नवीन लेखन...

कथा एका चावीची

पोलीस खात्यात काम करतांना कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, हे कधीही कोणालाही सांगता येणार नाही.

तुम्ही एखादा विचार करुन रात्री वेळेत घरी येतो, असं पत्नीला किंवा मुलांना सांगून निघता, त्यावेळी हमखास तुम्हाला वेळेत घरी जाता येत नाही.

हा समस्त पोलीस खात्यात काम करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा अनुभव आहे. प्रत्येक क्षणाला पोलीस स्टेशनमध्ये येणारा मनुष्य हा काय तक्रार घेउन येईल याचा काही अंदाज लागत नाही.

पोलिसांनी सदैव तत्पर राहून येणाऱ्या माणसाचं समाधान करण्याचा प्रयत्न करावा लागतो. काही वेळेला इच्छा असूनही मदत करता येत नाही. कारण कायद्याच्या चौकटीत राहून काम करतांना पोलिसांना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपल्याला न्याय मिळावा, आपल्या समस्याचं निराकरण आणि तेही अगदी कमी वेळेत व्हावं अशी अपेक्षा असते.

जनतेची ही अपेक्षा चुकीची आहे, असं मला मुळीच म्हणायचं नाही. परंतु सर्वांच्याच समस्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविता येत नाहीत. काही तक्रारींमध्ये तांत्रिक अडचणी असतात. तर काही वेळेला कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात.

पोलीस दलात काम करतांना अनेक वेळा बाका प्रसंग येतो, तर काही वेळेला काहीही घटना घडलेली नसतांना, समज गैरसमजातून अनेक वेळेला पोलिसांना काही कारण नसतांना व्यस्त होणं भाग पडतं. पोलिसांना त्यावेळी हस्तक्षेप करुन, प्रसंगावधान राखून समस्या सोडवाव्या लागतात आणि मग अशा घटना घडलेल्या नसतांना पोलीस कसे व्यस्त होतात किंवा विनाकारण त्या न घडलेल्या घटनेच्या निमित्ताने पोलिसांना कसं काम करावं लागतं व त्यांचा वेळ कसा वाया जातो. हे काम करणाऱ्या पोलिसांनाही कळत नाही. ज्यावेळी पोलिसांना समजतं की, ‘आपण एवढी मेहनत केली, ती फुकट गेली.’ त्यावेळी पोलिसांना आपल्या घराचा, जेवणाचा व झोपेचा पूर्णपणे विसर पडलेला असतो.

अशा अनेक प्रकारच्या प्रसंगामुळे पोलिसांचं काही वेळा मनोरंजन होतं, तर काही वेळा फुकट वेळ वाया गेल्याने चिडचिड व मनस्ताप होतो. एखाद्या न घडलेल्या घटनेमुळे मनस्ताप किंवा मनोरंजन होतं, त्या घटना मात्र कायमस्वरुपी पोलिसांच्या काळजात घर करुन बसतात.

असे अनेक प्रसंग अनुभवायला मिळाले, त्यापैकी कायम स्मरणात राहीलेला एक म्हणजे.

मी नौपाडा पोलीस ठाण्यात काम करत असतांनाची घटना. साधारण वीस वर्षांपूर्वीची. सन- १९९४ सालातील असावी. नुकताच श्रावण महिना सुरु झालेला होता. मराठी सणांमध्ये जास्तीत जास्त सण हे श्रावणापासून सुरु होतात. त्यामध्ये बहुतेक घराघरांतुन, सोसायट्यांमधून श्री. सत्यनारायणची पूजा, दहिहंडी नंतर श्री गणेश उत्सव, नवरात्रोत्सव अशा सणांची मालिका सुरु होते. पावसाळा आपलं काम चोख बजावित असल्यामुळे लोकांमध्ये उत्सवाचं वातावरण पसरलेलं होतं.

दिवसभर दहिहंडीचा बंदोबस्त केलेला होता. त्या काळात आजच्या सारखं दहिहंडीला राजकीय स्वरुप प्राप्त झालेलं नव्हतं. वेगवेगळ्या  विभागांतून सार्वजनिक मंडळ दहिहंडी बांधायचे व संध्याकाळी सात वाजण्याच्या वेळेपर्यंत दहिहंडीचा उत्सव पार पाडून लोक घरी जात. काही लोक एक दुसऱ्याच्या घरी पूजेसाठी, तिर्थप्रसादासाठी जात होते. आज देखिल एकमेकांच्या घरी जाण्याची परंपरा चालू आहे.

