नवीन लेखन...

चष्मा

 

परवाच जागतिक महिलादिन साजरा झाला. विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. महिलांची प्रगती आणि समस्यांवर चर्चा झाली. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीनं आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमाला मी हजर होतो. आरोग्यविषयक प्रश्नांबाबतची जागरुकता, असा चर्चेचा विषय होता. भाषणं झाली. महिलांनी स्वतःची काळजी कशी अन् किती घ्यायला हवी, हे सांगण्यात आलं. त्या वेळी माझ्या मनात एक आठवण आली. तिथंही सांगितली, वाटलं तुम्हालाही सांगावी. अहमदनगरमध्ये साई नेत्रसेवा म्हणून एक रुग्णालय आहे. डॉ. प्रकाश कांकरिया हे त्याच्या प्रमुखाचं नाव. जिल्ह्यात अन्रा ज्याच्या विविध भागांतही ते डोळ्यांच्या आजाराविषयी बोलतात, उपचार करतात. चष्मा नको असेल तर तो घालविता येतो. त्यासाठी उपचार आहेत. हे त्यांच्या कामाचं मुख्य सूत्र. सात-आठ वर्षांपूर्वी असाच डोळे या विषयावर त्यांच्याशी गप्पा सुरू होत्या. डोळ्यापुढे अंधार अन् केवळ अंधार असेल तर काय होतं, हे मी माझ्या वडिलांच्या अनुभवावरून जाणत होतो. स्वाभाविकपणे या विषयाला एक भावनात्मक किनारही होती. विषय चष्म्याचा अन् त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांचा होता. आज परिस्थिती खूप बदललीय; पण एक काळ असा होता, की चष्मा हा लग्नासाठीचा मोठा अडसर होता. मुलाला चष्मा असेल तर त्याच्या निवडीलाही मर्यादा यायच्या. हे जसं खरं, तसच चष्मा हा तर मुलीच्या लग्नासाठी नकारघंटाच बनायचा. लग्न, चष्मा आणि मुली अशा विषयावर चर्चा स्थिरावत असतानाच डॉक्टर म्हणाले, तुम्हाला मी अनुभवलेली एक गोष्ट सांगतो. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात चष्मा काय करू शकतो, हे कळेल आणि महिला स्वतःबद्दल आरोग्याची काळजी किती घेतात, हेही कळेल. डॉक्टर सांगू लागले. मी क्लिनिकमध्ये बसलो होतो. दुपारी एकची वेळ होती. पेशन्ट्स संपत आले होते. एवढ्यात एक जोडपे आले आहे. त्यांना मला भेटायचंय असं सांगण्यात आलं. सर्वांत शेवटी त्यांना पाठवा, असं मी सांगितलं. ते वाट पहात थांबले. तासाभरात मी त्यांना बोलावलं. ‘‘माझ्या पत्नीला जरा कमी दिसतंय.’’ दोघांपैकी पतीनं सांगितलं. मी त्या महिलेला तपासायला घेतलं. चाळिशी उलटून गेली होती तिची. तिच्या डोळ्यांची तपासणी करताना मला जे आढळलं त्यानं तर मी हादरून गेलो. तिची दृष्टीक्षमता अवघी दहा टक्के होती. उजेड आणि एखाद्या आकृतीचं भान असावं, एवढंच तिला दिसत होतं. मी थांबलो. विचारलं, ‘‘केव्हापासून कमी दिसतंय? उत्तर आलं, ‘‘अलीकडे जरा प्रश्न यायला लागला. परवा तव्यावर हात भाजला म्हणून इथं यायचं ठरविलं.’’ बाईंनी उत्तर दिलं. या वेळी त्या महिलेचा पती तिथेच बसलेला होता. त्यांना मी म्हटलं, ‘‘तुम्ही जरा बाहेर बसा, मी तपासणी करतो.’’ ते गृहस्थ बाहेर गेले. मी माझ्या खुर्चीवर बसत बाईंना विचारलं, ‘‘आता खरं काय ते सांगा. तुम्हाला केव्हापासून त्रास होतोय? आपला पती इथं नाही, हे लक्षात आल्यानं बाई जरा स्वस्थ झाल्या. म्हणाल्या, ‘‘डॉक्टर हा त्रास आताचा नाहीये. माझं लग्न झालं तेव्हा मी १८-१९ वर्षांची होते. त्यावेळीच मला चष्मा होता. आता तर नंबरही आठवत नाहीये.
माझ्यासाठी स्थळं पहायला सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक वेळी चष्मा हा मोठा अडथळा यायचा. एक मुलगा सर्वांना आवडला; पण त्याला चष्मेवाली मुलगी नको होती. वडील वैतागले होते. लग्नाचं जमत नाही हे पाहून ते घरी आले ते माझ्यावर संतापूनच.त्यांनी माझ्या चष्म्यालाच हात घातला अन् तो फेकून दिला. म्हणाले, याद राख, पुन्हा चष्म्याचं नाव घेतलं तर. आजपासून तुला चष्मा नाही. मी काय करणार होते? ती परिस्थिती मान्य केली. आश्चर्य असं की पुढं चार-सहा महिन्यांत माझं लग्न ठरलं. मला चष्मा नव्हता. वाटलं, आता नवर्‍याला सांगावं, चष्म्याचं; पण घरातल्यांनी सांगितलं. ते म्हणाले, बिलकुल सांगायचं नाही. फसवणूक केली म्हणून त्यांनी टाकून दिलं तर? मुलं-बाळं होऊ देत- मग पाहू. दोन वर्षांनी मुलगी झाली. आता काय करायचं? आता तर मोठा प्रश्न होता. एक तर चष्मा. तो नसल्यानं नंबर वाढलेला. दिसण्याचं प्रमाण कमी झालेलं अन् पदरी मुलगी. म्हणजे धोका वाढलेला. मुलगा झाला असता तर कदाचित सगळ्यांनी मान्यही केलं असतं. मला चष्मा नाही, हे मनोमन मान्य केल्यानंतर मी काळजी घेऊ लागले. स्वयंपाक करताना किवा मुलीचं पाहातानाही त्याची सवय होऊन गेली. अंधारातही सरावलेपणा यावा तसं झालं. पुढे दोन वर्षांनी मुलगा झाला. आता सांगावं का? पण अंधुकतेची इतकी सवय झाली होती अन्सगळ्यांच्या आनंदावर विरजणही टाकायचं नव्हतं मला. आता मुलगा मोठा झालाय. मी माझ्या घरात पूर्णपणे स्वीकारली गेलीय. त्यामुळं आता मला काहीच दिसत नाही, असं म्हटलं तरी बिघडणार नाही. नवर्‍यानं टाकलं तर माझा मुलगा तर आहे… माझ्या पेशंटनं तिची कथा सांगून संपविली होती. मी तिच्यावर उपचार सुरू केले. चष्मामुक्ती हे आपलं उद्दिष्ट किती योग्य आहे,याची साक्ष पटली होती मला, डॉक्टरांनी त्यांचा अभिप्राय दिला. ही घटना जुनी. सात वर्षांपूर्वीची. त्या महिलेचा प्रश्न त्याआधी वीस वर्षांपूर्वीचा. सामाजिक बदल खूप संथपणे होतात हे खरं. आज चष्मा हा लग्नातला अडसर नसेल; पण त्याऐवजी आणखी काही निर्माण झालंय का? वाटलं, समाजाला दृष्टी देण्याची गरज आहे. कोण देऊ शकेल ती?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..