अजब न्याय नियतीचा – भाग २८

……..एके दिवशी मी डॉ. जोशींना भेटून हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना, लक्ष्मणकाकांना राजदादाला व्हिल चेअरवर बसवूनआंत आणताना पाहिले आणि एका क्षणात मी त्याला ओळखले.  त्याला या अवस्थेत पाहून मला आधी भोवळ आली.  लक्ष्मणकाका मला ओळखत असल्यामुळे ते मला आत घेवून गेले.  शुद्धीवर आल्यावर मी डॉक्टरकाकांना माझी सगळी खरी हकीकत सांगितली.  मी किती वेड्यासारखा माझ्या भावाला शोधतोय आणि तो अशा अवस्थेत इथं पडलाय हे पाहून मला खूप वाईट वाटले.  पण मी राजचा भाऊ आहे हे ऐकल्यावर डॉक्टर काकांनापण आनंद झाला.

भाग २८ (अठ्ठावीस)

आरू : अरे पण तुला जर राज सापडला होता तर तू ते आम्हाला का नाही सांगितलंस?  तुलाही माहिती होतं की, मलाही राजची किती काळजी वाटत होती.  मग माझ्यापासून हे सगळं का लपवलंस तू?

नील : आरू, मी हे सगळं का केलं त्याचं कारण तुला डॉक्टरकाकाच सांगतील.

डॉ. प्रशांत जोशी : आरू बेटा, राज आम्हाला जिवंत सापडला यामध्ये लक्ष्मणकाका आणि केळकर काकांचे फार मोेठे उपकार आहेत आपल्यावर. तुम्ही त्यावेळी, म्हणजे ही घटना घडली तेव्हा, १५ तारखेला इथून परत जाणार होतात.  हॉस्पिटलच्या काही कागदपत्रांवर आणि काही नवीन करारांवर लताच्या सह्या घ्यायच्या राहिल्या होत्या.  म्हणून केळकर साहेब माझ्याकडून फाईल घेवून वाड्यावर आले. पण तोपर्यंत लता आणि राज गढीकडे निघून गेले होते.  त्या दिवशी सह्या घेणे जरूरीचे होते, शिवाय राज आणि लता दोघेच, कुणाला सोबत न घेता गढीकडे गेले, त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती.  म्हणून ते दोघे तातडीने गढीवर गेले.  तोपर्यंत राज आणि लता गोल महालाच्या छतावर पोहोचले होते.  त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी म्हणून पहिल्या बुरूजावरील आतील पायार्‍यांवरून ते दोघे छतावर जायला निघाले.  बुरूजावरील पुलावरून ते छतावर पोहोचतच होते, तेवढ्यात त्यांनी राजची किंकाळी ऐकली आणि पाठोपाठ लताला राजला हाका मारत खाली धावत जाताना पाहिले.

‘लताने राजला छतावरून विहीरीत ढकलले असावे’ असा त्या दोघांचा समज झाला.  केळकर साहेबांनी लक्ष्मणकाकांचा मुलगा गण्याला कॉल करून ‘काही तगडे गडी, दोरखंड आणि अ‍ॅब्युलन्स घेवूनच ताबडतोब गढीवर ये’ असे सांगितले.   थोड्याच वेळात लता राजला हाका मारून दमली आणि रडत रडत, जोरात पळत गढीच्या बाहेर निघून गेली.

केळकर साहेब पुढे काय झाले ते तुम्हीच सांगा.

केळकर : लता गेलेली पाहताच आम्ही विहीरीपाशी जाऊन राज साहेबांना खूप हाका मारल्या पण त्यांचा काहीच आवाज येत नव्हता. पण एक बरं होतं की सहा महिन्यांपूर्वीच आम्ही विहिरीच्या काठापासून आतमध्ये पाच फुटांवर लोखंडी जाळी बसवून घेतली होती आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे बरेचसे थर टाकून ठेवले होते.  कारण गेल्या दोन चार वर्षांत गुराख्यांची दुभती जनावरे या विहीरीत पडून मरायचं प्रमाण वाढलं होतं.

आरू : पण केळकर काका, गढीच्या मुख्य दरवाजाला तर कायम कुलूप लावलेलं असायचं ना? आणि दरवाजाची चावी तुमच्याकडेच असायची.

