
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणताः स्मतम ।।
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
समुद्रसपाटीपासून हा डोंगर ४६५९ फूट उंच असून त्याच्या बाजूला उंच शिखरे असली तरी ती सात दिसून येत नाही. चार मात्र स्पष्ट दिसत असल्यामुळे हा डोंगर चतुःशृंगी म्हणून ओळखला जातो. सप्तशृंगी गडावर एकापेक्षा एक अशी आठ कुंडे आहेत त्यांपैकी सरस्वती, लक्ष्मी, तांबुल, अंबालय व शितला ही पाच कुंडे छोटी असून कालिकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेय कुंड ही तीन मोठी आहेत. सूर्यकुंडाच्या खाली असलेल्या कपारीत जलगुंफा असून अग्नेय दिशेला सिद्धेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचे थोडे पुढे गेल्यानंतर शिवालय अथवा शिवतीर्थ दिसते. चार फूट खोलीचे हे तीर्थ म्हणजे कुंड दगडांनी बांधले आहे. या कुंडातील पाणी गोड व स्वच्छ असून इथे स्नान केल्यास मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जवळच मल्लखांबाची जागा असून तिथे मारुतीचे मंदिर आहे. शिवालय तीर्थापासून थोड्याच अंतरावर शीतकंडा नावाची दरी आहे. ही १२००० फूट खोल ‘सतीचा कडा’ म्हणतात.
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर असलेल्या ४८५ पायऱ्या चढून जावे लागते. या पायऱ्या दाभाडीचे सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाईंनी इ. सन १७१० मध्ये बांधल्या.
पायऱ्या चढत असताना सुरुवातीला गणेशमूर्तीचे व महिषासुराचे मस्तकाचे दर्शन घडते. त्यानंतर अंदाजे २५० पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामाचे छोटे मंदिर लागते त्याला ‘रामाचा टप्पा’ म्हणतात. हा टप्पा ओलांडल्यानंतर औदुंबर वृक्षाजवळच मच्छिंद्रनाथांची समाधी असून नाथपंथीय भक्त इथे येऊन साधना करतात. शेवटचा कासव टप्पा चढून गेल्यानंतर दोन शिखरांच्या मध्ये गुहेसारख्या भागात आत गेल्यावर देवीचे मंदिर लागते. ते डोंगराच्या भिंतीतच कोरलेले आहे. मंदिराची मूळची उभारणी आठव्या शतकातली आहे. मंदिरासमोर काळ्या दगडाची फरसबंदी असून तिथे शेंदूरचर्चित त्रिशूळ उभा आहे. देवीच्या पायापाशी स्नानाचे पाणी वाहून जाण्यासाठी खाच ठेवली असून मधे गजाननाची मूर्ती व दोन बाजूस द्वारपाल आहेत. मंदिरात प्रवेश करताच सप्तशृंगीची भव्य व उग्र मूर्ती दिसते. ती नैसर्गिक डोंगरी दगडात कोरली असून तिची उंची आठ फूट आहे. तिला सिंदूर लावल्यामुळे ती लाल वर्णाची दिसते. मस्तकावर घडीव काम केलेला चांदीचा मुकुट आहे. देवीला अठरा हात असून उजव्या बाजूच्या हातामध्ये मणीमाळ, कमळ, बाजा, तलवार, वज्र, गदा, चक्र आणि त्रिशूळ आहे. डाव्या बाजूच्या हातामध्ये शंख, घंटा, पाश, शक्तीदंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू ही आयुधे असून तिची मान किंचित कललेली आहे. देवी सकाळी बाला दुपारी यौवना आणि संध्याकाळी वृद्धा स्वरूपात भासते. देवीची पूजा शिडी लावूनच केली जाते. देवीची मूर्ती अखंड शिळेत कोरल्यामुळे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तरीदेखील मंदिराला सहा दरवाजे असल्यामुळे कुठल्याही दरवाजातून देवीचे दर्शन घेता येते. देवीची दिवसातून तीन वेळा पूजा व आरती केली जाते. सोमवार ते रविवार या वारी देवीला उंची वस्त्राने सजवून कानी कर्णफुले, गळ्यात मंगळसूत्र, नाकात मोत्याची नथ आणि गळ्यात सोन्याची पुतळी असे विविध प्रकारचे अलंकार घातले जातात. दुपारी १२ चे सुमारास देवीची आराधना करून पुरणपोळीचा प्रसाद दाखविल्यानंतर तिच्या मुखात लवंगयुक्त विडा ठेवण्यात येतो. पंचामृत स्नान प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी घालण्यात येते.
देवीला अठरा मीटरची साडी व तीन मीटरचा खण लागतो. प्रत्येक दिवशी देवीला निरनिराळ्या रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. कपाळी कुकूं लावण्याचे प्रकारही विविध असतात. या साजशृंगारामुळे देवीचे रूप बदलत असल्याचा भास होतो.
