नवीन लेखन...

आनंद आणि आई

 

एकदा एका छोट्या कार्यक्रमात एक प्रश्न सहजपणे आला. ‘‘तुमच्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण कोणता?’’ खरे तर हा प्रश्न कोणीही कोणालाही विचारू शकतो आणि त्याचे उत्तर अनेक वेळा मिळतेही. त्या कार्यक्रमातही तसेच झाले. ‘‘माझा जन्म हाच माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण’’ असे उत्तर मी देऊन टाकले. कार्यक्रमानंतरही या प्रश्नाने माझा पिच्छा सोडला नाही. खरंच, माझा जन्म हा आनंदाचा क्षण होता का? तो मी अनुभवला का? उद्या एखाद्याने तुमच्या आयुष्यातला सर्वांत वेदनादायक क्षण कोणता, असा प्रश्न विचारला असता, तर माझे उत्तर काय राहिले असते? या प्रश्नासाठीही माझे हेच उत्तर योग्य ठरू शकले असते का? त्या वेदना तरी मी अनुभवल्या होत्या का? तसे पाहिले, तर आनंद किवा वेदना, दुःख या बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया शाश्वत असतात का? एखाद्या प्रचंड आव्हानाला किंवा संकटाला सामोरे जाताना अनुभवल्या जाणार्‍या वेदना या कायमस्वरूपी वेदना तरी राहतात का? ‘त्या वेळी मी हे सहन केलं’ असे सांगताना त्या दुःखाचा नवा अनुभव घेतला जातो का? घेतला जात असेल, तर तो खरोखर दुःखद असतो की सुखद? प्रश्न छोटे असतात. ते भासतातही साधे-सोपे. प्रत्येक वेळी ते तसे असतात का? प्रश्न तेच असतात- साधे-सोपे. आपण त्यांना अवघड किवा सोपे बनवितो. अशा या घटनांचा प्रारंभच मुळी होतोयाळी होतो तो जन्मापासून आणि त्याचा गुंता वाढतो तो नातेसंबंधातून. तुमचे जीवन सुखकारक, आनंददायक बनविण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे तो तुमचे नातेसंबंध ठीक करण्याचा, ते सुधारण्याचा. आई-वडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण, मित्र आणि सहकारी यांच्या संबंधांतून तर आयुष्य पुढे सरकत जाते. एका अर्थाने रिलेशन्स म्हणजे आयुष्य होय अन् बर्‍याच वेळा आपणच ते वेदनादायक बनवितो. माझेच उदाहरण सांगतो. आम्ही चौघे भाऊ, एक बहीण. आमचे कुटुंब मध्यमवर्गीय. मी थोरा. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, संस्कार मिळावेत, त्याने मोठे व्हावे, ही माझ्या आई-वडिलांची इच्छा. स्वाभाविकपणे त्यांचे प्रयत्न त्या दिशेने. वयाच्या दहाव्या वर्षीच मला शिक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले. मी पुण्यात राहिलो; पण आपल्या कुटुंबाने, विशेषत आपल्या आईने आपल्याला अव्हेरले, ही भावना जपतच. माझ्यापेक्षा इतर भावंडांवर आईचा जीव अधिकच, असे मनाच्या कोपऱयात घट्ट बसले आणि मग सुरू झाला तो आई आणि मुलाच्या अस्वाभाविक नातेसंबंधातला एक प्रदीर्घ प्रवास. ज्या ज्या वेळी आईची अन् माझी भेट झाली त्या त्या वेळी माझ्या मनातला हा दुखरा कोपरा भळभळू लागायचा. मी सहजपणे असे काही बोलून जायचो, की त्यामुळे आईने दुःखी व्हावे, तिला अपराधी वाटावे. आईच नव्हे, तर या अस्वाभाविक प्रवासात माझे भाऊ-बहीणही मग माझ्या अनुदार शब्दांचे लक्ष्य ठरायचे. त्यांना वाईट वाटले, दुःख झाले, की मी सुखावला जायचो. हे सुखावणे क्षणिक असायचे. ती विकृती जाणवायची अन् मग पुन्हा एकदा सुरू व्हायचा तो दुःखाचा प्रवास. दुःख आठवणे, ते वाढविणे, ते जपणे अन् कुरवाळणेही. हृदयाच्या गाभाऱयात दुःख असले, तर इतरांसाठी आनंद तो कोठून येणार? वर्षांमागून वर्षे गेली आणि हे दुःख हेच माझे वास्तव आहे, असे वाटायला लागले. काही वेळा तर त्याचे उदात्तीकरणही सुरू झाले; पण आई-वडील म्हणजे काय, त्यांचे नाते काय असते, त्याचे नैसर्गिक आविष्करण कसे, याचा शोध मला अचानक झाला. एका भल्या पहाटे मी पुण्याहून नाशिकला गेलो. तिथे आई असते. त्या दिवशी मी प्रथमच आईकडे आई म्हणून पाहिले. तिच्या स्नेहाचे, प्रेमाचे दर्शन व्हायला मग अवधी लागला नाही. आईच्या पायांवर डोके ठेवून मी माझ्या आयुष्यात जपलेल्या अनेक वेदनांचे ओझे कमी केले. तिची क्षमा मागितली. आईच ती. तिच्या पायांवर माझे अश्रू वाहत असताना माझ्या पाठीवर तिच्या अश्रूंचा पाऊस पडला होता. तिचा स्पर्श प्रेमाचा, वात्सल्याचा दाखला देत होता. आम्ही दोघेही अश्रूंच्या पावसात स्वच्छ होऊन गेलो होतो. आज आई म्हटले तर आनंदाची अनुभूती मी घेऊ शकतो. कारण ते स्वाभाविक आहे.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..