नवीन लेखन...

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ५ : कुडा

कुडा वनस्पती:

कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो. करवंद, कण्हेरी, सर्पगंधा इत्यादी या वनस्पतीही ॲपोसायनेसी कुलातील आहेत.

कुडाची विविधभाषिक नावे:
संस्कृत : कुटज, इन्द्रजव
हिंदी : कूड़ा, कुरैया
इंग्रजी : कुर्ची
लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका
मराठी : कुड़ा
गुजराती : कड़ों
बंगाली : कुरची

याचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
1.पांढरा कुडा
2.काळा कुडा
3.तांबडा कुडा

पांढरा कुडा:
हा वृक्ष झुडुप (क्षुप) अथवा लहान वृक्ष असून, साधारण सात ते बारा फुटांपर्यंत उंच असतो. भारतात सर्वत्र आढळतो.

हे कणखर झाड अविश्वसनीयपणे जुळवून घेण्यास सक्षम आहे, विविध प्रकारच्या मातीच्या प्रकारांसह शुष्क, अर्ध-शुष्क आणि ओलसर प्रदेशात, विशेषतः कोरड्या वाळूच्या ठिकाणी, डोंगराळ भागात आणि दऱ्यांमध्ये वाढते. ते मध्यम सावली देखील सहन करते, बहुतेकदा पानझडी जंगलात वाढत्या प्रमाणात आढळते.
आढळ: भारत, म्यानमार, श्रीलंका तसेच ऑस्ट्रेलिया इ. देशांत पांढरा कुडा वृक्ष आढळून येतो. ह्याची लहान आकाराची झाडे गावात विशेषतः कातळसड्यांच्या आजूबाजूच्या झुडूपांमध्ये तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळत नाही. महाराष्ट्रात पानझडी जंगलात आणि कोकणात भरपूर प्रमाणात आढळतो. कोकण विभागात विशेषतः दापोली, गगन बावडा, रायगड जिल्हा, पाटगाव तसेच भीमाशंकरच्या अरण्यात आढळून येतो. खोड बारीक व राखाडी रंगाचे असते. उन्हाळ्यात कुड्याच्या झाडांना पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले गुच्छाने येतात. पावसाळ्यात शेंगा येतात. कुड्याच्या फुलांची व शेंगांची क्वचित काही ठिकाणी भाजी केली जाते.

खोडाची साल करडी व गुळगुळीत असून त्यातून पांढरा चिक निघतो. पाने किंचित लवदार, लहान देठाची (अल्पवृत्त), संमुख म्हणजे समोरासमोर, अंडाकृती, लंबवर्तुळाकार 6 ते 20 सेमी. लांबीची असतात.फुलांचा फुलोरा स्तबक प्रकारात असून पाच पाकळ्यांची पांढरी 15 ते 20 फुले फांदीच्या टोकाला फुलांचा गुच्छ स्वरूपात असतात. फुले मार्च ते जून महिन्यात येतात. फुले वाळल्यानंतर बदामी पिवळ्या रंगाची होतात. प्रत्येक फुलात पाच पुंकेसर असतात. याच मोसमात कुड्याला शेंगांच्या स्वरूपात फळे असतात. शेंगा दोन दोनच्या घोसात असून साधारण 30 ते 40 से.मी.पर्यंत लांब व चवीला फार कडू असतात. शेंगा वाळल्यानंतर त्यातून अनेक लांब व चपट्या केसाळ बिया बाहेर पडतात त्याच बियांना इंद्रजव असे म्हणतात. बियांचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो. कुड्याच्या झाडाचे लाकूड पांढरट रंगाचे असून ते फार नरम व हलके असते. खोड बारीक व राखाडी रंगाचे असते. जाईसारखी फुले असंख्य बियांनी भरलेल्या पातळ, असलेल्या शेंगांना जागा देतात, ज्यामुळे झाडाचा वारसा चालू राहतो. ही फुले मधमाश्या, मुंग्या, फुलपाखरे यांसारख्या अनेक सूक्ष्म प्राण्यांना आकर्षित करतात.

झाडांची पाने गुरांना चारा म्हणून घालतात आणि याच पानांचा तंबाखू भरून विड्या बनवतात.
मुळांची साल अत्यंत कडू असून ती ज्वर प्रतिबंधक व रक्तसंग्राहक असते. त्या सालीत एकप्रकारचे कडू द्रव्य असते ते गुळवेलीच्या सत्वाप्रमाणे जमवता येते. तसेच अमांश व अतिसार या रोगांवर उपचारासाठी अत्यंत गुणकारी आहे. पांढऱ्या कुंड्याच्या शेंगांच्या बिया म्हणजेच इंद्रजव ह्या कृमिनाशक व वायुनाशक आहेत. पांढऱ्या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्ये व पाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यात जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.

