नवीन लेखन...

तोडगा

एका गाडी बनविणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात एक प्रज्ञावान इंजिनिअर असतो. तो स्वतःच्या हिकमतीवर एक नवीन गाडी बनवितो. गाडी फार सुरेख झालेली असते. सगळे जण तिला पाहून मोहित होतात. इंजिनिअरही स्वतःच्या सृजनावर प्रसन्न होतो. आता टेस्ट ड्राईव्हसाठी गाडीला कारखान्याच्या बाहेर न्यायचे असते. परंतु बाहेर पडण्याच्या दरवाज्यापाशी आल्यावर इंजिनिअरच्या लक्षात येते की गाडीची उंची दरवाजाच्या उंचीपेक्षा जरा जास्त आहे. त्याला आश्चर्य वाटते की या गोष्टीचा विचार त्याने गाडी बनविताना का केला नाही! निदान त्या दरवाज्याचे अगोदर माप घेणे अगत्याचे होते. त्या दरवाज्यातून आता ती गाडी बाहेर जाऊ शकणार नाही हे त्याच्या लक्षात आले. काय करावे असा विचार सगळेचजण करु लागतात.

त्याच्या सहपाठ्याने सुचविले की आपण गाडी तशीच ढकलत बाहेर आणूया. फारतर थोडेसे खरचटले जाईल. गाडीवर थोडे ओरखडे उठतील. गाडी कंपनीचा मालक या मताशी सहमत होईना. “नव्या गाडीवर ओरखडे उठलेले कसे चालतील?” तो रागावून म्हणतो.

दुसरा एक जण सुचवितो की दरवाजा काढून ठेवायचा, गाडी बाहेर काढायची आणि मग दरवाजा पुन्हा बसवायचा. बहुतेकांना ही कल्पना पसंत पडते. परंतु मालक म्हणतो “पुढच्या गाड्यांचे काय? या गाड्या बनत राहिल्या तर प्रत्येक वेळेला कारखान्याचा दरवाजा काढायचा की काय?” तो ही ही कल्पना मागे टाकतो.

आता सगळे जण चिंतेत पडतात. गाडी बाहेर काढायची कशी हे कोणालाच सुचत नसते. इंजिनिअरने केलेली मेहनत एवढ्या क्षुल्लक कारणासाठी वाया जाईल की काय असा प्रश्न प्रत्येकाला सतावत रहातो.

हा सगळा प्रसंग कारखान्याचा दरवान पहात असतो. तो ही विचार करत असतो की या प्रश्नावर तोडगा काय काढावा. बराचवेळ संकोच करुन अखेर तो आपला धीर एकवटतो आणि सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमोर जाऊन उभा रहातो. “मी फार छोटा माणूस आहे. मला एक मार्ग सुचला आहे. पण लहान तोंडी मोठा घास घ्यावा की नाही असा मला प्रश्न पडला आहे. आपण म्हणत असाल तर मी माझ्या अल्प बुध्दिला सुचलेला तोडगा सुचवू काय? ”

सगळे मोठे अधिकारी एकमेकांकडे पाहू लागतात. गाडी बनविणारा इंजिनिअर त्या दरवानाला म्हणतो “तुला जे सुचले आहे ते निःसंकोच सांग. आपल्याला तोडगा मिळाल्याशी कारण.”

दरवान भीत भीत म्हणतो “गाडीची उंची थोडीशीच जास्त आहे. तिला खरचटत नेण्यापेक्षा टायरमधली हवा काढून बाहेर ढकलत नेली तर आपले काम होईल काय?

” त्याच्या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. एवढी सोपी कल्पना आपल्याला कशी सुचली नाही याचा विचार जो तो करु लागतो. गाडी बनविणारा इंजिनिअर आनंदाने त्या दरवानाला मिठी मारतो. त्याच्या सूचनेनुसार गाडी सुखरुप बाहेर आणली जाते.

अशाच प्रकारचे अनेक तोडगे आपल्याही आयुष्यात आपल्याला कोणीतरी अगदी सामान्य व्यक्ती किंवा कदाचित मुलेही सुचवितात. आपण ठराविक दिशेने विचार करतो. त्यामुळे आपल्याला अनेकदा पर्याय सुचत नाहीत. दरवानाचा त्या प्रोजेक्टमध्ये काही सहभाग नव्हता. एका तिऱ्हाईतासारखे त्याने त्या प्रश्नाकडे पाहिले आणि त्याला जे सुचले तो सर्वात किफायतशीर व उत्तम मार्ग होता हे नि:संशय.

आपणही कुठल्याही कठीण परिस्थितीत आपल्याला परिचित असलेल्या मार्गाने विचार न करता एखाद्या त्रयस्थासारखा विचार केल्यास आपल्यालाही निश्चित तोडगा सापडतो. दरवानासारखी साधी माणसेही आपल्या उपयोगाची असतात हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टीवरुन असेही आपल्या लक्षात येईल की या जगात कोणीच लहान थोर नाही. जो. तो आपल्या परीने श्रेष्ठच असतो.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..