गडावर आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरू होऊन त्याची सांगता कोजागिरी पौर्णिमेला होते. हा एक प्रकारचा आनंदोत्सव असल्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे खानदेशातील भक्तगण या उत्सवाला आवर्जुन उपस्थित असतात. त्या वेळी मंदिराची रोषणाई करून झेंडूच्या माळांनी देवीचा गाभारा सुशोभित केला जातो. देवीच्या जयजयकारांनी वातावरण निनादून निघते. सप्तशती ग्रंथाच्या पाठाने भक्तांच्या आनंदाला उधाण येते. भाविक आपले फलद्रुप झालेले नवस फेडण्यासाठी इथे येतात. तसेच देवीला अर्पण केलेल्या साड्यांचा आणि अन्य वस्तूचा प्रचंड ढीग मंदिरात साचलेला असतो. पौष महिन्यात देवीला घुंगुरमासाचा नैवेद्य दाखवला जातो. वृद्धांना गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता येत नसल्यामुळे गडाच्या खाली देवीची पालखी फिरवली जाते.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर नकळत आपले लक्ष मंदिराचे माथ्यावर जाते. माथ्यावर एक उंच आणि अवघड असा सुळका असून यावर देवीचे मूळ पीठ आहे, असे मानले जाते. या अवघड जागी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नाही, तरीसुद्धा आश्चर्याची गोष्ट अशी की चैत्र शुद्ध चर्तुदशीस आणि आश्विन शुद्ध नवमीस या सुळक्यावर ध्वज लावला जातो. डोंगराच्या पायथ्याखाली असलेल्या बुटीगावच्या पाटलांचे वंशजांपैकी एकजण ध्वज सुळक्यावर लावण्यासाठी कसा चढून जातो हे न उलगडणारे कोडेच आहे; कारण त्याचेवर देवीची कृपा झालेली असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
गडाच्या पठारावर पूर्वेच्या बाजूला समुद्रसपाटीपासून ४२८४ फूट उंचीवर मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असून तिथे साधनाद्वारा अंतःकरणपूर्वक ऋषी देवीची नित्य आराधना करीत असल्यामुळे देवी त्यांना प्रसन्न झाली होती. अशी आख्यायिका आहे म्हणूनच की काय हा डोंगर पवित्र मानला जातो.
संत एकनाथ यांच्या काळात त्र्यंबकराज नावाचे संत होऊन गेले. त्यांनी लिहिलेल्या बालबोध ग्रंथात देवीची आपल्यावर कशी कृपा झाली याचे वर्णन विस्ताराने केले आहे. महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी यांच्या महानुभाव वाङ्मयातही सप्तशृंगी देवीचे उल्लेख आढळतात. त्याचप्रमाणे संतकवी निरंजन रघुनाथ यांनी देवीची स्तुतिपर गीते रचलेली आहेत. देवीचे महात्म्य वर्णन करणारा सप्तशती ग्रंथात तिच्या पराक्रमाची सखोल माहिती असून मार्कंडेय ऋषींचे अस्तित्वही सांगितले आहे. भाविक लोक या ग्रंथाची घरी तसेच मंदिरात पारायणे करतात.
सप्तशती ग्रंथातील कथेनुसार प्राचीन काळी सुरथ नावाचा राजा सदाचरणी असूनही त्याच्यावर परचक्र आल्यामुळे त्याला परागंदा व्हावे लागले. अशा दारूण परिस्थितीत तो एकाकी वनामध्ये फिरत असता त्याला समाधी नावाचा एक वैश्य भेटला. पैशाच्या अतिलोभामुळे घरच्या लोकांनी त्याला घराबाहेर हाकलून दिल्याने सुरथ राजाप्रमाणेच त्याची स्थिती झाली होती. अशा तऱ्हेने ते दोघे समदु:खी झाले असता मार्कंडेय ऋषी त्यांना भेटले. त्यांच्या उपदेशानुसार दोघे गडावर जाऊन सप्तशृंगी देवीची उपासना करू लागले, तेव्हा देवीने प्रसन्न होऊन दोघांना संकटमुक्त केले.
पुराणातील कथेनुसार महिषासुर राक्षस उन्मत्त होऊन तो साधु संतांचा छळ करू लागला. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आदिशक्तीला अठरा हाताचे मूर्तरूप दिले. तिलाच सप्तशृंगी म्हणजे भवानी माता अथवा जगदंबा म्हणतात. या जगदंबेने महिषासुराचा वध केल्यानंतर ती विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर कायमची विसावली आहे अशी भक्तजनांची श्रद्धा असल्यामुळे आपल्या संकटाचा व व्याधींचा परिहार होण्यासाठी असंख्य भाविक सप्तशृंग गडावर येऊन देवीची उपासना करतात.
काहींच्या मते वणीची सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक अर्धे पीठ आहे; परंतु तसे नसून तुळजापूरच्या भवानी देवीचे ते दुसरे पीठ आहे. पीठ म्हणजे पूर्णावस्था स्त्रीचे लग्न झाल्यावरच तिला पूर्णावस्था प्राप्त होते. उदाहरणार्थ, भवानी देवीचे शिवाशी, (तुळजापूर ) लक्ष्मीदेवीचे विष्णूशी (कोल्हापूर ) आणि रेणूकादेवीचे जमदग्नी ऋषीशी ( माहूरगड ) लग्न झाले आहे म्हणून या तिन्ही स्थानांना पूर्ण पीठ म्हणतात.
सप्तशृंगी देवी संत ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी असून हिला भद्रकाली, कपालिनी, चामुंडा, दुर्गा, चंडिका आदि नावाने संबोधितात. श्री क्षेत्र वणी ही शक्तिभूमी असल्यामुळे इथे देवीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक जण निराश न होता देवीच्या कृपेने सुखी व समाधानी पावतो. सप्तशृंगी देवी महाराष्ट्रातील अनेक घराण्याची कुलदेवता असून भक्तांच्या मनोकामना ती पूर्ण करते, असा अनेकांचा अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी या गडावर देवीच्या दर्शनाला अनेकदा आले होते, असा उल्लेख ऐतिहासिक वाङ्मयात आढळतो.
महिषाघ्नि महामाये सप्तशृंग निवासिनी ।
द्रव्यमारोग्य विजयं देहि देवी नमोस्तुते ॥
Leave a Reply