नवीन लेखन...

जिम कॉर्बेट – भाग २

नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ पडली. तो म्हणतो, “नरभक्षकांच्या छायेत आपण किंवा आपल्या निकटवर्तीयांनी जगण्यासारखी भयंकर आपत्ती नाही.” नरभक्षकांच्या मागावर असताना नरभक्षक आपल्या मागावर असणार व आपली शिकार करण्याची संधी शोधत असणार, याची त्याला पूर्ण कल्पना असे. नरभक्षकाची शिकार हा खरे तर नरभक्षक आणि शिकारी यांच्यातील परस्पर शिकारीचा सामनाच असतो व परिस्थिती नरभक्षकाला पूर्ण अनुकूल असते. पण हा धोका पत्करूनही व त्याचप्रमाणे ज्या संपूर्ण कुमाऊँला नरभक्षकांच्या भीषण छायेतून वाचवण्याचा मान मिळवूनही या अत्यंत सुस्वभावी व विनयी माणसाच्या जंगल व जंगलवासींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काहीही बदल झालेला नाही. म्हणून तो चुकाचा नरभक्षक या आपल्या कथेत लिहू शकतो – “The thought of disabling an animal and a sleep-ing one at that simply because he occsionally liked a charge of diet was hatefull.”

वन्य प्राण्यांच्या सवयीची त्याला पूर्ण जाण होती. त्यांचे माग पाहून तो अचूक निदान करू शकत असे. प्राण्यांचे लिंग, वय, आकार एवढेच काय त्यांची मन:स्थितीसुद्धा तो ओळखू शके. सर्व वन्य प्राणी लाजाळू असतात. परिस्थिती त्यांना आक्रमक, हल्लेखोर बनवते. आज निसर्ग समतोल न्यायाच्या संदर्भात कोणताही प्राणी भुकेसाठी, भुकेपुरते व भूक लागेल तेव्हाच किंवा संरक्षणासाठी दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करतो ही वस्तुस्थिती मांडली जाते. या विचाराचा उगम कॉर्बेटच्या लिखाणात आढळतो. इतकेच नाही तर बलिष्ठ प्राणी दुबळ्या प्राण्यांचे संरक्षण करतात, त्यांना कधीही त्रास देत नाहीत व हाच जंगलचा कायदा आहे, असे कॉर्बेट निक्षून सांगत असे. जिम कॉर्बेटने आपल्या ‘माय इंडिया’ या पुस्तकात एक अनुभव/गोष्ट सांगितली आहे. दोन अजाण बालके जंगलात हरवतात. त्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वले तसेच अन्य वन्य श्वापदांचे वास्तव्य होते. ३ दिवसांनी जेव्हा ती मुले सापडली तेव्हा त्यांच्यावर नखाचा ओरखडासुद्धा नव्हता. या तीन दिवसात प्राण्यांनी ती मुले पाहिली नाहीत केली असे होणेच शक्य नाही पण कुणाही प्राण्याने त्या मुलांना कसलीही इजा नव्हती. कॉर्बेटने सांगितलेल्या गोष्टीमुळे त्याच्या विचारांना निश्चिती मिळते. जिम कॉर्बेटच्या ज्ञानाचे, अनुभवाचे, अनुमानाचे, निष्कर्षाचे प्रतिबिंब त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला स्पष्टपणे पहायला मिळते.

