कर्कटशृंगी अर्थात काकडशिंगी – बाळसंजीवनी उपयुक्त सर्वांगी
आयुर्वेदात अश्याकाही वनस्पतीयोजना आहेत की जन्मल्यापासुन निरोगीआयुष्य पुर्ण होईस्तोवर तुम्ही त्यावर अवलंबून राहु शकता. आजीबाईचा बटवा हे त्याच उत्तम उदाहरण होय. लहानपणीत बाळगुटी व आयुर्वेदात बाळासांठी दिलेले सर्व वनस्पती योग्यवेळी वापरल्या तर पुढं चालुन त्या मुलामुलींना आजार नगण्य राहुन नक्की संपुर्ण आयुष्य निरोगी राहता येते हेच आयुर्वेद सांगते. म्हणून आपल्या बालरोगतज्ञाकडे बाळाला औषधे व लस, डोस देतांना जवळच्याच वैद्दाकडेही जाउन अरवींदासव, बालकल्याण, संजीवनी बाळगुटी, बाळंतकाढा आवर्जुन घ्या म्हणजे बाळ गुटगुटीत व सुदृढ होइल, स्मरणशक्ती वाढेल अन निरोगी आयुष्य जगेल.
चला आज अशी वनस्पती आहे जी बाळाचे आरोग्यासाठी फार उत्तम आहे. तिचा उपयोग लहान बाळांच्या ज्वर,कफ, सर्दी साठी नेहमी होतो त्यात काकडशींगी, नागरमोथा व अतिविष अशी संजीवनवटी.
यातील काकडशिंगी किंवा कर्कटशृंगी बद्दल जाणून घेउया.
काकडशिंगी ही पिस्ताशिया इंटेगेरिमा (Pistacia integerrima) या झाडाची एक औषधी वनस्पती आहे. ही झाडाच्या पानांवर किटकांच्या चाव्यामुळे तयार होणारी विशिष्ट प्रकारची शिंगासारखी रचना असते. या वनस्पतीचा उपयोग लहान मुलांच्या श्वसनमार्गाच्या आजारांवर, विशेषतः खोकला आणि कफ कमी करण्यासाठी केला जातो. हे एक चकचकीत झुडूप आहे, गडद राखाडी किंवा काळसर साल आहे आणि १६ मीटर पर्यंत वाढते. या झुडुपाचा वास विचित्र आहे. पाने गडद हिरव्या रंगाची असतात जी शरद ऋतूमध्ये चमकदार लाल होतात. या वेळी ती अधिक सहजपणे ओळखता येतात.
काकडशिंगीची माहिती:
शास्त्रीय नाव: Pistacia integerrima
दात येताना होणाऱ्या त्रासावर अतिशय गुणकारी असते. मुलांना ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यापैकी कोणताही त्रास होत असल्यास नागरमोथा, अतिविषा, काकडशिंगी व पिंपळी या चारही द्रव्यांचे दूध वा पाण्यात उगाळून एक अष्टमांश चमचा भरेल एवढे चाटण मधातून चाटवावे. दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलांना याचे पाव चमचा चूर्ण मधात मिसळून दिले तरी चालते. काकडशिंगी हेही एक बहुगुणी औषध आहे.
• स्वरुप: ही फिकट रंगाची, पोकळ, हलकी आणि फुगीर शेंगेसारखी असते, जी झाडाच्या पानांवर कीटकांच्या चाव्यामुळे तयार होते.
इतर नावे: कर्कटशृंगी, काकरसिंगी, क्रॅब्स क्लॉ (Crabs claw)
सुश्रुत संहितेत, कर्कटशृंगीला विषारी कंद म्हणून वर्गीकृत केले आहे. ही एक औषधी वनस्पती आहे जी श्रृंगी (पित्त) तयार करते जी दसिया एसिडिफॅक्टर या कीटकाने तयार केली आहे. कीटकाच्या फांद्यांवर शिंगासारखे वाढ निर्माण करते ज्याला कर्कटशृंगी म्हणतात.
अधिवास:
हे मूळचे चीन आणि जपानचे आहे. पण इंग्लंडमध्येही आढळते. भारतात ते समशीतोष्ण हिमालयात, काश्मीर, सिक्कीम ते भूतान पर्यंत ६००-२,५०० मीटर उंचीवर घेतले जाते.
• औषधी उपयोग:
१. लहान मुलांच्या औषधात काकडशिंगी ही लोकप्रिय आहे. ती खूप प्रमाणात वापरतात.
२. लहान मुलांच्या खोकल्यात – लहान मुलांना खोकला झाला तर काकडशिंगीचे चूर्ण 125 मिलि ग्रॅम मधातून चाटवावे. लहान मुलांना झालेला खोकला ताबडतोब बरा होतो.
३. लहान मुलांना हगवण लागली तर काकडशिंगीचे चूर्ण अत्यंत उपयुक्त आहे. ते मधातून चाटवावे. त्याने हगवण तत्काळ बरी होते.
४. लहान मुलांच्या तापावर – कोणत्याही प्रकारचा ताप लगेच बरा हाईल जर अर्धा ग्रॅम अतिविषाची कळी व काकडशिंगी यांचे चूर्ण अर्धा ग्रॅम मधाबरोबर चाटवले तर ताप कमी होतो.
५. लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी – लहान मुलांना रोग होऊ नये व त्यांची प्रतिकारकशक्ती वाढावी म्हणून अतिविष, नागरमोथा व काकडशिंगी या आयुर्वेदीय वनस्पतींचे समभाग घेऊन वस्त्रगाळ चूर्ण करावे. कुटून चांगले वस्त्रगाळ केलेले चूर्ण बालकांना मधातून देण्याचा प्रघात आहे. हे चूर्ण रोज लहान मुलास बालगुटी म्हणून द्यावे.
