
मराठी संगीत नाट्यसृष्टीचे जनक असणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन !
कै . अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेला संगीत नाटकाचा प्रवाह आज विशाल झाला आहे .
त्या प्रवाहात मलासुद्धा थोडी संधी मिळाली , याबद्दल धन्यता वाटत आहे .
मी लिहिलेल्या आठ संगीत नाटकांपैकी तीन नाटकांचे त्रिदल हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे . आज कै. अण्णासाहेबांच्या जयंतीदिनी त्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे . संगीत घन अमृताचा ,संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस या तीन संगीत नाटकांचे , खल्वायन संस्थेने प्रकाशित केलेले माझे पुस्तक म्हणजे त्रिदल. सं. घन अमृताचा कलाकाराची कला रसिकाश्रयाने समृद्ध होते हा विचार मांडण्यासाठी लिहिलेले हे संगीत नाटक . गायक असणारे पं. मकरंद आणि पत्नी मधुरा , चित्रकार असणारे शैलेंद्र आणि गायिका असणारी पत्नी शीतल , या दोघांचा मित्र राजा आणि रसिकांचा प्रतिनिधी सातपुते या सर्वांची ही कथा . आयुष्यातील चढउतारात केव्हातरी वितुष्ट येतं आणि मग वेगवेगळ्या मार्गावरून वाटचाल सुरू होते . पण दोन्ही कुटुंबाना जाणवू लागतं की वैयक्तिक हेवेदाव्यात रसिक दुरावत जातो आहे . मग रसिकच अमृताचा घन होऊन दोघांच्या प्रतिभाशक्तीला नवसंजीवन कसे देतो आणि पुन्हा एकदा नव्याने कला कशी बहरू लागते , त्याची कहाणी म्हणजे हे नाटक . मैत्री , प्रेम , नातेसंबंधातील अपरिहार्यता आणि कलेवरची अढळ निष्ठा यांचे महत्व अधोरेखित करणारी ही कहाणी . गायन चालू असताना रंगमंचावर प्रत्यक्ष चित्र काढणं , वेगळ्या धर्तीचं संगीत , वेगळं नेपथ्य , वेगळी वाट चोखळणारं कथानक असे अनेक प्रयोग या नाटकाच्या निमित्ताने मी केले होते.
शांतिब्रह्म
संत विचारातून समाजमन घडत असतं आणि विरोध पत्करून समाजाला दिशा देण्याचं कार्य संतच करू शकतात , हा विचार या नाटकाच्या मध्यवर्ती कल्पनेत आहे . संत एकनाथांचे कार्य सर्वानाच ठाऊक आहे . पण त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या मुलाला – हरिपंताला- हाताशी धरून मोठी आघाडी उघडली होती. परमेश्वरासमोर सर्व सामान असतात , हीनदीन समाजाला आपल्याबरोबर घेऊन, आपलं मानून आपण जीवन जगलं पाहिजे या एकनाथांच्या विचारधारेला त्या मार्तंडांनी विरोध केला होता .एकनाथ महाराजांना धर्मबहिष्कृत करण्यापर्यंत मार्तंडांची तयारी झाली होती , पण शांतिब्रह्म एकनाथांनी त्या लोकांना कशी नवी दिशा दिली , कोणता नवा विचार दिला ते या नाटकात मी मांडलं आहे .
संत एकनाथांच्या अनेक रचनांचा त्यात उपयोग करून घेतला आहे . हे नाटक आजही अनेक संस्था सादर करीत असतात . जवळपास पन्नास प्रयोग झाले आहेत , अजूनही होत आहेत .
राधामानस
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नसले तरी सस्यशामल पृथ्वीसाठी आणि मानव जातीच्या हितासाठी काहीवेळेला युद्धही क्षम्य ठरत असते , हा विचार या नाटकातून मी मांडला आहे .महाभारतातील अठरा दिवसांच्या महायुद्धाच्या अगोदर हे युद्ध थांबवण्यासाठी नारदमुनी , सुदामा आणि राधा प्रयत्नशील असतात . बलरामाला युद्ध हवे असते . खुद्द श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीलाही हे युद्ध हवे असते . पण प्रत्येकाची त्यापाठची भूमिका वेगळी असते . या नाटकात सुदामा हा गरीब जनतेचा प्रतिनिधी तर राधा ही पृथ्वीची प्रतिनिधी असं रुपकाश्रयानं मी दाखवलं आहे . श्रीकृष्णाची पृथ्वी विषयी ,प्रजेविषयी भूमिका हे या नाटकाचं बलस्थान आहे .
या तीनही नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धेत चांगलं यश संपादन केलं . घन अमृताचा आणि शांतिब्रह्म ही दोन्ही नाटके राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांकानं तर राधामानस द्वितीय क्रमांकानं यशस्वी ठरलं .
या तीनही नाटकांनी अनेक विक्रम केले . अनेक संगीतकारांना संगीताची , दिग्दर्शकांना दिग्दर्शनाची , कलाकाराना गायनाची , अभिनयाची प्रथम क्रमांकाची पारितोषिके , पुरस्कार मिळाले . तीनही नाटकांना वेगवेगळ्या संस्थांनी वेगळे संगीत , वेगळे नेपथ्य दिले. अनेकांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले .
मला स्वतःला , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार , मुंबईच्या साहित्य संघ मंदिराचा भालेराव पुरस्कार, पु . भा.भावे पुरस्कार लाभला . महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा *कुसुमाग्रज पुरस्कार त्रिदल पुस्तकाला लाभला . पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने मला २००९ यावर्षी कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने गौरवले होते . एक प्रकारे हा ऋणानुबंधच म्हणायला हवा !
ऋषितुल्य असणाऱ्या प्रतिभावंतांनी सुरू केलेल्या सुरेल परंपरेशी , अशी नाळ जोडली गेली यातच आयुष्य कृतार्थ झाले , असे मला वाटते .
———-
डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
८९५१९०६७०१
Leave a Reply