नवीन लेखन...

सर उठाओ तो कोई बात बने

मंडळी सप्रे म नमस्कार !

आज मी तुम्हाला अशा एका कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की ज्याच्या नावापासूनंच नशिबाने त्याची थट्टा मांडली , पण जो पुढे जाऊन एक असा अद्वितीय कलाकार बनला की ज्याच्या नावाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उभा रहाण्याची कल्पनाच करवत नाहि! चला तर मग या हकीकतीकडे…..

पंजाबमधील लुधियानात एक जहागीरदार रहात असे — फज़ल मुहम्मद.याने आयुष्यभर फक्त अय्याशीच केली.याने एकूण १२ जणींशी लग्न केलं आणि यापैकी बेगम सरदार नामक ११ व्या बायकोपासून त्याला एकुलता एक मुलगा झाला.बाकीच्या बायकांपासून एकहि संतान नव्हती! शेजारी एक सुप्रसिद्ध राजकारणी गृृहस्थ रहात असे — ज्याच्याशी त्याने उगीचंच उभा दावा मांडला होता.पण त्या गृहस्थाचं वर्चस्वंच इतकं होतं की याचा नाइलाज होता! आणि त्याच्यावर सूड उगवण्याची संधी याला मिळाली ती बेगम सरदार ८ मार्च १९२१ ला प्रसूत होऊन मुलगा झाल्यावर! याच्या शैतान डोक्यातून एक शक्कल आली व मुलाला त्याने शेजार्‍याचंच नांव ठेवलं व मुलगा ४ वर्षांचा होईतो हा मुलाला मोठमोठ्याने नांव घेऊन शिव्या देई ! शेजारी वैतागून जाब विचारी , की हा लगेच म्हणे मी आपणांस नाहि , माझ्या मुलाला — अब्दुल हयीला शिव्या देत आहे!

स्त्रीला भोगदासी समजणार्‍याा फज़लने आणखी मुलांसाठी बेगम सरदारचा छळ मांडला.तो जेंव्हा असह्य झाला तेंव्हा बेगम सरदारने घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.न्यायाधीशांनी जेंव्हा ४ वर्षांच्याअब्दुल हयीला विचारलं की तू कुणाबरोबर राहू इच्छितोस? तेंव्हा अब्दुल हयीने शांतपणे आईकडे बोट दाखवलं व तो आईसोबत मामाकडे राहू लागला.लहानपणापासून स्त्री जातीवर झालेला अन्याय पाहिलेल्या अब्दुलच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झाली.

आजूबाजूला शीख व हिंदू रहात असल्याने शाळेतले तमाम मित्रमंडळी शीख व हिंदूच होते.लहानपणापासून कवी मनाच्या अब्दुलला दसर्‍याला मेळ्यातील नाटकं व शेरोशायरीत खूप रस वाटे.त्याकाळचे सुप्रसिद्ध शायर रहमत यांची सगळी शायरी त्याला मुखोद्गत होती! शाळेतील शिक्षक फैय्याज़ हिरयानवी यांनी अब्दुलला प्रोत्साहन दिलं व तो मोठेपणी शायरी करू लागला.उर्दू व साहित्याची ओळख करून देणारे फैय्याज़ हे अब्दुलचे आद्य गुरू होत ! एकदम फोटोजेनीक मेमरी असलेला अब्दुल , एकदा वाचलेलं सहज लक्षात ठेवी.१९३७ साली मॅट्रिकच्या परिक्षेची तयारी करता करता इकबाल यांनी लिहिलेली एक नज़्ज़्म जी १९ व्या शतकातील शायर दाग देहलवी यांच्या प्रशंसनार्थ लिहिली होती , ती त्याला विशेष आवडली — जी अशी होती :

चल बसा दाग, अहा! मय्यत उसकी जेब-ए-दोष है

आखिरी शायर जहानाबाद का खामोश है

इस चमन में होंगे पैदा बुलबुल-ए-शीरीज भी

सैकडों साहिर भी होगें, सहीने इजाज भी

हुबहु खींचेगा लेकिन इश्क की तस्वीर कौन

यातला साहिर ( म्हणजे जादुगार ) हा शब्द त्याला इतका आवडला की त्याने आपलं नांव अब्दुल हयीच्या एवजी साहिर ठेवलं व पुढे आपल्या जन्मगावाचं नांव लावलं लुधियानवी ! मंडळी हाच तो अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी ज्याने पुढे अगणित उत्कृृष्ट गीते लिहिली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीतकारांपेक्षा १ ₹ जास्त मानधन घेणारा एकमेव गीतकार ठरला!

