तिकडचे अन् इकडचे

काही गोष्टींना कसा योगच यावा लागतो, तेव्हा त्या घडतात. जसे मुलीचे लग्न. योग आला की चटकन् dजमते नाही तर चपला झिजवून झिजवून वधुपिता कसा रडकुंडीला येत असतो. आमच्या कुंडलीत पण परदेशगमनाचा योग लिहिलेला असावा म्हणूनच मुलगा अन् सून हाँगकाँगला गेल्यावर आम्ही उभयता कॅथे पॅसिफिकच्या विमानाने एका संध्याकाळी हाँगकाँगला येऊन पोहोचलो.
बेटसमूहांचा बनलेला हाँगकाँग हा आता चीनच्या ताब्यात आला आहे; पण ब्रिटिशांच्या वेळेस असलेला हाँगकाँग आता चीनने तसाच ठेवलेला आहे. तेथील स्वच्छता कशी वाखाणण्यासारखी आहे. ती तर आम्हाला लहान मुलांपासूनसुद्धा दिसली. येथील मुले च्युईंगगमचा राहिलेला भाग व्यवस्थित वरच्या आवरणात गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकताना आढळली. येथे सिगारेटझोनमध्येच लोक सिगारेट ओढतात व थोटके डस्टबीनमध्ये टकतात. पान खाणे नसल्याने पिंक टाकणे हा भाग येथे दिसत नव्हता. काम व्यवस्थित करणे हे सगळ्यांच्या कसे रक्तात भिनलेले आढळले. सकाळी झाडझूड करणाऱया स्त्रिया न बोलता आपले काम व्यवस्थित करताना आढळल्या. आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये एका मजुराला दिवसभर कठडे साफ करताना पाहिले. ते कठडे कसे स्वच्छ चकचकीत दिसत होते. झाडे व्यवस्थित लावलेली दिसत होती. त्यांच्या पालापाचोळ्याची विल्हेवाट दररोज लावली जात होती. मी तर रेल्वेस्थानक, बसस्थानक व मॉलमधील टॉयलेट्स कशी स्वच्छ व दुर्गंधविरहित पाहिली. जनता रहदारीच्या नियमांचा व्यवस्थित आदर करताना पाहिली. पोलीस वॉकीटॉकी घेऊन फक्त सर्व व्यवस्थित चालले आहेत की नाही, हे पाहायचे. `येथे असे केले की इतका दंड होईल’ असे बोर्डपण ठिकठिकाणी होते; पण दंड भरताना आम्हाला कोणीच दिसला नाही. व्यायामाची आवड मात्र येथील सर्व स्तरांतील लोकांना असलेली दिसली. `ताई ची’ हा व्यायामाचा प्रकार सकाळी 6 ते 8 पर्यंत सर्व लोक करतात. काही रेकॉर्डप्लेअरवर व्यवस्थित व्यायाम करतात, तर काही तलवारी घेऊन व्यायाम करतात. डबलबार, सिंगलबारचा व्यायामपण करणारे दिसलेत. आम्ही एका ठिकाणी तर एका वृद्धाला डबलबारचा व्यायाम करताना पाहिले. ज्यांना हे जमत नाही ते चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करीत होते. सकाळी चालणारे कसे जोरजोरात हात हलवीत रस्त्यावर चालताना दिसत होते. एकदा तर रात्री 9 वाजता एक युवक समुद्रकिनाऱयाच्या कडेने धावताना दिसला. आम्ही मुलाला विचारले तेव्हा त्याचे उत्तर होते, “येथे व्यायामाला काळ-वेळ नाही. ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो करतो.”
म्हणूनच आम्हाला येथे कोणीही पोट सुटलेली व्यक्ती आढळली नाही. सर्व कसे सडसडीत अन् तरुणच दिसायचे. चेहऱयावरून वयाचा अंदाज येत नव्हता. म्हणून मला सुचले-
