नवीन लेखन...

रोजा

 

गुलबट छटा असलेली सुरेख फर, वेधक बोलके डोळे, स्वतच्या सौंदर्याची जाणीव असलेल्या तरुणीसारखी चाल, कोणीही मला पाहिले, तर पुन्हा मान वळवून पाहावेच लागेल, असा कमालीचा विश्वास बाळगणारे हे व्यक्तिमत्त्व. रोजा. पामोरियन स्पीट्स जातीची कुत्री. अवघ्या तीन महिन्यांची असताना माझ्याकडे आली अन् घरातील एक महत्त्वपूर्ण घटक बनली. मी, पत्नी रेखा, मुलगा पराग या त्रिकोणी कुटुंबात रोजा आल्यामुळे चौकोन झाला. रोज घरातून बाहेर पडताना आणि आल्यावर तिला भेटणे, तिच्याशी खेळणे हा महत्त्वाचा रिवाज झाला. तिचे वय वाढू लागले तसा तिच्या जोडीदाराचाही शोध घ्यावा लागला. तिचे पहिले बाळंतपण डॉक्टरांनी दारात उभे राहून, तर मी तिला थेट आधार देऊन केले. छान पाच पिले दिली तिने. त्यांच्या आगमनानंतर तर दोन महिने आमचे घर गोकुळ बनले होते. वाटीवर चमचा वाजविला की पाचही पिल्लं धावत यायची. दूध प्यायची. रोजा तर स्वतचे आणि पिल्लांचेही आवर्जून करवून घ्यायची. आता ही पिले मोठी झाली असणार, नव्हे त्यांच्या काही पिढ्या झाल्या असाव्यात. माझ्या मित्राकडे त्याचेही बरे चाललेले असणार. रोजा आई झाली याचा आनंद तिच्यापेक्षाही कांकणभर आम्हालाच होता. त्यामुळे तिचा लाड वाढतच होता. आमच्या बिछान्यावर झोपण्यापासून तिला सांगून गेले नाही तर रुसून बसण्यापर्यंत तिची मजल गेली होती. घरात कोणी नसेल, तर हिच्या गप्पा चालत रोजाशी अन् तीही

 

छान ऐके. तर अशी ही आमची रोजा. लाडकी रोजा. आज तिचीच गोष्ट सांगायची म्हणून एवढी प्रस्तावना.

 

 

तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे

नाही; पण आता तिला मोकळे

सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा

 

जाऊ? मी म्हटले, एकदा ठरवले ना? मग तो हिला म्हणाला, आई जाऊ? ती म्हणाली, कसे करतोस? रेखाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. मीही माझा निर्धार सोडायला उत्सुक होतो नि पराग तर ते काम केवळ उरावर दगड ठेवूनच करणार होता. सध्या राहू देत असे म्हणून पाटीतील पिले घरात आली. “रोज म्हणत होती, मला माहीत होते, तू हे करू शकणार नाहीस म्हणून.” तिने तिघांजवळ येऊन कृतज्ञता व्यक्त केली. बहुधा क्षमाही मागितली. नव्या उमेदीने आम्ही पिलांशी खेळू लागलो. त्यांचे फोटो काढू लागलो. कौतुक करू लागलो. माझे घर पुन्हा गोकुळ झाले. माझ्या, हिच्या अन् परागच्या मनात निर्माण झालेल्या राक्षसाची जागा माणसाने घेतली. मला माहीत आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक राक्षस आहे अन् देवही. काय जागवायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..