नवीन लेखन...

एका सैनिकाची गोष्ट

एका युध्दातली ही कथा आहे. एक सैनिक आपल्या तुकडीपासून चुकतो. रस्ता जंगलातला असतो. सैनिक आपल्या तुकडीचा खूप शोध घेतो. त्याला कोणी भेटत नाही. जंगलभर फिरुन फिरुन तो अगदी दमून जातो.

तेवढ्यात त्याला पावलांचे आवाज ऐकू येऊ लागतात. त्याच्या लक्षात येते की हे पावलांचे आवाज आपल्या तुकडीचे नाहीत. बहुदा शत्रूची तुकडी याच मार्गाने येत असावी. तो आजूबाजूला पहातो. लपण्यासाठी कुठलीच सोय नसते. त्याला खात्री पटते की आता आपण मारले जाऊ.

शेवटचा प्रयत्न म्हणून तो आणखीन थोड्या अंतरावर जाऊन निरिक्षण करतो. त्याला दोन चार गुहा दिसतात. “या गुहा प्राण्यांच्या असाव्यात. परंतु मला त्यात लपता आले तर माझा जीव वाचेल.” सैनिक स्वतःशी विचार करत असतो. त्याच्या मागे पावलांचे आवाज वाढत चालले असतात. शत्रू जवळ जवळ येत असतो. शेवटी धीर करुन हा सैनिक एका गुहेत शिरतो.

तो गुहेत शिरला ना शिरला तेवढ्यात गुहेच्या तोंडावर एका कोळी जाळे विणायला सुरुवात करतो. सैनिक देवाला प्रार्थना करत असतो की देवा माझे प्राण वाचव. माझी इतर सैनिकांबरोबर भेट घालून दे. कोळ्याला जाळे विणताना पाहून तो म्हणतो “हे काय देवा, मी तुला माझे रक्षण करण्याची विनंती केली होती. तू तर एक क्षुल्लक कोळी जाळे विणायला पाठवून दिलास.

माझ्या सोबत का बरे अशी मस्करी करतो आहेस? का तुला मी त्यांच्या हातून मरायला हवा आहे?”

दुसरा कुठलाच इलाज नसल्यामुळे सैनिक शत्रूच्या हातून मरणासाठी सिध्द होतो. शत्रूचे सैनिक त्या गुहेजवळ येतात. आजूबाजूला इतरही गुहा असतात. त्यांच्यातल्या म्होरक्या थोड्या थोड्या सैनिकांना प्रत्येक गुहेत जाऊन कोणी तेथे लपले तर नाही ना याची खातरजमा करण्यास सांगतो. त्यानुसार तुकडीतले सैनिक इतर गुहांमधून विखुरतात.

हा सैनिक जिथे लपलेला असतो त्या गुहेसमोर शत्रू उभा असतो. त्यातल्या एक जण म्होरक्याला विचारतो “भी या गुहेत जाऊ का? ” म्होरक्या म्हणतो “येथे जाण्यात काही अर्थ नाही. ज्याअर्थी कोळ्याने इथे जाळे विणले आहे त्या अर्थी इथे कोणी यापूर्वी गेलेले नाही. कोणी गेले असते तर कोळ्याचे जाळे तुटले असते.”

ती गुहा सोडून बाकी सगळ्या गुहांमधून शत्रूचे सैनिक तपासणी करतात. त्यांना कोणी तेथे आढळून येत नाही. शत्रूची तुकडी पुढे निघून जाते. सैनिक देवाला प्रार्थना करतो. “देवा मला क्षमा कर. मी तुला कोळी पाठविलास म्हणून दूषण दिले होते. मला हे तेव्हा कळले नाही की कोळ्याचे जाळे एखाद्या भिंतीपेक्षा अधिक मजबूत असते, आपले अधिक चांगले संरक्षण करु शकते.”

देवाच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण देवाकडून मागत रहातो. आपले कल्याण कशात आहे हे देवाला आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून देवावर पूर्ण विश्वास ठेवावा. तो आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते. तिला अधिक सकारात्मक करते.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..