नवीन लेखन...

फौजदार

 

एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्‍याचा

वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली अंतरही तसं आवाक्यातलं. सायंकाळी सांगलीत पोहोचलो. दादांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘असं कर, उद्या सकाळी सातला मी निघणार आहे. जत-कवठे महांकाळ आणि नंतर कर्नाटकच्या सीमावर्ती गावात दौरा आहे. बरोबर जाऊ. जाताना चर्चा होईल. काय लिहायचं ते लिहा.’ वसंतदादा पाटील यांच्या नावाचा दबदबा मोठा होता. अर्थात, त्यावेळी त्यांना सारं काही अनुकूल होतं असंही नव्हे. त्यांच्यासमवेत जायचं ठरविलं अन् तसा सकाळी हजरही झालो. छोट्या छोट्या सभा होत्या, तिथं दादा फारतर दहा मिनिटे बोलायचे; पण जे बोलणं असायचं ते नेमकं आणि मतदारांशी थेट संवाद साधणारं. बहुतेक भाषणांचं सूत्र पाणी आणि दुष्काळ हेच होतं. जतला तुलनात्मक मोठी सभा होती. सकाळचे साडेअकरा वाजून गेले होते. सभा झाली. आता दादा आणखी पुढे जाणार होते. मी दादांना म्हटलं, ‘मी इथं थांबतो. मिळेल त्या वाहनानं सांगलीला जातो. मला बातमी द्यायला हवी.’ त्यांचा निरोप घेऊन निघालो. सभास्थळापासूनचा एक रस्ता गावात जात होता, तर दुसरा आणखी एका जवळच्या गावाकडे. नेमकं काय झाले ते आठवत नाही; पण जिकडं जायचं होतं तो रस्ता हुकला अन् दुसर्‍याच रस्त्यानं निघालो. एक-दोन किलोमीटर चालल्यानंतरही गावाची चिन्हे दिसेनात; पण एक पोलीस अधिकारी पायीच पण वेगानं जात असल्याचं दिसलं. त्याला गाठायला हवं असं वाटलं अन् मी वेग वाढविला. त्याला गाठा
ला पाच-दहा मिनिटं तरी लागली. अखेर त्याला गाठलंच. मी माझी ओळख करून

दिली. त्याची ओळख त्याच्या छातीवरची नावाची पट्टी देत होती. खांद्यावर म. पो. ही अक्षरं आणि दोन तार्‍यांबरोबर तीन फिती सहजपणे सांगत होत्या, की हा पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. माझ्याप्रमाणे तोही इलेक्शन ड्युटीवर होता. त्याच्याशी बोलताना कळलं की जवळच्या गावातून सायंकाळी सांगलीसाठी बस मिळू शकेल. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. गप्पांच्या ओघात रस्ता संपत होता. चालत असताना आमच्यामागून काँग्रेसचे झेंडे असणारे दोन ट्रॅक्टर ट्रेलर जात होते. मी सहज त्या पीएसआयला म्हटलं, ‘अजून किती दूर आहे गाव?’ तो म्हणाला, ‘अजून सहा-सात किलोमीटर असेल. तासाच्या आत पोहचू आपण.’ मी त्याला म्हटलं, ‘हे ट्रॅक्टर तिकडेच चाललेत असं दिसतंय, त्यांना थांबवू आणि जाऊ त्यांच्याबरोबर.’ तो म्हणाला, ‘नको तुम्हाला जायचं तर जा. मी पायीच येतो.’ मी म्हटलं, ‘का हो? मी तर पत्रकार आहे. मला ट्रॅक्टर चालतो, कोणत्याही पक्षाचा असला तरी मला फरक पडत नाही. तेवढंच चालणं वाचेल.’ तो म्हणाला, ‘तुमचं बरोबर आहे. तुम्हाला चालेल ते; पण मला कोणत्याही पक्षाचं वाहन नाही वापरता येणार. मी इलेक्शन ड्युटीवर आहे. ड्युटीवर असताना एक तर पोलिसांचं वाहन किवा ही आपली विनोबा एक्सप्रेस!’ एक पोलीस अधिकारी निवडणुकीच्या काळात केवळ तो निवडणूक ड्युटीवर आहे म्हणून वाहन वापरायला नकार देतो, हा माझ्या दृष्टीने वेगळाच अनुभव होता. आता मला त्याच्यात रस निर्माण झाला होता. मीही पायी जायचं ठरविलं. जाताना त्याचं गाव, कुटुंब, त्याच्या नोकरीविषयी सतत बोलत होतो आणि तोही नेमकी उत्तरं देत होता. वाहन न वापरणं हा त्याचा संभावितपणा नव्हता, तर त्याच्या त्या निष्ठा होत्या हे सहजी जाणवत होतं. तासाभरातच आम्ही त्या गावी पोहोचलो. तिथं पंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो. पदाधिकार्‍यांपैकी कोणी नव्ह
तं. तिथंपण एकानं फौजदारासाठी चहा सांगितला. आम्ही चहा घेतला. पैशाचं काही न विचारता मी एस.टी. स्टँडकडे वळलो. सहज मागे पाहिले तर फौजदारमहाशय आमच्या चहाचे पैसे चुकते करीत होते.

 

 

मी सांगलीला अन् त्यानंतर कोल्हापूरला पोहोचलो. वसंतदादांचा प्रचार, त्यांचा मतदारांवर होणारा परिणाम, दादांना मिळणारं पाठबळ आणि होणारा अल्पसा विरोध याविषयीचं वार्तापत्र पूर्ण केलं. आपलं काम संपलं असं मला वाटत होतं; पण माझ्या समवेत चालणारा तो फौजदार माझ्या मनातील पाठ सोडत नव्हता. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत चौकाचौकात पोलीस पाहिलेत, अनुभवलेत, पण हा कालचा फौजदार आगळा-वेगळा होता. सहज लिहीत गेलो. त्यावेळी निवडणूक वार्तापत्राबरोबरचं या आगळ्या फौजदाराचीही वाचकांची भेट करवून दिली. आज पंचवीस वर्षांनंतरही त्याला मी विसरलेलो नाही. नाव आठवत नाहीये; पण त्याला विसरणं कठीण.

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..