नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २२

“लता राज कुठाय? तुम्ही इथं गढीवर आलात तेव्हा तुमच्या दोघांत नेमकं काय झालं ते मला जाणून घ्यायचं आहे.”

‘नील, तू कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतोस? मला खरंच माहिती नाही राज कुठं गेलाय, तो कुठे आहे ते.”

“अग, पण त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती तूच आहेस. तुझ्याशी भांडण झालं आणि तो रागाने निघून गेला असं तूच तर सांगितलंस ना सगळ्यांना ?”

“हो, आमचं भांडण झालं आणि तो निघून गेला. मी पण रागाने वाड्यावर निघून आले. त्यानंतर मलाही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही.”

‘लता मला खरं सांगशील? राजवर तुझं मनापासून प्रेम होतं ना?’

‘होतं नाही आहे. अजूनही माझं प्रेम आहे राजवर.”

‘मग तू त्याला हुडकायचा प्रयत्न का नाही केलास?”

‘आधी थोडे दिवस मी रागावले होते त्याच्यावर. मला वाटलं राग शांत झाला की येईल स्वतःहून परत. पण तो कधीच परत आला नाही.’

‘बरं, तुला आठवत असेल तर तुमच्यात इथं या गढीवर शेवटचा संवाद काय झाला होता ते सांगशील का मला.’

‘पण नील, तू आता हे सगळं ऐकून काय करणार आहेस? आता चार वर्षं होवून गेलीत या घटनेला. जर इतक्या वर्षात तो परत आला नाही तर आता माहिती घेवून काय मिळणार तुला?’

‘लता, तू रात्री झोपेतून ओरडत उठलीस तेव्हा, ‘भोग आपल्या कर्माची फळं, तुला याची शिक्षा मिळायलाच पाहिजे होती. मी काही केलं नाही. माझी यात काहीच चूक नाही. मला माफ कर..‘ इ. इ. वाक्यं तू वारंवार बोलत होतीस. याचा अर्थ काय?’

‘मी कशाला असं म्हणेन? जर मी काही केलेलंच नाहीये तर मला भिती वाटायचं काय कारण आहे?’

“Exactly, मलाही तेच म्हणायचं आहे. जर तू काही केलेलं नाहीयेस तर मग मला सांग ना तुम्ही शेवटच भेटलात तेव्हा तुमच्यात काय बोलणं झालं किंवा कशावरून तुमचं भांडण झालं? आरू मला म्हणाली की त्यादिवशी गढीवर आल्यावर राज तुला काहीतरी सरप्राईज देणार होता? मग काय सरप्राईज दिलं त्यानं तुला? का ते सरप्राईज तुला आवडलं नाही म्हणून तुमच्यात भांडण झालं? …….बाय द वे, त्याचंही तुझ्यावरच प्रेम होतं ना?”

“ऑफ कोर्स, त्याचंही प्रेम होतं माझ्यावर.”

“मग? का भांडलात तुम्ही?”

“नील मी तुला यातलं काहीही सांगणार नाही. आणि तुला का इतका इंटरेस्ट आहे आमच्या भांडणात?”

“लता. तुझी ती निष्पाप बहीण आरू, सतत तुझी काळजी करत असते. तुला परत हसती खेळती बघायची आहे तिला. म्हणून तिनं मला सांगितलं की, दीच्या मनावर कशाचं ओझं आहे ते तू तिला विचार. आपण तिला त्यातून बाहेर पडायला मदत करूया. तीनं आजपर्यंत हरतऱ्हेने तुला विचारून पाहिलं. पण ती तुझी सख्खी बहिण असूनही तू कधी तिच्याशीही मोकळेपणाने बोलली नाहीस. निदान आपल्या मैत्रीखातर तरी तू तुझ्या मनातलं माझ्याशी बोलशील म्हणून मी तुला विचारतोय. याशिवाय मला काय इंटरेस्ट असणार आहे त्याच्यात? आम्ही तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय हे तरी तुझ्या लक्षात येतंय का?”

