नवीन लेखन...

कार्ल्याची एकवीरा

आदिशक्ती मोहमाया । विश्वरूप व्यापिनी ।
जगत्रय जननी । ब्रह्मादिक पार नेणती भुवनी ॥

पुणे जिल्ह्यातील मुंबई महामार्गावर असलेले लोणावळा शहर सोडल्यानंतर एक आड स्थानक लागते त्याचे नाव मळवली आहे. मळवली गावापासून जवळ असलेले कार्ला खेडे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. येथून उत्तरेला बुरुजासारखा डोंगराचा एक विशिष्ट भाग दिसतो. त्यावर कार्ल्याचे लेणे व देवी एकवीराचे मंदिर आहे. या गावाजवळून इंद्रायणी नदी वाहते. इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात असलेल्या उंच पर्वतावर अनेक बौद्धकालीन विहार असल्यामुळे कार्ले खेड्याला पुरातन काळी विहारगाव म्हणत असत. विशेष म्हणजे इथे सापडलेल्या एका शिलालेखावरून असे सिद्ध होते की, मंदिरालगत असलेल्या विशाल चैत्यभवनाची निर्मिती नहपन्न नामक शासनाने केली. यावरून देवीचे स्थानकार जुने आहे, असा निष्कर्ष काढला जातो.

या देवीला एकवीरा नाव कसे पडले, यासंबंधी दोन आख्यायिका सांगितल्या जातात. काही संशोधकांचे मते अक्का अव्वेयार म्हणजे पूजनीय माता या द्रविडी नावावरून एकवीरा नाव पडले असावे. दुसरे म्हणजे एकवीस वेळा निःक्षत्रिय करणाऱ्या महापराक्रमी परशुरामाची माता रेणुका असून तिच्या पोटी एकच वीर म्हणजे परशुराम जन्माला आल्यामुळे मातेचे नाव एकवीरा नाव प्रचलित झाले असावे अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे.

सह्याद्री पर्वताच्या ज्या भागावर देवीचे मंदिर आणि लेणी आहेत. त्याची उंची जमिनीपासून ४०० फूट उंच आहे. पायथ्यापासून पर्वतावर जाण्यासाठी पायऱ्या उपलब्ध असून त्या चढून गेल्यानंतर एक फाटक लागते. ते ओलांडले की दर्शनी एक दुमजली टुमदार इमारत लागते. तिथे देवीचा नगारखाना असून तो तिन्ही त्रिकाळ दुमदुमत असतो. या नगारखान्याची नेमणूक पुण्याच्या पेशवे सरकारने केली असल्याचा उल्लेख ऐतिहासिक बखरीत सापडतो.

मंदिराचे दाराशी एका कमानीला नऊ लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एका घंटेवर १८५७ असा आकडा कोरला आहे. अर्थात तो इंग्रजीत असून घंटेचा आवाज लोकांना आकर्षित करतो. देवीच्या सभामंडपावर एक शिलालेख दिसून येतो तो असा की एकवीरा देवीचे जुने मंदिर मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या मदतीने इ. सन १८६६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. सभामंडपात देवीच्या भक्तांनी देवीची छायाचित्रे लावली असून नवस फेडण्यासाठी मंदिराचे उंबरठ्यावर आणि दरवाजात चांदीचे रूपये ठोकले आहेत. गाभाऱ्याचा दर्शनी भाग चांदीच्या पत्र्याने मढवून त्यावर नक्षीकाम केले आहे.

नगारखान्याच्या इमारतीतून आत गेले असता कार्ल्याच्या लेण्याच्या उजव्या अंगाला एक भव्य असा सिंहस्तंभ लागतो. या सिंहस्तंभाचे पायथ्याशी देवीचे वाहन असलेला एक छोटा सिंह आहे. सिंहस्तंभासमोर लेण्याच्या दाराजवळच एका दगडी चबुतऱ्यावर एकवीरा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील गाभाऱ्यात एकवीरा देवीची मूर्ती पाषाणाची असून ती डोंगराच्या दगडात कोरलेली आहे. एकवीरा देवी ही स्वयंभू असून तिच्या अंगावर शेंदुराची अनेक पुटे चढलेली आहेत. देवीचे डोळे खोल असून त्यात मिन्याचे डोळे बसविल्यामुळे देवीचे रूप काहीसे उग्र दिसत असले तरी तिला चोळी आणि साडी नेसवून तिच्या मुखावर चांदीचा मुखवटा बसविल्यानंतर त्या उग्र रूपाचे रूपांतर सौम्य होते. निरनिराळ्या अलंकारांनी सुशोभित झालेली देवी प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशीर्वाद देते. देवीच्या डाव्या हाताला असलेल्या कोनाड्यात जोगेश्वरीची शेंदूरचर्चित असलेली मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. नाथपंथीय साधू तंत्र आणि मंत्र आणि योगसाधनाने या देवीची आराधना करतात. ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे विशेष म्हणजे कोळी सोनार आणि प्रभू लोकांची एकवीरा देवी आराध्यदैवत असल्यामुळे ते देवीची नित्य उपासना करतात आणि हजारोंच्या संख्येने इथे येऊन देवीचे दर्शन घेतात.

देवीला कोंबडा किंवा बकरा देण्याची प्रथा आहे. अर्थात तो बळी डोंगराच्या पायथ्याशी दिला जातो. देवीची मूर्ती दगडाच्या डोंगरात कोरली असल्यामुळे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा उपलब्ध नाही. एकवीरा देवीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते. एक चैत्र व दुसरी आश्विन महिन्यात. चैत्रातील जत्रा मोठी असून ती चैत्र शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालते. कार्ले लेण्याच्या नैऋत्य दिशेला जवळच एक छोटासा तलाव असून तिथे क्षेत्रपालाचे मंदिर आहे. या मंदिराचे देवघर असे नाव असून ते देवीचे माहेरघर म्हणून समजले जाते. चैत्र शुद्ध अष्टमीस देवी माहेराहून आपल्या सासरी म्हणजे कार्ल्यास येण्यास निघते. त्या वेळी शेकडो भाविक भक्त एकत्र जमून देवीला गडावर नेतात. या वेळी देवीच्या जयजयकाराने भोवतालचा आसमंत दुमदुमून जातो.

आश्विन महिन्यातील नवरात्र यात्रा भरते, त्या वेळी तळकोकणातून कोळी लोक यात्रेला येताना देवीच्या पालख्या आणतात. त्यात देवीचे चांदीचे ताट व मुखवटे असतात. या वेळी कित्येकांचे अंगात देवीचे वारे शिरते. त्यास ‘झाड’ असे म्हणतात. दिवसातून चार वेळा देवीची षोडशोपचारे पूजा करून अनन्य भक्ति भावाने आरतीने ओवाळले जाते.

एकरूप दाविले मनी । तव एकचि दिसे जनी वनी ।
एकचि कानी वदनी । एकपाणी एकवीरा ॥

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..