नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १९

“बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस.  आता आपल्याला लताच्या मनात नेमकं काय टोचतंय ते शोधायला सोप्पं पडेल.  तिनं आजपर्यंत तुला काहीच सांगितलं नसलं तरी मला खात्री आहे की, ती तिच्या मनातलं मला नक्की सांगेल. आणि एकदा का मला तिच्या मनातलं कळालं, की आपण त्यावर योग्य ते सोल्युशन काढू.  कदाचित तुझी दी तुला पहिल्यासारखी परत मिळेल. आणि मग मी लगेच तिच्याकडे तुझा हात मागतो. कशी आहे आयडिया?”

“मस्त…मग आजच हे काम करून टाकूया.”

“आज 14 तारीख आहे बरोबर? आज व्हॅलेंटाईन डे आहे.  आजच्याच दिवशी राज नाहिसा झाला होता. त्यादिवशी ते दोघं शेवटचं भेटायला गढीवर गेले होते.  तू असं कर, आपण वाड्यावर गेलो की तू पोटात दुखत असल्याचं नाटक करून वाड्यावरच थांब. मी लताला घेवून गढीवर जातो.  कदाचित राजच्या जाण्याचा धक्का बसल्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला असू शकेल किंवा त्या गढीवरच राजच्या गायब होण्याचं कारण दडलेलं असू शकेल.  तिचा मूड पाहून तिथं बोलता बोलता मी हा विषय काढतो. बोलण्याच्या ओघात ती काही सांगते का पाहू.  जर तिच्या मनात काय होतं ते आपल्याला कळलं, मन मोकळं करून ती बोलली, तर तिच्या मनावरचं अपराधीपणाचं ओझं काढून टाकायला आपल्याला सोप्पं होईल असं मला वाटतं.  आम्ही दोघं माझ्या गाडीतून पुढे जातो.  आम्ही गेलो की साधारण अर्धा तासाने तू तिकडं ये. बघ पटतंय का तुला?

“हो, चांगली कल्पना आहे.  मला असं वाटतंय की, कदाचित ती तुला तिच्या मनातली गोष्ट सांगेल. तिचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मलापण या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय चैन पडणार नाही आणि राजबद्दल खरंच काय झालंय ते आपल्याला कळायलाच हवं. गो अहेड.”

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

नीलने हलकेच तिच्या डोक्यावर थोपटले आणि तो म्हणाला, “ए, वेडी आहेस का तू आरू, तुझ्यासाठी करतो म्हणजे काय? तुझ्या दीच्या कारणाने जर तू दुःखी असशील तर तुला आनंदी पाहण्यासाठी मी एवढं पण नाही का करू शकत? प्रयत्न करणं एवढंच तर आपल्या हातात आहे.”

“Thank you very much, पण या सगळ्यात तुझा जीवाला काही धोका नाही ना?”

“नाही रे बाळा, काही नाही होणार मला.  मी काळजी घेईन”

“चल मग आपण वाड्यावर जाऊया. जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेवू आणि मग आम्ही दोघं गढीवर जातो.  तू ठरल्याप्रमाणे नाटक कर.”

“ते सगळं ठीक आहे रे, पण मी एकटी कशी येणार गढीवर? आपल्याकडे तर एकच गाडी आहे.”

“अरे हो, ते मी तुला सांगायलाच विसरलो. काल मी केळकर काकांना बोललो होतो की आजही मला गढीवर जायचं आहे. काही फोटो काढायचे राहिले आहेत, तर मी आणि लता गढीवर जाऊन येतो.  तेव्हा ते म्हणाले की, कुणी सोबत असल्याशिवाय जाऊ नका.  तेव्हा मी त्यांना आपल्या प्लानबद्दल सांगितलं.  तर ते म्हणाले की, मी लक्ष्मणकाकांना सोबत घेवून आरूला पण गढीवर घेवून येईन.”

“ओके, ठीक आहे.  मी येईन त्यांच्याबरोबर.”

दोघेही वाड्यावर परत आले. दुपारची जेवणं झाली. जेवतानाही दी जास्त काही बोलत नव्हती. नील आणि दी विश्रांतीला वरती आपापल्या खोल्यांत गेले.