केळकर : हो छोट्या ताईसाहेब, गढीचा मुख्य दरवाचा बंद असला आणि त्याची चावी जरी माझ्याकडे होती, तरी मागील बुरूजाच्या एका कोपर्‍यातील भिंतीचा कांही भाग कोसळला होता.  त्या भागातून काही गुराखी गवत चारण्यासाठी, चोरून, त्यांच्या गुरांना गढीत घेवून येत असत. नजर चुकवून एखादे दुभते जनावर विहीरीत पडले तर त्यांचे खूप नुकसान होत असे.  विहीर खोल असल्याने त्या जनावरांना बाहेर काढणेही शक्य होत नव्हते.  बर्‍याचदा समज देवूनही ही गुराखी लोकं आमचं ऐकत नव्हती, आणि एकंदर दुरूस्तीचं काम काढलं असतं तर ते बरंच खर्चिक होतं.  शिवाय गढीवर कोणतीही दुरूस्ती करताना अनेक सरकारी परवानग्या काढणं वगैरे भानगडीत बराच वेळ गेला असता.  आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवून बुरूजाच्या भिंतीच्या दुरूस्तीचं अंदाजे बजेट विचारलं आणि विहीरीत गुरं पडतात ही समस्याही सांगितली.   तेव्हा त्यानंच आम्हाला सुचवलं की, भिंतीच्या कामाचा खर्च करण्यापेक्षा विहीरीला लोखंडी जाळी बसवून घेणं स्वस्त पडेल आणि एवढ्याश्या कामाला परवानगीचा प्रश्न येणार नाही. म्हणून मग आम्ही सर्व बाजूंनी विचार करून अशी लोखंडाची जाळी बसवून घेतली होती.  यासाठी आम्ही ताईसाहेबांना कळवले नव्हते.  आमच्या इतर मेंटेनन्सच्या खर्चात हा खर्च भागल्यामुळे, आमच्या आखत्यारीत निर्णय घेवून आम्ही हे काम पूर्ण करून घेतले. ताईसाहेबांना विहीरीवर जाळी बसवून घेतली आहे ही गोष्टच माहिती नव्हती. त्यामुळे राजसाहेब जेव्हा विहिरीत पडले तेव्हा ते खोल विहीरीत बुडाले असावेत असा ताईसाहेबांचा समज झाला.  त्या जाळीवरही नंतर परत भरपूर झुडपे वाढलेली होती.

आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अ‍ॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले.  सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.  परंतु कडेला वाढलेल्या झाडांवर त्यांचे डोके आणि हात जोरात आपटल्यामुळे त्यांचा एक हात मोडला होता आणि डोक्याला जबरदस्त मार लागला होता, त्यामुळे ते पूर्णपणे बेशुद्ध झाले होते, म्हणूनच ताईसाहेबांच्या आणि आमच्या हाकांना त्यांच्याकडून उत्तर मिळत नव्हते.  मग आम्ही त्यांना डॉ. जोशींकडे घेवून आलो.

डॉ. प्रशांत जोशी : त्यांनी राजला आमच्याकडे आणलं तेव्हा त्याची अवस्था खूपच गंभीर होती.  तशाच आवस्थेत आम्ही आधी त्याच्या हाताला प्लास्टर केले आणि तो शुद्धित यावा म्हणून सर्व प्रयत्न चालू केले.  जवळ जवळ तीन महिने तो बेशुद्ध होता.  नंतर त्याच्या शरिराने थोडा थोडा प्रतिसाद द्यायला सुरूवात केली.  पण मानेला आणि डोक्याला लागलेल्या जबरदस्त मारामुळे तो त्याची स्मृती हरवून बसला होता.

आरू : पण डॉक्टरकाका, हा पेशंट ‘राज’ आहे हे तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही आम्हाला का नाही कळवलं त्याच्याबद्दल?

