नवीन लेखन...

कचकड्यांचे मोती

 

सन्मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला, असं काहीसं सांगितलं जातं. त्यामुळंच कदाचित माणसं आपली झालेली फसगत सांगायला फारशी राजी होत नसावीत. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर किती गार वाटलं, याच्याच कथा अधिक. तर आज मी सांगणार आहे, ती घटना आहे माझ्या फसगतीची. अंध विश्वासाची आणि यशाकडे जाण्यासाठी शॉर्ट कट निवडण्याची.
तो काळ होता 1998 चा. माझा व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. सार्वत्रिक मंदीचे चटके जाणवत होते. मी प्रिंन्टिंग, डिझायनिंग अशा व्यवसायात होतो. पुण्यातल्या शनिवार पेठेत एक मोक्याच्या जागेवर कार्यालय होतं. एके दिवशी एक गृहस्थ आले. काही तरी शोधत होते. त्यांच्या हातात एक फोटो होता. अक्कलकोट स्वामींचं महिला वेशातलं ते चित्र मी अनेक वेळा पाहिलं होतं. ते छायाचित्र त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, “असं चित्र मला हवं आहे. तुम्हाला माहीत असेल, तर पहा किंवा मला त्याच्या काही कलर प्रिन्ट्स काढून द्या.” मंदीच्या काळात ग्राहक आलं होतं. त्यांना बसा म्हटलं. त्या छायाचित्राचं स्कॅनिंग करून फोटो लॅबमध्ये तुम्हाला चांगल्या प्रती स्वस्तात मिळतील, असं त्यांना सांगितलं. फोटोचं स्कॅनिंग केलं. त्याचे वीस रुपये त्यांनी लगेच काढून दिले. हे काम सुरू असताना गप्पा आल्याच. फोटो प्रती कशासाठी हव्या आहेत, असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राचा एक अनुभव सांगितला. अत्यंत अडचणीत आलेल्या त्या मित्राला कोणीतरी ही प्रतिमा दिली आणि त्याचे सारे प्रश्न सुटले, असं त्याचं सार होतं. जाताना त्यांना मी म्हटलं, “तुमच्या फोटोकॉपीज आल्या की मला एक द्या. त्याचे हवे तर पैसे देईन मी.” माझ्या या विधानावर तो थांबला. माझ्याकडे न्याहाळून पाहिलं, म्हणाला, “साहेब, का थट्टा करता माझी. तुमच्यावर तर साक्षात लक्ष्मी प्रसन्न आहे. तुम्हाला आणखी काय हवंय?” मी फारशा तपशिलात गेलो नाही; पण सध्या अडचणीत आहे, असं सूचित केलं. आता हे गृहस्थ पुन्हा बसले होते. म्हणाले, “मी आज तुम्हाला एक कोटी रुपयाचं कर्ज द्यायला तयार आहे. कारण, तेवढी तुमची क्षमता आहे हे मी पाहातोय. माझा माझ्यावरच विश्वास बसेनासा झाला. हे कसं शक्य आहे?” सारं शक्य आहे महाराजा, असं म्हणून तो सांगू लागला, “मी भारतात असतो. काही वेळा आप्रिकेमध्ये. माझी बहीण तिकडेच आहे. तिच्या पैशाची गुंतवणूक मी करतो. आज मी तुमच्या व्यवसायात एक कोटीची गुंतवणूक करतोय, असं समजा. संकटात असलेल्या माणसाला मदतीचा हात हवा असतो इथं तर तो माझं सारं संकटच घ्यायला तयार होता. माझ्या आशा दुणावल्या होत्या. तो माणूस माझ्यासाठी देवमाणूसच बनलेला होता. यानंतर अर्धा पाऊणतास आम्ही गप्पा मारीत होतो. त्याला निरोप देताना दुसऱया दिवशी माझ्या घरी येण्याचं निमंत्रण द्यायला- मी विसरलो नाही. त्यानंही मोठ्या आनंदानं माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला. ती संध्याकाळ माझ्यासाठी स्वप्नवत होती. रात्र तर थेट स्वप्नांचीच होती. दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजताच ते माझ्या घरी आले. आम्ही दोघांनी त्यांचं स्वागत केलं. येताना त्यांनी एक मखमलीची डबी आणलेली होती. खास मला देण्यासाठी. ते म्हणाले, “या डबीत खास आप्रिकन मोती आहेत. ते तुमच्या देवघरात ठेवा. मी संध्याकाळीच गुजरातला जात आहे. आठवड्याने येईन तेव्हा आपण एक कोटीचा व्यवहार करू. त्यासाठी आवश्यक तर तुमच्या वकिलांशी बोलून करार तयार करून ठेवा. मला माझ्या पैशाची काळजी नाही. कारण, अशा अनेक कोटींचा व्यवहार तुम्ही करताय, हे आताच मी पाहात आहे. पण एक करा- ही डबी आठ दिवसांनी माझ्या समक्ष उघडा. तिची साग्रसंगीत पूजा करू आपण त्या वेळी.” माझा त्यालाही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. आमची न्याहरी झाली आणि ते जायला निघाले. थोडं थांबत ते म्हणाले, “मी जी डबी दिली तुम्हाला ती फुकट देता येत नाही आणि त्या मोत्याची किंमतही करता येत नाही. असं करा, एका पाकिटात एक रुपया, दहा रुपये, शंभर रुपये तुम्हाला वाटेल तेवढी रक्कम ठेवा. पाकीट बंद करा अन् मला द्या. मी ते पाकीट तसंच बहिणीकडे पाठवून देईन.” मी ठीक म्हणालो. आत गेलो. बायकोला सांगितलं. ती म्हणाली, “अकरा रुपये ठीक आहेत. अजून कशाचा कशाला संबंध नाही अन् आज आपली क्षमताही कुठे आहे?” मी म्हटले, “असे कसे? अमूल्य गोष्टीची किंमत दहा रुपये? नाही. असं कर, एक हजार एक रुपया पाकिटात घाल अन् दे.” तिची तयारी नव्हती; पण आम्ही दोघांनी आतल्या खोलीत अधिक काळ रेंगाळणं शंका निर्माण करणारं होतं. ती ठीक म्हणाली. एक हजार एक रुपयांचं पाकीट आदरपूर्वक त्या गृहस्थाच्या हातावर ठेवलं. त्याला नमस्कार केला आणि निरोप दिला. आज या घटनेला सात वर्षे झालीत. त्यानं दिलेल्या फोनवर कोणी भेटले नाही. तो गृहस्थ मला स्वामीमहाराजांचं छायाचित्र द्यायला आला नाही की कोणताही व्यवहार करायलाही फिरकला नाही. ज्या वेळी कर्जफेडीसाठी मी माझं राहतं घर विकलं तेव्हा सामानात ती डबी सापडली. ती उघडली. त्यात कचकड्यांचे तीन मोती होते. तापमानाच्या परिणामानं मोत्यांवरचं कवच निघालेलं होतं. विश्वास, श्रद्धा या बाबी तुमचं आत्मिक बळ वाढवायला ठीक आहेत; पण केवळ त्यावर संकटाचा सामना करता येत नाही. कारण, संकटाचा सामना करायला श्रद्धेबरोबरच प्रयत्नही लागतात, हे त्या हजारएक रुपयांनी मला शिकविलं होतं.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..