नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २४

फोटो – इंटरनेटवरुन

“तुम्ही दोघं इथं गढीवर बरोबर आलात इथंपर्यंत सगळं मला माहिती आहे. आता इथं आल्यावर, या छतावर आल्यावर, शेवटी तुमच्या दोघांत नेमकं काय घडलं तेवढं मला सांग.”

“नील, तू काय पोलीस इन्स्पेक्टर आहेस का, पुरावे समोर ठेवून माझी उलटतपासणी घ्यायला? पण मला एक कळत नाही या सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती?”

“लता, हे मला कसं माहिती ही गोष्ट आत्ता महत्त्वाची नाहीये. महत्त्वाचं हे आहे की राजचं काय झालं? मला ते उत्तर तुझ्याकडूनच हवंय. लता प्लीज मला सांग, शेवटी तुमच्यात काय संवाद झाला?”

काही मिनीटं लता अस्वस्थ होवून छतावर येरझा-या घालू लागली, मग अचानक थांबून सांगू लागली.

“मुंबईत असताना, आरूच्या विषयावरून आमची भांडणं विकोपाला गेली होती. शेवटी एके दिवशी मी त्याला माझ्या आयुष्यातूनच निघून जा असे सांगितले. तू इथे मुंबईत राहू नको. मी आरूला सोडून कुठे जाणार नाही, आणि तू इथे थांबलास तर तुझे आणि आरूचं प्रकरण संपणार नाही, आणि हे सहन करायची मानसीक ताकद माझ्यात नाही. तर तू कायमचा निघून जा आणि मला परत कधीही तोंड दाखवू नकोस असं त्याला निक्षून सांगितले. जवळजवळ आठवडाभर मी त्याला घरी येवू दिलं नाही. त्याचे फोन कॉल्स घेतले नाही. मग एक दिवशी तो घरी आला. माझ्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं त्यानं सांगितलं. तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’

त्याचवेळी आमच्या प्रोजेक्टसाठी मला महत्त्वाची पेंटिंग्ज बनवायची होती. मग राजनंच मला सुचवलं की आपण तुमच्या गावी जावूया. आपलं फिरणं पण होईल, पेंटिंगसाठीचे फोटो पण काढता येतील आणि आपलं प्रोजेक्टचं कामही पूर्ण होईल; आणि गांवी गेल्यावर आपण आपल्यातले काही गैरसमज असतील ते दूर करूया आणि लग्नाचा फायनल निर्णय घेवू. म्हणून मी इकडे गांवी यायला तयार झाले. पहिले दोन दिवस त्याने माझ्यासाठी पूर्ण वेळ दिला. पण तिसर्या दिवशी मंदिरातून परत येताना आरूचा पाय मुरगाळला, तर त्याने लगेच तिला उचलून गाडीपर्यंत नेले. वाड्यावर गेल्यावर पण त्याने आरूला गाडीतून उतरवून, उचलून वाड्यात घेवून गेला. असं करून त्यानं मला दिलेलं प्रॉमिस मोडलं. म्हणजेच तो माझ्याशी खोटं वागला. त्यावेळी आरूला इतकं काही झालं नव्हतं की तिला उचलून न्यायला लागावं. त्यामुळे आमच्यात परत भांडणं झाली. संध्याकाळी आम्ही तिघंही गढीवर जाणार होतो. पण आरूचा पाय दुखत होता म्हणून आम्ही दोघंच गढीवर जायला निघालो. मी जेव्हा माझं आवरण्यासाठी खोलीत गेले, तेव्हा मला आरूची बॅग उघडी पडलेली दिसली. त्यात वरंच ते लाल रंगाचं ग्रीटींग होतं, जे ती आज उघडणार होती. मी उत्सुकतेने ते उघडले तर त्याच्या वरतीच लिहीलेलं होतं की, “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझी जीवनसाथी बनशील का?” मी हे वाचलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी मनाशी पक्का निश्चय केला की, आज आपण राजला याचा जाब विचारायचा आणि त्याच्याशी कायमचे संबंध संपवून टाकायचे.”

“मग, इथं आल्यावर नेमकं काय केलंस तू?”

“मग आम्ही दोघं गढीवर आलो. मी रागावलेय याची कल्पना असल्यानं, सारखं मला जोक सांगून, काहीतरी इकडचं तिकडचं बोलून, वाटेत राज माझा राग घालवण्याचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला काहीच दाद दिली नाही. गढीत येताना तो फोटो काढत होता. आम्ही जेव्हा छतावर, या ठिकाणी आलो तेव्हा तो वरून कठड्यावरून वाकून विहीरीचे फोटो घेत होता. कठड्याच्या भिंती ढासळू लागल्यात म्हणून त्याला मी कडेला उभा राहू नको म्हणून रागावले पण होते.”