जिम कॉर्बेटने नरभक्षकांच्या दहशतीच्या क्रौर्याच्या कथा रंगवल्या पण निसर्गातील समतोल शाबूत ठेवण्यासाठी सहाय्यभूत होण्याचे कार्य वाघाला पार पाडायचे असते व त्यासाठी वाघांच्या अस्तित्वाचे महत्त्व पण तो जाणून होता. वाघांची भलावणी तो ‘सहृदय सद्गृहस्थ’ अशी करत असे. वाघ नरभक्षक का बनतात व त्यात माणसांचा सहभाग किती, याची तो कारणमिमांसा करत असे. तो म्हणतो, “वाघ नरभक्षक होण्याची कारणे म्हणजे असह्य वेदना देणाऱ्या किंवा अपंगत्व आणणाऱ्या जखमा, वृद्धत्व किंवा अपुरे नैसर्गिक खाद्य! साळिंदर हा छोटासा प्राणी. हे वाघाचे आवडते खाद्य! पण साळिंदराचे काटे वाघाच्या पायात घुसत. त्या काट्यामुळे पायाला खोल जखमा होत. त्याला चालणे मुश्किल होई. त्याचे नैसर्गिक खाद्य मिळवणे मुश्किल होत असे. अशा परिस्थितीत जर चुकून त्याच्या हातून नरहत्या झाली तर हे सुद्धा एक खाद्य आहे हे त्याच्या लक्षात येई व तो नरभक्षक बने.” जिमने मारलेल्या बऱ्याच नरभक्षकांच्या पायातून त्याने साळिंदराचे काटे बाहेर काढले होते तर मुक्तेश्वरची वाघिण एका डोळ्याने आंधळी होती.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे नरभक्षकांच्या मोहिमेवर असताना त्याला एक आंतरिक संवेदना होत असे व त्यामुळे त्याचे संरक्षण होत असे.

पण त्याला आलेला एक अद्भुत अनुभव म्हणजे पूर्णागिरीच्या पहाडावर त्याला दिसलेले दिवे! हा अनुभव त्याने आपल्या ‘तालादेसचा नरभक्षक’ या कथेत सांगतला आहे. टणकपूरपासून २५ कि.मी. अंतरावर माता भगवतीचे ‘पूर्णागिरी’ हे शक्तिपीठ आजही उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्णागिरी मंदिराच्या समोरील पहाडावर, देवीची कृपा असलेल्या श्रद्धाळू भक्तांना, त्या परिसरातील लोकांचे भले करणाऱ्या व्यक्तींना दिव्य ज्योतीचे दर्शन होते, अशी आजही ह्या परिसरात वदंता आहे आणि विशेष म्हणजे जिम जेव्हा तालादेसच्या नरभक्षकाच्या मोहिमेवर होता तेव्हा त्याला व त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांना या दिव्य ज्योतींचे दर्शन झाले होते. त्या संबंधी त्याने एका स्थानिक पत्रकात लेखही प्रसिद्ध केला होता. तो लेख जेव्हा पूर्णागिरीच्या मुख्य पुजाऱ्याच्या ते वाचण्यात आला तेव्हा हे दिवे पाहिलेला पहिला युरोपियन माणूस म्हणून स्वत: जिमला भेटण्यासाठी आले होते. या दिव्यांची वस्तुस्थिती त्यांना माहित होती तर जिमने ते प्रत्यक्ष पाहिले होते.

वाघ वाङ्मयाला व शिकारकथांना प्रसिद्धी मिळाली ती केनेथ अँडरसन व जिम कॉर्बेटमुळे! पण जिम कॉर्बेटचं लिखाण अतिशय सुंदर आहे. या लिखाणात त्याने केलेली निसर्गाची वर्णने, प्राण्यांच्या सवयी, लोकांच्या भावना, त्यांचे स्वभाव, त्याला स्वत:ला आलेले अनुभव हे सर्व वाचताना या सर्व घटनांचे आपणही एक साक्षीदार आहोत असे वाटू लागते व त्यात आपण गुरफटू लागतो.

जिम कॉर्बेटने लिहिलेल्या पुस्तकांना जगात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषात त्याची भाषांतरे झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या. विक्रीचे उच्चांक मोडले. त्याच्या ‘मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ’ या पुस्तकाचा तर भारतात सिनीअर केंब्रिजच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. या पुस्तकांनी जिम कॉर्बेटला लक्षाधीश बनवले व निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाला निसर्ग भरभरून देतो ही त्याची श्रद्धा खरी ठरली. पण हे मानधन माझे नाही तर हे पैसे निसर्गाचे आहेत या भावनेने मिळालेले सर्व मानधन त्याने भारत व ब्रिटनमधील वन्यप्राण्यांच्या रक्षणाच्या योजना आखण्यात, गिरीजनांना, गोरगरिबांना, युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांना, अंधांना मदत करण्यात खर्च केले.

–प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..