दिवसभर बंदोबस्त करुन नेहमी प्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर हजर होते. त्या दिवशी मला रात्रपाळी होती. माझ्याबरोबर रात्रपाळीला पोलीस हवालदार पाटणकर, हवालदार सोनार आणि इतर काही पोलीस अंमलदार होते. मी दिवसभर बंदोबस्त करुन पुन्हा रात्रपाळी कर्तव्यावर हजर झालो होतो.

सगळे दहिहंडी उत्सवाच्या व बंदोबस्तामधील गंमती-जमती एक दुसऱ्याला सांगत होते. रात्रपाळी गस्तीच्या अंमलदारांना हद्दीत रवाना केलं. आम्ही सर्व मोकळा वेळ मिळाल्याबरोबर थोडी पोटपुजा करुन पुन्हा कर्तव्यावर रुजू झालो. बाहेर अधुनमधून पाऊस पडत होता. दहिहंडीच्या उत्सवामधून लोक आपापल्या घरी गेलेले असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक चालू होती.

मी ठाणे अंमलदाराच्या खुर्चीत बसून बाहेरचं वातावरण न्याहाळत होतो. मनात विचार आला, थोडा रिकामा वेळ आहे. पेन्डींग केसपेपर हातावेगळे करावेत. म्हणून खुर्चीवरुन उठून अधिकाऱ्यांसाठी असलेल्या केबीनमध्ये जायला निघालो. तेवढ्यात पोलीस स्टेशनच्या समोरुन २/३ इसम व २/ ३ महिला, त्यात एक दोन वयस्कर मंडळी माझ्यासमोर आले.

“साहेब, नमस्कार. ” असं म्हणत त्यातील एका व्यक्तीने दोन्ही हात जोडले.

“नमस्कार मंडळी, या आत बसा. ” मी म्हणालो. ते सर्वजण आतमध्ये आले. त्यांच्या सर्वांच्या अंगावरील कपडे, साड्या भरजरी होत्या. पण त्या अर्धवट भिजलेल्या होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी – भीती अशा संमिश्र छटा दिसत होत्या.

त्यांच्यापैकी मध्यम वयाची व्यक्ती बोलू लागली.

“साहेब, आम्ही नौपाड्यात राहतो. आज आम्ही सर्वजण डोंबिवलीला नातेवाईकांचे घरी पुजेसाठी गेलो होतो. दुपारी बारा वाजता आम्ही घराला कुलूप लावून गेलो. परत आलो. आमच्या दरवाजाचे जे कुलूप आहे, त्याला चावी लागत नाही.” एवढं बोलून ती व्यक्ती थांबली.

“तुम्ही नक्की खात्री केली ना? ” मी विचारलं.

“होय साहेब, कुलूप तेच वाटतयं, पण चावी लागत नाही”. ती व्यक्ती म्हणाली.

“कुलूप तुटलेलं नाही ना? कदाचित कुलूप तुटलेलं असेल, तर चावी लागणार नाही.” मी म्हणालो.

“नाही साहेब, कुलूप तेच आहे.” ती व्यक्ती म्हणाली.

माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. मी पाटणकर हवालदारानां बोलावून घेतलं.

“जी सर.. पाटणकर हवालदार आत येऊन म्हणाले. त्यांनी सर्व हकिकत समजावून घेतली.

“आता पुढं काय करायचं? ” त्यांनी मला विचारलं.

“पाटणकर, कदाचित जागेचा वाद असेल तर समोरच्या पार्टीने कुलूप बदललं असण्याची शक्यता आहे.” मी म्हणालो.

तेवढ्यात त्यातील एक व्यक्ती मला थांबवत म्हणाली. “नाही साहेब, आमचा जागेचा किंवा घराचा कसलाच वाद किंवा भांडण नाही. साहेब, तुम्ही आमच्या सोबत चला. घरात चोरी तर झाली नसेल? ”

‘जर कुलूप बंद आहे, तर चोरी होणार कशी? ” मी प्रतिप्रश्न केला.

आता त्या मंडळीमधील एक आजीबाई माझ्याकडे पहात म्हणाला,

“साहेब, तुम्ही चला ना, आमच्या बरोबर आणि तुम्हीच बघून घ्या, नेमकं काय झालयं ते.

“चोरी करणारे गुन्हेगार चोरी केल्यानंतर घराला कुलूप लावत नाहीत, असा आमचा अनुभव आहे.” मी त्यांना सांगत होतो. पण ती गोष्ट त्यांना पटत नव्हती.

पाटणकर हवालदारांना मी गाडी काढायला सांगितलं. त्या मंडळीकडून त्यांच्या घराचा पत्ता घेवून त्यांना “तुम्ही पुढे चला आम्ही मोटार सायकलवरुन येतो” असं सांगितलं.

