नवीन लेखन...

नक्षत्रांची वेल

(आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली , कोरोना काळातील माझी एक कथा.)

– नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली .
बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ?
तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल .
आपण उगीच बोललो त्याला .
तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती .
अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण .
असला कसला आपला संताप ?
समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ?
छे !
चुकलंच आपलं .
नंदिनी अस्वस्थ झाली .

हल्ली हे असं का होतंय आपलं ?
सतत राग .
सतत संताप . अंगाची लाही लाही .
चिडचीड . अस्वस्थता . वेळीअवेळी होणारा उद्रेक . वेळीअवेळी डोळ्यातून वाहणारं पाणी . मन स्थिर ठेवण्यासाठी करावा लागणारा मानसिक आटापिटा . समोरच्याला आश्वासक वाटावं म्हणून मनाविरुद्ध केलेली केविलवाणी धडपड .
औषधं , इंजेक्शनच्या सिरिंज , कॉटन आणि कसल्याकसल्या मेडिकल इक्विपमेंट्सनी भरलेला ट्रे हाती घेतला की आठवणारी रुग्णसेवेची घेतलेली शपथ !
बस ! त्याक्षणी आपण केवळ सिस्टर असतो सगळ्यांची . कधी कुणाची ताई तर कधी कुणाची आई . कधी मावशी तर कधी बेटी .
या नात्यात बधिर होऊन गेलेल्या आपल्या मनाला जाणवत नाही , की भाऊ म्हणून आपल्याला कुणी नाही . भाऊ म्हणून धीर देणारं , आपुलकीचं बेट नाही .

चीन मधून आलेल्या कोरोनानं सगळी नाती विस्कटून टाकली . उद्ध्वस्त करून टाकली . एकमेकांपासून हिरावून घेतली . नातीच संपवली त्या कोरोनानं .

सुरुवातीच्या संभ्रमावस्थेत सगळेच गोंधळून गेले होते .
काय करायचं हेच नक्की ठरत नव्हतं .
औषधं नव्हती आणि दूरपर्यंत कुठे दिलासा दिसत नव्हता .
मग हळुहळू मार्ग दिसू लागला .
मास्क , सोशल डिस्टन्स आणि अपरिहार्य झालेलं सॅनिटायझेशन .

लोकांनी स्वीकारलं सगळं .
दुरावा स्वीकारला . बिघडलेली आर्थिक गणितं स्वीकारली . सरकारची मदत स्वीकारली . माणुसकीचे पूल उभारले .
कोरोना योद्धे म्हणून संबंधितांना सन्मान दिला .
पण…

कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचं तांडव सुरू झालं .स्मशानं अपुरी पडू लागली . ऍम्ब्युलन्स मिळेनाशा झाल्या . जिवंतपणी नेहमी वाट्याला येणारी लांबचलांब रांग , मृत्यूनंतरही सुटली नाही . समाजमन अधू होऊ लागलं . पॅनिक होऊ लागलं . धीर सुटला . जिवंत राहण्यासाठी जिवाच्या आकांतानं ऊर फुटेस्तोवर धडपडू लागला .
पहिल्या वर्षातला संयम सुटू लागला . प्रशासन आक्रमक झालं . त्यामुळं समाजमन आणि समाजजीवन अधिकच अधू आणि अगतिक बनू लागलं . पोलिसांची मारहाण , औषधांचा तुटवडा , त्यातून निर्माण होऊ लागलेला काळाबाजार , कोरोनाशी संबंधित प्रत्येक घटकाने सुरू केलेला पाशवी भ्रष्टाचार , ऑक्सिजनची कृत्रिम कमतरता , बेड्सची कृत्रिम कमतरता, त्यातून नव्याने सुरू झालेला भयावह , जीवघेणा असा , आयुष्याची सगळी पुंजी संपवून टाकणारा खेळ !

माणुसकी संपवली होती काही विकृत धुरीणांनी !
आणि त्याचा जास्त फटका आपल्याला बसला .

