नवीन लेखन...

वाडा

मला वाडा ह्या प्रकारच प्रचंड कुतूहल आहे.  वाडा हा गावं आणि लहान शहर याचा अविभाज्य अंग असतो .वाडे नाहीत असे गावं किवा लहान शहर सापडत नसे वाडा हा नुसता नसून त्याला स्वताची ओळख असते.. परांजप्यांचा वाडा,फडक्यांचा वाडा,शिंद्यांचा वाडा,मालकाच्या नावावरून वाड्याची ओळख असते,. पत्ता सांगायची खुण म्हणून वाड्याचा उपयोग होतो.तो आपल्या मालकाच्या नावाने डौलात उभा असतो..चौसोपी वाडा,चिरेबंदी वाडा.टुमदार घरापुढे तो आडदांड पणे उभा असतो.टुमदार घर वाड्याच्या वळचणीला उभे असल्या सारखे दिसते.अर्थात घरही स्वताचे अस्तित्व राखून असते.

वाड्याचा आकार मालकाच्या ऐपतीवर अवलंबून असतो. मालक जितका तालेवार तितका वाडा मोठा.त्यातलं बारदान तितकं मोठे . वाडे घराण्याची श्रीमंती दाखवतात.काही  वाडे इतिहास कालीन असतात.काही मालकाने नंतर बांधलेले असतात.साधारण पाच फुट उंच जोत,त्यावर ऐसपैस ओसरी,ओसरी शेणानी सारवलेली,हल्ली शेण मिळेनास झाल्यामुळे त्यावर लाद्या बसवलेल्या, वरती शिसवी भाल, त्याला टांगलेला सागवानी झोपाळा,जो झोके घेताना करकर आवाज करतो.छताला टांगलेल झुंबर,दर्शनी भिंतीला कोनाडे, खुंट्या,आतमध्ये मोठ माजघर,त्यातून माडीवर जाण्याचा रस्ता माजघाराभोवती असंख्य खोल्या,एक देवघर,धान्याच कोठार,अडगळीची खोली,सैपाक घर,मागे परस न्हाणीघर.चौसोपी वाड्यात चारी बाजूनी सोपे.प्रत्येक सोप्याच्या बाजूला खोल्या.

शहरातले वाडे निराळे असतात.त्यांना एव्हडा पसारा जागे अभावी शक्य नसतो.तरी ते स्वताचे  अस्तित्व सांभाळून असतात.बाजूला एखादा गुलमोहोर असतो.फाटकाच्या दाराशी एखादी बोगनवेल असते.असे वाडे बाजूबाजूला एका रांगेत हारीने असतात.मालकाचे अस्तित्व सांगत.पोस्ट ऑफिस असो,शाळा असो,शेजारचा वाडा हि खुण असते.मला ह्या वाड्यान बद्दल कायम कुतूहल वाटत आले आहे.कोण राहत असेल? वाड्याची रचना आतमधून कशी असेल?

काळ बदलला.घरटी माणसे वाढली.एकत्र कुटुंब पद्धती परवडेनाशी झाली.भांड्याला भांड वाजू लागलं.शहरातल्या बिल्डरचा डोळा साहजिक जागेवर जातो .त्या जागी बिल्डींग उभी राहिली जाते .मालकालाही मोठी जागा मिळते .भरपूर मोबदला मिळतो .तोही सुखावतो .बिल्डींग उभी राहूनही ती जागा मूळ मालकाच्या नावानेच ओळखली जाऊ लागतो .कारण वर्षानुवर्षे त्या मालकाचा वाडा तिथे असतो .अशातच एखादा  चुकार  वाडा मला  दिसतो.माझी पाऊले थबकतात.मला कौतुक वाटत.ह्या सिमेंटच्या जंगलातही हा वाडा कसा टिकून आहे? मी सुखावतो,कारण वाडा आणि टुमदार घर याच मला प्रचंड अप्रूप आहे.मी थांबून त्या वाड्याकडे बघत राहतो. . मग वाटते  कदाचित भाऊबंदकीत हा वाडा असाच राहिला असेल.कोर्ट कचेऱ्या चालू असतील.मालकाच्या अवाच्या सवा मागण्या असतील. कारणे काहीही असोत.मी मात्र  वाडा बघून थबकतो., मी सुखावतो.

गावातील परिस्थिती  वेगळी असते. शेतीचा पैसा खुळखुळू लागलेला असतो.नव्या पिढीला जुने घर कालबाह्य वाटू लागते.एवढ्या मोठ्या वाड्याची डागडुजी, तेलपाणी करणेही कठीण होत जाते कारण वाडा हा बराचसा लाकडावर उभा असतो.त्यामुळे तो पाडून सिमेंटचे घर बांधणे गरजेचे असते.गावातील काही वाडे मात्र घरातले सगळे लोक शहरात पांगल्यामुळे  ढासळलेल्या अवस्थेत उभे असतात.ते एखाद्या वैराग्यासारखे  दिसतात. गावातल्या प्राण्यांचा वावर सुरु होतो. नको त्या गोष्टींसाठी गावातल्या टग्यांना रान मोकळे होते.खरच तो वाडा आपलं प्राक्तन भोगत उभा असतो.

माझ्या मित्राने एकदा मला घरी बोलावले.त्याचे घर वाडा होते.थोडा वेळ गप्पा झाल्यावर तो म्हणाला “चल मी तुला आमचा वाडा दाखवतो.” त्याने आतून बाहेरून वाडा दाखवला. वाडा खूप मोठा होता.दर्शनी दरवाज्याला मोठे खिळे होते.माजघाराभोवती अनेक खोल्या होत्या.सैपाक घर पेशवे कालीन मुदपाकखान्या सारखे होते. वरती मोठा माळा होता लग्नघरात वऱ्हाडी मंडळीना उतरण्यासाठी असतात तसे.त्यावर एक पोटमाळा होता.तो वाडा मला इतर वाड्यांपेक्षा वेगळा वाटला.असे असले तरी तो वाडा तसा मोडकळीस आला होता.त्याला दुरुस्तीची गरज होती.मी मित्राला म्हटले “तुमचा वाडा इतर वाड्यांपेक्षा वेगळा आहे”

तो म्हणाला “हो” आणि आता तो आम्ही पाडून इमारत बांधणार आहोत.पण तू विचारलेस त्याप्रमाणे हा वाडा इतर वाड्यांपेक्षा वेगळा का आहे ते सांगतो.”हा वाडा चिमाजी अप्पांनी बांधला.  वसईच्या लढाईत पोर्तुगालांना  हरवल्या नंतर वसईचा सारा वसूल करायचा होता.त्यामुळे जो सरदार सारा वसुलीसाठी वसईला येत  असे त्यांच्या उतरायची सोय म्हणून हा वाडा बांधला खोल्यांमध्ये सरदाराची राहायची सोय. वरती त्यांचा नोकरांची रहायची सोय,आणि त्यावरच्या पोटमाळ्यावर गुप्त खलबत करायची जागा.ऐकून मला खूप वाईट वाटले.इतिहासाचा साक्षीदार काळाच्या ओघात नष्ट होणार.असे अनेक वाडे उभे राहतात, आपलं प्राक्तन भोगत अस्तित्व टिकवतात.आणि काळाच्या ओघात नष्ट होतात.

— रवींद्र वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 83 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..