नवीन लेखन...

पाणी

माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला होता. थेट सिमल्याहून बेणे आणल्याचं आठवतं. त्यानंतर काही काळ घरात केवळ चर्चा होती ती बटाटयाच्या शेतीची. अखेर एकदा घरात बटाटे आले. त्यांचा प्रत्येकी आकार फार तर खेळातल्या गोट्यांएवढा असेल. त्यानंतर बटाट्याची शेती मागे पडली ती कायमचीच; पण जेव्हा जेव्हा माझे काका घरी यायचे तेव्हा शेतीचा विषय निघायचाच. त्या वेळी आम्ही कोपरगाव तालुक्यातल्या कोळपेवाडी या साखर कारखान्याच्या गावी राहत असू. तेथून फार तर पन्नास किलोमीटरवर गंगापूर तालुक्यात माझं गाव होतं. मांजरी हे गावाचं नाव. लहानपणी या गावात गेलेलो, खेळलेलो. तिथलं देवीचं मंदिर, गावकऱयांनी तयार केलेला तलाव, आमच्या घरातलं रेशनचं दुकान आणि त्यासमोरचं पोस्ट, या त्यातल्या आठवणीच्या खुणा. शेतावर जायची कधी वेळ यायची नाही; कारण तिथं धड ना सावली ना पाणी. स्वाभाविकपणे नगर जिल्ह्यातील हिरवीगार शेती पाहिलेल्या मला ते शेत वैराणच वाटायचं. फार तर विसाव्याला एक चिंच होती. चिंचेच्या खाली पीर होता. त्यामुळं तिथं आम्हाला फारसा प्रवेशही नसायचा. तर, काका शेती करायचे आणि ते घरी आले की ज्या चर्चा होत त्यात शेतीचा विषय खूपच कमी असायचा. कुठे कर्ज घेतलंय, कुठलं पीक जळालं, या वेळी खायला दिढीनं दोन पोती घेतलीत (दिढीनं म्हणजे या हंगामात घेतलेलं एक पोतं धान्य दुसऱया हंगामात दीड पोतं द्यायचं) ही पोती कधी उत्पन्न आलं आणि परत करता आली, असं झालं नव्हतं. प्रत्येक वेळी वडील काही ना काही पैसे काढून देत. काकांचं आमच्या घरातलं वास्तव्य बरचसं तणावाचंच असे; पण माझ्या दृष्टीनं मात्र थोडा वेगळा अनुभव असायचा. काका परत जायला निघाले की मी त्यांच्याबरोबर स्टॅन्डवर जायचो. काकाला मिसळ आणि जिलेबी खूप आवडे. त्याच्या दृष्टीनं ती चैनच होती. आमच्याकडे आल्यावर बहुधा त्याला ती करता यायची.
शेती हा एकूणच विषय माझ्या आईच्या दृष्टीनं फारसा उत्सुकतेचा किंवा आत्मीयतेचा नसायचा. तिला घरात वाचविलेल्या पैशातून शेतीसाठी काही द्यावं लागायचं हे त्यामागचं कारण असावं; पण मला आठवतं, त्या वेळी शेती हा उत्साहाचा विषय बनला होता. सुरुंग, ब्लास्टिंग असे एरवी वापरात नसलेले शब्द चर्चेत असायचे. पैशाचा विषयही यायचाच, पण त्या चर्चेत निराशा-नाराजी नसायची. उत्साह असायचा. स्वप्नं असायची. एके दिवशी कळलं, की आपल्या शेतावर विहीर काढायची ठरलीय. विहीर आणि पाणी यांचा संबंधच इतका अभिन्न, की या कल्पनेनंच आम्ही भारावून गेलो होतो. चार-आठ दिवसांनी बातमी यायची. खोदकाम सुरू झालंय, एक परस झालं. दोन परस खोदलेत पण जमिनीला ओलावाही नाहीये. एके दिवशी काका आले ते चेहरा एवढासा करूनच. विहिरीत पक्का दगड लागला होता. पाच परस खोदल्यानंतरही पाण्याचा पत्ता नव्हता. गेले काही दिवस सातत्यानं पैसे गावी जात होते. आज ना उद्या पाणी लागेल ही आशा होती. पाणी रोज स्वप्नात पाहिलं जात होतं त्यावर आजचा दिवस सुखाचा होत होता. त्या रात्री केवळ विहीर अन् पाणी एवढाच विषय चर्चेला होता. काका निराश होता, तर वडील काहीतरी मार्ग निघेल, अशा प्रयत्नात. अखेरीला औरंगाबादेतून चार माणसं सुरुंग काढायला न्यायचं असं ठरविलं, तेव्हा पहाट झाली होती. सकाळी-सकाळी काका गावी गेला. आमची मिसळ-जिलेबी झालीच नाही. त्या दिवशी वडील दिवसभर काही मोठ्या बागाईतदारांशी बोलत होते, काही ठरवीत होते. अखेर ठरलं. गुरुवारी निघायचं. गाडी घेऊनच जायचं. कोपरगावहून ब्लास्टिंग मशिनची गाडी येईल. हे सारं तपशिलानं लक्षात रहायचं कारण म्हणजे त्या गाडीबरोबर मलाही नेणार होते. मी केवळ गुरुवारची वाट पाहत होतो. अखेर गुरुवार उजाडला आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शेतावर पोहोचलो तेव्हा मजुरांनी विहिरीच्या खड्यात किमान दीड-दोन फूट खोलीची नऊ बिळे तयार केली होती. त्यात स्फोटके भरण्यात आली. त्याला जिलेटीन म्हणत. या सुरुंगाचं सारं नियंत्रण या गाडीतून होणार होतं. सारं काही सज्ज होतं. सर्वांना विहिरीपासून दूर जायला सांगण्यात आलं. आता लवकरच स्फोट घडविण्यात येणार होते. उत्कंठा वाढत होती. सारे विहिरीपासून किमान शंभर मीटरवर होतो. काकाही मागे झालेला होता. इशारा झाला आणि बार उडाले. किती बार झाले कळलं नाही; पण विहिरीतून दगड उडाले, खपल्या उडाल्या. `थांबा।़ एवढ्यात पुढे जाऊ नका,’ असं गाडीतून सांगण्यात येत होतं; पण आता बार थांबलेत म्हणून काका पुढे झाला तेवढ्यात एक स्फोट झाला. दगड उडाले. छोटे अन् मोठेही. एक कपटा उडाला तो काकाच्या कपाळावर. त्यानं कपाळाला हात लावला. तो ओला झाला होता. रक्त येत होतं. काका तसाच विहिरीकडे धावला अन् ओरडला, `दादा।़ पाणी!’ कपाळाची खोक विसरून पाण्याचं ते निर्मळ रूप तो पाहत होता. विहिरीला तीन जिवंत झरे लागले होते. झऱयाच्या मुळाशी स्वच्छ पाणी मातीत मुरत होतं. आमचा आनंद कष्ट, वेदना थिट्या करीत होता.
आज हे सारं आठवलं ते वृत्तपत्रातल्या एका छोट्या बातमीवरनं. बातमीत म्हटलं होतं, `22 मार्च हा जागतिक जलदिन आहे.’

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..