काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच.१२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत.कृष्णामूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.
जे. कृष्णमूर्ती यांनी कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचले नव्हते भगवद्गीता, वेद उपनिषदे, बायबल, कुराण या धार्मिक ग्रंथात कोणता उपदेश सांगितला आहे हे त्यांना माहित नव्हते आणि त्यात त्यांना रसही नव्हता. परंतु भारतीय वेदांतशास्त्रातील अद्वैत दर्शनात प्रकट झालेले चिंतन आणि कृष्णमूर्तींचे चिंतन यात विलक्षण साम्य आढळते असा तत्वाज्ञानाच्या अभ्यासकांचा अभिप्राय आहे. कुठल्याही महावाक्याचा किंवा एखाद्या धार्मिक सूत्राचा आधार न घेता जीवनाकडे सरळपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्या चिंतनात दिसते.
जे. कृष्णमूर्ती यांना अपेक्षित असणारा माणूस घडवण्याची प्रक्रिया शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेकडून त्यांना फार अपेक्षा होत्या. आजच्या शिक्षणामुळे आपले संबोध मन वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीने आणि ज्ञानाने भरून टाकण्याची प्रक्रिया चाललेली आहे. जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना ढकलण्याचे काम पालक आणि शिक्षक करतआहेत. अभ्यासाच्या प्रचंड ओझ्यामुळे मुलाची संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे. मुलांच्या मनात असणारी उपजत सर्जकता मारून टाकण्याचे काम शिक्षणाद्वारे सुरु आहे.आज मुलांना विचार करण्याची संधी मिळत नाही. मुलांचे पाठांतर आहे पण संबोध स्पष्टता नाही.
जे.कृष्णमूर्ती म्हणत, शिक्षण व्यवसाय हा सौंदर्याचा आणि आनंदाचा अविष्कार आहे त्यातून मिळणाऱ्या यशस्वितेच्या मापाने मोजता येण्यासारखी ही वस्तू नव्हे. कृष्णमूर्ती ज्याला सर्जनशील सौख्य म्हणतात त्या सर्जनशील सौख्याचा संस्पर्श प्रत्येकाच्या मनाला होऊ शकतो ही सदाविमुक्त संवेदनशीलता कायम राहण्यासाठी शिक्षकांना व पालकांनाही या सौख्याचा अनुभव असला पाहिजे. मानवी जीवनात परम सौख्याचे महत्व आणि त्याची अत्यंतिक आवश्यकता इतर सगळ्या गोष्टींपेक्षा अधिक आहे याची जाणीव जोवर होणार नाही तो पर्यंत शिक्षण हे एक दुष्ट चक्र आहे असे त्यांचे मत होते.
वर्तमान काळात सर्वांचीच मानसिकता बिघडत चालली आहे विशेषतः तरुण मुले मानसिक दृष्टया अस्वस्थ झालेली आहेत. संपूर्ण समाजातच मनोरुग्णता वाढत आहे म्हणून अश्या काळात कृष्णामूर्तींच्या विचारांची उपयुक्तता अधिक आहे. माणसाच्या सर्व दुखाचे मूळ मनात आहे त्यासाठी आत्मावलोक न केल्यास मार्ग सापडतो. आत्मावलोकन सर्वथा नवीन अश्या अनुभूतीचा प्रत्यय देणारे असते .
जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे “माणसाला अज्ञाताची भीती नसते; भीती असते ती ज्या गोष्टी ज्ञात आहेत, माहितीच्या- सवयीच्या झाल्यात त्या संपुष्टात येण्याची!” एखाद्या रोगामुळे माणसे मरत असताना त्यांना आपली जीवनशैली बदलावी लागते तरच ते जगू शकतात. करोना मुळे लाखो लोक मेले तेव्हा माणसांना जीवनशैली बदलावी लागली आणि ज्यांनी बदलली तेच जगले. जीवन जगत असताना कोणत्या तरी व कोणाच्या तरी तत्त्वज्ञानामुळेच, जीवनशैली मुळेच जीवनात अर्थ निर्माण होतो. माणसांना केवळ जगायचं नसतं तर अर्थपूर्ण व नआनंदी जगायचं असतं.आवडत्या माणसांचं अनुकरण करायचं असतं.अस्तित्वावर संकट आल्याल्याशिवाय माणसे बदलतच नाहीत, जेव्हां त्यांना कळते की आपले अस्तित्व राहणार नाही, तेंव्हा त्यांच्या मनात बदलाची प्रक्रिया सुरू होते. आपल्याला एखाद्या संकटातून जीवदान मिळाल्यानंतर उर्वरित आयुष्य चांगले जावे यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात,पण त्या साठी कोणाच्या तरी प्रेरणा असणे महत्त्वाचे असते आणि जे.कृष्ण मूर्ती यांच्यासारख्यांच्या तत्त्वज्ञानानेच एक नवीन पायवाट त्यांच्या अनुयायासाठी ते निर्माण करतात, ते केवळ चहाता वर्ग निर्माण करत नाहीत तर त्या विचारांचं अनुकरण चालू राहण्यासाठी केलेली ती एक प्रेरणेची पाऊलवाट असते.
डॉ.अनिल कुलकर्णी
Leave a Reply