नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १७

माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू.

राज मला भेटायला येताना माझ्यासाठी कायम कॅडबरी आणत असे, शिवाय बहुतेक वेळा तो मला माझ्या आवडीच्याच वस्तू गिफ्ट म्हणून देत असे. मला वाटत होतं की, दीनं राजला सांगितलं असावं की, मला काय काय आवडतं ते आणि मी दीची लहान बहिण असल्यामुळे तो माझे सगळे लाड पुरवत असेल.

मी जेव्हा जेव्हा राज बरोबर बाहेर जात असे तेव्हा किंवा कधी जर अचानक त्याच्याबरोबर बाहेर जाणं ठरलं तर, मी दीला मेसेज करून किंवा फोन करून कळवत असे की, मी राज बरोबर अमुक ठिकाणी आहे किंवा अमुक ठिकाणी चालले आहे आणि मला घरी यायला उशीर होईल.

दी मला स्वतःहून तुम्ही कुठं गेलात, काय करत होतात असं कधीच विचारत नसे. पण बरेच वेळा राज बरोबर मी कुठेही जाऊन आले की, घरी आल्यावर आम्ही कुठं कुठं गेलो होतो, काय बोललो ते मी दीला सांगत असे. राजने मला काही वस्तू गिफ्ट दिल्या तर त्या मी तिला आनंदाने दाखवत असे. पण हे ऐकताना किंवा पाहताना दीच्या चेहेऱ्यावर मला कधीच राग दिसला नाही. माझ्यासमोर तरी दीनं कधीच नाराजी व्यक्त केली नाही किंवा तू राजबरोबर कशाला बाहेर जातेस वगैरे, असंही ती कधीच मला म्हणाली नाही.

मी माझ्या आयुष्यात दी पासून कधीच काही लपवून ठेवलं नाही…..म्हणजे फक्त आपल्या नात्याबद्दल मी अजून तिच्याशी बोललेली नाहीये… ते सुद्धा तू मला तशी अट घातली आहेस म्हणून… असो. तर मी तिच्याशी नेहमीच मोकळेपणाने बोलून तिला माझ्या बाबातीत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगत असे. पण दी जेव्हा जेव्हा राज बरोबर बाहेर जात असे तेव्हा, आल्यावर आम्ही कुठे गेलो, काय बोललो असं ती माझ्याशी कधीच शेअर करत नव्हती. त्यामुळे त्यांचे नातं नेमकं कुठल्या टप्यावर आहे याचा मला अंदाज येत नव्हता.

कधी कधी मी आणि राज, आम्ही बाहेरून फिरून आल्यावर, राज जर मला घरी सोडायला आला तर तो नंतर दीच्या दालनात जात असे, पण बऱ्याचवेळा काही मिनीटातंच तो रागाने झपझप चालत निघून गेल्याचे मी अनेकवेळा पाहिले होते. पण त्यांचे भांडण झाले किंवा काय हे मला कधीच कळले नाही.

आणखी एक गोष्ट, जी मला तेव्हा लक्षात आली नव्हती, पण आता तुला संगतवार सांगताना जाणवतेय, ती म्हणजे आम्ही बाहेर फिरत असताना आमच्या आसपास नेहमी एक काळा बुरखा घातलेली महिला वावरताना मी पाहिली होती आणि आम्ही परत निघायचा काही वेळ आधी ती गायब होत असे. पहिल्यांदा एक दोन वेळा तिला पाहिल्यावर मी दुर्लक्ष केलं. पण मला ती वारंवार दिसू लागली म्हणून ती माझ्या लक्षात आली. पण याचा आमच्याशी काही संबंध होता की नाही हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. कदाचित मला तसा भासही होत असेल.’

मी एकदा ही गोष्ट राजच्या निदर्शनास आणली, की नेहमीच आपल्या आजूबाजूच्या टेबलवर एक बुरखा घातलेली व्यक्ती बसलेली असते आणि मला उगाचच असं वाटतं की तिची नजर आपल्यावरच आहे. तेव्हा त्यानं ती गोष्ट हसण्यावारी नेली होती. तो ही मला असंच म्हणाला की, “आरू, आपण काही आईवडिलांना खोटं सांगून, चोरून फिरणारे प्रेम वीर नाही आहोत, मग आपल्याला कुणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय असं वाटायचं कारणच नाही ना? तुला भास होत असेल. ती व्यक्ती कुणाची तरी वाट पहात असेल आणि योगायोगानं त्यांची आणि आपली इथं यायची वेळ एक येत असेल.”

