नवीन लेखन...

रंगांतील श्रीगणेशभक्ती

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ – गजानन सीताराम शेपाल ह्यांनी लिहिलेला हा लेख)


सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती. आप्पा सांगतात म्हणून घासाच्या शेतातून, बांधावर उगवलेल्या ताज्या अन् हिरव्यागार टोकदार दूर्वा नखाने तोडून २१ दुर्वांची जुडी बनवायची अन् पूजेच्या वेळी नेऊन द्यायची. कौतुक होतंय म्हणून आणखीनच दूर्वांच्या जुड्या बनवायच्या अन् गणेशमूर्तीला वहायच्या वगैरे. एवढाच काय तो रोजचा सकाळचा कार्यक्रम.

कधीमधी आप्पा गावी गेलेले असतील तर पूजेचं कार्य माझ्या हाती यायचं. देवघरातील तमाम देवतांची आंघोळ आणि गंध-पुजा, फुले वाहून, अंतीम टप्प्याचा मोर्चा श्रीगणेशाच्या ‘त्या’ सुंदर-सुबक मूर्तीकडे वळायचा. आप्पा आल्यानंतर कौतुक करतील, नव्हे त्यांनी कौतुक करावं… म्हणून भरपूर जुड्या, निशिगंधाचे एकमेकांत अडकवून बनवलेले अलंकार या साऱ्यांमुळे, गणेशपूजा फारच रंगायची. आणि श्रीगणेशाचं ओंकारूप हे त्या अजाणत्या वयापासूनच आवडायला लागलं. हे सारं कथन करायचा उद्देश एकच की, काहीच कळत नव्हतं तेव्हापासून श्रीगणेशमूर्तीचं आकर्षण होतं. ते आजतागायत…!!

अनभिज्ञपणे, अजाणतेपणानं, अज्ञानीपणानं एखादी कृती पूर्ण आनंद घेऊन केली तर तिचं निरागसत्व जाणकारालाच काय परंतु रुक्ष व्यक्तिलाही पटतं. म्हणूनच, तान्ह्या बाळाच्या हालचालींना लय असते, त्या पाहायला छान वाटते, त्याने पायाचा अंगठा तोंडात घातला तर ते रूप मन हरखून टाकते, त्याचं रडणं-हसणं फार काय त्याची शी-शू देखील… कौतुकास पात्र असतात. त्याच्या सारखंच जर मोठ्यांनी केलं तर? ते एक चेष्टेचा किंवा हास्याचा भाग ठरतं/वाईट दिसू शकतं. आपली कृती त्या लहान बाळांसारखी निरागस असेल तर पुढच्या फलिताचा आनंद तो काय वर्णावा?

श्रीगणेशाचं प्रत्येक रूप ते अशा प्रकारचा आनंद देत असतं. ‘आनंद’च का? तर ह्या ‘आनंद’ शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाहिए म्हणून. आणि म्हणूनच की काय परंतु श्री गणेश ही एकमेव अशी देवता आहे की, कुणाही चित्रकाराने वा बालकलाकाराने सुद्धा कशीही रेखाटली अथवा रंगविली ती सुंदरच दिसते. हेच ताडून मी माझ्या इयत्तेच्या ४थी पासून (१९७५ पासून) श्री गणेशाचे अनंत आकार रेखाटले असतील. रंगविले असतील.

मुळात श्रीगणेशाकार हा आधुनिक उपयोजित कलेमध्ये अत्यंत सर्वसमावेशक असा आकार मानला जातो. ‘ओंकार’ हा नाद आहे. तो स्वयंभू आहे. शब्दांच्या, अर्थांच्या म्हणजे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ यांच्याहूनही वेगळा तो स्वयंभू !! म्हणजेच नैसर्गिक नाद आहे. हिन्दू तत्त्वानुसार आकाशापासून सृष्टी बनली. आणि आकाशाचं विशुद्ध स्वरूप नाद आहे. तो दिसत नाही, जाणवतो. आकाश दिसते परंतु हातात घेता येत नाही. अशा सर्वव्यापी ईश्वराचं स्वरूप म्हणजे नाद. हा नाद मुख्यतः

पाच विविध आकारांमध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न जाणकारांनी केला. पृथ्वी-आयत, आप (पाणी) वर्तुळ, तेज-त्रिकोण, वायू-चंद्रकोर आणि आकाश-ज्योति. अशा पांच आकारांची मूळ नावे-पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. श्रीगणेशाने या साऱ्या आकारांना स्वतःमध्ये सामावून घेतलेले आहे. आकाशतेज मस्तकावर, वायू तेज-भाल प्रदेशावर, तेजरूप-मुख प्रदेशावर, आप तेज-उदरावर आणि पृथ्वी तेज हे मांडी घातलेल्या पायांवर धारण केलेले आहे.