साहिरच्या शायरीमुळे तो हळूहळू प्रसिद्ध होत होता.परंतू १९३९ ला शासकीय काॅलेजमधे असताना त्याचं अमृता प्रीतम ( लेखिका ) शी सूत जमलं.पण दोन भिन्न धर्मियांचं मिलन कसं व्हावं? अमृताच्या वडिलांच्या सांगण्यावरून साहिरला काॅलेजमधून काढून टाकण्यात आलं !  पण १९४३ ला साहिर लाहोरला आला व त्याने तिथे आपला तल्ख़ियाँ ( म्हणजे जळजळ , काहिली ) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आणि साहिरला वारेमाप प्रसिद्धी मिळाली! पण शायरीने पोट भरत नाहि ना महाराजा? याच दरम्यान त्याला अदब—ए—लतीफ या मासिकाच्या संपादकाची महिना ४० ₹ ची नोकरी मिळाली.१९४५ ला आजादी की राह पर सिनेमात गाणी लिहिण्याचं काम मिळालं.साहिर त्याचा मित्र हमीद अख्तर बरोबर मुंबईला आला.मुंबईत साहिरचा परिचय मजरूह सुलतानपुरी , कैफी आज़मी , मजाज लखनवी या थोर शायर मंडळींशी झाला.मजाजशी खूप गहरी दोस्ती झाली.वर्सोव्याला एका आऊटहाऊसमधे दोघे राहू लागले.आणि याच दरम्यान पंजाबमधील हिंसाचाराची बातमी आली.अर्धा जीव आईमधे अडकलेला साहिर लुधियानाला परतला.फाळणी झाली , देश स्वतंत्र झाला.साहिर आईबरोबर पाकिस्तानला गेला.पण तिथेहि क्रौर्य पाहताच साहिरची लेखणी सवेरा नामक नियतकालिकेतून अंगार बरसू लागली :

ये जलते हुए घर किसके हैं , ये कटे हुए तन किसके हैं

तकरीम के अंधे तुफा में , लुटते हुए गुलाब किसके हैं

ऐ सहबर मुल्क ओ कौम बता, ये किसका लहु है और कौन मरा , ये किसका लहू है कौन मरा , जरा हमको भी बता , हमभी सुनें!

पाकिस्तान सरकारला हे कसं सहन व्हावं ? त्यांनी साहिरला जेरबंद करण्याचा फतवा काढला.याची कुणकुण लागताच साहिर आईसह परत हिंदुस्थानात पळून आला ! ( एवढं एकंच काम पाकिस्तानने चांगलं केलं ज्यामुळे साहिर सारखे शायर भारताला मिळाले ! )

मंडळी १९५२ ला एक सिनेमा आला नौजवान व याची गीतं चालीवर लिहिण्याचं काम मजाज लखनवीकडे देण्यात आलं.पण हाडाचा शायर असलेल्या मजाजच्या मिज़ाज़ ला ते झेपेना ! त्याने चित्रपटसृृृष्टीचा निरोप घेतला पण हे काम साहिरच्या झोळीत टाकून ! दादा ऊर्फ सचिन देव बर्मनसाठी साहिरने सुंदर गाणी लिहिली व साहिर—दादा व लताने एक गाणं अमर केलं ठंडी हवाएँ , लहराके आएँ , रुत है जवाँ , तुमको यहाँ कैसे बुलाएँ?

नौजवान ने साहिरसाठी पायघड्या घातल्या…..पाठोपाठ सजा , जाल , बाजी , सी.आय्.डी. अशी अनेक शिखरं साहिरने पादाक्रांत केली.

अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्तच्या बाजी या प्रथमच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले… या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेते देव आनंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.

पश्चिम बंगालमधील ‘बाऊल’ परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणार्‍या आन मिलो आन मिलो शाम सवेरे… हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर शिक्कामोर्तब करणारे ठरले.

प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे. ठंडी हवाएँ लहराके आयें… नंतर देव आनंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या चुप है धरती चुप है चाँद सितारे… या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.आणि हेमंतकुमारने तर या गाण्याचं सोनं केलं सोनं!