त्याचे फोटो काढून झाल्यावर तो मला म्हणाला की, “मी इथं आल्यापासून सगळं तुझ्या मनासारखं वागतोय तर तुला आता कशाचा राग आलाय?” मी परत त्याला त्यानं आरूला उचलून आणलं ते मला आवडलं नाही हे बोलून दाखवलं. त्यावर तो म्हणाला की, “आरूच्या जागी जर तुझा पाय मुरगाळला असता तर मी तुलासुद्धा उचलूनच नेलं असतं. त्यात काय एवढं? मी तुला हजार वेळा सांगतोय की माझं आणि आरूचं, तुला वाटतंय तसं काही नाहीये, आणि मलाही आता या विषयावर सारखं सारखं वाद घालायचा कंटाळा आला आहे. तू विश्वास का ठेवत नाहीयेस माझ्यावर? तुझी लहान बहीण म्हणून जशी तुला आरूची काळजी वाटते, तशीच मलाही तिची काळजी वाटते. ती आपल्या दोघांची जबाबदारी आहे. मग तिला गरज असेल तेव्हा आपण तिची मदत करायला नको?” तेव्हा मी त्याला म्हणाले की, “तू एक नंबरचा खोटारडा आहेस. माझ्याशी खोटं बोलतोस आणि तिला प्रेमाची कबूली देतोस याची तुला लाज वाटत नाही का?”

हे ऐकल्यावर मात्र त्याला माझा खूप राग आला. तो म्हणाला, “माझंच चुकलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे यात काही प्रश्नच नाही. पण गेले काही महिने तुझं बदललेलं वागणं आणि तुझ्या स्वभावात झालेला बदल बघून, मलाही आपल्या नात्याबद्दल सिरीअसली विचार करावा लागेल असं वाटतंय. माझं आरूवर प्रेम नाही हे खरं आहे आणि तीही माझ्याशी असं काहीही वागत नाही की ज्यामुळे ती मला तुझ्यापासून हिरावून घेईल. पण एक मात्र खरं आहे की, तिच्या सहवासात असताना, ती बोलताना, तिला आनंदी वावरताना बघून, तुझ्यातली जी खेळकर, आनंदी लता हरवलीय ना? जिच्यावर मी मनापासून प्रेम करतो, ती मला आरूच्यात दिसते आणि म्हणून मी स्वतःला थांबवू शकत नाही तिच्याशी बोलण्यापासून. लता तू जरा स्वतःच्याच मनाला विचार, तू वागतेस ते बरोबर आहे का? आणि मग मला जाब विचार. तू म्हणतेस तसं, मी तिला प्रेमाची कबूली देण्याचा इथं विषयच कसा येवू शकतो? कशाच्या आधारावर तू माझ्यावर असे गलिच्छ आरोप करतेस?”

मी संतापाच्या भरात पर्समधून ते लाल रंगाचं ग्रीटींग काढलं आणि त्याला दाखवलं. “हा एवढा मोठ्ठा पुरावा आहे माझ्याकडे, तू आरूवर प्रेम असल्याचं कबूल केल्याचा. आणि तरीही माझ्याशी खोटं बोलतोस तू? तू इतका खोटारडा असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हे पाहिल्यावर माझी खात्री पटलीय की तू डबलगेम खेळतो आहेस. कशीही असली तरी आरू माझी सख्खी बहीण आहे. एकाचवेळी तू दोघींनाही फसवतो आहेस राज आणि या गोष्टीची शिक्षा तुला व्हायलाच पाहिजे. तू आत्ताच्या आत्ता माझ्या आणि आरूच्या आयुष्यातून निघून जा आणि परत कधीही मला तुझं तोंड दाखवू नकोस. चालता हो इथून.’

यावर राज जोरजोरात हसायला लागला. तो मला म्हणला, “अगं वेडे, किती पटकन राग येतो ग तुला? जssssरा थंड डोक्याने विचार केलास तर ना? म्हणूनच हे असे गैरसमज होतात. अगं, ते ग्रीटींग मी तुझ्याचसाठी आणलंय, ते नीट उघडून पहा, म्हणजे तुला कळेल खरं काय आहे ते. तुला सरप्राईज द्यायचं म्हणून मी तिच्याकडे ठेवायला सांगितलं होतं. बिलव्ही मी.’

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि……..

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट  

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..