ह्या प्रत्येक तेजाकारांना विशिष्ट रंग आहेत. पृथ्वी (हिरवा), आप (गडद निळा), तेज लाल/नारिंगी/पिवळा), वायू (पांढरा/चंदेरी) आणि आकाश (फिक्कट निळा) ह्या तेजांचा आणि श्री गणेशाकारांचा अन्योन्यसाधारण संबंध आहे. आपण कितीही तप-साधना-उपासना केली तर मला प्रत्यक्ष श्री गणेशाने सदेही दर्शन दिले. असे आजपर्यंत घडलेल्या पुराव्यांसह सांगता येणं मुश्किल आहे. परंतु दृष्टांत झाला, स्वप्नात दर्शन झाले, तेजःपुंज दिसला, स्टार दिसला, निळा प्रकाश दिसला वगैरे आपण ऐकतो. कदाचित आपल्यापैकी काही वाचकांनी अनुभवले देखील असेल. म्हणजेच, विशिष्ट रंगांच्या माध्यमातूनच आपणांस अनुभूती मिळते/ मिळवता येते. या मतावर विश्वास बसला आणि त्यातूनच श्रीगणेशाची रूपे, श्रीगणेशाचे सांकेतिक आकार, प्रतीके यांचा पुराणापासून कसा कसा साधनेमध्ये उपयोग केला गेला या प्रारंभी क्लिष्ट वाटणाऱ्या परंतु नंतर उत्सुकता वाढवणाऱ्या विषयाकडे संशोधक विचाराने अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्यातून बऱ्याच अद्भुत वाटणाऱ्या (परंतु अद्भुत नसलेल्या) गोष्टी ध्यानात आल्या. उदाहरणार्थ, आपणांस श्रीगणेशाची पूजा करायची आहे. परंतु आपणांस हवी तशी मूर्ती अथवा प्रतिमा उपलब्ध नाही. अशावेळी त्या देवतेची जी लक्षणे सांगितली आहेत ती लक्षणे बिंदु, त्रिकोण, षट्कोन, वर्तुळ किंवा अष्टदल या आकारांनी बद्ध केलेल्या एका संयुक्त/ संयुक्तिक आकारसमूहात रेखाटून आणि विशिष्ट रंगांनी रंगवून त्यांची पूजा केल्यास, ती पूजा ही त्या देवतेपर्यंत पोहोचविण्याचा ‘बायपास’ मार्ग म्हणजे ही ‘रेखाकृती’.

या रेखाकृतींना ‘भद्र’ अशा नामोल्लेखाने ओळखले जाते. ‘भद्र’ हा संस्कृत शब्द आहे. ‘ॐ भद्रं कर्णेभिः’ मधला ‘भद्रं’ म्हणजे ‘कल्याण’ हे ओंकारा… श्रीगणेशा… हे कल्याणकारी देवते…!! या अर्थाने श्रीदेवतेला तिच्या लक्षणांनी युक्त अशा आकार समूहात रंगांच्या साहाय्याने बद्ध करण्याच्या कृतीला ‘भद्र’ किंवा ‘यंत्र’ असं म्हटलं गेलेलं आहे.

सर्वतोभद्र, गणपती भद्र, सिद्ध गणेश यंत्र, एकलिंगतोभद्र अशा श्रीगणेशाशी निगडीत असलेल्या यंत्रांची नांवे पाहिल्यावर आपल्या ध्यानात येईल की श्रीगणेश ही देवता किती कल्याणकारी आणि मंगलवाचक आहे…!!

मंत्रशास्त्राच्या सिद्धांतानुसार बीजाक्षर मंत्रात ती देवता चैतन्य रूपाने असते. याला विज्ञानाने पुरावा मागितला तर तो शक्य नाही परंतु त्या उपासकाला अनुभव मात्र येतोच. अनुभूती येण्यासाठी साधक होणं आवश्यक आहे आणि जिथं विज्ञान संपतं तिथेच आध्यात्म सुरू होतं. कारण आधात्म हे पुराव्यांवर आधारित नसून अनुभूतींवर विसावलेले आहे.

श्री गणेशाचे ‘गं’ हे बीजाक्षर, श्रीगणेशयंत्रात मध्यभागी आहे. तद्वतच ऐं, हीं, क्लीं हे बीजाक्षरे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची आहेत. ह्या बीजाक्षरांनी युक्त अशी बरीच यंत्रे, मंत्रशास्त्रात उल्लेखिलेली आहेत. देवतेच्या प्रतिमापूजनाचे फळ यंत्र पूजनाने त्वरित मिळविता येते. असे अनेकांना अनुभव आहेत.

