
ही कहाणी आहे बातमीसाठी जीवघेणी स्पर्धा चालते अशा , Necessary evil ची . ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .
ही कहाणी आहे बारबालांची , मसाज सेंटर्सची आणि लेदर करन्सीचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्या तथाकथित मान्यवरांची .
कहाणी अर्थातच राजकारण्यांची .
त्यांना वापरून घेणाऱ्या उद्योगजगताची .
ही कहाणी घामाला मातीमोल देणाऱ्यांची .
अगदी क्षुल्लक पैशात श्रम विकणाऱ्यांची .
अपवाद म्हणून जिवंत असलेल्या सद्सद्बुद्धीवाल्यांची .
‘ इस देशमे कुछ नही होनेवाला ‘ आणि ‘ सब चलता है ‘
हे म्हणणाऱ्यांची कहाणी म्हणजे ब्रेकिंग न्यूज
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे . तरन्नुमची अटक हा हाय पॉईंट कॅच करून लाईव्ह करायला बसलेल्यांची पंचाईत होतेय , कारण तिला लपवून नेलं जातंय आणि एका चॅनलच्या कॅमेरामनने हे टिपलंय , त्याचं प्रसारण सुरू झालंय .
आता इथून पुढं खेळ सुरू होतोय . चेकमेट चं राजकारण , ब्लॅकमेलिंग चं राजकारण आणि जनतेच्या हिताचं नाव पुढं करून स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचं राजकारण . यात कळत नकळत ओढला जातोय , भरडला जातोय तो मीडियाचा स्टाफ .
पण अजूनही चांगली माणसं आहेत , त्यांना हाताशी धरून त्या मीडियातील सहासातजण काहीतरी बदल घडवण्यासाठी प्लॅन करत आहेत . पण त्यांना यश येण्याआधीच ज्या तरन्नुमवरून प्रकरण सुरू होतंय ती बेपत्ता करून सगळे तथाकथित सहीसलामत सुटतायत . आणि ते सहासातजण भरडले जातायत .
टीव्ही न्यूज मध्ये चटपटीत ,चमचमीत , झणझणीत , मसालेदार डिशची सवय सवय लागलेल्या जनतेला बेवकुफ बनवण्याचे , जीवनमरणाच्या प्रश्नावरून लोकांचे लक्ष उडवून लावण्याचे आणि दिलेल्या बातमीचे पुढे काय झाले याची माहिती न देता फक्त टीआरपी वर लक्ष केंद्रित करण्याचे कारस्थान करणाऱ्या आजच्या न्यूजविश्वाची ही कहाणी आहे .
ब्रेकिंग न्यूज
ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती . पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते . सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो . आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले . ही जाणीव जागृतीच आहे ना ?
तुम्हाला काय वाटतं ?
प्रतिक्रियेच्या अपेक्षेत आहे …
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
Leave a Reply