नवीन लेखन...

अपघात

 

अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, प्रत्यक्ष घटनास्थळावर जायचं का, असे प्रश्न यायचे. अपघातामागचा धक्का, वेदना त्या वेळी तरी जाणवल्या नाहीत. त्याची बातमी दिली, की आपली इतिकर्तव्यता संपली, असंच काहीसं होतं. वेगळ्या व्यवसायाचा तो परिणाम असावा किंवा आपल्याला काय त्याचं, ही वृत्ती असावी; पण वृत्तपत्रात उमटणाऱया एखाद्या छोट्या बातमीमागे एखाद्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून जातं, याची जाणीव नव्हती. एक अपघात असा पहिला, की त्या दिवशी रात्री मी जेवण नाही करू शकलो. पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या बसने रस्त्यातच पेट घेतला आणि ती भस्मसात झाली. शांताबाई जोग आणि इतर काही नाट्य कलावंतांचा त्यात कोळसा झाला. पाच बाय पाच एवढ्या आकारात चार-पाच जणांच्या मृतदेहाचे ते अवशेष पाहिले अन् गदगदून आलं. या अपघाताची बातमी वर्णनासह लिहिली; पण ती घटना अस्वस्थ करून गेली. त्या दिवशी ना झोप, ना भूक. आता एखादी बातमी वाचली तरी त्या व्यक्तीचं कुटुंब उभं ठाकतं डोळ्यापुढं, आप्तस्वकीय दिसू लागतात. कोणाचा तरुण मुलगा, तर कोणा बछड्याचा बाप. कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ… आयुष्य विस्कटून टाकणारे आपघात.

हे एवढं सारं सांगण्याचं कारणही तसंच आहे. पत्रकारितेत मनाचा दगडही होऊ शकतो अन् त्याला पाझरही असतो. आता अशी एक घटना… नागपूरला घडलेली. एक महिला पत्रकाराच्या संदर्भातली, माझ्या सहकारी महिलेच्या संदर्भातली. लोकमत नागपूर कार्यालयात `सखी’ या पुरवणीचं काम पाहणारी वर्षा पाटील. ती अन् तिचा मुलगा बरोबर राहायचे. दोघांना तेच एकमेकांचे. जिवाभावाचे. ऑफीसमध्ये बसलो होतो. फोन आला. वर्षाच्या मुलाला अपघात झालाय. मेंदूला जबरदस्त मार बसलाय. मी आणि काही सहकारी हॉस्पिटलमध्ये धावलो. काही मदत हवी आहे का, याची विचारपूस केली. डॉक्टरांकडे चौकशी केली. त्याला पाहिलं. वर्षाला भेटलो तिचा चेहरा काहीच बोलत नव्हता. ती धीटपणा दाखवीत होती. तिनं अवसान आणलं होतं, की ती या धक्क्यानं थिजली होती… काही कळेना. अशा वेळी काय बोलायचं ते कळेना. काळजी करू नको, सगळं ठीक होईल हे शब्द तिच्या पशात टाकून परतलो. अपघात गंभीर होता. कोण चुकलं, कोण बरोबर यापेक्षाही शिक्षा अटळ होती. आणखी काही दिवस वर्षाला कामावर येणं कठीण होतं. मी कामाची व्यवस्था पाहिली. दुसऱया सहकाऱयाला जबाबदारी दिली. तो दिवस संपला. दुसऱयाच दिवशी ऑफीसमध्ये गेलो. आता दवाखान्यात जावं असा विचार करून जिना उतरलो, तर वर्षा येत होती. मी थांबलो. तिचा तो तसाच भावनाविहीन चेहरा. मी विचारलं, `इथं काय करत्येस?’ ती म्हणाली, मजकुराचं पाहते.’ मी म्हटलं, `इथली काही काळजी करू नको. आम्ही पाहू.’ ती म्हणाली, `नको, मी पाहीन. तिथं तरी नुसतंच बसायचंय ना?’ मी काही बोलले नाही. वर्षानं त्या अंकाचं, पुढच्या अंकाचं काम सुरू केलं. दिवस जात होते. धीर खचत होता अन् वर्षा खंबीरपणे सगळ्यांनाच धीर देत होती. उपचाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, प्राथर्ना सुरू झाल्या; पण परमेश्वरानं कोणाचं काहीही ऐकायचं नाही, असंच ठरविलं होतं.

अचानक एक दिवस वर्षाच्या हालचालींना वेग आला. मुलाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलवायचं होतं. मुलाच्या किडनी दान करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले होते. अवधी कमी होता. तिला तिचा मुलगा कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत पाहायचा होता. त्यासाठी हे रूप संपलं तरी चालेल, या वास्तवाचा तिनं स्वीकार केला होता; पण नागपूरसारख्या शहरातही अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारं रसायन उपलब्ध नव्हतं. मुंबई-हैदराबाद फोन सुरू झाले; पण त्यासाठीचा अवधी आणि वर्षाच्या मुलाला देवानं दिलेलं आयुष्य यात कोण जिंकणार, हा प्रश्न होता. अखेर त्याला दुसऱया रुग्णालयात हलविलं. डॉक्टरांचं पथक तयार झालं. ज्याला या किडनीचा लाभ होणार तोही सज्ज होता; पण ते होणे नव्हते. तो गेला होता. मृत व्यक्तीच्या किडनीज् काही कामाच्या नव्हत्या. पेशन्टचं रूपांतर बॉडीमध्ये झालं होतं; पण वर्षा अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिनं नेत्रदानाचं काम तरी पूर्ण करावं यासाठी खटपट सुरू केली. पोलिसांची अडवणूक, वैद्यकीय तत्परता, वेळेची स्पर्धा यातून अखेर डोळे घेता आले. हा अपघात आणि अंत्यसंस्कारापर्यंतच प्रवासच असा होता, की तिथं दुःख, वेदना यापेक्षाही यंत्रणेविरुद्धचा संताप अधिक यावा, अशी परिस्थिती होती. मृतदेह मिळण्यासाठी एखाद्या आईकडून जेव्हा 500 रुपयांची लाच मागितली जाते, त्या वेळी तिला काय वाटलं असेल? पण वर्षा तिथंही घट्ट उभी होती. वर्षा एकटी राहिली. तिचा 18 वर्षांचा मुलगा, तिचं श्रांत होण्याचं स्थळच एका अपघातानं उखडून टाकलं. नियोजन करता येणार नाही त्याला अपघात म्हणावं, हे खरं; पण अपघातातही जेव्हा दृष्टी देण्याचं, जीवन देण्याचं नियोजन करण्याची उमेद येते त्याला काय म्हणावं?

 

 

आजही वर्षाला जेव्हा मी पाहतो, तिच्याशी बोलतो त्या वेळी मला आठवते ती काळापेक्षाही मोठी झालेली वर्षा.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..