गुरुदत्तचा प्यासा हा चित्रपट साहिर-एस.डी. बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील कळस होता! साहिरचं तल्ख़ियाँ वाचून प्रभावित झालेल्या गुरुदत्तला प्यासा ची एका कवीच्या जीवनाची शोकांतिका हि One Liner Story सुचली व या सिनेमात त्याने याच काव्यसंग्रहातली अनेक कविता वापरल्या!  एका प्यासा चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची. मात्र, प्यासा चे यश हे फक्त त्यातील गीतरचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एस.डी. बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण प्यासा तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. त्यातील साहिर यांनी लिहिलेली सर्वच गीते अक्षरश: महान च पण त्यातहि ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है… ला तोड नाही ! १९५७ ला प्यासा मिनर्व्हा ला प्रदर्शित झाला.पडद्यावर गुरूदत्त जेंव्हा यहाँ पीर भी आ चुके है , जवान भी आया गाऊ लागे तेंव्हा थिएटरमधे तमाम प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवंत ! ( जसे मराठीतले वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या गीत रामायण साठी लोक आजहि टाळ्या देतात ! ) मंडळी , नाटकाप्रमाणे एखाद्या कलाकाराऐवजी गीतरचनेसाठी सिनेमा थिएटरमधे टाळ्या घेणारा फक्त साहिर च असू शकतो !

सचिन देव ऊर्फ एस.डी.बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने नया दौर , तुमसा नही देखा असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार… या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकलं!

संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. मात्र, कभी कभी चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले मै पल दो पल का शायर… हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले.

हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये हम दोनो ची ही गीते येतात. – अल्लाह तेरो नाम… कभी खुद पे कभी हालात पे… तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया… अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, अभी ना जाओ छोड कर… यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.

साहिर यांचे चित्रलेखा चित्रपटातील गीत : संगीतकार रोशन यांनी ‘यमन’ रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका उंचीवर नेलेले – मन रे तू काहे ना धीर धरे… खूप गाजले.

आर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. आ गले लग जा मधील त्यांच्या तेरा मुझसे है पहले का नाता कोई… तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. मात्र, जोशिला मधील किसका रस्ता देखें ऐ दिल ऐ सौदाई… हे तात्त्विक शब्द वेड लावून जातात.

मंडळी , साहिरची लेखणी म्हणजे जणू दुधारी तलवारंच ! एकेक शब्द घायाळ करणारा….आता मी तुम्हाला जरा सैर करून आणतो साहिरच्या शब्दनगरीत…..

चित्रपट देवदास : मैं वो फूल हूँ की गया हर कोई मसल के , मेरी उम्र बह गई है मेरे आसुओंमें ढलके

चित्रपट फिर सुबह होगी :
रहने को घर नहिं है , सारा जहाँ हमारा ,
तालीम अधूरी मिलती नहिं मजूरी , फुटपाथ बंबईके हैं कारवाँ हमारा ,
चीन—ओ—अरब हमारा ! हिंदौस्ताँ हमारा!

चित्रपट साधना :
औरतने जनम् दिया मर्दोंको , मर्दोंनेंसे बाजार दिया ,
जब जी चाहा मसला कुचला , जब जी चाहा दुत्कार दिया

चित्रपट त्रिशूल :
तू मेरे साथ रहगा मुन्ने , ताकी तू जान सके , तुझको परवान चढानेके लिए कितने संगीन मराहिल से तेरी माँ गुजरी

चित्रपट इन्साफ का तराझू : संगीतकार रवींद्र जैन , त्यांची अट असायची की गीतकार पण मीच असणार!पण बी.आर.चोप्रांनी हा त्यांचा हट्ट न पुरवता साहिरला कथा ऐकवली.ती स्त्रीजातीवरील अन्यायाला वाचा फोडणारी कथा ऐकून साहिर इतका भारावला की माझ्या मनाप्रमाणे जर एखादं गाणं निर्माण झालं तरंच मी ते तुम्हाला देईन पण माझ्या  मनाप्रमाणे मला ते लिहिणं नाहिच जमलं  तर एक ओळहि मी देऊ शकणार नाहि! असं सांगून साहिर निघून गेला.पण दुसर्‍याच दिवशी साहिरचे बोल बी.आर.चं काळीज चिरत गेले : लोग औरतको फक्त जिस्म समझ लेतें हैं , रूह भी होती है उसमें ये कहाँ सोचते हैं? कुठेतरी साहिरने आपल्या ऐय्याश बापावर कोरडे ओढलेच….