नील अचानक मधेच म्हणाला, ‘आत्ता मला लिंक लागली. आरू, तुला आठवतंय का? आपण तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्यापूर्वी अडगळीच्या खोलीत, चित्रावर झाकलेलं कापड बाजूला काढलं, ते कापड म्हणजे काळा बुरखा होता, नाही का? आपल्याला त्यावेळी दीकडे बुरखा कसा काय म्हणून आश्चर्य वाटलं होतं? याचा अर्थ तुझ्या दीला, तुझ्या आणि राजच्या नात्याबद्दल संशय आला होता की काय?‘

आरू एकदम रागाने नीलला म्हणाली, ‘खबरदार नील, माझ्या दीवर असा काही आरोप करशील तर….’

‘अगं रागावतीस काय अशी? तू एक निर्मळ मनाचं कोकरू आहेस. तुझ्या मनात कोणाहीविषयी संशय, राग, द्वेष असलं काहीही येत नाही. म्हणून सगळं जग तुझ्यासारखं असतं असं नाही. एवीतेवी आपण सगळ्या घटनांची सांगड घालायचा प्रयत्न करतोय, म्हणून मी त्रयस्थपणाने त्याचा विचार करून फक्त एक शंका बोलून दाखवली. तसंच असेल असं काही नाही. तो योगायोगही असू शकतो. Dont take it seriously. पुढे काय झाले?

तर एकदा काय झालं, दीला तिच्या projectच्या संदर्भात काही गावांकडच्या दृष्यांवर चित्रं काढायची होती. तसे मधेच एक दोन वेळा ते दोघे आजूबाजूच्या खेडेगावांना भेट देवून आले होते. पण त्यांना पाहिजे तसे स्पॉट आणि फोटो मिळाले नाहीत. पण या भेटीत राजला गावाकडचे वातावरण खूपच आवडले. म्हणून मग चांगले फोटो काढायचे असतील तर त्या दोघांनी आपल्याच गावी जावून तिथल्या निसर्गाचे फोटोग्राफ्स काढून आणायचे आणि त्यावरून दीने नवीन पेंटिग्ज बनवायची असे ठरवले.

तर 11 ते 15 फेब्रुवारी असे पाच दिवस गावी जायचं ठरलं. माझा 10 फेब्रुवारी बर्थडे होता. कॉलेजमध्ये आम्ही मित्र मैत्रिणींनी केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. दरवर्षी आई बाबा आमच्यासाठी घरी किंवा बाहेर हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी ठेवत असत. यावर्षी आम्ही सेलिब्रेशन करणार नव्हतो. तर राजनी आम्हाला सरप्राईज दिलं. त्यानी स्वतः आमच्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये पार्टी ठेवली. मला खूप सुंदर ड्रेस आणला, दीला साडी आणली आणि माझ्या खास मित्र मैत्रिणींना पार्टीला बोलावलं. पार्टी खूप छान झाली. मला बर्थडे गिफ्ट म्हणून राजनी एक सुंदर गिटार भेट दिली. त्या गिटारवर एका बाजूला मस्त डिझाईन केलेला A कोरलेला होता. मला खूप दिवसांपासून गिटार घ्यायची होती. मी गिटार शिकण्यासाठी क्लासही लावला होता आणि जरा चांगलं वाजवायला येवू लागलं की गिटार घ्यावी असा माझा विचार होता. पण राजनी मला गिटार भेट देवून खूप गोड सरप्राईज दिलं. मला गिटार पाहून एवढा आनंद झाला की मी राजला अत्यानंदाने चक्क मिठी मारली. राजनी त्या गिटार बरोबर मला एक ग्रीटिंग पॅक करून दिलं होतं. पण त्यावेळी त्यानं सांगितलं, ‘हे ग्रीटिंग आपण गावी गेलो की, वाड्यावर गेल्यावर तू 14 तारखेला उघडायचं. त्यात अजून एक स्पेशल बर्थडे गिफ्ट आहे.’ मला खरं तर खूप उत्सुकता लागली होती त्या ग्रीटिंगमध्ये काय आहे हे पहाण्याची, पण चार दिवसांचा तर प्रश्न होता. म्हणून मग मी ते ग्रीटिंग माझ्या बॅगमध्ये जपून ठेवलं.