या चपट्या चिनी लोकांच्या देशात
ताई ची हे करतात दररोज लोक
म्हातारा मग कोणी दिसत नाही
सर्वच कसे तरुण दिसतात हे लोक
स्वच्छता तर येथे इतकी की माशापण दिसत नव्हत्या. मी एका मटणाच्या दुकानात टांगलेल्या डुकरावर एकही माशी पाहिली नाही. आम्ही हाँगकाँग पाहून कसे मग आश्चर्यचकितच झालो.
यथावकाश आम्ही भारतात परतलो अन् आमचे मन कसे प्रत्येक गोष्टीची तुलना करीत राहायचे. वाटायचे, तिकडची स्वच्छता आपल्याकडे केव्हा येईल? मग आम्ही अमरावतीला येऊन पोहोचलो. हळूहळू मन मग पुन्हा येथील गोष्टींना सरावले. कोणी जाताना पानाची पिचकारी मारली, की आम्ही मान बाजूला वळवायचो. मटणाच्या दुकानात कापलेल्या बोकडावर असंख्य माशा बसलेल्या दिसत असूनसुद्धा मांस विकत घेणारे पाहायचो. सकाळी रस्ते झाडताना स्त्रिया काम मध्येच सोडून गप्पा मारताना पाहू लागलो. नो पार्किंगमध्ये तर एकदा पोलिसांची गाडीपण उभी असलेली पाहिली. मुलांना स्वच्छतेचे धडे देण्याऐवजी रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीला बसवणाऱया स्त्रिया पाहिल्या. वाटले जाऊ द्या, पण काही तरी सुधारणा अजूनही दिसेल अन् मग दिसले- येथे लोक आता व्यायामकडे वळलेले आढळले. सकाळी किंवा संध्याकाळी लोक नियमितपणे फिरताना दिसतात. चांगले वाटले आम्हाला.
सकाळी एका सलवार-कमीझमधील स्त्रीने रस्त्यात धावताना थांबून आम्हाला `हाय’ केले. मग आठवले- अरे, ही तर देशपांड्यांची नेहमी साडीत दिसणारी मंदा. पुढे भेटले रामभाऊ जे दररोज नेहमी सूटबुटात असायचे. आता शॉर्ट पँट- जर्सी व लिबर्टीच्या जोड्यात. वारुअण्णा मात्र मलमलचा सदरा व धोतरामध्येच हिंडत होते. नानकराय सिंधी जोरजोरात हात हलवीत रस्त्याने फिरताना आम्ही पाहिला. शेजारच्या म्हाताऱया सिंधुताईही हिंडताना दिसल्या. ही सर्व मंडळी मग मालटेकडीच्या माथ्याकडे सकाळी सकाळी चालली होती. असेच पुष्कळसे लोकपण त्यांच्याबरोबर चढाव चढून व्यायाम करताना दिसले. आम्हाला खूप बरे वाटले म्हणून आम्ही खालीच एका झाडाखाली बसलो. थोड्या वेळाने व्यायाम करणारी मंडळी मालटेकडीवरून खाली उतरली. ते सर्व आता खाली बाजूला उभ्या असणाऱया हातगाड्यांकडे वळले. सर्व जण मग सामोसा, मिसळ, चहा घेत बसून श्रमपरिहार करीत होते. रामभाऊ सिगारेट फुंकत मंदाबरोबर गप्पा मारीत होते, तर मंदाताई मिसळ खात होत्या. सिंधुताईंनी गरमागरम सामोसे बांधून घेतले होते.
असा प्रकार आम्ही तिकडे कुठेच पाहिला नव्हता; म्हणून आम्ही दोघे एकमेकांकडे पाहून हसलो. मी मग हसत हसत म्हणालो,
चलता है चलने दो
जो होना है वह होने दो
अब तो हमे सिर्फ खाना है
हम अब बहुत थक गये है
एकंदरीत तिकडचे तिकडे अन् इकडचे इकडे हेच खरे!

रमेश इंगोलीकर, अमरावती

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..