माणसं

 

माझी ही आठवण तब्बल तीस वर्षांपूर्वीची. त्या वेळी मी नुकताच पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रात काम सुरू केलं होतं. शहरातल्या

 

घातपात-गुन्हेगारीच्या बातम्यांचा शोध घ्यायचा आणि त्या तयार करून द्यायच्या, असं काम. पुण्यात त्या वेळी अकरा पोलीस स्टेशन्स होती. सर्वच ठिकाणी जावं अशी अपेक्षा असायची; पण ते कठीण होतं. आजकालसारखी मोबाईल वगैरे साधनं नव्हती किंवा प्रेसनोटसारखी पद्धतही. क्राईम रिपोर्टर हा तसा वृत्तपत्राच्या व्यवस्थेतला शेवटचाच घटक. स्वाभाविकपणे सायकल हेच वाहन. रोज विठ्ठलवाडीहून निघावं, मिळेल तिथं, मिळेल तसं खावं, प्यावं अन् काम आटोपून मध्यरात्री परतावं, असा शिरस्ता. संस्था नवीन, माणसं नवीन, कामही नवीनच- खूप दमछाक व्हायची; पण कामावर आपला वेगळा ठसा उमठायला हवा म्हणून मेहनत तर आवश्यक होती. अवघा महिना झाला असेल; पण या कामात मी थकायला लागलो. भूक मंदावली, उत्साह कमी झाला. आजारी आहोत असं वाटायला लागलं. विश्रांतीसाठी रजा वगैरे घेणं कठीणच होतं. दुपारी मित्राच्या खोलीवर थांबायला लागलो. काम सुरू होतं; पण ते ओढून-ताणून. डॉक्टरांकडे गेलो; पण विशेष काही नाही, असं म्हणून त्यांनी रवानगी केली. भूक लागत नव्हती. उलटी होईलसं वाटायचं. असाच

 

संध्याकाळी मित्राकडे गेलो. भूक लागत नाही, असं सांगितलं. तो म्हणाला, `तुला काय झालंय? हे घे थोडं, छान भूक लागेल.’ घेतलं ते मी. घरी गेलो. जेवलो अन् भडभडून ओकलो. मद्य पचलं नव्हतं, हे खरं; पण त्यानंतर अन्नाचा कणही पचेनासा झाला. आता माझ्या आजाराचं निदान झालं होतं. कावीळ. त्यात विष घेतलेलं. विश्रांती, पथ्य आवश्यक. उपचाराला पैसे नाहीत. कुणीतरी सांगितलं म्हणून लोणावळ्याला गेलो. तिथं काविळीवरचा जालीम उपचार केला. पुढचे तीन दिवस कावीळ विसरून जावी, असा त्रास झाला. चालता येईना. प्रयत्न केला तर मस्तकात हादरे जात. ऑफिसमध्ये

जाणं अशक्यच होतं. घरात

राहावं तर पगार नसेल तर खायचे काय, असा प्रश्न होता. स्वत:च्या पायावर उभं राहायचं म्हणून बाहेर पडलो होतो; पण पुन्हा आई-वडिलांकडे गेलो. औषधं चालू होती आणि विश्रांतीही. आता प्रकृती सुधारत होती; पण कामाला लागावं एवढी स्थिती नव्हती अन् अचानक एके दिवशी पत्र आलं. पुण्याहून संस्थेचा लिफाफा होता. काय असेल त्यात याचा अंदाज मलाच काय घरातल्या सगळ्यांनाच येत होता. नव्यानं लागलेल्या नोकरीवर तीन आठवडे अनुपस्थिती हे कारवाईसाठी पुरेसं कारण होतं. पुरता हादरून गेलो होतो. थरथरत्या हातानं ते पत्र घेतलं. इतर माझ्याकडे पाहत

 

होते. त्यांच्या भावना काळजीच्या की रागाच्या, या पलीकडे गेलो होतो मी. पत्र उघडलं. सही पाहिली. श्री. ग. मुणगेकर. संपादक. आता काय लिहिलंय ते पाहावं म्हणून वाचू लागलो. पत्रात लिहिलं होतं, प्रिय किशोर, तुम्ही आजारी असल्याचं कळालं. कावीळ हा गंभीर आजार असतो. त्यासाठी विश्रांती हाच उपाय. तुम्ही विश्रांती घ्या. कामाची किंवा नोकरीची काळजी करू नका. तुम्हाला काही मदत लागल्यास मला कळवा. हयगय करू नका. आपला…

 

 

किती वेळा ते पत्र वाचलं हे आठवत नाही; पण खूपदा वाचलं. डोळ्यांत अश्रू होते. ते पत्र तसंच पत्नीच्या, आईच्या, वडिलांच्या हातात गेलं. तेही भारावून गेले. महिनाभराच्या कामानंतर आपल्या मुलाबाबतच्या संपादकांच्या भावना पाहून त्यांना आनंद झाला. श्री. ग. मुणगेकर गेल्यावर त्यांना अनेकांनी आदरांजली वाहिली. त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्या वेळी मला कोणी तसं विचारावं असं माझं स्थानही नव्हतं आणि तेवढं धाडसही झालं नाही; पण ज्या ज्या वेळी कोणाला कावीळ झाल्याचं कळतं, त्या वेळी माझ्यावर आलेला प्रसंग आणि ते पत्र आवर्जून आठवतं.

 

 

आज हे सारं आठवायचं कारणही तसंच आहे. मी राहतो तेथेच एक सॉप्टवेअर इंजिनिअर तरुण राहतो. चार महिन्यांपूर्वी त्याला बड्या पगाराची नोकरी लागली. तीन महिन्यांपूर्वी त्याला अपघात झाला. अलीकडे आठवड्यापूर्वीच तो बरा होऊन घरी आला. त्याच्या बॉसनं अवघ्या एका महिन्याच्या कामाच्या अनुभवावरून त्याला नोकरीत कायम केल्याचं पत्र त्याला आयसीयूमध्येच दिलं. आज तो तीन महिन्यांनंतर पुन्हा ऑफिसमध्ये गेला. त्याच्या ऑफिसनं त्याच्यासाठी रुग्णासाठी असलेली व्हॅन पाठविली. स्वागत केलं. जमेल तेवढाच थांब, असा स्नेहाचा सल्लाही दिला. तो घरी परत आला तेव्हा त्याचा चेहरा उजळला होता. शारीरिक त्रास अजूनही असेल; पण मानसिकदृष्ट्या तो पूर्णपणे उत्साहात होता.

 

माझ्यासाठी श्री. ग. मुणगेकर होते, त्याच्यासाठी आणखी कोणी. माणसाचा माणसावर विश्वास बसण्यासाठी एवढं पुरेसं असावं- नाही का?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…