नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार ( भाग २१)

प्रत्येक व्यक्ती ही कवी असते! तसेच प्रत्येक व्यक्ती ही लेखक कलाकारही असते! असे मी माझ्या व्याख्यानातून नेहमी सांगत असतो. फक्त व्यक्तीला व्यक्त होता आले पाहिजे! त्यासाठी साहित्याची , वाचनाची , चिंतनाची , कलेची अभिरूची असणे ही अत्यंत अत्यावश्यक असते! सहवास आणी संगत यातून या गोष्टी जन्म घेतात. माझ्या बाबतीत तर हेच घडले. पूर्वार्जित, वडिलोपार्जित व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळाले. परिस्थितिने कष्ट आणी दुर्दम्य विश्वास शिकविला. नेहमी ब्राह्म मुहूर्तावर उठावे! मंदिरात काकड आरती करावी, पूजाअर्च्या करावी. व्यायामशाळेत जावे. पाठांतर करावे, मुखोद्गत करावे अशा संस्कारांचे संस्करण बालपणातच झाले. तेंव्हा सारेच सामाजिक वातावरणही सर्वार्थनेच पोषक होते. परिस्थितीनुरूप संस्कार घडत गेले.
सांस्कृतिक सण, उत्सव, अशा समारंभातून प्रबोधनात्मक गोष्टि सहज शिकता आल्या.

आजच्या सारखी प्रसार माध्यमे नव्हती. पण त्यावेळी प्रवचने, कीर्तने, पोवाडे, भारुड, नाटक, सिनेमा थिएटर, व्यायामशाळा, तमाशे,कलापथके, फड, जत्रा जाहिर व्याख्याने, मेळे, भावगीत गायन, प्रभात फेऱ्या, असे अनेक संस्कारक्षम कार्यक्रम होत असत. अशा सर्व कार्यक्रमासाठी ओपन थिएटर असत. अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार, गायक, वादक, व्याख्याते, कलाकार ही मंडळी सहज दिसत असत, सहज भेटत असत. त्या सुमारे किमान १९५५ ते १९६५ चा तो काळ हा सर्वारथाने समृद्ध असा होता, संस्कारक्षम होता. त्यातूनच सारे जीवन घडले. आम्ही सर्वच मित्र याच वातारणात मोठ्ठे झालो. आजही वयाची ७० री पार करून देखील आमची मैत्री अजुनही घट्ट जीवाची आहे.
हे सर्व सांगण्याचा, लिहिण्याचा उद्देश्य म्हणजे त्या काळी आम्ही सर्वांनीच हे जे जे कार्यक्रम पाहिले, ऐकले त्या सर्व कार्यक्रमामधुन आम्हाला सर्वार्थांने फक्त प्रबोधन झाले. त्याकाळचे प्रख्यात कीर्तनकार कै. निजामपुरकर बुआ, गोविंदबूआ देव, कै. गोविंदस्वामी आफळे, ओतूरकर बुआ, कोपरकर बुआ, नरसिंगपूरकर (कराडकर) बुआ, पटवर्धन बुआ (वाई), कै. दीक्षित बुआ, अशा अनेक दिग्गज ज्येष्ठ कीर्तनकार प्रभृतींना कित्येक वर्षे आम्ही ऐकत आलो.

त्याकाळी पैसे गाठीला तर कधीच नव्हते, संध्याकाळची देखील विवंचना होती. पण प्रेमसंस्कार, तडजोड आणी समाधान मात्र होते. या संस्कारामुळे आज आमची पिढी सुखी आहे असे मी म्हणेन! अशा वातावरणात खरी अजरामर श्रीमंती मला लाभली.

