नवीन लेखन...

मुलाखत

 

ही गोष्ट आहे २० वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी पुण्यातल्या ख्यातनाम वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून काम करीत होतो. पत्रकारितेमध्ये सातत्यानं नवे पत्रकार यायला हवेत, नवे उमेदवार तयार व्हायला हवेत ही स्वाभाविक बाब होती. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही तो तरुण वा तरुणी थेट काम करण्यास पात्र होतेच असंही नाही. म्हणून आम्ही पत्रकारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचं ठरविलं होतं. त्याच्या जाहिराती केल्या होत्या. शेकडो अर्जातून अपेक्षित उमेदवारांची छाननी केली होती. आता वेळ होती मुलाखतींची. मुलाखतीसाठी आम्ही किमान तिघे किवा चौघे असत. एकानं पत्रकारिता, आवड, निवड यावर प्रश्न फेकायचे, एकानं सामान्यज्ञान पाहायचं, एकानं उमेदवाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, व्यसन वगैरेंचा वेध घ्यायचा. मुलाखत देणार्‍याला नेहमीच मुलाखत घेण्याविषयी आदर, भीती, असूया वाटत असते; पण हे काम अवघड. कारण अवघ्या १५-२० मिनिटांच्या चर्चेतून आपल्याला हवा तसा उमेदवार शोधून काढणं सोपं नसतं. वारंवार जाहिराती आणि मुलाखती हेही परवडणारं नसतं. तर अशा या मुलाखती सुरू झाल्या. एम.एस्सी. झालेल्या एका मुलीला मी विचारलं, ‘ग्रीन हाऊस इफेक्टस म्हणजे काय?’ तिला उत्तर नाही देता आलं. ती परतली तेव्हा माझ्या सहकार्‍यानं विचारलं ‘तुला तरी माहीत आहे का? किमान मला तरी नाही.’ मुलाखतीत एक बरं असतं. मुलाखत घेणार्‍याला कोणी प्रश्न विचारात नाही. मला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं; पण तो विषय तिथंच राहिला. कारण पुढचा उमेदवार आत आला होता. त्याची फाईल चाळली. तो बी. ई. झालेला होता. त्याला नोकरीही होती. सध्याचा पगार म्हणून त्यानं चार हजाराची रक्कम लिहिलेली होती. अपेक्षित वेतन मात्र संस्थेच्या नियमाप्रमाणे असा उल्लेख होता. उमेदवाराबद्दल रस वाटावा, अशी ही केस होती. आम्ही चौघेही सर
ावलो आणि एका पाठोपाठ एकप्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आमचा एकही प्रश्न परत येत नव्हता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं धडाधड

मिळत होती. अशा स्थितीत आणखी अवघड प्रश्न विचारले जातात. तसे सुरू झाले. एखादेवेळी त्यानं प्रश्नाचा नेमकेपणा समजावून घेण्यासाठी प्रतिप्रश्न केला असेल इतकंच. त्याची उत्तरं चोख होती. त्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितलं. आमची सल्लामसलत झाली. या उमेदवाराला संधी द्यावी असं ठरलं; पण माझा एक सहकारी म्हणाला, ‘घ्या तुम्ही; पण तो टिकणार नाही. इंजिनिअर आहे तो. चार हजार पगार मिळतोय. आपण काय देणार? १५००, फार तर दोन हजार.’ या प्रतिक्रियेनंतरही त्याला बोलावलं. तो आला. आता प्रश्न सुरू झाले होते. ते वेगळ्याच वळणावरचे होते. इंजिनिअरिंग आवडत नव्हतं, तर तो अभ्यासक्रम केलाच का? आता नोकरी असूनही ती का सोडणार? पगार कमी होईल त्याचं काय? एकापाठोपाठ प्रश्न आले. तो म्हणाला, ‘तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. एकत्रच येतील ती.’ तो बोलू लागला. ‘मी सातारा जिल्ह्यातला, वडील पोस्टात नोकरीला; सचोटीनं काम करायचं हे त्यांचं जीवनसूत्र. पैसा साठवावा अशी स्थितीही नव्हती आणि वृत्तीही. मुलांनी शिकावं, चांगलं शिकावं हीच काय ती आमची पुंजी, असं ते म्हणत. मी एसएससी झाल्यावर ते मला म्हणाले, ‘तू इंजिनिअर व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी हवा तो खर्च मी करीन. तू हुषार आहेस. तुला ते जमेल.’ मला इंजिनिअर व्हायचं नव्हतं; पण वडिलांची इच्छा मोडणंही शक्य नव्हतं. त्यांनी कसे दिवस काढले हे अनुभवत होतो. त्यांच्या इच्छेला मान दिला. अभ्यास सुरू केला. बुद्धीनं साथ दिली आणि शिष्यवृत्तीही मिळत गेली. फारसा खर्च न होताच मी इंजिनिअर झालो. आता नोकरीचा आग्रह. तीही मिळाली; पण हे आपलं ध्येय नव्हे याची जाणीव होती. वाचन, अभ्यास सुरू होता. चार महिन्यांपूर्वी वडील वारले. आई आधीच गेलेली होती. आता
मी वडिलांच्या शब्दातून मुक्त होतो. याचकाळात तुमची जाहिरात आली. पत्रकारिता म्हणजे काय असते याची माहिती नानासाहेब परुळेकरांच्या चरित्रातून मिळालेली होती. वाटलं, आपला मार्ग सापडला. आज मी इथं आहे. तुम्ही निवड केलीत तर प्रशिक्षण घेईन. पगार, मानधन महत्त्वाचं नाही. कारण माझा पगार माझ्या गुणवत्तेवर, कौशल्यावर ठरला होता. इथं मी प्रशिक्षणार्थी आहे. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मी टिकेन.’

 

 

मुलाखत संपली. त्याची निवड झाली होती. त्यावेळच्या उमेदवारात सर्वाधिक स्टायपेन्ड त्याला देण्यात आला होता. प्रशिक्षणाच्या काळात तो चमकत होता. तो पत्रकार बनला होता. त्याची रीतसर नेमणूक झाली. सातारा भागात काम करू लागला तो; पण तेवढ्या विश्वात त्याचे मन रमत नव्हतं. नोकरी सोडून त्यानं मुंबई गाठली. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात तो आजही यशस्वी पत्रकार म्हणून काम करतोय.

 

 

माझा मुलगा पराग. त्याला मी आग्रह करीत होतो; संगणकात बी. टेक. कर. काय हवं ते मी देतो. आज तो डिजिटल डिझायनर, अॅनिमेटर आहे. इंजिनिअर नाही. तो केवळ माझ्या शब्दाखातर इंजिनिअर झाला नाही, याचा मला अभिमान आहे.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..