दिवसाचे चौविस तास अपुरे वाटू लागले .
पीपीई किट घालून जीव गुदमरू लागला होता .
नातेवाईकांना भेटणं दूर , त्यांना फोनसुद्धा करणं मुश्किल झालं होतं .
मनभावना आवरून कर्तव्य बजावावं लागत होतं .
जीव धोक्यात घालून काम करावं लागतं होतं .
टेस्टिंग , रिपोर्टिंग , औषधं , इंजेक्शन्स , ऑक्सिजन , बेड …
याशिवाय दुसरा शब्द ऐकू येत नव्हता .
दुसरा विचार मनाला शिवत नव्हता .
तासनतास , दिवसेंदिवस , महिनोंमहिने…
अत्यवस्थ रुग्ण . ऑक्सिजनची कमतरता आणि डोळ्यासमोर तडफडत प्राण सोडणारे विकलांग रुग्ण .
लहान मुलं . तरुण मुलं . धडधाकट वृद्ध आणि सत्तरी पार केलेले वृद्ध .
लिंगभेद , धर्मभेद , जातीभेद पार करून कोरोना खदाखदा हसत होता .

आणि हसत होते टाळूवरचे लोणी खायला हपापलेले कावळे .

मेलेल्या रुग्णाचं बिल वसूल करण्यासाठी धावणारे मेलेल्या मनांचे मुर्दाड लोक .

संयम सुटलेले हताश नातेवाईक धावायचे . वेड्यागत पळत राहायचे . केविलवाणे होऊन मृत देहाची भीक मागायचे .
याचा मृतदेह त्याला . त्याचा मृतदेह याला .
कुणाला काही कळत नव्हतं .
सगळीकडे प्रेतंच प्रेतं .
कॉटवर . पायऱ्यांवर. टॉयलेटमध्ये .
बेवारस मरण पाहणारे नातेवाईक .
आणि त्यांच्या क्षोभाला सामोरं जाण्याची सक्ती झालेले आपण .

नंदिनी अस्वस्थ होत होती .

पाच वर्षाच्या लहानग्या हरिप्रियाला तिला भेटायला जाता येत नव्हतं .
तिच्या वाढदिवशी सुद्धा तिला जाता आलं नव्हतं .सोसायटी आणि नंदिनीच्या नवऱ्यानं खूप सावरून घेतलं होतं .

आणि हरिप्रिया …
इतक्या लहान वयातली तिची समज…
आई भेटत नाही म्हणून अनावर झालेले हुंदके आवरून , आपल्याला बरं वाटावं म्हणून हसण्याचा तिचा प्रयत्न…
बाबांना , आजीआजोबांना त्रास होऊ नये म्हणून , चिमुकल्या हातांनी स्वतःची कामं , स्वतः करण्याचा प्रयत्न…
हट्ट न करता , सगळ्यांशी हसतखेळत राहायला हवं याची आलेली उमज …
एक ना दोन .

नंदिनीला आतून भरून आलं .
किती गोड आहे छकुली .
पण तिला जवळ घ्यायला सुद्धा …

तिला आठवलं .
अगदी सुरुवातीला चार दिवसांनी घरी आल्यावर हरिप्रियाला जवळ घेण्यासाठी तिनं हात पसरले , पण गोड हसून ती आजीला बिलगली . म्हणाली ,
” माझ्या आईला मी अजून खूssssssप वर्षं हवी आहे , हो की नाही आजी ? ”
नंदिनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं .
” शहाणी माणसं , रडत नाहीत कधी .”
तिनं गाल फुगवून सांगितलं .
आणि स्वतःच खुदकन हसली .
रडणाऱ्या नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू फुटलं .
” सगळी माणसं बरी झाली , की मी खूप खाऊ आणि खेळणी घेणारेय तुझ्याकडून .”
हरिप्रिया म्हणाली आणि नंदिनीला आतून खूप भरून आलं . आभाळ गच्च दाटून यावं , तसं . आवंढे गिळून ती मनाला समजावत राहिली . एकदा नवऱ्याकडे , मग सासुसासऱ्यांकडे बघत राहिली .
” आम्ही नाही काही शिकवलं तिला .”
तिघंही एका सुरात म्हणाली .
” मला शिकवायला कशाला हवं . मी आता मोठ्ठी झालीय . आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलंय , लवकर मोठं व्हायचं आणि कोरोनाला नाहीसं करायचं . त्यासाठी आम्ही सगळ्याजणी डॉक्टर होणारोत म्हटलं .”
हरिप्रियांनं कमरेवर हात ठेवून , पाय आपटत ठसक्यात सांगितलं .
सगळे हसू लागले .