कीर्तन म्हणजे सर्वांग सुंदर कला प्रकार की ज्यात अभिनय आहे, पाठांतर आहे, नृत्य पदन्यास आहे, गायन वादन, सर्वरस श्रृंगार आहे असे विलक्षण एकपात्री कसब आहे. असे की जे आख्यान पहाताना,ऐकताना फक्त विरश्री अलगद जन्म घेते. कीर्तनातील सर्वच आख्याने म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवराय, श्रीमंत छत्रपती संभाजी, सर्व संतविभूती, स्वामी विवेकानंद, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, रामायण, महाभारत अशा अनेक विवेकी संस्कारक्षम विषयावर अभ्यासपूर्ण असे आख्यान जेंव्हा होत असे तेंव्हा सर्व श्रोतावर्ग मंत्रमुग्ध होत असे.

तीच गोष्ट चातुर्मासामध्ये सतत होत असणाऱ्या प्रवचनातूनही होत असे. काशीचे विद्वान महामहोपाध्याय वेदसंपन्न भाऊशास्री वझे. तर इंदौरचे पंडित भालचंद्रशास्त्री भारती. अकोल्याचे पंडित दीक्षितशास्री. सांगलीचे ईश्वरशास्त्री, तसेच सातारचे महामहोपाध्याय, वेदसम्पन्न यज्ञेश्वर केळकर शास्त्री या सर्वांची रामायण, महाभारत, स्कंदपुराण, विष्णु पुराण, भगवतगीता, भागवत पुराण या विषयावर संपूर्ण चातुर्मासात प्रासादिक प्रवचने होत असत. मन्दिरातून भागवत सप्ताह होत असत .त्यातून अध्यात्मिकतसेच समाज प्रबोधन होत असे. हे सर्व ऐकण्याचे भाग्य आमच्या पिढीला वर्षानुवर्षे सतत लाभले अन अगदी सहज जाता जाता बालवयातच आमच्यावर असे सुंदर संस्कार झाले. ऐकता ऐकता पाठांतर झाले आणि अशा संस्कारक्षम गोष्टी अंतरात रुजल्या आणि साहित्यकला, संस्कृतिची खरी ओळख झाली. आवड़ निर्माण झाली. आम्ही लिहू लागलो, बोलू वाचू लागलो, गाऊ लागलो, कलाछंद, खेळात रमलो केवळ या प्रसन्न संस्कारक्षम वातावरणामुळेच!

शाळेमध्येही लेखनाचे धड़े शिक्षकवृन्द देत असत. दरमहा एक हस्तलिखित मासिक वर्गावर्गातुन विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले जात असे. त्यातूनही साहित्य अभिरूची रुजविली जात होती आणि या सर्वातुनच साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर रुजले.

काळ धावत राहिला. शिक्षण संपले! मी व्यवसायात स्थिरावलो. अनेक पुस्तके छापली प्रकाशितही केली. त्यात माझिही सात आठ पुस्तके लिहून प्रकाशित झाली होती. पुढे त्यावेळी पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कै. डॉ. दभी . कुलकर्णी सरांना त्यांचे अभिनंदन
करण्याच्या उद्देशाने धायरी वडगाव पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत एक साहित्यिक म्हणून मला भेटण्याची संधी मिळाली . मी भेटलो. भेटत राहिलो. ते मी रहात होतो तेथून अगदीच जवळ रहात होते. सतत संपर्क होत राहिला आणि आमचे उभयतांचे मैत्र संबंध दृगोच्चर झाले हा दैवयोग.
खरं म्हणजे हे पूर्वकर्म, संचित, प्रारब्धयोग असेच काहीतरी असावे.

पुढे व्यवसाया निमित्त मी १९८४ मध्येच पुण्यात आलो. डेक्कनवर माझे ऑफिसही होते. त्यामुळे पुण्यातील मान्यवरांशी संपर्क ठेवणे त्यांना भेटणे सुलभ झाले. कालांतराने पुढे मी मुंबई येथे देखील व्यावसाया निमित्ताने राहिलो.

मग सातारा, पुणे, मुंबई अशी माझी भ्रमंती सुरू झाली आणि केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार या उक्तीची अनुभूती आली.

© विगसा

४ – १२ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..