मी येतो, म्हटल्यावर सर्व मंडळी उठून बाहेर चालू लागली.

पाटणकर हवालदार आणि मी दोघेजण त्या मंडळींच्या सोसायटीमध्ये पोहोचलो. सोसायटीच्या आवारात मोटार सायकल थांबवून आम्ही त्या मंडळींची वाट पहात होतो. रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. सोसायटीमधील एका घरात लाईट चालू होती. तेथून त्या घरातील कुटूंब आमच्याकडे पहात होतं. “काहीतरी भानगड असावी.” असं आपआपसांत कुजबूजत होते.

तेवढ्यात सोसायटीमध्ये दोन रिक्षा येऊन थांबल्या. त्यातून पोलीस ठाण्यात आलेली मंडळी रिक्षांतून उतरली. त्या सोसायटीमधील दुसऱ्या माळ्यावर त्यांचं घर होतं. सोसायटीमधील जिन्यामध्ये मिणमिणते लाईट (झीरो बल्ब) लावलेले होते. त्या मंद उजेडात पायऱ्याही निट दिसत नव्हत्या. त्या मंडळीच्या बरोबर आम्ही दुसऱ्या माळ्यावर पोहोचलो. एका माळ्यावर चार फ्लॅट, अशी रचना होती. मी आणि पाटणकर हवालदार यांनी कुलूप व कडी-कोयंडा याची तपासणी केली. कुलूप – कडी कोयंडा अगदी व्यवस्थित  दिसत असल्याने, मनाला एक समाधान वाटत होतं, ते म्हणजे, त्या घरात चोरी झाल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं.

मी त्या घरातील एका महिलेला कुलूप उघडायला सांगितलं. ती पन्नास बावन्न वर्षाची होती. तिने साडीच्या ओटीतून (ओटी म्हणजे सौभाग्यवती बाईला खण-नारळ देतात, ते खण-नारळ महिला आपल्या नेसलेल्या साडीच्या ज्या पदरात घेतात, त्याला ओटी म्हणतात.) चावी काढून त्यांनी कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती चावी त्या कुलूपाला काही लागत नव्हती.

मी आणि पाटणकर आश्चर्याने त्या कुलूपाकडे पहात असतांना, पाटणकर हवालदार यांनी त्या महिलेच्या हातातील चावी घेऊन कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु चावी काही लागत नव्हती. कुलूप उघडण्याचा प्रयत्न चालू असतांना घरातील ती सर्व मंडळी आपआपसांत बोलत होती. प्रत्येकजण आप – आपले विचार आणि मत मांडत होते. त्यांच्या आवाजामुळे आजु-बाजुच्या फ्लॅटमधील कुटुंबिय बाहेर येऊन “काय झालं? ” म्हणून विचारत होते.

ह्या सर्व प्रकारात अर्धा तास कसा निघून गेला समजले देखिल नाही. हजर असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतादेता माझी दमछाक झाली होती. प्रत्येकजण वेगवेगळे तर्क लावत होता.

“गुन्हेगारी कशी वाढली? ”

“ते कसे कसे गुन्हे करतात? ”

“आजकाल पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिलेलाच नाही.

“दिवसाढवळ्या दरोडे पडतात. ”

“घरफोड्या होतात.”

“अशात सामान्य माणसांनी जगावं तरी कसं? ‘

वगैरे-वगैरे चर्चा चालू होती. मी आणि पाटणकर बंद कुलूप उघडण्याचा प्रयत्न करीत होतो.

शेवटी न राहवून त्या मंडळींना पाच मिनिटे शांत बसण्याची सूचना करुन, पाटणकर यांच्या हातातील चावी घेऊन मी स्वत: कुलूप उघडण्याचा प्रयत्न करु लागलो. पण, ती चावी कुलूपात व्यवस्थीत बसत नव्हती. त्या फ्लॅटच्या बाहेर जास्त उजेड नव्हता. बारकाईने निरीक्षण केलं, पण अंधारामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. मी एका व्यक्तीला “घरातील लाईटच्या उजेडात चावी पहायची आहे. आत जाउन पाहू का? ” अशी विचारणा केली.

ते गृहस्थ म्हणाले, “या साहेब, आत येउन बघा.

घरात जावून चावी पाहिली आणि हसावं की रडावं, अशी माझी अवस्था झाली. मी माझ्या कपाळावर हात मारुन घेतला. तसं त्या ठिकाणी हजर असलेले सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

जे लोक माझ्याकडे आले होते, त्यापैकी एका गृहस्थाला मी विचारलं.