काही यंत्रे केवळ उभ्या व आडव्या चार रेषांची असतात. त्यात अंक असतात. त्यांची सर्व बाजूंनी बेरीज पंधरा, तीस, एकोणीस वगैरे येते. ह्या यंत्रांच्या केवळ दर्शनाने फलप्राप्ती होते असा अनुभव आहे. मात्र काही यंत्रे ही विशिष्ट साधना करून, विशिष्ट पृष्ठभागावर, विशिष्ट रंगांनी रंगवून-इन्दुखंड, शृंखला, वल्ली, भद्र, वापी, परिधि, अष्टदल, सत्त्वरजतम या सांकेतिक स्थानांचा वापर करून यंत्रांची रचना केलेली असते. त्यांचे निर्मितीचे शास्त्र- जसे नक्षत्र, तिथी, मुहूर्त, योग इ. पाहून कोणत्या रंगयोजनेत ते बंद करायचे हे सारे निश्चित करावे लागते. शास्त्रात इन्दुखंड पांढऱ्या रंगाने, शृंखला काळ्या म्हणजे बुक्कामिश्रित, वल्ली निळ्या रंगाने, भद्र-लालसर रंगाने, वापी पांढऱ्या रंगाने तर परिधिचा रंग पिवळा असावा असे उल्लेख आहेत. जमिनीवर श्री गणेशभद्र काढताना, पांढऱ्यासाठी तांदूळ (तांदूळ शुभ सूचक प्रतीक आहे म्हणून) त्या तांदळात-बुक्का मिसळला की काळा, हळदीमुळे पिवळा, बुक्का हळद यांच्या कमी अधिक मिश्रणामुळे निळा व हिरवा, कुंकवामुळे लालसर ह्या रंगछटा तयार केल्या जायच्या.

श्री गणेशाच्या यंत्रावर आधारित, कलाकृती करतांना रंगछटा उपलब्ध असल्याने अशी पेंटींग्ज सुद्धा फार फलदायी ठरल्याचे अनुभव आहेत. मात्र अशी पेंटींग्ज धार्मिक शास्त्राधार, जप, मुहूर्त, योग इ. बाबी पाहून निर्माण केल्यास, अनुभूती ही येतेच. अशी रास्त खात्री देता येते.

श्री गणेश यंत्र, श्री गणेश लक्ष्मी यंत्र, श्री गणेश कुबेर यंत्र, श्री शक्तिगणेश यंत्र, श्री सिद्धीगणेश यंत्र, अशी अनेक गणेश यंत्रे पुराणात उल्लेखिलेली आहेत. ‘यंत्र’ ह्या धातूचा मूल अर्थ ‘यंत्र संकोचे’ असा आहे. म्हणजे चराचर सृष्टीत व्यापलेल्या दैवी शक्तीचा एका विशिष्ट ठिकाणी संकोच करणे, तिला नियंत्रित करणे. अशा सुनियंत्रित आणि मंत्रशास्त्राने निबद्ध झालेली देवता त्या यंत्राच्या रूपाकारांत वास करीत असल्याने अनेकांना अनेक प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत. आत्मविश्वास वाढणे, झोप म्हणजे निद्रानाशापासून सुटका, कौटुंबिक कलहांपासून मुक्ती, संकंटांचे दूर पळणे, धाडस वाढणे, घाबरटपणा कमी करणे, मंगलकार्य घडणे, दृष्ट न लागणे या व अशा अनेक अशा अनेक उपायांवर ही यंत्रे कार्य करतात.

श्री गणेश ही देवताच अशी आहे की, तिचे आकर्षण वाटते. विविध प्रतिकांनी युक्त असलेली ही देवता, म्हणूनच की काय परंतु घराघरातून जगभर पोहोचली आहे. हत्तीचे तोंड हे बुद्धीचं प्रतीक, सुपासारखे कान हे विशालतेचं प्रतीक, वाहन मूषक असल्याने मूषकाप्रमाणे सतत जागरूक व कामात व्यग्र, लंबोदर म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक तर त्याची आवड पाहता ध्यानात येईल की उकडीचा मोदक ज्याचा आकार पिरॅमिड सारखा होतो. ‘पिरॅमिड’ या विषयाचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्याला दूर्वा आवडतात. दुर्वा रक्त शुद्धि सह अनेक व्याधींवर उपयुक्त अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याला केवड्याचा सुगंध आवडतो. केवड्याच्या सुवासाने निद्रानाश टाळता येतो -दुःस्वप्ने पडत नाहीत. या व अशा अनेक प्रतीकांनी युक्त अशा श्री गणेशाचे वर्णन करतांना शब्द तोकडे पडतात.

-गजानन सीताराम शेपाल, नवी मुंबई

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..