नवीन लेखन...

आयुर्वेद जडी बुटी भाग ६- अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)

आयुर्वेद जडी बुटी भाग ५ – अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)
गुळवेल (Tinospora cordifolia) ही एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे, जी अनेक आजारांवर प्रभावी ठरते. याला ‘अमृतकुंभ’ किंवा ‘गुळवेल’ म्हणूनही ओळखले जाते.
गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते.
गुळवेल वनस्पतीच्या उत्पत्तीविषयी रामायणातील आख्यायिका !
या वनस्पतीच्या उत्पत्तीविषयी रामायणामध्ये एक आख्यायिका आहे. राम-रावण यांच्या युद्धात जेव्हा अनेक वानर मृत्यूमुखी पडले, तेव्हा इंद्रदेवाने आकाशातून अमृताचा वर्षाव केला आणि वानरांना जिवंत केले. त्या अमृताचे थेंब पृथ्वीवर जेथे जेथे पडले, तेथे तेथे ही गुळवेल निर्माण झाली

फायदे:
• रोगप्रतिकारशक्ती वाढवते: गुळवेल शरीरातील रक्त पेशी वाढवते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
• ताप आणि सर्दीवर उपचार: गुळवेल ताप, सर्दी, खोकला आणि इतर श्वसन समस्यांवर मदत करते.
• पचनास मदत: गुळवेल पचनक्रिया सुधारते, जुलाब आणि अतिसार यांसारख्या समस्यांवर उपचार करते.
• मधुमेह नियंत्रण: गुळवेल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
• मूळव्याध आणि संधिवात: गुळवेल मूळव्याध आणि संधिवातासारख्या समस्यांवर उपचार करते.

सेवन:
• गुळवेलचा काढा: गुळवेलाचे तुकडे किंवा पावडर गरम पाण्यात उकळून त्याचे काढा बनवतात, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
• गुळवेल पावडर: गुळवेलाची पावडर गरम पाण्याचा किंवा मधामध्ये मिसळून सेवन करता येते.
• सावधानता:
• गुळवेलाचे जास्त सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गुळवेलीसंबंधी आयुर्वेदातील उद्धरणे:
गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागांत ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-
” पिबेद्वा षट्पलं सर्पिरभयां वा प्रयोजयेत् |
त्रिफलायाः कषायं वा गुडूच्या रसमेव वा ||”
– (चरकसंहिता )
” पिप्पला मधु संमिक्ष गुडूची स्वरसं पिबेत |
जीर्णा ज्वर कफ प्लहिका सारोचक नाशनम्‌ || ”
-( भैषज्य रत्नावली )
” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |
संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||
दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्‌ |
कामलाकुष्ठवातास्रज्वरकृमिवमीन्हरेत् |
प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत् ||”
-(भावप्रकाश निघंटू )

विविध नावे आणि घटक:
• Latin name – Tinospora cordifolia Willd ,
• कुळनाव- Menispermaceae
• संस्कृत नावे- अमृता, कुण्डलिनी, गुडूची, छिन्ना, बल्ली, मधुपर्णी, वत्सादनी,
• मराठी नावे-अमृता, गरोळ आणि गरुड, गुडची आणि गुळवेल,
• हिंदी नावे- गीलोय, गुडीच गुळवेलीचे मराठी नाव ‘गुळवेल’च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार ‘गरुड’ ‘गरोळ’, ‘गुडची’ ही गुळवेलची आणखी काही मराठी नावे आहेत.

गुळवेलीमधील रासायनिक घटक:
ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामाटिन (Palmatine), रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस’ (TuberCulosis) व ‘एस्केनीशिया कोलाई’ हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.

औषधी उपयोग:
औषध उपयोगी अंगे- कांड व पाने कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार, आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे. या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात ‘अमृतकुंभ’ म्हणून ओळखली जाते. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे.

उपयोग:
1. रसायन कार्यासाठी – प्रत्येकाने दररोज सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा घेऊन वर गाईचे दूध पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधील प्रा. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या संशोधनात गुळवेलीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहते असे आढळून आले आहे.

2. मधुमेहात उपयुक्त – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.

3. हृदयरोगात उपयोगी – गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.

4. मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेलसत्त्व फार गुणकारी ठरते.

5. यकृतविकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा देणे.

6. पंडुरोग रक्तक्षय- गुळवेल रक्त घटक वाढवते. गुळवेलसत्त्व वा अमृतारिष्ट घ्यावे.