“नील, तुझा हेतू कितीही चांगला असला तरी मी तुला राजच्या बाबतीत काहीच माहिती सांगू शकत नाही. सॉरी. नुसतं त्या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण आता निघूया परत.”

“लता, लेट मी गेस ????…….म्हणजे बघ हं…. मला जेवढी माहिती आहे त्यावरून मी थोडीशी तुला सुरूवात करून देतो. त्यानंतर तुला वाटलं तर तू पुढं सांग काय झालं ते….. ओके?
तुमच्या आईबाबांचं दुःखद निधन झालं…… राज तुझा आधिपासून मित्र होता…… त्या दुःखातून सावरायला त्यानं तुम्हा दोघींना खूप मदत केली…… तो तुमच्या फॅमिलीचा एक भाग झाला…… तो वारंवार तुमच्या घरी यायला लागला…… हळूहळू सहवासातून तू त्याच्या प्रेमात पडलीस……काही दिवसांनी त्याने तुला लग्नाबद्दल विचारलं…… तू त्याला त्यावेळी होकार दिला नाहीस…… तुझा निर्णय होत नव्हता की तुझंही राजवर तेवढंच प्रेम आहे की नाही ……काही काळ तू त्याला वाट बघायला सांगितलंस…… ओके…. इथपर्यंत बरोबर आहे का?”

लता त्याला उपहासाने म्हणाली, “अरे व्वा, interesting !!! तुझी कल्पनाशक्ती चांगली आहे बरंका नील…. पुढे बोल…अजून काय गेस केलंस ते…’

‘तर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात होतात….. पण अचानक तुला असा संशय येऊ लागला की राजला कुणीतरी दुसरी मुलगी आवडू लागली असवी… आणि ती मुलगीही राजच्या प्रेमात आहे. सुरूवातीला तू आडून आडून हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलास…..कधी कधी त्याच्यावर पाळत ठेवलीस…. तो कुठं जातो?…… त्या मुलीला कुठं भेटतो?…… मग तुला खात्री वाटायला लागली की, तो खरंच दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे…… मग तू त्याला त्यावरून टोमणे मारायला सुरूवात केलीस…… सुरूवातीला राजने त्याकडे लक्ष दिले नाही…… पण हळूहळू तुझं संशय घेणं, त्याला जाब विचारणं वाढत गेलं….. आणि मग तुमच्यात, त्या दुसऱ्या मुलीवरून भांडणं व्हायला सुरूवात झाली…… तुला संशय असलेली ती दुसरी मुलगी तुझ्या ओळखीची होती…… तू तिच्याकडून गोड बोलून ‘राज तिला आवडतो का?’ असं विचारलंस…… तिनं ’हो’ म्हणून सांगितल्यावर तुमची भांडणं वाढली…… काय लता मी बरोबर सांगतोय ना?’

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’

त्यांचं बोलणं आरू, लक्ष्मणकाका आणि केळकर साहेब ऐकत होतं. आरूला तर हे ऐकून धक्क्यावर धक्के बसत होतं. इतकं सगळं घडत होतं आणि मला कधीच कसा पत्ता लागला नाही? कोण होती ती मुलगी जिच्यामुळे यांच्यात ऐवढे वाद होत होते. राजनेही मला कधी सांगितले नाही त्या मुलीबद्दल. तिच्या शेजारीच व्हील चेअरवर बसलेला राजू एकटक नील आणि लताकडे पहात होता. राजबद्दल नील बोलत असलेल्या गोष्टी ऐकून त्याच्या चेहेऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते, त्याचे हात थरथरू लागले होते. तो पायांची चुळबुळ करत होता. लक्ष्मणकाकांना राजूमध्ये होणारे हे बदल पाहून काळजी वाटू लागली होती तर केळकर काकांना समाधानाचं हसू येत होतं. डॉक्टरकाकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे राजूच्या मनात पॉझिटीव बदल होत होते. प्रत्येकजण आपापल्या नजरेतून समोरचे नाट्य पहात होता.