“ही चावी कोणाकडे ठेवली होती? ”

ते गृहस्थ एका महिलेकडे बोट दाखवित म्हणाले,

‘ह्या काय ह्या आमच्या वहिनींच्याकडं ठेवली होती. ‘

मी त्या वहिनीबाईंना विचारलं,

‘चावी कुठे ठेवली होती.? ”

त्या म्हणाल्या, “कमरेला साडीच्या ओटी मध्ये ठेवली होती. ”

‘त्या ओटीमध्ये आणखी काय-काय ठेवलेलं आहे? ” मी विचारलं.

“अहो साहेब, हे काय, ह्या ओटीमध्ये खण-नारळ आणि तांदूळ आहेत.”

त्या बाईंनी सांगितलं.

पूर्वी काही कुलुपांच्या चावीची नळी आतून पोकळ असायची. त्या चावीच्या आतील पोकळ नळीमध्ये तांदूळ अडकले होते. मी चावी उलटी करुन माझ्या तळहातावर झटकली. त्यातून १०-१२ तांदूळ बाहेर पडले.

चावीची पोकळी आतून तांदूळांनी भरलेली असल्याने ती चावी कुलुपाला लागत नव्हती. मी, चावी पुन्हा त्या कुलुपाला घालून चावी फिरविली आणि एका सेकंदात कुलुप उघडलं. ज्या वेळी कुलूप उघडलं, त्यावेळी सर्वजण त्या वहिनींकडे अशा रितीने पहात होते की विचारु नका. त्यांचीही अवस्था बघण्यासारखी झाली होती.

एक गृहस्थ म्हणाले.

‘वहिनी हा काय वेंधळेपणा, ओटी ही काय चावी ठेवायची जागा आहे? चावी दुसरीकडे कुठेतरी ठेवायची.”

“अहो भाऊजी, मला काय माहित ह्या तांदूळांमुळे एवढी गडबड होईल ते.” ती बाई म्हणाली.

सर्वजण सुटकेचा श्वास सोडून ‘एका मोठ्या संकटातून सुटलो. अशा अविर्भावात घरात शिरले.

“आम्ही आता निघतो.” मी त्या गृहस्थाला म्हणालो.

“साहेब, नाहक त्रास दिला. तुम्हाला….. माफ करा.” ते गृहस्थ हात जोडत म्हणाले.

“नाही हो, आम्हा पोलिसांना या गोष्टींची आता सवय झाली आहे. निघतो आम्ही.” मी म्हणालो.

त्या घरातील स्त्रीने दोन ग्लास पाणी आणले व म्हणाल्या, “साहेब बसा दोन मिनिटे, पाणी तरी घ्या, आता रात्रीचे बारा वाजून गेलेत, थोडा चहा पिऊन जा.”

“नको ताई, धन्यवाद ! तुमचं घर सुखरुप पाहून आम्हाला चहा

प्यायल्याचा आनंद मिळाला आहे. ” मी म्हणालो.

तेवढ्यात एक गृहस्थ पुढे आले. माझे हात हातात घेत, म्हणाले,

“साहेब, खरचं आमच्या थोड्याश्या वेंधळेपणामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, सॉरी साहेब.”

“साहेब, होतं असं कधी कधी, तुम्ही काय मुद्दाम पोलिसांना त्रास दिला नाही. ” मी म्हणालो.

मी आणि पाटणकर परत निघालो. येता येता हद्दीतील नाईट राऊंड असल्याने फेरफटका मारुन पोलीस ठाण्यात परत आलो. परत आलो, त्यावेळी पहाटेचे पाच वाजले होते.

पोलिसांच्या जीवनात असे एक ना अनेक प्रसंग येत असतात. कधी गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना धावपळ करावी लागते. पण कधी कधी गुन्हा घडला नसतांनाही ‘घरदार’ विसरुन धावपळ करावी लागते. आपण सर्वसामान्य लोक जर कान, डोळे उघडे ठेवून समाजात वावरलो, तर असे प्रसंग येणार नाहीत, असं मी म्हणणार नाही. परंतु काही प्रमाणात का होईना अनिष्ठ गोष्टींना प्रतिबंध नक्कीच करु शकतो.

आज ह्या घटनेला वीस वर्षे होउन गेली, परंतु ज्या ठिकाणी घरफोडी, चोरी झाली असेल, त्या ठिकाणी गेल्यावर हमखास मला त्या “चावीची कथा” आठवते आणि मी एकटाच गालातल्या गालात हसत असतो.

व्यंकट पाटील

व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 14 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..