६. बाळाचे दात येताना त्रास होऊ नये म्हणून -अतिविष, नागरमोथा व काकडशिंगी यांचे मिश्रण चांगले मधात घोळून बाळाला चाटवले असता बाळाचे दात येताना त्याला हलके जाते दात येताना सर्दी, खोकला, हगवण, ताप यासारखा काहीही त्रास होत नाही.
७. मूत्रवह पूयमेह – कर्कटशृंगीमधील विशिष्टगंधी तेलामुळे मूत्रातील पूयाचा नाश होत असल्याने पूयमेहात तिचा वापर करावा .
८. क्षयरोग – तिक्त व उष्ण असल्याने कटुपौष्टिक कार्य होऊन क्रमाने बल वाढते . म्हणून काश्मीरात क्षयरोगात कर्कटशृंगीच्या फळाचा वापर करतात. मात्रा – चूर्ण १ ते २ ग्रॅम ; लहान मुलांमध्ये १२० ते ५०० मिलिग्रॅम
९. शृंगी + त्रिकटु हे मिश्रण गरम पाण्याबरोबर दिले असता श्वास, हिक्का, पीनस इ.व्याधी बऱ्या होतात
१०. लहान मुलांचा कास, ज्वर, सर्दी या कफविकारांमध्ये काकडशिंगी, नागरमोथे आणि अतिविष यांचे शृंग्यादिचूर्ण मधाबरोबर द्यावे.
११. अतिसारावर काकडशिंगीचे चूर्ण मधाबरोबर द्यावे .
अशाप्रकारे काकडशिंगी ही खास बाळाचे आरोग्य जतन करणारी वनौषधी आहे.
इतर: काही पारंपरिक उपचारांमध्ये याचा उपयोग उलट्या, अतिसार आणि नेत्रविकारांवरही केला जातो.
आयुर्वेदिक गुणधर्म:
रासा तिक्ता, कसाया चव कडू, तुरट
गुना लघु, रुक्षा भौतिक मालमत्ता कोरडे
विर्या उष्णा सामर्थ्य गरम
विपाक काटू चयापचय गुणधर्म (पचनानंतर) तिखट
रासायनिक संघटन –
शृंगाकार कोषात २० ते ७५ टक्के टॅनिन , उडनशील तेल , राळ आणि बीटा सिस्टेस्टेरॉल व मॅस्टिकारडिऑनिक ॲसिड हे घटक असतात . गंधवर्णरहित असणारे ताजे तेल काही वेळ ठेवल्याने पिवळे व विशिष्ट स्वादयुक्त बनते.
पूरक प्रमुख कार्य व उपयोग:
काकडशिंगी आमाशयातील दुष्ट क्लेदककफाचे छेदन व शमन करते. त्यामुळे लहान मुलांमध्ये वयपरत्वे होणाऱ्या कफदुष्टीजन्य कास, श्वास, हिक्का, सर्दी, प्रतिश्याय व अतिसारात शृंगीचूर्ण मधाबरोबर चाटवावे.
दोषघ्नता -उष्ण असल्याने वातघ्न, सर्व गुणांनी कफघ्न .
स्थानिन – लेप केला असता कर्कटशृंगीच्या कषाय रसाने ओढा बसून शोथ कमी होतो . कषायरसाने रक्तवाहिन्यांचा संकोच होऊन हिरड्यांतून रक्त येणे बंद होत असल्याने काढ्याच्या गुळण्या कराव्यात .
व्रणावर चूर्ण लावले असता कषायरसाने व्रणरोपण होते. उष्णवीर्य असल्याने वातानुलोमन व कषायरसमुळे व उष्णतेमुळे ग्राही असल्याने व तिक्तरस आणि उष्णवीर्य यांमुळे दीपन असल्याने अरुचि, अतिसार, प्रवाहिकेत अनुक्रमे रुचिकर आणि ग्राही म्हणून उपयोग होतो. विशेषतः बालकांमध्ये दंतोद्भवाच्या वेळी उत्पन्न होणाऱ्या अतिसारादी लक्षणांमध्ये काकडशिंगीच उष्णवीर्य असल्याने उर:स्थ व कण्ठस्थ कफाचे विलयन करते व कफ बाहेर टाकते. तसेच कषाय रसाने कफस्थानांना बल देते व नवीन कफनिर्मितीला पायबंद घालते. काकडशिंगीमुळे प्राणवहस्रोतसाच्या श्लेष्मरोधकतेला बल मिळते .
वातज कासात तिलतैलाबरोबर काकडशिंगीचे चूर्ण चाटविल्यास वातशमन होते. क्षयज कासात काकडशिंगीसिद्ध घृत दिल्याने अरुची, ज्वर , इत्यादी लक्षणे कमी होतात. कफज व्याधींचा कर्कटशृंगीमुळे उपशम होतो. यासाठी शृंगी, पिंपळी व पुष्करमूळ यांचे चूर्ण मधाबरोबर चाटवावे.
संदर्भ:
१. संकलन व माहीती द्रव्यगुणविज्ञान भाग 1 व 2 द्वारा
(प्रा . डॉ . अ . पां . देशपांडे प्रा . डॉ . र . रा . जवळगेकर प्रा . डॉ . सुभाष रानडे)
२. डॉ. कैलास लीलाधरराव उगले यांचे लेख.
३. सुजाता गानू यांचा लेख
४. मराठी विश्वकोश
५. गुगल वरील माहिती.
६. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
मोबाईल: ९८८१२०४९०४
११. ११. २०२५


Leave a Reply