक्षित होता. दहा रुपये वाचवायचे? कशासाठी? मनात एकूण महिन्याच्या खर्चाचा हिशेब सुरू झाला. ठरविलं तर वाचविता येतील अन्यथा नाही, असं तळ्यात-मळ्यात उत्तर मनात आलं; पण ‘हो शक्य आहे,’ असं उत्तर तोंडातून निसटलं होतं. ते ‘ठीकै’ असं म्हणाले अन् मी निघालो. माझ्या इथं झोपण्याचा अन् मी दहा रुपये वाचविण्याचा काय संबंध आहे हे कळेना. खूप विचार केल्यावर कशाला वाचवायचे असा विचार आला अन् तो विषय मी पूर्णपणे बाजूला काढून टाकला. माझा दिवस किवा फारतर रात्र म्हणा सुरू झाली होती. सायंकाळी सातच्या सुमारास मी ऑफिसला आलो. एरवी मी दिवसभरात केव्हाही येत असे; पण आज ठरवूनच सायंकाळी आलो. चार तास झोपलो तर काय बिघडलं? या प्रश्नानं माझ्या अहंकारला धक्का दिला असावा बहुतेक. ऑफिसमध्ये येऊन पाहतो तो विनायकराव जोशी अजूनही त्यांच्या जागेवर बसलेले होते. त्यांना इतका वेळ ऑफिसमध्ये बसलेलं मी पाहिलं नव्हतं. मी येऊन माझ
या जागेवर बसणार तेवढ्यात त्यांनी मला बोलावलं. ते माझी वाटच पाहत होते, असं वाटलं अन् ते खरंही होतं. मी त्यांच्या टेबलाशी जाऊन उभा राहिलो. ‘बस,’ ते म्हणाले. आता काय, असा प्रश्न माझ्या मनातून माझ्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये झळकला असावा. ते पाहून ते म्हणाले, ‘बरं असं कर,’ असं म्हणून त्यांनी दोन किल्ल्या माझ्या हातात दिल्या. म्हणाले, ‘बाहेर एक सायकल ठेवलीय. त्यावर तुझं नाव, पत्ता टाकलाय. आजपासून ती तुझी झाली. आता तुला इथून ऑफिसपर्यंत पायपीट करायला नको.’ त्यांचा प्रत्येक शब्द मला अनपेक्षित होता; पण हातात किल्ल्या होत्या. मी वर गेलो. सायकल पाहिली. नवी कोरी, चेनकव्हर, सीटकव्हर लावलेली बंपरवर अजून खाकी कागद असलेली…..माझं हक्काचं वाहन… नवं कोरं. सायकल घेणं हे आज अगदी साधी बाब; पण तीस वर्षांपूर्वीचा तो काळ आठवला म्हणजे आजही त्या सायकलचा नवेपणा जाणवू लागतो. मी पुन्हा विनायकरावांकडे आलो. त्यांनी माझ्या हातात पावती दिली. एकशे दहा रुपयांची. विनायकराव म्हणाले, ‘हे बघ, दरमहा दहा रुपये माझ्या बचत खात्यात जमा करायचे. हा माझा अकौंट नंबर. दहा हप्ते भरायचे. उरलेले दहा रुपये माझ्या वतीने तुला.’ ती पावती हातात घेताना, खिशात हात घालताना, त्या चाव्या हाताळताना मी त्या कसबी पत्रकार नसलेल्या पण माणूसपण असलेल्या माझ्या ज्येष्ठ सहकार्‍याकडे पाहत होतो अन् काहीच घडलं नाही, अशा थाटात ते बाहेर पडले.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..