नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग ३

नीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता.
आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. 
एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती.  नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं.  नील तिला आज एक सरप्राईज देणार होता….
चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला……

अजब न्याय नियतीचा – भाग ३


तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत. आपल्या आवडी-निवडी, आपले विचार, एकमेकांना चांगलेच माहिती आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवायला आपल्या दोघांनाही आवडते हे मला अगदी मान्य आहे. सध्या जे काही चाललं आहे ते खूप छान चाललंय. मग अचानक असं कोड्यात काय बोलायला लागला आहेस तू?”

नील म्हणाला, “गेले खूप दिवस मी यावरच विचार करतोय आणि मला असं वाटायला लागलंय की, आपल्या नात्याला आता आपण नांव द्यायला पाहिजे. किती दिवस आपण असं नुसतं फिरत राहणार? नुकताच माझ्या डॅडनी माझ्यासाठी इथं मुंबईतच नवीन फ्लॅट बुक केलाय. दोन तीन महिन्यात त्याचं पझेशन मिळेल….. मला तुला असं विचारायचं होतं की ………”

त्यानं आरूकडे पाहिलं… ती नुसती उत्सुकतेनं तो काय बोलतोय ते ऐकत होती.

शेवटी सगळं बळ एकवटून तो पुन्हा म्हणाला, “मला तुला असं विचारायचं होतं की ……माझा हा नवा फ्लॅट, तुला

‘आपल्या दोघांसाठी’ सजवायला आवडेल का?”

एव्हढं बोलून नीलने आरूसमोर आपले गुढगे टेकले आणि स्टाईल मध्ये त्याने आणलेल्या मखमली डबीतून लाल गुलाबाचे फुल काढले. ते फुल मधोमध उघडल्यावर त्यात एक सुंदर हिऱ्याचे नाजूक खडे जडवलेली अंगठी होती. ती अंगठी हातात घेऊन त्याने आरुला प्रपोज केले. “आरू, माय डार्लिंग, विल यू मॅरी मी ? या राजकुमाराच्या हृदयाची राणी व्हायला तुला आवडेल का?

आरूला खरं तर आता खूपच हसू येत होते. पण लटक्या रागाने ती त्याला म्हणाली, “राजकुमार साहेब, या राजकुमाराच्या हृदयाची राणी आम्ही आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु राजकुमारांनी सध्या तरी आपली अमूल्य अंगठी स्वतः जवळच ठेवावी हि विनंती. नील, तुझी ऑफर खरोखरच छान आहे, पण ती तू चुकीच्या वेळी आणि चुकीच्या व्यक्तीसमोर मांडली आहेस.”

आरूचे हे उत्तर ऐकून नीलला धक्काच बसला…… ‘म्हणजे ? काय म्हणायचंय तरी काय तुला?”

“म्हणजे मी तुला तुझा दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आत्ता देऊ शकत नाही, त्यासाठी मला विचार करावा लागेल…… पण, तुझ्या पहिल्या प्रश्नाचे, म्हणजे “तुझा फ्लॅट मला सजवायला आवडेल का?”, याचे उत्तर “नाही” असे आहे. कारण मला इंटिरिअर मधलं काहीच काळात नाही. सो, मी कसा काय सजावणार नं तुझा फ्लॅट? हा…. पण माझ्या दी ला, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला त्याचे उत्तम ज्ञान आहे……. कारण ती एक आर्टिस्ट आहे… आणि हे काम ती करेल का हे तिला विचारायचे असेल .…..तर त्यासाठी तुला माझ्याबरोबर माझ्या घरी यावे लागेल. बोलो क्या ये तुम्हे मंजूर हैं?”