इतकी समज कशी हिला ?
तिला प्रश्न पडला .
सोसायटीतले लोक बोलत असतात ते ऐकून की , परिस्थितीनं शहाणं केलं हिला ?

– विचार करता करता जिने उतरून ती खाली केव्हा आली ,ते तिलाच कळलं नाही . लिफ्ट आहे हे जणू ती विसरूनच गेली होती .

सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बागेच्या कठड्यावर ती बसली .
आपण दमलो आहोत आणि तहान लागली आहे याची तिला जाणीव झाली . ती इकडेतिकडे बघू लागली .
गेटमननं तिला पाहिलं आणि पाण्याची बाटली घेऊन तो आला .
तिनं पाण्याची बाटली घेतली आणि सगळी रिकामी करून त्याच्याकडे दिली .
” कुछ तकलीफ है मॅडम ? ”
ती हसली .
” नाही , कसलीही तकलीफ नाही . थोडावेळ बसते इथे .”
“जी.”
तो दूर गेला .

आणि मोबाईल वाजू लागला .
तिनं स्क्रीन पाहिला .
दादाजींचा कॉल होता .
कॉल घेतला तर इथूनच हॉस्पिटलला जावं लागेल आणि नाही घेतला तर ते आपल्या मनाला पटणार नाही .
काय करावं या विचारात ती मोबाईलकडे बघत बसली .

दादाजी हॉस्पिटल मधले सगळ्यात ज्येष्ठ डॉक्टर होते . वयोवृद्ध होते पण रुग्णांसाठी देवदूत होते . प्रत्येक ठिकाणी त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता .
तिच्यासाठी ते फ्रेंड , फिलॉसॉफर आणि गॉडफादर होते .

नर्स म्हणून जॉईन झाल्यावर पहिल्याच पेशंटला इंजेक्शन देताना तिचा हात किंचित थरथरला .
खरंतर ट्रेनिंग पिरिअड मध्ये अनेक वेळेला इंजेक्शन देण्याची प्रॅक्टिस झाली होती . पण का कुणास ठाऊक , आत्ता तिचं मन कावरंबावरं झालं आणि हात थरथरला .
” परमेश्वराची सेवा करताना मनात संभ्रम निर्माण झाला तर , आपल्याला स्वतःबद्दल आणि परमेश्वराबद्दल विश्वास कसा निर्माण होणार ? ”
पाठून धीरगंभीर आवाज आला .
तिनं पाठी वळून पाहिलं.
डॉक्टर दादाजी उभे होते . चेहऱ्यावर हसू होतं . नजरेत आश्वासक भाव होता . आणि शब्दात आपुलकी दाटली होती .
तिला तिच्या आजोबांची आठवण झाली .
ती हसली .
आणि थरथरणाऱ्या हातांना बळ मिळालं .
इंजेक्शन देऊन झाल्यावर तिनं पुन्हा पाठी पाहिलं . पाठमोरे जाणारे दादाजी तिला दिसले . तिनं ट्रे बेडवर ठेवला आणि हात जोडले .
तिला वाटलं , दादाजी प्रेरणा द्यायलाच जणू आले …
त्यानंतर दादाजींचे शब्द तिला वेळीअवेळी सावरत गेले . तिच्या मनाला खंबीर करीत गेले .
समाजातली , हॉस्पिटलमधली कुठलीही समस्या सांगायला गेल्यावर त्यांचं त्यावरचं उत्तर आणि भाष्य ऐकण्यासारखं असे .
हॉस्पिटलमधल्या सर्वांनाच दादाजी , आधारवड वाटत होते .

तिला आठवलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कहर झाला होता .
पहिली लाट ओसरत आहे असं वाटत असताना अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली . हॉस्पिटलमधली जागा कमी पडू लागली .
पुन्हा एकदा मृत्यू वाढायला लागले . सगळीकडे हाहाकार माजला होता . न्यूज चॅनल , प्रिंटिंग मीडिया वरच्या बातम्यांनी समाजमन धास्तावून गेलं होतं .

अशाच एका कातर संध्याकाळी दादाजींनी दहा मिनिटांची मिटिंग बोलावली .
रुग्णांची व्यवस्था करून डॉक्टर्स , नर्सेस हॉलमध्ये एकत्र आले .
दादाजींनी आश्वासक नजरेनं सगळ्यांकडे पाहिलं .