आता नील थोडं मोठ्या आवाजात लतावर आरोप करत असल्यासाखा बोलू लागला ….. लताचा चेहरा हळूहळू रागाने लालबुंद होवू लागला होता. ती नीलच्या समोर अस्वस्थ होवून येरझाऱ्या घालू लागली.

‘तर लता…..राज तुला पुन्हा पुन्हा त्याचं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे असं सांगत राहिला…… तुला ते पटत नव्हतं…… कारण राज त्या दुसऱ्या मुलीबरोबर बाहेर फिरत होता …… तिला गिफ्टस देत होता, हे तू पहात होतीस…… हे सगळं तुला सहन होत नव्हतं. तुझा राग काढण्यासाठी राज तुला घेवून इकडे गावाकडे आला. इथल्या निसर्गरम्य वातावरणात तू शांत होशील आणि परत एकदा तुमचे रिलेशन्स ठीक होतील म्हणून तुला मुद्दाम ‘व्हेलेंटाईन डेला’ तो इथं गढीवर घेवून आला…… आणि तुमचं परत कडाक्याचं भांडण झालं……. तू त्याचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता त्याच्यावर उपलटसुलट आरोप केलेस……तो वारंवार तुला समजावून सांगत होता की तुझा संशय खोटा आहे…… तू तो मनातून काढून टाक……. पण तू त्याचं काही एक ऐकून घेतलं नाहीस…… बरोबर? आणि ज्या मुलीवरून ही भांडणं चालली होती तिला बिचारीला याची सुतरामही कल्पना नव्हती….. बिच्चारी…..’

नील असं बोलताच लता एकदम भडकली, ‘अगदी बरोबर बोललास नील. ती मुलगी बिच्चारीच होती. प्रत्येकाला नेहमी ती चांगली आणि मी वाईट असंच वाटत होतं. नाही येत मला गोड गोड बोलायला. नाही येत मला दुसर्यांच्या पुढं पुढं करायला. नाही येत मला मनातलं मोकळेपणानं व्यक्त करायला. मग हा माझा दोष आहे का? म्हणजे मी नालायक आहे का? का सतत माझी तुलना इतरांबरोबर करायची? मी का इतरांसारखं वागलं पाहिजे? मला माझ्या मनाप्रमाणे जगायचा अधिकार नाहीये का?’

‘लता, अगं शांत हो…… मी फक्त गेस करत होतो. मला नाही माहिती खरंच असं झालं होतं का? आणि कोणी तुझी तुलना केली? कुणाबरोबर केली? तू जशी आहेस तशी चांगलीच आहेस. तुला कोणी सांगितलं इतरांसारखं वागायला? ती मुलगी कोण होती?’

‘कोणी कोणी सांगितलं नाही ते विचार? ती मुलगी आरू आहे नील. तिच्यामुळे माझ्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली. लहानपणापासून मी शांत स्वभावाची आहे. आम्ही दोघी दिसायला एकसारख्या, आमचे कपडे बरेचसे एकसारखे असायचे. अभ्यासात मी आरूपेक्षा हुषार होते. मला नेहमी तिच्यापेक्षा जास्त मार्क पडायचे.

