नवीन लेखन...

गुलाबी रिबिन

एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते. मुलांना ते ऐकून भारावून गेल्यासारखे वाटले. शिक्षिका पुढे म्हणाली “मी प्रत्येकाला अजून तीन रिबिनी देणार आहे. तुम्हाला आवडेल त्या माणसाला तुम्ही या रिबिनी देऊ शकता. या रिबिनीमधला संदेश महत्वाचा आहे. त्यामुळे ज्याला तुम्ही ही रिबिन द्याल त्याची निवड डोळसपणे करा.”

मुले रिबिनी घेऊन आपापल्या घरी गेली. एक मुलगा अति श्रीमंत होता. त्याचा त्याच्या आई वडीलांशी काहीच संवाद नव्हता. त्यामुळे तो सतत निराश असायचा. त्या दिवशी नेमके वडील घरात होते. त्या मुलाने घरात शिरल्याबरोबर गुलाबी रिबिनीचा बो वडीलांच्या छातीवर लावला. शिक्षिकेने सांगितलेले वाक्य बोलायला तो विसरला नाही.

वडीलांवर याचा योग्य तो परिणाम झाला. त्यांचे डोळे भरुन आले. आपण आपल्या मुलाकडे लक्ष देत नाही, त्याच्या बरोबर वेळ घालवत नाही आणि तरीही तो आपल्याला म्हणतो की तुमच्या अस्तित्वाने माझ्या आयुष्याला अर्थ लाभला आहे हे ऐकून ते मनातून वरमले. त्यांनी आपल्या …मुलाला छातीशी घट्ट कवटाळले आणि त्यांनी त्याची क्षमाही मागितली. मुलांना जन्म देऊन कोणालाही बाप होता येते. मात्र खऱ्या अर्थाने मुलांचा बाबा होणे महत्वाचे आहे.

दुसरा एक मुलगा पार्टटाईम नोकरी करत होता. त्याचा बॉस फार खडूस होता. त्या मुलाने कितीही परिश्रमाने काम केले तरी त्याचे श्रेय बॉस त्याला देत नव्हता. त्या मुलाने गुलाबी रिबिनीचा बो आपल्या बॉसच्या शर्टाला लावला. लावता लावता तो शिक्षिकेने सांगितलेले वाक्यही बोलला. त्याचा बॉस अचानक भावुक झाला. आपण याच्याशी चांगले न वागताही हा मुलगा. आपल्याला त्याच्या आयुष्यात स्थान देतो, आपल्या अस्तित्वाला महत्व देतो ही बाब त्याला स्पर्श करुन गेली. काही क्षण तो स्तब्ध बसून राहिला. नंतर अचानक उठून त्याने त्या मुलाला मिठी मारली. “खरेच तुला असे वाटते काय? ” त्याने अविश्वासाने मुलाला विचारले. मुलगा म्हणाला “म्हणूनच तर मी तुम्हाला ती रिबिन दिली.”
या प्रसंगानंतर बॉसचे वागणेच बदलून गेले. त्याने मुलाला योग्य ते श्रेय देऊन बढतीही दिली. मुलालाही काम करताना हुरुप वाटू लागला. एका गुलाबी रिबिनीने सगळे आयुष्यच बदलून गेले.

दुसऱ्या एका मुलीने ती गुलाबी रिबिन आपल्या शेजारच्या मुलीला दिली. देताना ती जे वाक्य बोलली त्याने समोरची मुलगी हादरुन गेली. ती मुलगी या मुलीला सतत त्रास द्यायची. वाईट साईट बोलायची. असे असताना आपल्या शेजारणीने आपली निवड या गुलाबी रिबिनीसाठी केली याची तिला अपूर्वाई वाटू लागली. तिच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून तिचे वागणे एखाद्या जिवलग मैत्रिणी प्रमाणे झाले.

एका छोट्याशा वाक्याने केवढी किमया घडवून आणली होती ! दीर्घकाळाचे वैर संपले होते. मनातली किल्मिषे निघून गेली होती. वातावरण स्वच्छ झाले होते. एकमेकांबद्दलच्या सद्भावनांमुळे कामाचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

शिक्षिकेने वर्गात काय शिकविले ते ज्ञान होते. परंतु एका छोट्याशा रिबिनीने जीवनातला अनमोल धडा दिला होता ज्याने बऱ्याच लोकांचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकले. चला, आपणही ही गुलाबी रिबिन द्यायला लागूया. शिक्षिकेने सांगितलेले वाक्य मात्र विसरायचे नाही. रिबिन देताना हे सांगायला विसरु नका की त्या व्यक्तीच्या अस्तित्वाने तुमच्या जीवनाला अर्थ आहे. ही आनंदाची गुरुकिल्ली आहे असेच म्हणावे लागेल.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..