” मला माहित्येय , आपल्या सगळ्यांचा एकेक सेकंद महत्वाचा आहे . कोरोनाचा पुन्हा उद्रेक झालाय . त्यामुळं आता समाजात उद्रेक होईल . आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी झळ आपल्याला लागेल . अशावेळी कुणीही पॅनिक होऊ नका . शांत , थंड डोक्यानं आणि नम्रतेनं पेशंट्सची काळजी घ्या . रुग्ण , त्यांचे नातेवाईक , वार्ताहर , नेतेमंडळी कुणीही काहीही बोललं तर उलट उत्तर देऊ नका . त्यांच्यापैकी अनेकांना हे माहीत नाही की दुसऱ्या लाटेचा उद्रेक , समाजाच्या बेफिकीरीनं झालाय . मास्क नाही , सोशल डिस्टन्सिंग नाही , स्वच्छता नाही यातून हे सगळं वाढलंय . पण आत्ता कुणीही हे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतील . तेव्हा आपणच त्यांना समजून घेऊ . लस उपलब्ध होणार आहेत त्याची माहिती देऊ . हॉस्पिटल प्रशासन तुमच्या पाठीशी असेल . वैयक्तीक मी सुद्धा तुमच्याबरोबर असेन . तुम्हाला पीपीई किट्स मिळतील, पण मनाला संयमाचं आवरण घालून कार्यरत राहा . ”

दादाजींनी बोलणं थांबवलं आणि सर्वांना जायला सांगितलं .
त्यांचे शब्द साधेच होते पण आत खोलवर पोहोचले होते .
आत्मविश्वासाचा , निग्रहाचा आणि सेवेचा मंत्र प्रत्येकाच्या रक्तात भिनल्यासारखं वाटत होतं .
भारावल्यागत सगळे निघाले .

– मोबाईल पुन्हा पुन्हा वाजत होता .
नंदिनी भानावर आली .
आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . तिनं फोन कट केला

दादाजी पुन्हा पुन्हा फोन करत आहेत , म्हणजे काहीतरी घडलंय .
काहीतरी म्हणजे …?
तिचा हात छातीवर गेला .
दादाजी पॉझिटिव्ह तर नसतील ना ?

तिला हुंदका फुटला .

दोनच दिवसांपूर्वी हॉस्पिटलवर आक्रमकपणे चालून आलेल्या मोर्चाची तिला आठवण झाली .
डॉक्टरांची , नर्सेसची , प्रशासनाची कुठलीही चूक नसताना , केवळ कुठल्यातरी समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या फेक व्हिडिओतील बातमीचा आधार घेऊन मोर्चा आला होता . दगडफेक झाली होती . काही डॉक्टरांना मारहाण झाली होती . आणि हे कळल्यावर दादाजींचा संयम सुटला होता . पोलिसांची , कोरोनाची पर्वा न करता ते मोर्चात घुसले होते आणि दगडफेक करणाऱ्यांना थांबवू लागले होते . त्या झटापटीत त्यांनासुद्धा जखमा झाल्या . पोलिसांनी सगळ्यांना अटक केल्यावर , दादाजी आत आले …

– त्यावेळी गर्दीत कुणी पॉझिटिव्ह असला तर दादाजींनासुद्धा धोका संभवतो हे , तिच्या लक्षात आलं .

मग त्यासंदर्भात तर फोन नसावा ना ?

तिनं मोबाईलकडे पाहिलं .
आणि कॉलबॅक केला .
पण आता तो व्यस्त होता .

ती धावतच लिफ्टकडे वळली .
घरी सांगून पुन्हा हॉस्पिटलला जायचं हे तिनं मनाशी पक्कं केलं .
लिफ्ट थांबताक्षणी ती बाहेर पडली धावतच दाराकडे गेली .
बेल वाजवली .
आणि दार उघडताच आतलं दृश्य बघून दारातच मटकन खाली बसली .
आणि रडू लागली .

नंदिनी रडू लागताच आतले सगळे हसायला लागले .