आरूचे हे उत्तर ऐकून नील पारच गडबडून गेला आणि त्याला तिचा राग पण आला. तो चिडून, वैतागून तिला म्हणाला, “आरू, कसली माठ आहेस ग तू? मी तुला माझा फ्लॅट, ‘आपल्या दोघांसाठी’ सजवायला आवडेल का? असं विचारतोय, आणि हे काय उत्तर देतीयेस तू मला? मी काय तुला प्रोफेशनल माणसांसारखं ‘घर सजवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतेस का म्हणून विचारतोय का? तुला खरंच काळात नाहीये, का वेड घेऊन पेडगावला जायचा तू प्रयत्न करते आहेस तेच कळेना झालय मला. तू माझ्याशी अशी वागशील असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. मग आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम, एकमेकांना समजून घेणं, इतके दिवस एकत्र फिरणं ….. हे सगळं काय होतं असं मी समजू.”

नील तू उगीच चिडचिड करू नकोस हा. तू माझा खूप चांगला मित्र आहेस, म्हणून तर मी विश्वासाने तुझ्याबरोबर फिरते आहे ना? पण तू इतक्या लवकर डायरेक्ट लग्नाचं वगैरे विचारशील असं मात्र मला खरंच वाटलं नव्हतं…….”

नील जे काही ऐकत होता त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. ती असं काही उत्तर देईल याचा त्यानं कधी विचारच केला नव्हता. तो खूपच नाराज झाला. त्याला कळेचना कि तिच्या या उत्तरावर काय बोलायचे….. तो डोळे विस्फारून अविश्वासाने आरुकडे हताश होऊन पाहत तिथल्या वाळूत फतकल मारून खाली बसला. त्याचा चेहेरा पूर्ण उतरला. त्याने ती अंगठी परत त्या गुलाबाच्या फुलात ठेवून डबीत ठेवून दिली.

आरूला खरं तर त्याची हि अवस्था बघून खूप हसू येत होतं …. पण ते आवरून ती पण वाळूत नीलचा शेजारी बसली…. त्याला म्हणाली, “नील, मी काय म्हणतेय ते तू शांतपणे ऐकून घेशील का? असा नाराज होऊ नकोस रे राजा. तुला माहितेय, मला गाणं आणि गाण्याशी संबंधित गोष्टी या शिवाय दुसरी काहीही येत नाही. आता तेच माझं सर्वस्व आहे. शिवाय मला स्वच्छंद मनमोकळे जगायची सवय……. लग्न करायचे म्हणजे फक्त मी तुला आणि तू मला आवडलो, पसंत पडलो कि झालं. …… पण तसं नसतं रे राजा …… ती एक कमिटमेंट आहे …. जबाबदारी आहे…… आणि ती जबाबदारी पेलण्याइतके आपण दोघंही मॅच्युअर्ड झालो आहोत असं खरंच वाटतं का तुला? नाही ना?….. मग आधी यावर आपल्या दोघांनाही विचार करावा लागेल. … मला विचारशील तर निदान मी आत्ता तरी लग्न आणि त्यासंबंधी येणाऱ्या जबाबदाऱ्या, या गोष्टींसाठी मेंटली आणि फिजिकली अजिबातच प्रिपेअर्ड नाहीये…. शिवाय आपल्या ऑर्केस्ट्राची पुढच्या सहा महिन्याची बुकिंग्स फुल्ल आहेत. ते तर आपलं मुख्य पॅशन आहे. त्याचाहि विचार करायला हवा. ….. सो तू फार वाईट वाटून घेऊ नकोस…… जेव्हा करिन तेव्हा मी तुझ्याशीच लग्न कारेन. पण आपण या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करू आणि मग बोलू. ओके?

यावर नील थोडावेळ गप्प बसला. मग तो आरूला म्हणाला, “यार आरू, तू इतका सगळा विचार करत असशील असं वाटलं नव्हतं ग मला. ग्रेट …. आज मला तुझा खरंच अभिमान वाटला, आणि तुझं कौतुकही वाटतंय. पण आपण ही गोष्ट आपापल्या आई वडिलांच्या कानावर घालायला हवी. माझे मॉम डॅड मला कधीच नाही म्हणणार नाहीत याची खात्री आहे मला.

बोल … मग कधी जाऊया तुझ्या आई बाबांना भेटायला?”

“सॉरी नील, आपण इतक्या दिवसांत कधी घरचा विषय काढलाच नाही त्यामुळे सांगायचे राहून गेले.”