काळा कुडा – याला भूरेवडी म्हणतात. इंग्रजी नाव आहे Wrightia tinctoria. (गोड इंद्रजव; हिं. सिरई, दुधी; सं. मधुइंद्रायण; इं. ब्ल्यू डायिंग रोझबे; लॅ.राइटिया टिंक्टोरिया). पांढऱ्या कुड्याच्या कुलातील पण भिन्न वंशातील हा लहान पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र पानझडी जंगलात आढळतो. काळ्या कुड्याला “Snowflake tree” म्हणून ओळखतात. ह्याची उंची ६–७•५ मी. व घेर ०•९–१•२ मी. असतो. साल खवलेदार परंतु गुळगुळीत व पाने अल्पवृंत, पातळ, गुळगुळीत व भाल्यासारखी असतात. फुले पांढरी व सुवासिक तगरीच्या फुलासारखी असून मार्च—मेमध्ये द्विशाखी वल्लरीवर फांद्यांच्या टोकास येतात. फुलाची सामान्य लक्षणे अ‍ॅपोसायनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फुलात अनेक पांढऱ्या रेषाकृती विरळ खवल्यांचे तोरणअसते. शेंगा (पेटिकाफळे) व बी पांढऱ्या कुड्याप्रमाणे असते.

लाकूड मध्यम कठीण प्रतीचे, हस्तिदंती रंगाचे, कातीव व कोरीव कामास बरे असते; उपयोग पांढऱ्या कुड्याप्रमाणे; मुळाची साल व बी (गोड इंद्रजव) यांचे औषधी गुणधर्मही तसेच; साल शक्तिवर्धक व बी वाजीकर (कामोत्तेजक) असून रक्तदोष, यकृताचे व पित्ताशयाचे रोग, अर्शरोग (मूळव्याध) इत्यादींवर गुणकारीआहे.

पाला गुरांना खाऊ घालतात; पाने वाळवून बिड्यांकरिता वापरतात; पाने पाण्यात उकळून निळा रंग बनवितात. शोभेकरिता झाडे बागेत लावतात. यांचे लाकूड मध्यम कठीण प्रतिचे व हस्तिदंती रंगाचे असते.

तांबडा कुडा –
याला पांडुकुडा म्हणतात. इंग्रजी नाव आहे Wrightia arborea असे आहे. काळ्या कुड्याच्या वंशातील ही दुसरी जाती भारतात सर्वत्र (दाट जंगलांत) श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आढळते. सु. ७–१० मी. उंचीचा हा पानझडी वृक्ष असून सालीतून पिवळा चीक निघतो. पाने अल्पवृंत व दोन्ही टोकांस निमुळती, लवदार व वाळल्यावर तांबडी विटकरी दिसतात. सर्व कोवळे भाग लवदार; बहुतेक सर्व लक्षणे काळ्या कुड्याप्रमाणे; याच्या पानांचा वास तितकासा बरा येत नाही. फुलांचा वास चांगला नसून एप्रिल-जूनमध्ये सुकल्यावर ती पिवळी दिसतात. तोरणाचे खवले आखूड, ५–१०, बोथट व नारिंगी असतात. बियांवरचा केसांचा पुंजका पांढरा; पाने आणि कोवळी फळे खाद्य; सालीतील पिवळट चिकापासून पिवळा रंग तयार करतात. लाकूड मध्यम प्रतीचे व उपयोग काळ्या कुड्याप्रमाणे; सालीचा उपयोग आर्तवदोष (मासिक पाळीचे दोष) व मूत्रपिंडाच्या विकारांवर होतो. ही झाडे शोभेकरिता बागेत लावतात. त्याच्या फुलाच्या मधला भागात (पुंकेसर) तांबडे असतात. त्यामुळे फुल तांबडे दिसते. झाडाच्या सालीच्या पिवळट चिकापासून पिवळा रंग बनवतात.

कुड्याचे विशेष उपयोग-
कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. तीचा उपयोग वारंवार येणाऱ्या तापाला प्रतिबंधात्मक म्हणून वापरतात. बियांमध्ये रक्तसंग्राहक व वेदनाशामक गुण आहेत. कडू इंद्रजवाचे चिमुटभर चूर्ण खाल्ल्यास भूक वाढते, पचनक्रिया सुधारते आणि पोटात वायू धरत नाही.

 

कुड्याच्या शेंगांची भाजी-
साधारणतः मे जून महिन्यात कुड्याच्या शेंगांना बहर येतो.यावेळी त्या शेंगा घरी आणून गरम पाण्यात वाफवून त्याची भाजी करतात.भाजी फार कडू असते ती भाजी म्हणून कोणी आवडीने खात नाहीत तर औषधी गुणधर्मयुक्त असल्याने खाल्ली जाते. कोकणात म्हणतात “अरे मे म्हयन्यात पोरांटोरा आंबे,गरे,आंबट चिंबट कायमाय खाऊन पोटाची वाट लायतत तेव्हा ही कुड्याच्या शेंगांची कडू भाजी खाल्ली काय पॉट साफ झाला आणि आजार सगळो भायेर गेलो”. प्रत्येक कोकणी घरात दोन ते तीन वेळा ही भाजी खावीच लागते.