आरूला एकटीला बसून चैन पडत नव्हते.  तसंही वाड्यावर आल्यापासून त्यांचा बाहेर फिरण्यातच जास्त वेळ जात होता. लक्ष्मण आणि हौसाबाईंनी, वाड्याच्या आतील आणि वाड्याच्या मागील बाजूचा परिसरही खूप छान मेंटेन केला होता.  आरूच्या मनात आले की असाही वेळ आहे आपल्याकडे तर जरा वाड्यातच फिरून येवू.  म्हणून ती मागच्या बाजूला नोकरांसाठीच्या खोल्या होत्या, त्या बाजूला गेली. एक दार उघडं दिसत होतं.

तीने बाहेरून हाक मारली, “हौसाबाई ….ओ हौसाबाई.”

तिची हाक ऐकून हौसाबाई लगबगीने बाहेर आल्या.  आरूला दारात पाहून त्या एकदम चपापल्या,  “काय वो ताई, काई पायजे होतं का तुमाला? तुमी हिकडं कशा काय आलासा? निरोप धाडला असतात तर म्या आले अस्ते की.”

“नाही, काही नकोय मला.  मला बाहेर एकटीला बसून कंटाळा आला होता.  म्हणून विचार केला की, तुमचं घरही पहावं आणि तुम्हाला जर वेळ असेल, तर थोडं बोलावं तुमच्याशी.”

“असं व्हयं.  मंग या ना आतमधी.  बसा वाईच.  मी थोडंस स्वैपाकाचं काम रायलंय ते करून येते.  मग आपण बोलत बसू.  बरं, तुमी काय घेणार?”

“खरंच काही नको मला.  अत्ताच तर चहा झाला ना आमचा?  मी सहज आले होते इकडे फेरफटका मारायला.  पण तुम्ही आत्ता इतक्या लौकर का स्वयंपाक करताय?”

“आवो, आमचा स्वैपाक करून ठेवते. आमचे मालक, बाहेरची सगळी कामं आणि शेतावरची कामं संबाळतात.  अक्षी दमून येतात सांजच्याला.  आल्या आल्या जेवन तयार असलं म्हंजे घेतात आपल्या हातानं वाडून. येकदा जेवन हितं तयार करून ठेवलं असलं की, वाड्यात येवून तुमचा स्वैपाक, जेवनं होईपर्यंत उशीर झाला तरी चालतंय.”

“तुम्ही आमच्याबरोबर तुमचा स्वयंपाक नाही करत? तिथं वाड्यावरच का नाही जेवत?”

“नाय, आमचा स्वैपाक येगळा असतोय, येकदम सादा आणि तीखट असतोय जरा, तो तुमास्नी चालनार नाय. परत आमच्या पावन्याचाबी येगळा सैपाक कराया लागतो. आजारी असतोय ना तो म्हनुन. मंग मला घरी याला येळ लागला तर त्यालाबी जेवण भरवत्यात ते.  बरं बसा तुमी, मी आलेच.”  असं म्हणून हौसाबाई आतल्या बाजूला स्वयंपाक घरात गेली.

आरू घराचं निरीक्षण करत होती.  हौसाबाईंनी त्यांचं तीन खोल्यांच घर, छोटंस असूनही एकदम टापटीप ठेवलं होतं. खोलीच्या दुसऱ्या बाजूला अजून एक दार दिसत होतं.  बहुदा ती झोपायची खोली असावी. तिला एकदम त्या खोलीतून तांब्या भांडं पडल्याचा आवाज आला.  म्हणून ती खोलीत डोकावली.

तिला आतमध्ये एक कृश शरीराचा माणूस कॉटवर झोपलेला दिसला. त्याच्या उशाला असलेल्या स्टूलवरचा तांब्या खाली पडला होता.  बहुतेक त्याला तहान लागली असावी आणि पाणी घेण्याच्या प्रयत्नात धक्का लागून तांब्या पडला असावा असं आरूला वाटले. आरू त्याच्या कॉटपाशी गेली.  तिनं त्या माणसाला विचारलं, “तुम्हाला पाणी हवं होतं का?” त्यानं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.  तेवढ्यात तांब्या पडल्याचा आवाज ऐकल्यानं हौसाबाईपण खोलीत धावत आल्या. आरूला त्या माणसापाशी उभी पाहून हौसाबाई एकदम चपापल्या.  क्षणभर काय बोलावं त्यांना सुचेना. मग एकदम, “अगं बया, सांडलं व्हय पानी.  असूंदे.  म्या दुसरं आनतू” असं म्हणून ती तांब्या घेवून पाणी आणायला लगबगीनं आत गेली.