7. शुक्रधातूवर्धक (व्रण्य)- स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.

8. मानसिक ताणतणाव कमी होतो- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.
*गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.

*गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात.

गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.

*सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.

*गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे.

गुळवेलीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व थोडक्यात:

1. यकृतोत्तेजक कार्य – यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. गुळवेलीमुळे यकृताचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते, कारण यकृतामुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते.

2. हृदय कार्य – गुळवेलीमुळे हृदयाचे रक्ताभिसरण सुधारतेच, शिवाय मानसिक ताण कमी होत असल्याने सध्याच्या तणाव युगातील (stress-age) सततच्या मानसिक ताणतणावामुळे हृदयावर होणारे दुष्परिणामही टळून हृदय बळकट बनते.

3. रसायन कार्य – आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.

*सेक्सची इच्छा प्रबळ करण्यासाठी:
शारीरिक आरोग्य आणि यौन अर्थात सेक्स करण्याची इच्छा होणे याचा एकमेकांशी संबंध आहे. कारण जेव्हा माणूस शारीरिक स्वरूपात निरोगी असतो तेव्हाच उत्तम सेक्स करू शकतो. सेक्सची इच्छा वाढवणारे हार्मोन्स काही काळाने कमी होतात. पण गुळवेलात असणाऱ्या इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्यासह एफ्रडिजीयॅक प्रभावामुळे सेक्सची इच्छा वाढविण्यास मदत करतात.

पाककृती – गुळवेलीची भाजी:
*साहित्य – गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.
*कृती – गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत *भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.
*वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.

गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म:
*गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.
*कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.
*मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी. *वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते.
*त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे.
*कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.

गुळवेलाचा काढा कसा तयार करावा:
*गुळवेलाची 2-3 इंच लांबीची फांदी घ्या आणि ती स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात 2 ग्लास पाणी घ्या आणि त्यात गुळवेलाची फांद टाका.
*पाणी उकळायला ठेवा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.
*काढा थंड झाल्यावर गाळून घ्या.
*चवीनुसार मध किंवा साखर मिक्स करा.

गुळवेल काढ्याचे सेवन:
• गुळवेलाचा काढा दिवसातून 2-3 वेळा सेवन करणे फायदेशीर ठरते.
• गुळवेल काढ्याचे जास्त सेवन करणे टाळा, कारण यामुळे काही लोकांना पचनसंस्थेच्या समस्या येऊ शकतात.
• गुळवेल काढ्याचे सेवन करण्यापूर्वी, डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्या, विशेषत: जर तुम्ही गर्भवती असाल किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असाल.
बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे
अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह (पंडुरोगात अत्यंत उपयोगी) गुडुची सत्त्व. गुडुची तेल – त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.
गुळवेल चूर्ण कसे घ्यावे?
गुळवेलाचे वाळलेले खोड व पानाचे चूर्ण औषध निर्मितीकरिता उपयोगात आणतात. करंगळी एवढ्या जाडीचे एक फूट लांब तुकडा बारीक करून त्यात पाच, दहा तुळशीची पाने मिसळावीत. हे सर्व घटक दोन कप पाण्यात एक चतुर्थांश म्हणजे अर्धा कप होईपर्यंत आटवावेत. त्यानंतर गाळून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्यावे.

गिलोय घनवटीचे फायदे काय आहेत?
घनवटी म्हणजे गोळी स्वरूपातील आयुर्वेदिक औषध. गिलोय घन वटी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि खोकला, ताप आणि सर्दी कमी करते. त्यात शक्तिशाली कायाकल्प आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. हे श्वसन प्रणाली देखील सुधारते आणि खोकला, दमा, COPD आणि इतर श्वसन समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. तसेच डेंग्यू व करोनावर ही प्रभावशाली आहे हे करोना काळात सिद्ध झाले आहे. सध्या करोना परत येण्याच्या मार्गावर आहे असा शात्रज्ञांचा अंदाज आहे. तरी सावध होऊन गुळवेल अर्थात गिलोय चा वापर करणे फायदेशीर ठरेल.

 

संदर्भ:
मराठी विश्वकोश.
शरदिनी डहाणूकर यांचा लेख.
गुगल वरील बरेच लेख
प्रो. बडगुजर यांचा लेख

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
२२.०५. २०२५

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 93 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..