पार्टी झाल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, पार्टीला गेल्यापासून दी फारसं बोलत नव्हती आणि एकंदर तिचं पार्टी एन्जॉय करण्यात अजिबातच लक्ष नव्हतं. ती फक्त सतत राजच्या हलचालींवर वर लक्ष ठेवून होती. संपूर्ण पार्टीमध्ये ती शांत होती. इतरवेळी तिला पार्टी एन्जॉय करायला, डान्स करायला खूप आवडत असे. मग मला वाटलं तिला आई-बाबांची आठवण येत असेल त्यामुळे ती शांत आहे. मी तिला घरी आल्यावर तसं विचारलं, पण ती ‘जरा बरं वाटत नाहीय, म्हणून माझं पार्टीत लक्ष नव्हतं’ एवढंच म्हणाली.

मग आम्ही तिघं 11 तारखेला आमच्या गाडीतून इथं गावी आलो. येताना राज आणि दी आलटून पालटून ड्रायव्हिंग करत होते. गावात आल्यावर गावातलं सृष्टीसौंदर्य पाहून राज तर अगदी वेडा झाला होता. तो सांगत होता की देश विदेशातली इतकी ठिकाणं तो फिरलाय, पण असं सौंदर्य त्यानं कुठंच पाहिलं नव्हतं. हे सगळं कॅमेऱ्यात किती साठवून ठेवू असं झालं होतं त्याला. मग आम्ही दोन तीन दिवस गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भरपूर हिंडलो फिरलो. खूप सारे फोटो काढले. धम्माल केली.

13 तारखेला आम्ही तिघं, काल आपण ज्या टेकडीवरच्या आंबामातेच्या मंदिरात गेलो होतो ना, त्या देवळात गेलो होतो. तिथून परत येताना मी माझ्याच नादात मंदिराच्या पायऱ्या उड्या मारत उतरत होते. अचानक माझा पाय मुरगाळला आणि मी पडले. जास्त लागलं नाही, अगदी किरकोळ खरचटलं. पण पाय मुरगाळल्यामुळे मला चालता येईना. मग राजनी मला उचलून गाडीपर्यंत नेलं. वाटेत दवाखान्यात जाऊन औषध घेवून मग आम्ही घरी आलो. वाड्यात पोहोचल्यावर पण राजनीच मला गाडीतून उतरवून आतपर्यंत उचलून आणलं. नंतर मग दीनं हात धरून मला आधार देत देत वरच्या खोलीत पोहोचवलं.

म्हटलं तर ही घटना तशी फारच किरकोळ होती, पण या सगळ्या धावपळीत राज माझी किती तळमळीने काळजी घेत होता हे मला प्रकर्षानं जाणवलं. जिजू सोबत असले की मी खूपच सिक्यूअर फील करते या गोष्टीचीही मला त्यावेळी परत एकदा जाणीव झाली. दी नं खरोखरच तिचा जिवनसाथी म्हणून योग्य माणसाची निवड केलीय याचं मला मनोमन समाधान वाटलं. त्याचवेळी, दी माझी सख्खी बहिण असून, जी माझ्यावर जिवापाड प्रेम करत असे, ती या सगळ्या घटनेत खूपच त्रयस्थासारखी वागत होती, याचं मात्र मला आश्चर्य वाटत होतं.

त्या संध्याकाळी जेवताना दी फारसं बोलत नव्हती. मीही पाय दुखत होता म्हणून औषध घेवून लवकर झोपायच्या खोलीत गेले. इथे येताना मी राजनी दिलेलं ग्रीटिंग माझ्या बॅगमधून घेवून आले होते. दुसर्या दिवशी ते उघडायचं होतं. त्यात काय सरप्राईज असेल याची मला खूप उत्सुकता लागली होती. एकदा वाटत होतं ते ग्रीटिंग उघडून पहावं का? पाहून झाल्यावर परत पहिल्यासारखं चिकटवून ठेवता येईल. क्षणभरच असा विचार माझ्या मनात आला. पण मग राजनी एवढ्या विश्वासानं ते माझ्याकडे दिलंय, मग असं आधी उघडणं योग्य नाही असं मला वाटलं. परत मी माझ्या मनाला समजावलं की आता तर एका रात्रीचा प्रश्न होता. उद्या तर मी ते उघडणारच होते. शेवटी त्या ग्रीटिंगमध्ये काय काय असू शकते या शक्यतांचा विचार करतच मी झोपी गेले.

मग 14 तारखेला exactly काय झालं ? …….

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..