नवीन लेखन...

बेभान होऊन काम करा!

जुन्या काळची गोष्ट आहे. एक हौशी पर्यटक होता. गावोगावी फिरणे, दर्शनीय वास्तू पाहणे, हा त्याचा आवडता छंद होता. असाच फिरत असताना एके दिवशी तो एका गावात गेला. तिथे काही गवंडी बांधकाम करताना त्याला दिसले. त्याने सहज म्हणून एका गवंड्याला तुम्ही काय करत आहात ते विचारले. त्याने सांगितले की, आम्ही विटांवर विटा चढवत आहोत. बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्ही बघायला या. आवर्जून बघावे असे काही तुम्ही बांधत असाल असे मला वाटत नाही, असे म्हणून तो पर्यटक पुढच्या मुक्कामाला निघाला. पुढच्या गावातही असेच एक बांधकाम होताना त्याला दिसले. त्याने पुन्हा एका गवंड्याकडे चौकशी केली. त्या गवंड्याने सांगितले की, आम्ही इथे एक सुंदर वास्तू उभारत आहोत. प्रत्येक वीट चढविताना माझ्या मनात हाच विचार असतो की मी काहीतरी भव्यदिव्य निर्माण करत आहे. मी स्वत:ला एक गवंडी किंवा मजूर समजत नाही. मी स्वत:ला एक कलाकार समजतो. जे काही मी करतो ती माझी कलाकृती असते आणि माझी प्रत्येक कलाकृती श्रेष्ठ असावी असाच माझा प्रयत्न असतो. त्याचे हे उत्तर ऐकून तो पर्यटक एवढेच म्हणाला की तू काय बांधतो आहेस ते मला माहीत नाही; परंतु तू जे काही बांधतो आहेस, ते निश्चितच खूप देखणे असेल हे मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. ते पाहायला मी पुढच्यावेळी अवश्य येईल.एकच काम करणाऱ्या दोन व्यक्तींमधील केवळ दृठिकोनाच्या तफावतीने ते जे काही करत असतील त्याच्या निष्पत्तीत खूप फरक पडू शकतो, हेच त्या पर्यटकाला सुचवायचे होते. सांगायचे तात्पर्य, आपण काय करतो आहोत त्याला तितकेसे महत्त्व नाही, तर जे काही करत आहोत त्याची अंतिम फलनिष्पत्ती काय असेल ते अधिक महत्त्वाचे ठरते. ‘ढोर मेहनत’ हा शब्दप्रयोग त्या अर्थानेच रूढ झाला आहे. मेहनतीला दिशा हवी, लक्ष्य हवे.