पण मी लहानपणापासून बघत आलेय…. आमच्या घरी कोणीही आलं की, आई बाबा आमच्या दोघींची ओळख करून देत. मी त्यांच्याशी ओळख झाली की थोडं हसून तिथंच बसून रहात असे, पण आरू लगेच त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असे. ती पाहुण्यांना गाणी म्हणून दाखवी, डान्स करून दाखवी. अभ्यासात मला 98 टक्के मार्क आणि तिला 92 टक्के पडले असले तरी मी स्वतःहून कुणाला माझे मार्कस् सांगत नसे. पण आरू मात्र स्वतःचे मार्क सांगून कौतुक करून घेत असे. तिचा स्वभाव लाघवी आणि बडबडा होता त्यामुळे आल्या गेल्याला, घरातल्या नोकर चाकरांना, पाहुण्यांना आरू लगेच आवडायची आणि शेवटी ’ही आरू बघा कशी हसरी आनंदी आहे, चारू मात्र शांत आहे, ही अजिबातच मिसळत नाही कोणाशी. अशी शांत मुलं आतल्या गाठीची असतात.’ असे रिमार्क ही लोकं मारायची.

मी कुठे त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत होते? पण ती चांगली म्हणून मला वाईट ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? मीही लहानच होते ना? पण माझ्या मनाचा कोणीच विचार केला नाही. माझं, माझी धाकटी बहीण म्हणून, आरूवर पहिल्यापासूनच प्रेम आहे, अगदी जीवापाड. तिचंही माझ्यावर प्रेम आहे. हे सगळं ती मुद्दाम करत नाही हे ही माहितेय मला. पण प्रत्येक वेळी तुलना… तुलना…तुलना.

तिला सगळ्यांकडून चांगुलपणा…वाहवा… आणि मला मात्र कायम वाईटपणा मिळत आला. मग हळूहळू मी अजूनच अबोल होत गेले. माझ्या स्वतःच्या मित्रमंडळींच्या सर्कलमध्ये मी आनंदात असायचे. मग मी खास माझ्या असणाऱ्या गोष्टी आरूपासून लपवायला सुरूवात केली. माझं कौतुक करणारी माणसं, माझे मैत्र, माझ्या सुंदर वस्तू अशा अनेक गोष्टी, की ज्यात आरू सामील झाली, तर मला आपोआपच कमीपणा मिळू शकतो…. अशा सर्व गोष्टीपासून मी तिला लांब ठेवत गेले नील.

आई बाबा अपघातात गेले तेव्हा तर आमच्यावर आभाळंच कोसळलं होतं. त्याचवेळी आरूची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे याझं खूप मोठं दडपण माझ्या मनावर आलं. मी हे कसं काय निभाऊ शकेन याची पण मला काळजी वाटू लागली आणि मी अजूनच एकलकोंडी झाले.

पण राज आमच्या आयुष्यात आला आणि त्यानं या सगळ्यातून बाहेर पडायला आम्हाला खूप मदत केली. मी आधिपासूनच त्याच्या प्रेमात होतेच, पण त्याचा एकंदर खेळकर स्वभाव, जबाबदारीचं वागणं, आमची काळजी घेणं हे सगळं पाहून त्याला आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णयही मी माझ्या मनाशी घेवून टाकला. पण हे मी त्याला किंवा आरूला कधीच बोलले नाही.

दोन एक वर्षांनी त्याने मला रीतसर प्रपोज करून लग्नाची मागणी घातली. पण मला आरूचीही काळजी वाटत होती. त्यासाठी मी राजला लग्नाला होकार देण्याआधी थोडा वेळ मागून घेतला. राजने मला तो दिल्लीला राहातो असे सांगितले होते. त्याच्या फॅमिलीबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती. पण ‘आपण जर लग्न केले तर तू इथं मुंबईतच सेटल होशील का?’ असे मी त्याला विचारले होते आणि तो ‘हो‘ म्हणाला होता.

मी त्याला होकार देण्याच्या विचारातच होते की, मला माझ्या काही मैत्रिणींनी, ज्यांना माझं राजवर प्रेम आहे आणि राज माझा होणारा नवरा आहे हे माहित होते, त्यांनी मला सांगितले की, त्यांनी आरूला आणि राजला खूप वेळा बाहेर एकत्र फिरताना पाहिले आहे.”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..