तिनं समोर पाहिलं .
घरातली सगळी तिच्याकडेच पहात होती . सोफ्यावर दादाजी बसले होते .
त्यांच्या मांडीवर हरिप्रिया बसली होती . आणि एका सोफ्यावर रिक्षावाला बसला होता .
” दादाजी तुम्ही ? ”
” आश्चर्य वाटलं ना ? आम्ही मघाशीच आलो . तुझं लक्ष नव्हतं . मी गाडीतून उतरलो तेव्हा हा रिक्षावाला दिसला . त्यानं मला ओळखलं , पण माझ्या लक्षात येईना . मग त्यानं सगळे संदर्भ दिले . त्याच्या म्हाताऱ्या आईसाठी तू बेडची आणि ऑक्सिजनची व्यवस्था कशी केलीस , किती धावपळ केलीस आणि त्याच्या आईचा जीव वाचवलास ते त्यानं सांगितलं . आणि आज तुला घरी सोडायला तो आला तेव्हा त्याला तू ओळखलं नाहीस . तो तुझ्याकडून भाड्याचे पैसे का घेत नव्हता हे तू ऐकूनही घेत नव्हतीस . तुझा काहीतरी गैरसमज झाला म्हणून त्याला वाईट वाटलं . हे सगळं त्यानं मला सांगितलं . मग त्यालाही म्हटलं , चल माझ्याबरोबर . बहीण भावाची नवीन ओळख करून देऊ या . आणि हो मला या चिमुरडीसाठी यायचंच होतं . दिवसातून दोन तीन वेळेला फोन करून तुझी चौकशी करत असायची रोज . सांगायची , आईची काळजी घ्यायला हवी . बाबांची काळजी मी घेईन . ती मला चक्क आजोबा म्हणते . मग आज ठरवलं , तुमच्याकडे यायचं .”
” पण आजोबा मी तुम्हाला आणि या नवीन मामाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही .”
” पण जेवण करणार कोण ? ”
” आई ”
तिनं पटकन सांगून टाकलं .
सगळे हसू लागले

दादाजींनी सगळ्यांच्या नकळत डोळे टिपले .
” हे बघ नंदिनी , मी तुम्हा सगळ्या नर्सेसना नक्षत्रांच्या वेली म्हणतो . का महित्येय ? रुग्णांच्या रुपात येणारी माणसं , तुमच्या आधारानं नक्षत्रांसारखी चांगली होऊन जातात . हे सतत सुरू असतं . वेल वाढत असते . जगत असते . वाढताना , जगताना आधार देत असते आणि आधार घेत असते . नक्षत्रांना बळ देत असते . वेल कधीच कुठली अपेक्षा ठेवीत नाही , पण फुलणाऱ्या नक्षत्रांचा आधार काढूनही घेत नाही . स्वतःच्या क्षमतेनुसार वेल बहरत असते आणि तिच्या सान्निध्यात येणाऱ्यांचं जीवन सुखकर बनवीत असते . बाकी आम्ही केवळ आधारवड . वेलीला जीवनरस पुरवणं इतकंच आमचं काम . या कोविड काळात तू अनेक नक्षत्रांची वेल झालीस , त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मी आलो . सगळ्यांकडे असाच जाणार आहे . ”

दादाजी बोलताना थांबले .
कारण रिक्षावाला काहीतरी शोधत असलेला त्यांना दिसला .
” काय रे , काय झालं ?”
” काही नाही , मी माझ्या ताईसाठी आणि या भाचीसाठी काहीच आणलं नाही .”
त्यानं खिशातून सगळ्या नोटा बाहेर काढल्या .
” ही माझी आजची कमाई , ताईसाठी आणि हरिप्रियासाठी . आणि हो उद्यापासून मी ताईला हॉस्पिटल मधून रोज घरी आणून सोडणार .”
त्यानं डोळे पुसले .

पुन्हा एकदा शांतता पसरली .
हरिप्रिया उठली . आत गेली . आणि थोड्या वेळाने ट्रे मधून आईस्क्रीम घेऊन आली .
” हे आत्ता सगळ्यांनी खायचं आणि मामा उद्यापासून मला आठवणीनं खाऊ आणायचा .”
तिनं नेहमीच्या ठसक्यात , कमरेवर हात ठेवून सांगितलं आणि सगळा हॉल हास्यात बुडून गेला .

नंदिनीनं नवऱ्याकडे पाहिलं .
तो भिंतीकडे बघत डोळे पुसत होता .
ती उठली .आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला .
आजोबा खाकरले , तशी ती लाजून आत पळाली .
हॉल पुन्हा एकदा हसण्याने भरून गेला .
( काल्पनिक )

– डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 111 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..