चित्रपट प्यासा : गुरुदत्त व कॅमेरामन व्हि.के.मूर्ती पार वेश्यावस्तीत ५—६ दिवस फिरून आलेले.दिलीपकुमारने नायकाच्या रोलला नाहि म्हणत म्हणत गुरुदत्तलाच इतनी डिटेल्ड स्टडीके बाद मुझसेभी ज्यादा तूही ये किर्दार अच्छि तरह निभाएगा ! व्हाय डोण्ट यू डू इट? म्हणंत बोहल्यावर उभा केला.मुहुर्ताच्या शाॅटला साहिरने एन्ट्री घेत गुरुदत्तला ओळी ऐकवल्या : ये पुरपेच गलियाँ ये बदनाम बाज़ार , ये गुमनाम राही ये सिक्कोंकी झनकार , ये इस्मत के सौदे ये सौदोंपे तकरार , जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?

ये फूलोंके गज़रे , ये पीकों के छींटे , ये बेबाक नजरें ये गुस्ताख़ फिकरे , ये ढलके बदन और ये बीमीर चेहरे , जिन्हें नाज़ है हिंदपर वो कहाँ है?

ज्या सिच्युएशनसाठी , शाॅटस् व शूटिंग योजना ठरवण्यासाठी ५-६ दिवस रेडलाईट एरियात गुरुदत्त व मूर्ती वणवण भटकले होते व झिजत होते , त्याचं मर्म कुठेहि न जाता साहिरने आठ ओळीत उभं केलं होतं ! मला सांगा , साहिर का नाहि हो म्हणणार की प्यासा साहिरमुळे चालला ? साहिर बेफिकिरीत जगला! करिअरच्या अगदी सुरुवातीला लता मंगेशकरशी भांडला! परिणामी हाती असलेल्या ११ पैकी ९ चित्रपट हातातून गेले! पण त्याने कुणाची तमा—फिकीर बाळगली नाहि!त्याच बेफिकिरीचं गाणंहि बनवलं….

चित्रपट : हम दोनो :
जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया , जो खो गया मैं उसको भुलाता चला गया ! ; मैं ज़िंदगीका साथ निभाता चला गया , हर फिक्रको धुएँमें उडाता चला गया!

मंडळी सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे ! म्हणून इथेच थांबतो….१९७६ ला साहिरने त्याचा श्वास गमावला…बेगम सरदार — त्याची अम्मी जग सोडून गेली.आधी अमृृृता प्रीतम , मग सुधा मल्होत्रा…२ निष्फळ प्रेम प्रकरणानंतर साहिरची जीवनासक्ती आटत गेली…..२५ आॅक्टोबर १९८० रोजी ह्रृृृदयविकाराच्या धक्क्याने हा आभाळाएवढा गुणी शायर इहलोक सोडून गेला…..त्याच्याच शब्दांत सांगायचं तर :

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे , जनम मरनका मेल है सपना ये सपना बिसरा दे , कोई ना संग मरे! हाय् मन रे तू काहे ना धीर धरे!

मंडळी , आपल्याच रुतब्यात साहिर जगला ! त्याचा स्वत:च्या या शब्दांवर प्रचंड विश्वास होता व हेच आपल्या जीवनाचं सूत्र बनवत साहिर जगला :
पोंछकर अश्क अपनी आँखोंसे , मुस्कुराओ तो कोई बात बने
सर झुकानेसे कुछ नहिं होता, सर उठाओ तो कोई बात बने!
पहिल्या २ ओळीत जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन शिकवणार्‍या तर दुसर्‍या दोन ओळी बेदरकार व ताठ बाणा शिकवणार्‍या !

बा साहिर , तुझ्या प्रतिभेला सलाम करत एवढंच म्हणावसं वाटतं :
यूँ तो शायर औरभी होंगे तुझसा भी कोई साहिर होगा
पलमें आशिक़ी पलमें रुतबा ऐसा न कोई माहिर होगा!

कळावे,
आपला विनम्र ,
– उदय गंगाधर सप्रे म—ठाणे

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..