नवीन लेखन...

आमची इडली

 

सुमती मावशी अन् माझा संपर्क सहवास अवघ्या दहा वर्षांचा; पण त्या दहा वर्षांत मला त्यांनी खूप काही दिलं. खरं म्हणजे माझ्या मनात येईल ते अन् येईल तसं मांडण्याची जागा म्हणजे सुमती मावशी. त्यांना मी मावशी म्हणत असलो, तरी त्या माझ्या मावशी नव्हत्या. व्यवहारिक अर्थानं सांगायचं, तर त्यांचं नि माझं नातं असं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मीनाच्या लग्नात आमची ओळख झाली. त्या मीनाच्या मावशी. त्यावेळी माझं वय असेल तिशीच्या आत आणि त्या होत्या पन्नाशीच्या आसपास. खडकीच्या एका शाळेत हिंदी शिकवायच्या. घरात ती दोघंच. पती आणि त्या. त्यांना मूलबाळ झालंच नाही असं नव्हे; पण टिकलं नाही. व्यक्तिमत्त्व थेट पुणेरी वळणाचं. लग्नसमारंभ आटोपल्यावर `या हं, एकदा आमच्याकडे,’ असं आमंत्रण त्यांनी दिलं. एवढ्या आमंत्रणावर एखाद्याकडे जावं असा माझा स्वभाव नव्हता. मी त्यावेळी पुण्याचाच एक भाग असलेल्या विठ्ठलवाडीला राहायचो. बस एवढाच पर्याय. त्याही कमीच होत्या. मावशीचं घर बसस्टॉपपासून खूपच जवळ. अगदी गावात. भिकारदास मारुतीजवळ. स्वाभाविकपणे जाण्यासाठी वाकडी वाट करण्याची गरज नव्हती. एकदा सहज गेलो. कदाचित, बसला वेळ आहे म्हणून गेलो असेन किंवा पाऊस येतोय म्हणून गेलो असेन; पण पहिल्याच भेटीत खूप काही बोललो. बातमी, लेख, राजकारण, समाजकारण, माणूस, धर्म हे सारेच त्यांच्या आवडीचे विषय असल्याचं जाणवलं. त्यांना खूप बोलायचं असे अन् ऐकून घेणारा बहुधा कोणी नसावं. मी त्यांना एक चांगला श्रोता मिळालो. त्यांच्या ठाम मतावर विरोधी भूमिका घेऊन त्यांना छेडायचं अन् आणखी बोलायला भाग पाडायचं, हा माझा छंदच होऊन बसला. त्यांचं ऐकता ऐकता मी माझ्या मनातलं सारं त्यांना केव्हा सांगू लागलो, याचा पत्ताही लागला नाही. त्यानंतर आमचं नातं पक्कं झालं, कुटुंबाचं झालं.

मावशीचे यजमान मधुमेहानं ग्रस्त होते. रक्तदाबही होता. इतरही बरंच काही होतं. त्यांचे प्रश्न आता आमचे, तर आमचे प्रश्न आता त्यांचे झाले होते. मला पुण्यात एक हक्काचं घर मिळालं होतं; पण थोडंसं निमित्त झालं. मावशीचे यजमान आजारी पडले. खूप उपचार केले; पण त्यातच त्यांचं निधन झालं. पुण्यातील मध्यवस्तीतील घर अन् घरात दोघांशिवाय कोणी नाही. स्वाभाविकपणे काकांच्या अखेरच्या काळात त्यांचे रक्ताचे नातेवाईक येऊ लागले होते. चौकशी करीत. गोड-धोड काही आणत. काळजी व्यक्त करीत. काकांना मावशीची काळजी होती. त्यामुळं त्यांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी आपलं राहतं घर आपल्या जवळच्या नातेवाइकाला देऊन टाकलं. मावशीची त्यांनी काळजी घ्यावी, एवढी अपेक्षा मात्र होती. काका गेले तेव्हा ही मंडळी त्या घरातच होती. त्यांच्यानंतर त्यांना त्यांच्या छोट्या दीड खोलीच्या घरात जायची वेळ आली नाही. दोन माणसांचं, दोन मोठ्या खोल्यांचं आणि मोठ्या मनानं हे घर भरून गेलं. त्यांचं झालं. मी मावशीकडे आलो की सार्‍या घरानं कान टवकारले आहेत असं वाटायचं. बोलता यायचं नाही. मावशी तर मूक झाल्या होत्या. इतक्या विषयावर बोलणारी बाई हो-नाही पलीकडे बोलेनाशी झाली. त्यांची प्रकृतीही ढासळल्यासारखी वाटत होती. एकदा रेखानं काही खायला करून दिलं. त्यातले दोन घास खाल्लं. बाकी घरातल्या इतरांना दिलं. दुसर्‍या भेटीत त्या म्हणाल्या, `छान झालं होतं बरं का; पण माझ्या नशिबात नव्हतं ते.’ खूप दिवसांनी त्या काही बोलल्या होत्या. मी खाण्याचाच विषय चालू ठेवला. बर्‍याच गप्पानंतर मनातला एक डंख बाहेर आला. म्हणाल्या, `खूप दिवस वाटतंय स्वीट होमची इडली खावी; पण जावं कसं? लोक काय म्हणतील. इथं आणायचं तर या घराच्या चार भिंतीच्या कैदेत आता जीव नकोसा झालाय.’ मावशीला घरातील माणसं माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. त्यांना मावशीशिवाय असलेल्या घरात रस होता. स्वतच्या घरात मावशी परकी झाली होती. त्या दिवशी मावशीला मी बळेच बाहेर काढलं. आम्ही दोघच स्वीट होमला गेलो. तर्रीदार इडलीचा रस्सा, इडली आणि शेव-उपमा भरपेट नाश्ता केला. काका गेल्यानंतर मावशीनं प्रथमच मनापासून काही खाल्लं असावं असं वाटत होतं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्या म्हणाल्या, `मनात आणलं असतं तर इथवर मी एकटीही आले असते; पण त्यात अर्थ नव्हता. आज माझ्या सगळ्या इच्छांना पूर्णविराम मिळाला आहे.’ त्यानंतर काही इच्छा करायला सुमती मावशी जगात राहिलीच नाही. माझ्या जिवाभावाची मैत्रीण गेली; पण एक समाधान होतं, आमची इडली छान जमली होती. मनातलं मनातच ठेवणारी अनेक माणसं आपण पाहतो; पण मनातलं उधळून देणारी माणसं जेव्हा गप्प होतात तेव्हा त्यांच्या मनाचा ठाव घेणं देवाला भेटण्यापेक्षा वेगळं काही नसतं.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..