कॉटवरचा तो माणूस शांत पडून होता.  शेजारी असलेल्या खिडकीतून थोडा थोडा उजेड आत येत होता.  आरू त्या माणसाचं निरीक्षण करत होती.  तो माणूस तरूण होता, 28-30 वयाचा असावा, पण वयाच्या मानाने खूपच कृश दिसत होता. गोरापान, एकदम बारीक अंगकाठीचा होता. त्याचा चेहेरा पांढुरका पडलेला होता, खूपच कोमेजल्यासारखा दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. गालफाडं बऱ्यापैकी वर आलेली होती.  डोक्यावरचे केस पूर्णपणे काढून टाकलेले होते. त्यामुळे तो इंग्रजी सिनेमातील एलिअन्स दाखवतात तसा दिसत होता.

आत्ता त्याचा हात लागून तांब्या पडला, आरू त्याच्यासमोर आली, हौसाबाई आत येवून गेल्या ह्या घडलेल्या घटनांचे कोणतेच पडसाद त्याच्या मनावर उमटलेले दिसत नव्हते.  आरूने यापूर्वी कधी या माणसाला वाड्यावर पाहिल्याचं आठवत नव्हतं.  हौसाबाई आणि लक्ष्मण दोघेही कष्टकरी माणसासारखे उन्हाने रापलेल्या वर्णाचे होते.  त्यामुळे त्यांच्या घरात हा गोरापान माणूस कोण…. असाही आरूला प्रश्न पडला.  कॉटच्या शेजारीच एक व्हील चेअर ठेवलेली होती.

तेवढ्यात हौसाबाई तांब्याभांडं घेवून आली.  भांड्यात थोडं पाणी ओतून तिनं त्या माणसाला हळूच उठवून बसवलं आणि थोडं थोडं पाणी त्याला पाजू लागली.

आरूने विचारले, “हौसाबाई हे कोण आहेत?”

“पावना हाय आमचा.  माज्या लांबच्या भनीचा मुलगा हाय.  आजारी हाय त्यो.  माझी भन लांऽऽब तिकडं खेड्यात ऱ्हाती.  याला इलाज करन्यासाठी दर महिन्याला दवाखान्यात न्यावं लागतं.  जायची याची पण सोय व्हत नाय दरवेळी, म्हणून तिनं माज्याकडंच ठिवलंय याला.”

“काय आजार झालाय त्यांना?”

“झाडावरून पडला व्हता एक डाव, तवा एक हात मोडला आणि डोक्याला मार बसला. हात बरा झाला त्याचा दोन महिन्यात.  अंगाला किरकोळ खरचटलं होतं, ते बी बरं झालं. बाकी काय बी त्रास नाय त्याला. पण डोक्यावर पडला तवापासून कुणाला सुदीक वळकत न्हाई हा. आपण कोण हाय, आपलं नाव काय, आपण कुटं र्‍हातो,  काय बी माहिती नाय बगा त्याला. आता मी रोज बरोबर असते म्हनून मला आनी ह्यास्नी तो वळकतो. आमच्या संगतीत ऱ्हावून आम्ही रोज त्याच्याशी जे बोलतो, सांगतो, तेवढं करायचं इतकंच समजतं त्याला, सोताच्या मनानं काय बी करत नाही. बाकी आजूबाजूला काय चाललंय? कोन काय बोलतंय? असं काय बी पटकन कळत नाय त्याला.”

“आणि डोक्याचा असा गोटा का केलाय त्यांच्या?”

“तो पडला तवापास्नं रातीचं कधी मधी झोपेत वरडत उठतंय,  तेवढाच काय तो आवाज.  ह्यो जवा बी झोपेत वरडत उठायचा, तवा जोराजोरात केसं उपटायचा अन् सोताचंच डोकं आपटून घ्याचा.  डाक्टरकडं गेलं की कदी कदी त्याच्या डोक्याचे अन मानेचे पन फुटू काडाया लागत्यात. मेंदूची का कसली तपासणी करन्यासाठी, म्हनून केसं कापून टाकली त्याची.  बाकी इतरवेळी शांत पडून असतो.”