औषधी उपयोग :
1. कुडा हे एक अत्युत्तम औषध आहे. रक्ताची आव झाली असल्यास ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
2. कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटात वायू धरत नाही व जंत असल्यास पडतात. ह्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी खाण्यास देतात, त्यामुळे जंत असले तर पडतात.
3. पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पोटशूळ यांसाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
4. दात दुखत असल्यास सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करतात. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
5. जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
6. इंद्रजवाच्या फांटाने मुळव्याधीत रक्त वाहणे बंद होते.
7. यापासून बनविण्यात येणारे कुटजारिष्ट हे प्रभावी औषध आहे.
8. उन्हाळ्यात कुड्याची फुले सुकवून ठेवून त्याची भाजी करतात.
9. त्याच्या पानांचा अर्क कारागीर चीज बनवण्यासाठी वापरला जातो आणि त्याच्या लेटेक्सपासून त्वरित दही तयार होते.
10. याला इंडिगो प्लांट म्हणून ओळखले जाते. ते कापडासाठी निळा रंग तयार करते आणि त्याचे लाकूड कोरीवकाम आणि लहान अवजारांसाठी आदर्श आहे.
11. काळ्या कुड्याच्या बियांपासून लाडू बनवले जातात आणि ते सेक्स टोनिक म्हणून चांगलं काम करतात.
12. झाडाची साल आणि बिया दोन्ही अपचानावर रामबाण उपाय आहेत.
13. मुळांच्या सालीचा अर्क काढून पिण्यासाठी दिल्यास सापाच्या विषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
14. झाडाच्या सालीचे चूर्ण मूतखडा (Kidney stone) वर प्रभावी औषध आहे.
15. साल, फांद्यांचा अर्क प्राण्यांच्या त्वचेच्या आजारांवर देखील उपयोगी आहे.
16. सोरायसिस (Psoraysis) सारखे त्वचारोग सुद्धा काळ्या कुड्याने बरे होतात
17. केसांमधील कोंडा (Dandruff) कमी करण्यासाठी काळा कुडा वापरला जातो त्यामुळे केसांच्या आयुर्वेदिक तेलामध्ये या वनस्पतीचा अर्क बहुधा वापरलेला दिसतो.

कुडा मध्ये आढळणारे रासायनिक घटक:
• कुटजिन (Kutjina):
हे एक महत्वपूर्ण रासायनिक घटक आहे, जे मुख्यतः कुड्याच्या सालीमध्ये आढळते. याचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधोपचारात केला जातो.
• इंद्रजविन (Indrajvina):
एक शक्तिशाली अँटी-डिसेंट्रिक (antidysenteric) घटक आहे, जे अतिसार (dysentery) आणि आमांश (dyspepsia) यांसारख्या पचनविकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
• होलारिना (Holarrhena):
या वनस्पतीमध्ये ‘होलारिना’ नावाचे अल्कलॉइड (alkaloid) आढळते, जे विविध औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते.
इंद्रजव (Holarrhena pubescens) मध्ये आढळणारे रासायनिक घटक:
• इंद्रजव (Indrajv):
इंद्रजवमध्येही ‘इंद्रजविन’ (indrajvina) नावाचे रसायन आढळते, जे अनेक आयुर्वेदिक औषधोपचारात उपयोगी आहे.
• कुटजिन (Kutjina):
काही प्रमाणात ‘कुटजिन’ (kutjina) देखील या वनस्पतीमध्ये आढळते, ज्यामुळे यालाही औषधी गुणधर्म प्राप्त होतात.
इतर घटक:
• फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids):
कुडा आणि इंद्रजवमध्ये फ्लेव्होनॉइड्स (flavonoids) नावाचे घटक देखील असतात, जे अँटीऑक्सिडंट (antioxidant) आणि दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म देतात.
• टॅनिन (Tannins):
काही प्रमाणात टॅनिन (tannins) देखील या वनस्पतींमध्ये आढळतात, जे अँटीबॅक्टेरियल (antimicrobial) गुणधर्म देतात.

तर असा हा कुडा वृक्ष ज्याची पाने,फुले,फळे,खोड, साल, पाळेमुळे सर्वांगाने औषधी गुणधर्म असणारी आहेत त्यामुळे शक्य असेल त्या प्रत्येकाने आपापल्या घराजवळ वृक्षारोपण करावे.

संदर्भ:
औषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई
मराठी विश्वकोश, आवृत्ती, २०२०
लेखक : ग.शं.चंद्रस यांचा लेख.
किशोर देसाई यांचा लेख.
सर्व फोटो गुगल वरून साभार.
गुगल वरील व अनेक इतर लेख.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
०६.०५.२०२५

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 93 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..