नवीन लेखन...

सदिच्छा

 

सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो. शब्दाचं सामर्थ्य काय असतं? मुळात शब्दाला सामर्थ्य आहे का? मला वाटतं, भावना व्यक्त करणारा अन् ती स्वीकारणारा असे दोघेही या शब्दाला बळ देत असावेत. परवा मध्यरात्री एक फोन आला. `लोकमत’चे अध्यक्ष विजय दर्डा यांचा. वेळ होती रात्री बाराची. फोन घेतला पलीकडनं ते म्हणाले, `वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’ रात्र जागणं हे पत्रकाराला नव नसतं; पण विजय दर्डा यांना तर रात्र-रात्र जागणं हा छंदच. पण, या माणसानं रात्री बाराची वेळ निवडून शुभेच्छा द्याव्यात, यासाठी या शुभेच्छा मनात जिराव्या लागतात, मुराव्या लागतात अन् मग त्या परिणाम घेऊन प्रत्यक्षात येतात. तर विषय शुभेच्छांचा होता अन् या प्रसंगानं तो जागा केला होता.

 

 

ही गोष्ट आहे 1991 ची. त्या वेळी मी पुण्यात; पण पुण्यापासून लांब निगडीला राहत असे. रोज वीस किलोमीटर पुण्यात यायचं अन् जायचं. सध्याच्या युगात हे अंतर फारसं नसलं तरी पुण्यात अजूनही ते खूप मोठं आहे; कारण शहरातील वाहतूक व्यवस्था. याच काळात मला पुण्यात एक घर घेण्याची संधी आली. ऑफीसपासून फारतर पाच किलोमीटर अंतर असेल. घर तर छानच होतं. आटोपशीर पण मोठंही! सोईचं अन् आवाक्यातलंही; पण प्रश्न होता तो पुढेच. या घरासाठी अडीच लाख रुपये अवघ्या दोन आठवड्यांत भरायचे होते. त्या वेळी घरासाठी कर्जे मिळत; पण त्यासाठीचा कालावधीही किमान दोन महिन्यांचा असे. आता हे दिव्य कसं साध्य व्हावं? खूप विचार केल्यावर घर घेण्याचा निर्णय थांबवायचं ठरविलं; कारण पैशाचं सोंग आणता येणं कठीण होतं. त्या दिवशी मी भोजनाच्या वेळी माझ्या ज्येष्ठ सहकाऱयाशी बोलत होतो. त्याला मी माझ्या घराचा निर्णय

सांगितला. तो थांबला, म्हणाला, एक

कागद घे अन् तुझ्या जवळच्या मित्रांची यादी कर.’ मी यादी करू लागलो. पहिलं नाव अर्थात माझ्या त्या मित्राचं होतं. यादी करता करता वाढत गेली आणि जवळचे असे बावीस मित्र निघाले. माझा सहकारी म्हणाला, `झालं तर मग घर घ्यायचं. आपण असं करू प्रत्येकाला पाच, दहा, पंधरा हजार पये द्यायला सांगू. दोन महिन्यात ते परत करायचे. या दोन महिन्यात कर्ज मंजूर व्हायला काही अडचण येऊ नये.’ झालं. मी त्यालाच म्हणालो, `तू ती देतोस?’ त्यानं फोन लावला. 15 हजारांची व्यवस्था केली. आमच्याकडे एक जाहिरात कंपनीचे संचालक येत. त्यांना अडचण कळली. त्यांनी 25 हजार पाठविले. माझी घरासाठी भरावयाची रक्कम अवघ्या आठ दिवसांत पूर्ण झाली. थोडी अधिकच रक्कम आता हाती होती. `घर नको’ या माझ्या निर्णयापासून `माझं घर’ हा प्रवास अवघ्या दहा दिवसांचा ठरला. एकानं सदिच्छा दिली. घर व्हायलाच हवं असं तो म्हणाला आणि मी कामाला लागलो. ज्यांना विनंती केली
त्यापैकी कोणी नकार दिला नाही. प्रत्येकाच्या मनात सदिच्छा जागी होती. ती मला कळत होती. घर झालं. यथावकाश कर्जाचं काम झालं. प्रत्येकाचे पैसे वेळीच देता आले तरी त्यामागच्या भावनांची परतफेड अवघड होती, अशक्य होती.

 

 

तीन वर्षांच्या कालावधीनंतर नागपूरहून पुण्याला आलो होतो. पुण्यात पुन्हा रुळत होतो. अचानक एक तरुण आला. ओळखीचा चेहरा. तो थांबला. खाली कला. नमस्कार केला त्यानं, म्हणाला, `सर, आता मी ऑपरेटर झालोय. इथं समोरच काम करतो. घरात तीन कॉम्प्युटर घेतलेत. दिवसभर घरात काम चालतं. माझं ठीक चाललंय आणि आणखी तिघांनाही रोजगार देऊ शकतोय. हे केवळ तुमच्या आशीर्वादानं.’ आता मी त्याला ओळखलं होतं आणि हे श्रेयही माझं नाही, याची जाणीव होती. तो माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी शिपाई म्हणून काम करायचा. कामाचं प्रमाण कमी झालं होतं. व्यवसाय डबघाईला येत होता. त्यांना वेतन देऊ शकेल अशी माझी स्थिती नव्हती. त्याला म्हटलं, `आता काही तरी दुसरी नोकरी शोध. इथं काही होणार नाही. फार तर महिनाभर ऑफिसमध्येच मराठी टायपिंग शिक. तुला त्याचा उपयोग होईल.’ माझ्याकडे सगळी व्यवस्था होतीच. तो शिकला. त्यानं कष्ट घेतले. त्याचं फळ त्याला मिळालं. माझ्या होत्या त्या केवळ शुभेच्छा, सदिच्छा!

 

 

आज हे लिहीत असताना होळी साजरी होत्येय. मनातल्या साऱया भावना, राग, संताप, द्वेíष, मत्सर सारं काही होळीत भस्म करण्याचा हा दिवस. एकदा हे सारं भस्म झाल्यावर उरतं तरी काय? मला वाटतं, उरतात त्या केवळ सदिच्छा!

 

जे आपल्याकडे आहे ते वाटायला मग काय हरकत आहे?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..