हौसाबाई हे सांगत असताना त्यानं एकदा त्याचे निर्जिव डोळे उघडून आरूकडे पाहिलं.  काही मिनीटं तो तिच्याकडं एकटक पहात होता.  आरूला एकदम त्याचे डोळे ओळखीचे असल्यासारखे वाटले. पण असं आपल्या ओळखीचं कोण आहे ते काही केल्या तिला आठवेना. त्याच्या भुऱ्या रंगाच्या डोळ्यांत काही सेकंद ओळख असल्यासारखी चमक आली आणि लगेच त्याने डोळे मिटून घेतले आणि तो पडून राहिला.

“तसा याचा काईच तरास नाई बगा आमाला.  लई गुनाचं लेकरू हाय. मीच त्याच्या खान्या-पिन्याच्या येळा ठरवून, डाक्टरांनी सांगितल्यापरमानं त्याला जेवू खावू घालते, औषदं देते. तो सोताहून कधी काय मागत नाय.”

“पण त्याला अजिबातच चालता येत नाही का? ही व्हीलचेअर त्याच्या साठीच आहे का?”

“हो, पयली एक दोन वरसं अजिबातच काही करता येत नवतं त्याला.  मग आम्ही ह्यात बसवून त्याला फिरवायचो. कुठं जास्त जांब जायचं असलं तर मग अजूनबी ह्यात बसवूनच न्याला लागतं.  पन इतरवेळी, रोज जेवनं झाली की मग आमी त्याला अंगणात हाताला धरून फिरवतो,  तेवडीच काय ती हलचाल करतो. बाकी वेळ पडूनच असतो. पन रोज जेवनानंतर असा वायाम होतो म्हनुन आता जरा जरा तब्बेत सुधराया लागलीय बगा.  डाक्टर म्हनाले तो जेव्हा सोताच्या हातानं जेवाय लागल तवा चांगला तगडा गडी बनंल. तुमी बोला आता.  काय बोलायचं होतं तुमाला?”

“पण हे असे किती दिवस उपचार करावे लागणार आहेत त्याच्यावर?”

डाक्टर म्हनाले, “तो झाडावरून पडला व्हता, तसं काईतर याच्या बाबतीत परत जालं, आणि त्याच्या डोक्याला मार लागला तर, नायतर तो पडला तवा काय झालं असंल, तसं कायतर त्याला दिसलं, तर कदाचित जुनं सगळं परत आठवंल त्याला, आन बरा व्हईल कदाचित.  पण ग्यारंटी न्हायी.”

“त्याच्यावर कोणत्या डॉक्टरांकडे उपचार चालू आहेत?”

“ते जोशी हास्पीटल नाय का?  तीथं दोगं डॉक्टर भाव भाव हायेत बगा. ते दोगं मिळून उपचार करतात याच्यावर.”

“हो ओळखीचे आहेत ते माझ्या.  कालच आम्ही भेटायला गेलो होतो त्यांना.  पण ह्याच्याबाबत मला काहीच माहिती नव्हतं.  नाहीतर कालच त्यांच्याशी बोलले असते.  मग खर्चाचं कसं करता?”

“आपले केळकर सायेब हायेत ना? ते बरीच मदत करत्यात बगा.  त्यांच्या गाडीतून सोता याला घेवून जातात, आणून पोचवतात.  औषधांचा, खाण्याचा खर्च करतात.  डाक्टरबी तपासणीचे, उपचारांचे पैसे घेत नाईत आमच्याकडून.  लई देवमाणसं हायेत बगा.”

“तुमची मुलं कुठं असतात?”

“मला एक मुलगा धर्मा अन एक मुलगी इंदू.  मुलीचं लगीन झालं.  ती इथं जवळच्या गावातंच दिलीय, आणि मुलगा धर्मा, त्याचं बी लगीन झालंय.  तो आपलं शेतात फार्महावुस हाय ना, तीथं रातो त्याच्या बायको मुलांसोबत.  तिथली सगळी येवस्था तोच बगतो.”

बोलत बोलत त्या बाहेरच्या खोलीत येवून बसल्या.

“मला एक सांगा हौसाबाई, मागल्यावेळी चार वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथं आलो होतो, तेव्हा तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी दिसल्या किंवा ऐकू आल्याचं आठवतंय का?

“वेगळ्या म्हंजे?”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच मी झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..