नवीन लेखन...

सीमोल्लंघन

 

मला अजून आठवतं, मी विचारत होतो, परमेश्वर म्हणजे काय? तो खरेच अस्तित्वात असतो का? माझ्या प्रश्नावर मी खूष होतो. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर्कशुद्ध पद्धतीनं देता येणार नाही असं मला वाटत होतं. एका अर्थानं एका पत्रकारानं एका आध्यात्मिक गुरूला विचारलेला तो प्रश्न होता. प्रश्नामागे उत्तर मिळविण्याच्या अभिलाषेपेक्षा समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्याचा इरादा अधिक होता.

 

 

ते बोलू लागले, `तू हा विजेचा दिवा पाहतो आहेस? हे बटन दाबल्यानंतर हा दिवस लागणार आहे हेही तुला माहिती आहे. हा विजेचा परिणाम आहे, ऊर्जेचा परिणाम आहे हेही तुला ज्ञात आहे. या बटनापासून या दिव्यापर्यंत जी वायर जाते तिला हात लावला तरी आपल्याला काही होणार नाही याची कल्पनाही तुला आहे. कारण ती सुरक्षित बनविली आहे. उघडी वायर असेल, तर विजेचा धक्का बसतो हेही माहीत असतं आपल्याला. वायर हे माध्यम आहे. दिवा हेही माध्यम आहे अन् ऊर्जा हा परिणाम आहे. वीज मग तुम्हाला हवा तर दिवा प्रज्ज्वलीत करू शकते, पाणी गरम करू शकते, खोली थंड करू शकते. पाण्याचे बर्फही बनवू शकते. वीज दिसू शकत नसली, तरी ती आहे हा आपला विश्वास आहे अन् तो शास्त्रीय तर्कानं सिद्धही करता येतो. हवेचंही तसंच आहे. ती दिसत नाही; पण जाणवते. श्वासासाठी आपण ती वापरतो. वारा आला की तिची जाणीव होते. वादळ आलं, की त्याचे परिणामही णवतात. हवेचे आपण हवे तसे उपयोगही करून घेतो. बऱयाचवेळा ते उपयुक्त असतात. काहीवेळा ते प्रतिकूलही ठरतात. परमेश्वर असाच आहे. तो जाणवतो; पण त्याची जाणीव हवी. तो अनेक रूपांत भेटतो…त्याला ओळखता यायला हवं. परमेश्वर म्हणजे अनेक हात असलेला किंवा ज्यांना आपण

 

मूर्तीत, चित्रात पाहतो. तो

म्हणजेच परमेश्वर असं नव्हे. तो

तुझ्यात जसा आहे तसाच माझ्यातही आहे. आपण त्याला शोधू पाहतो; पण तो सापडत नाही. कारण आपल्या मनात त्याची जी प्रतिमा आहे तीच केवळ आपण शोधत असतो. आपल्या जवळपास, आपल्यात असलेल्या त्याला आपण शोधतच नाही. आता हे पाहा, तू रस्त्याच्या कडेला उभा आहेस. मित्राबरोबर गप्पा सुरू आहेत. काही कामासाठी मित्र दूर जातो. तू उभाच रस्त्याच्या कडेला. सुरक्षित, शांत अन् विचारमग्न. अचानक एक वेगवान वाहन तुझ्या दिशेनं येत असलेलं दिसतं. काही करावं, यासाठी वेळ नसतो… तोपर्यंत ते वाहन आणि तू यांच्यात फारतर फुटभराचं अंतर उरतं. आता सारं संपलं आहे याची तीव्र जाणीव होते. घसा कोरडा पडतो, आवाज फुटत नाही अन् क्षणात खस्कन तुला कोणीतरी ढकलतं. तू बाजूला पडतोस. वाहन रोरावत निघून जातं. आलेला मृत्यू पाहात असतानाच तुला दिसतो एक अनोळखी चेहरा जवळनं जात असलेल्या अज्ञात पादचाऱयाचा. तो तुला उठवतो. म्हणतो, `अरे, एवढा कसल्या विचारात होतास? आता गाडीखाली गेला असतास!’ तू उभा राहतो त्या माणसाला धन्यवाद देतोस. म्हणतोस, `तू देवासारखा आलास…अन्यथा?’ आपण काहीच केलं नाही अशा आविर्भावात तो निघून जातो. तुझा

 

मित्र दुरून हे सगळं पाहात असतो…त्यालाही तो देवासारखा वाटतो. खरंच कोण असेल तो? एक पादचारी? एक माणूस? एक मदतनीस? की देव? एरवी एखाद्या माणसाने धक्का दिला तर चिडणारा तू, त्याला देव म्हणतोस. कारण देव पाहण्याची दृष्टी त्या प्रसंगानं तुला दिलेली असते.

 

परमेश्वर, त्याचं अस्तित्व, त्याचं जाणवणं याविषयी ते बरंच काही बोलत असतात. मी ऐकत असतो; पण एका अर्थानं माझा परमेश्वराचा शोध संपलेला असतो. निरुत्तर करायला गेलेला मी तिथं गळून पडलेला असतो. आता मी माझ्या सभोवताली अशा देवांचा मेळावा पाहू शकतो. कारण ती दृष्टी मला लाभली. आरती, पूजा, व्रतवैकल्य, साधना यापेक्षाही माणसा-माणसातला देव खूप सोपा, साधा अन् सहजसाध्य असतो. त्यासाठी तुमच्यातला परमेश्वरही जागा हवा एवढंच.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..