“काय?”
“माझे आई बाबा नाहीयेत?”
“व्हॉट?…. नाहीयेत म्हणजे?
“नाहीयेत म्हणजे, आता ते हयात नाहीत.”
‘ओह, आय एम सॉरी आरू, पण हे कसं काय आणि कधी झालं?”

“नील, माझे वडील कॉन्ट्रॅक्टर होते आणी आई ड्रॉइंग टीचर होती. बाबांचे मुंबईत खूप कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स चालू होते. शिवाय मुंबई बाहेरही काही प्रोजेक्ट्स चालू होते. त्यांचा बिझनेस चांगलं चालत होता. पैशाची कधीच कमतरता नव्हती. आम्ही राहतो तो बंगलाही माझ्याच बाबांनी बांधला आहे. एकदा त्यांना बिझनेस संदर्भात साऊथला जायचे होते. आठवडा भराची ट्रिप होती, म्हणून ते आईलाही बरोबर घेऊन गेले. तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात दोघेही गेले.”

“सो सॅड”

“बाबानी माझ्या आणि दी च्या नावावर भरपूर पैसे, शेअर्स, एफडीज ठेवलेल्या होत्या. ते अपघातात गेल्यावर त्यांच्या इन्शुरन्सचे बरेच पैसे मिळाले. आमच्या मूळ गावाकडे आमची भरपूर शेतीवाडी, जमीनजुमला आहे, त्याचे भरपूर उत्पन्न येते. त्यामुळे आर्थिक बाबतीत कधीच काही प्रॉब्लेम आला नाही…. पण एकाच वेळी आई बाबा दोघांचेही छत्र हरपल्यामुळे आम्हा दोघी बहिणींना मोठा मानसिक धक्का बसला.”

“आय एम रियली व्हेरी सॉरी आरू.”

“माझी एक मोठी बहीण आहे. तिचे नांव ‘चारुलता’. माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनीच मोठी आहे ती. मी तिला चारुदी म्हणते. आई बाबा गेल्यापासून तीच माझी आई बाबा झाली. तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आता आम्ही दोघीच एकमेकींच्या सोबतीने राहतो.”

“नील, आई बाबा गेले तेव्हा दी जे. जे. ला लास्ट इयर ला शिकत होती आणि मी ११ वीत होते. माझी दी खूप सुंदर चित्रं काढायची. तिच्या चित्रांची प्रदर्शनं पण भरली होती. ती पण माझ्यासारखीच फॅशनेबल, चुलबुली, खेळकर आणि दंगेखोर होती. पण आई बाबा गेल्या पासून तिच्या अंगावर सगळी जबाबदारी पडली आणि माझी हांसती खेळती चारुदी एकदमच शांत झाली आणि जबाबदारीमुळे प्रौढ असल्यासारखी वागू लागली. अजूनही तिचं पेंटींग्ज काढणं चालू असतं पण ती तिची पेंटिग्ज बाहेरच्या कोणाला दाखवणं नाही.”

“बाप रे, तुम्ही दोघींनी कसं सहन केलंत हे सगळं?”

“आम्हाला दोघींनाही आई बाबांच्या जाण्याचा चांगलाच धक्का बसला होता. पण हळूहळू आम्ही सावरलो त्यातून. दी खूपच काळजी घ्यायची माझी. आम्ही दोघीच एकमेकांसाठी होतो. दी घरात माझ्याशी हसून खेळून बोलत असायची. माझे सगळे हट्ट पुरवायची. पण बाहेरच्या जगापासून तशी ती अलिप्तच राहाते…..”

“त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, मी तुझ्या प्रपोजलचा विचार करायच्या आधी तू माझ्या दी ला भेटावंस असं मला वाटतं. कारण आता माझ्या दी शिवाय माझं असं या जगात कोणीच नाहीये. तू जर तिला पसंत पडलास तर मग आपण लग्न करायचं कि नाही याचा विचार करू. पण मला फायनल निर्णय घ्यायला थोडा वेळ हवाय.”

“ठीक आहे मी भेटेन तिला. तू माझ्याबद्दल काही बोलली आहेस का तिच्याशी?”…….

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच मी झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..