तसे नसते तर दगड फोडणारा पाथरवटही शिल्पकार म्हणवल्या गेला असता. आजकाल मात्र परिस्थिती तशीच आहे. दगडं फोडण्याचीही अक्कल नसलेले पाथरवट स्वत:ला शिल्पकार म्हणवून घेत आहेत. मी इथे कोणत्याही जाती विशेषाचा उल्लेख करत नसून केवळ उपमा देण्यासाठी त्या शब्दांचा वापर केला आहे. देशाचे शिल्पकार म्हणवणारे आपले नेते, त्यांचे सरकार प्रत्यक्षात पाथरवटाच्याही योग्यतेचे नाही. हा आरोप नाही. ही सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. गेल्या 58 वर्षांच्या आपल्या ‘स्वतंत्र’ प्रवासाने हे सिद्ध केले आहे. पंचवार्षिक योजनांची ढोर मेहनत अखेर वाया गेली. ती वाया जाणार होतीच. मूर्ती घडविणे काय आणि देश घडविणे काय, दोन्ही कामं अतिशय कलाकुसरीची! एकही घाव, एकही टाका चुकीचा पडला की सगळं मुसळ केरात. हे एवढ्या जोखमीचे, कलाकुसरीचे काम इतक्या उथळपणाने केले गेले की ‘बिघडणे’ परवडले; परंतु ‘घडणे’ नको, असे म्हणायची वेळ आली. पंचवार्षिक योजनांचे श्राद्ध नियमितपणे घालणे एवढे एकच काम आमच्या शिल्पकारांनी केले. कोणत्या योजना यशस्वी झाल्या, कोणत्या योजनांनी देशातील सर्वसामान्यांचे जीवन सुखमय झाले? सरकारी आकडेवारी काहीही सांगू देत, वस्तुस्थिती हेच सांगते की गेल्या 55 वर्षांत देशातील बहुतांश सामान्य नागरिकांच्या जीवनमानात काहीही फरक पडलेला नाही. जो काही विकास झाला तो पाच ते दहा टक्के आधीपासूनच सुस्थितीत असलेल्या लोकांच्या राहणीमानात झाला. आधी बग्गीतून फिरणारे आता विदेशी मोटारगाड्या उडवू लागले. हवेल्यांमधून राहणारे, आता बंगल्यात, फार्महाऊसमध्ये राहू लागलेत. विकासाचा हा प्रचंड अनुशेष निर्माण होण्याचे कारण हेच की सरकारने सामान्य जनतेसाठी म्हणून ज्या काही योजना आखल्या त्यावर लेबल केवळ ‘सामान्य जनतेसाठी’ असे होते. प्रत्यक्षात त्या योजनांनी भले मात्र मूठभर श्रीमंतांचे आणि पसाभर नोकरदारांचे केले. सत्ताधाऱ्यांना त्यांचा ‘शेअर’ वेळेवर आणि पाहिजे तितका मिळत राहिला आणि यामुळेच दिल्लीतून निघालेला रुपया गल्लीत पोहोचतो की नाही याकडे लक्ष देण्याची गरज कुणाला भासली नाही. सरकारच्या अनेक योजनात व्यवहार्यता नव्हती. केवळ काहीतरी करायचे म्हणून काही तरी केले जात होते, आजही केले जात आहे. साधे पाण्याचेच उदाहरण घ्या. दरवर्षी देशाच्या मोठ्या भागात उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्यावर सरकारने उपाय काय करावा, तर टँकरद्वारे पाणीपुरवठा! हा पुरवठा दोन-चार वर्षांपुरता असता तर समजून घेता आले असते; परंतु आज 58 वर्षांनंतरही अनेक खेडीपाडी केवळ टँकरच्याच भरोशावर जिवंत आहेत. प्रश्न एका रात्रीत निर्माण झालेला नाही. वर्षानुवर्षे ही समस्या भेडसावत आहे. अशाच इतरही अनेक समस्या आहेत की ज्या अगदी सहज आणि अल्पावधीत सोडविता आल्या असत्या; परंतु तसे झाले नाही. त्यामागे दोन कारणं आहेत, एकतर त्या समस्यांचे योग्य निदानच सरकारला करता आले नाही आणि दुसरे म्हणजे त्या समस्या सोडविण्यात सरकारमधील दलाल, नोकरशाही, त्यांच्या जिवावर पोसलेली ठेकेदार मंडळी आदींचाच विरोध होता. पाण्याची समस्या सुटली तर टँकरद्वारे मिळणाऱ्या मलिद्याचे काय? एका-एका टँकरच्या दिवसातून पंधरा-वीस खेपा दाखविल्या जातात, अर्थात कागदावर. हा पाण्यातून मिळणारा पैसा एवढ्या सहजपणे कोण सोडणार? नैतिकता वगैरेचा प्रश्न नाही. सगळी भाषा ‘पर्सेंटेज’ची. प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिस्सा वेळेवर पोहोचला की झाले. कसल्या योजना आणि कसले टार्गेट! काय तर म्हणे सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलणार! प्रत्यक्षात काय तर ज्याच्या सावकारीचा ढळढळीत पुरावा समोर आला त्याच्याच पाठीशी सरकार उभे! लोकांचा आता विश्वास उडाला आहे. योजना कोणत्याही असो, शेवटी ती ढोर मेहनतच ठरणार. प्रत्येक योजना कुरण असते आणि त्या कुरणात चरण्याची परवानगी काही खास ‘ढोरांनाच’ असते. इतरांच्या नावाने स्त:चे चांगभले करून घेण्याचा हा उद्योग अगदी थेट पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सरकारी यंत्रणांनी व्यवस्थित चालविला आहे. मोठमोठी धरणे सरकारने बांधली. बांधायची कोणासाठी होती तर शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या सिंचनाचा प्रश्न दूर करण्यासाठी. प्रत्यक्षात धरणांचा उपयोग शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी होत आहे. शेतकरी आपला अजूनही आसवांवरच आपले पीक काढतो आहे. पाथरवटाने मूर्ती घडविण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा वेगळे काय होणार? सरकारने भान ठेवून योजना आखायला हव्या होत्या आणि बेभान होऊन काम करायला हवे होते. झाले नेमके उलटे. योजना आखताना कुठलेही भान ठेवले नाही, बेभान होऊन काम करणे कधी जमले नाही. भान राखल्या गेले ते योजनेच्या नावाखाली मलिदा कसा लाटता येईल याचे आणि तो मलिदा बेभानपणे लाटल्या गेला. दूरदर्शीपणा कशाशी खातात हेच सरकारला माहीत नाही. शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी हरितक्रांती आली आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावून गेली. धरणे बांधली, परंतु शेतीतले ढेकूळ कधी भिजले नाही. शेतकऱ्यांचे भले करायचे तर सावकारांना वाजविणे पुरेसे ठरणार नाही. शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराशी उभी करणारी व्यवस्थाच बदलायला पाहिजे. त्यासाठी बिनखर्चाची शेती त्यांना शिकविली पाहिजे. परंतु सरकार हे कधी करणार नाही. विद्यापीठे, शाळांची पेरणी केली; परंतु बहुजनांचे पोरं कधी बारावीचा अडथळा पार करून पुढे जाऊ शकली नाहीत. तशी तजवीजच केल्या गेली.सरकारची एक योजना धड नाही. ज्या धड आहेत त्या धडपणे राबविल्या जात नाहीत. शंभर टक्के लोकांनी पाच टक्के लोकांसाठी राबविलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही, असे आपल्या व्यवस्थेचे वर्णन करता येईल. भान ठेवून बेभानपणे काम करणाऱ्या लोकांच्या हातात जोपर्यंत देशाची सूत्रे जात नाहीत तोपर्यंत तरी परिस्थितीत फारसा बदल होणार नाही, एवढे खरे!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..