केळकर काका : छोट्या ताईसाहेब, आम्ही छतावर नक्की काय घडलं ते प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. पण आमचा दोघांचाही असा पक्का समज झाला होता की, ताईसाहेबांनीच राज साहेबांना वरून ढकलून दिलंय.  असं असताना त्यांनाच तो जिवंत आहे हे कसं कळवणार?  त्यामुळे राजसाहेबांच्या जीवाला अजूनच धोका निर्माण झाला असता, असं आम्हाला वाटलं. त्याबद्दल आम्ही डॉक्टर साहेबांशी बोललो. पण राजसाहेब जोपर्यंत शुद्धीवर येत नाहीत, आणि स्वतःच्या तोंडून नक्की काय झाले ते सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही काहीच निर्णय घेवू शकत नव्हतो. अशा परिस्थितीत राजसाहेब जिवंत आहेत हे ताईसाहेबांना कळवणे आम्हाला धोकादायक वाटले.

डॉ. प्रशांत जोशी : आरू बेटा, दुसरी गोष्ट म्हणजे सुदैवाने एवढ्या उंचीवरून पडूनही राज या अपघातातून वाचला होता.  त्याचं जर काही बरंवाईट झालं असतं तर तुझ्या दीवर खुनाचा आरोप आला असता.  तुमच्या आईबाबांचं दुखःद निधन झाल्यापासून, तसंही तुमच्या दोघींच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्यावर होती.  तुमच्या वडिलांचे, आजोबांचे आमच्यावर अनंत उपकार होते. असं असताना तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट आम्ही करणार नव्हतो. त्यामुळे राजला वाचवण्याची आणि त्याच्या उपचारांचीही संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली.

आरू : असं झालं होय?  झालं ते वाईटच झालं. पण मग राजला तुम्ही लक्ष्मणकाकांच्या घरी का ठेवलंत?

डॉ. प्रकाश जोशी : आम्ही त्याच्या शरीरावर उपचार करून त्याला बरं केलं होतं.  पण त्याला बसलेला मानसिक धक्का, त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याची गेलेली स्मृती, यामुळे त्याला पूर्णपणे बरं करणं अवघड होवून बसलं होतं.  त्याच्या मेंदूला जरी मार लागला होता तरी त्याची दृष्टी आणि श्रवणशक्ती चांगली काम करत होती.  पहिले काही महिने त्याला आम्ही हॉस्पिटलमध्येच ठेवले होते.  पण त्याला मायेने वागवणं, त्याच्याशी आस्थेने बोलणं, त्याची कोणीतरी काळजी घेतंय हे त्याला जाणवणं, हे सगळं त्याला बरं करण्याच्यादृष्टीनं त्याच्या बाबतीत घडणं गरजेचं होतं, हा त्याच्यावरील उपचारांचाच एक भाग होता.

लक्ष्मणकाका आणि हौसाबाई ही जोडी किती प्रेमळ आहे याचा तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे.  शिवाय राजचं असं झालं याचं त्या दोघांनाही खूप दुःख वाटत होतं.  लक्ष्मणचा मुलगा गण्या, तिकडं शेतावरच्या घरात राहून तिकडची सगळी कामं पहात होता, त्यामुळे इथं वाड्यावर हे दोघेच राहात होते.  म्हणून मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही राजला सांभाळाल का? त्याची काळजी घ्याल का? तेव्हा त्याला या दोघांनी आनंदाने होकार दिला.  मग आम्ही, त्या दोघांनी राजशी काय काय बोलायचं, त्याला खाऊ पिऊ कसं घालायचं, सारखं त्याच्याशी बोलून त्याला प्रत्येक कृतीचा अर्थ लक्षात येईल असं कसं वागायचं, त्याला कोणती औषधं, कधी कधी द्यायची, याचं रितसर ट्रेनिंग दिलं.

आमच्याकडे आलेल्या बर्‍याच केसेसमध्ये अशा ट्रिटमेंटनी पेशंटमध्ये खूप चांगल्या सुधारणा झाल्या होत्या. पण या सगळ्या ट्रीटमेंटला राजकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली.  शेवटी आपण बाहेरून कितीही अन्न भरवलं तरी, जोपर्यंत माणूस स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या हाताने खात नाही, तोपर्यंत ते अन्न त्याच्या अंगी लागत नाही.

आरू : राजच्या मेंदूपर्यंत या गोष्टी पोहोचतच नव्हत्या, मग गढीवर त्याला नीलच्यात आणि दीच्यात जे बोलणं चाललं होतं ते कसं काय समजलं असेल?

डॉ. प्रकाश जोशी : सांगतो.  ही सगळी अवस्था नील आणि राजची भेट होईपर्यंतच होती.  ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते.

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 35 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच मी झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…