नवीन लेखन...

आंबा

 

त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं जपणारी ही माणसं. जपानच्या या दौर्‍यात घरचं जेवण मिळायला हवं असं वाटत होतं अन् त्यासाठी आम्ही गळ घालीत होतो ती आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मुलीला. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर ती आम्हाला निमंत्रित करायला राजी झाली. तिचं घरही छोटसंच होतं. दोन खोल्या, बाल्कनी आणि स्वच्छतागृह. घरात येतानाच तिनं प्रत्येकाला सपाता दिल्या. घरात वापरण्यासाठी. प्रत्येक घरात असतातच त्या. घराच्या सजावटीत एक निसर्गचित्र असं लावलं होतं, की घरालाच एखाद्या बगिचाचं स्वरूप यावं. तिनं आमच्यासाठी `सुशी’ केली होती. सुशी हा जपानमधला खास लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मासे कच्च्या स्वरूपात खायचे असतात, हे सारं आता आठवावं, याला कारणही तसंच आहे. कालच एक बातमी वाचली… आता भारतीय आंबा जपानला निर्यात होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय आंब्यांच्या उत्पादन पद्धतीपासून घटक नियंत्रणापर्यंतची तपासणी केल्यानंतर या हंगामात काही प्रमाणात आंबे जपानला जाऊ शकतील, अशी ती बातमी होती. तर, त्या वेळच्या आमच्या जेवणाच्या टेबलावर सुशी होत्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार होते आणि एक मद्याची बाटली. सहज पाहायची म्हणून ती बाटली पाहिली. `इंडियन हनी’ असा ठळक उल्लेख त्यावर होता. स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली ती भारतीय पदार्थांवर. जपानच्या छोट्या-मोठ्या उत्पादनावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर. सहजी विषय निघाला आंब्याचा.  मी म्हटलं,`तू हापूसचा आंबा खाल्लायस?’ उत्तर नकारार्थीच होतं. आंबा हा काही वर्णन करून सांगायचा प्रकार नाही. तो अनुभवायचा असतो. त्याचा स्वाद सांगायचा नसतो, घ्यायचा असतो. आंबा खाल्ल्यानंतर हाताला दरवळणारा गंध साठवायचा असतो; पण त्या दिवशी आंबा हा आस्वादाचा नव्हे, तर गप्पांचा विषय होता. त्या वेळी लक्षात आलं, की बोलण्यासारखं खूप आहे, आंब्याबद्दल. जगात फळांचा राजा म्हणून त्याचं असलेलं निर्विवाद स्थान आम्हाला आंब्याविषयी बोलताना अभिमानाचा विषय वाटत होता. आमच्या चौघामध्ये मी मराठी, तर मालविका संघवी ही मुंबईत राहिलेली पत्रकार होती. आमच्या या गप्पात आमच्या यजमानबाईच्या मनात आंब्याविषयी कौतुकमिश्रित उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कारण आता आंब्याविषयीचे प्रश्न पलीकडून येत होते. आंबा न खाताही आणि सुशी खाऊन दात आणि दाढांची कसोटी लागलेली असतानाही आम्ही तो आस्वाद घेतला होता. ज्या वेळी समारोपाचं बोलणं सुरू झालं तेव्हा आमच्यापैकी एक जण म्हणाला, `तुझा पत्ता आहे माझ्याकडे. भारतात गेल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी काही पाठवून देऊ. म्हणजे आंबा आणि त्यातही हापूसचा आंबा काय असतो, ते कळेल.’ आता यजमानबाई पुढे आल्या. धन्यवाद म्हणाल्या; पण तेवढ्यावरच थांबलं नाही. त्या म्हणाल्या, `कृपा करा आणि आंबा काही पाठवू नकात. मी त्याचा स्वीकार नाही करू शकणार.’ काही तांत्रिक अडचण असेल तर दूर करता येईल, असं कोणी म्हणालं; पण त्यावर त्या म्हणाल्या, `तसं नाहीये. मीच नव्हे पण अनेकांनी हापूस आंब्याविषयी ऐकलं आहे. काहींनी भारतात तो खाल्लाही आहे; पण आम्ही तो भेट म्हणूनही नाकारतो. कारण तो जर इतका छान असेल तर त्याचा मोह नाही टाळता येणार. आणि एकदा आवड आणि मोह वाढला की भारतातून तो आयात करावा लागेल. आम्हाला तसं काही व्हावं, असं वाटत नाही.’ आता अवाक् होण्याची वेळ आमच्यावर आली होती. जपानमधील एक महिला. सुशिक्षित महिला आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, त्याच्या हितसंबंधांचा इतक्या व्यक्तिगत पातळीवरही विचार करीत होती.

जपानमधून परतताना पांडुरंग नावाच्या मराठी माणसाच्या मदतीनं मी जपानच्या बाजारात किरकोळ का होईना खरेदी केली होती. भारतात सहजी उपलब्ध असणाऱयाच त्या साऱया गोष्टी होत्या. त्या घेतानाही आपण एका अर्थानं जपानमधून या वस्तूंची आयात करतो आहोत, ही भावनाही मनात आलेली नव्हती. आज तर भारतीय बाजारपेठात अशी एकही वस्तू नसावी की जी भारतात मिळत नाही. तरीही भारतीय बाजारपेठेवर जपान नव्हे तर चिनी वस्तूंचं वर्चस्व दिसू शकतं. ती बातमी वाचली अन् विचार आला मनात आला… फळांचा हा राजा जपानवरही वर्चस्व मिळविणार… पण ती छोटी बाब कायम लक्षात राहिली. एखादा देश छोटा किंवा मोठा होतो तो त्या देशातल्या माणसांवर, त्यांच्या मनोवृत्तीवर, विचारपद्धतीवर… वाटलं, आपण कधी मोठे होणार?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..