उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा. बहुगुणी आणि उष्णतेच्या विकारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करणाऱ्या वाळा या घटकाबद्दल माहिती असणे हे आजकाल आवश्यकच आहे. वाळा ही खरंतर एक आयुर्वेदिक भारतीय वनस्पती आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरी फ्रिजचा वापर वाढला आहे. त्यामुळे लोक मातीचा माठ आणि वाळा वापरायला विसरत चालले आहेत. पण पूर्वी जेव्हा फ्रीज नव्हते, त्या काळात लोक शरीराला नैसर्गिकरीत्या आतून थंडावा मिळवून देण्यासाठी हा वाळा वापरत होते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात देखील तुम्ही वाळ्याचे थंडावा देणारे पाणी पिऊन उन्हामुळे होणाऱ्या विविध त्रास आणि आजारांपासून स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकता. आपल्याला सर्वांना परिचित व उन्हाळ्यात हवीशी वाटणारी वनस्पती म्हणजे वाळा होय, वाळा या वनस्पतीमुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच हे वाळा माठात टाकल्याने पाणी थंड आणि चवीला छान असे लागते. याचा औषधी म्हणून सुद्धा वापर केला जातो. वाळ्याची बरीच माहिती आहे आणि ते आता आपण पाहणार आहोत.
याची गवतासारखी बेटे असतात, याचे कांडे हे सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंच वाढते. त्याला एक प्रकारचा असा छान सुगंध येतो.ही मुळात भारतातील असलेली, बारमाही उगवणारी तृणप्रकारातील एक वनस्पती आहे. गवत कुलातील (पोएसी किंवा ग्रॅमिनी) यातील एक उपयुक्त वनस्पती. वाळा उर्फ खस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्रायसोपोगॉन झिझेनॉइड्स आहे. गहू, भात, नाचणी, बाजरी इत्यादी वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. वाळा मूळची भारतातील असून हैती, भारत, इंडोनेशिया या देशांत तिची व्यापारी लागवड केली जाते. वाळ्याची लागवड छोटा नागपूर, भारताच्या दक्षिण भागात नदयांच्या काठी व पाणी असणाऱ्या भागात केली जाते. वाळा गवताची मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी ३० ते ९० सेंमी. लांब असून रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. फुले बिनदेठाची व पिवळसर काळ्या रंगाची असतात. फुलाचा दांडा लांब व पिरॅमिडच्या आकाराचा असतो. वाळा ला हिंदी मध्ये खस म्हणतात.
वाळा:
वाळा बहुवर्षायू, गुच्छाने वाढणारे गवत आहे. ते नदीकाठच्या दलदलीत वाढते. मुळे तंतुमय, सुवासिक, लांब असून ती जमिनीत खोलवर सु. २–४ मी. वाढतात. जमिनीतील खोड (मूलक्षोड) १-२ मी. उंच वाढलले असून ते शाखायुक्त असते. खोडावरील ताटे (संधिक्षोड) आवरकांनी वेढलेली असतात. पाने साधी, एकाआड एक, हिरवी, गुळगुळीत, ताठ आणि ३०–९० सेंमी. लांब असतात आणि पानांच्या कडा काटेरी असतात. फुले बिनदेठांची, १५–४० सेंमी. लांब स्तबक फुलोऱ्यात (कणिशक) येतात. फुलोऱ्याचा दांडा जाड असून त्यापासून ६–१० फांद्यांची मंडले तयार होतात. लहान कणिशके करडी जांभळट, ४–६ मिमी. लांब व जोडीने असतात; त्यांपैकी एक कणिशक बिनदेठाचे, तर दुसरे देठ असलेले असते. प्रत्येक कणिशकात दोन फुले असून एक फूल द्विलिंगी व दुसरे फूल वंध्य असते, तर दुसऱ्या कणिशकात एक फूल वंध्य व दुसरे नरफूल असते. वाळ्याचे फुले येणारा आणि फुले न येणारा असे दोन प्रकार आहेत; उत्तर भारतात फक्त फुले येणारा, तर दक्षिण भारतात दोन्ही प्रकार आढळतात. वाळ्याचे गवत दुष्काळात तग धरून वाढते.
वाळ्याचे उपयोग:
मुळे सुवासिक असून त्यांच्यापासून उष्णता शमविणारे सरबत तयार करतात. ते पाण्यात, दुधात किंवा लस्सीत मिसळून पितात. मुळांपासून सुगंधी तेल मिळवतात. त्याचा वापर साबण आणि त्वचेची निगा राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये करतात. तेल वायुनाशी असून ते पोटदुखी, संधिवात, लचकणे यांवर चोळण्यासाठी उपयुक्त असते. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मूत्रल आहे. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याचे चूर्ण घेतले जाते. लघवीच्या आजारावर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. मुळे पाण्यात उगाळून किंवा त्याची पूड पाण्यात कालवून तापात अंगास लावली जाते. वाळा पित्तनाशक व कफनाशक आहे. त्याचा उपयोग दमा, खोकला, उचकी, उलटी यांसारख्या विकारावर केला जातो. डोकेदुखीवर उपचार म्हणून वाळा जाळून धुरी घेतात.
वाळ्याच्या मुळांपासून पडदे, पंखे, चटया, टोपल्या इ. बनवितात. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे बनवून त्यावर पाणी मारले, तर घरात गारवा राहतो. छपरासाठी तसेच कागदाचा लगदा करण्यासाठी वाळ्याचे गवत वापरतात. वाळ्याच्या सुकलेल्या गवतापासून केरसुणी बनवितात. वाळ्याची मुळे मृदेचे क्षरण होण्यापासून रोखत असल्याने मृदासंवर्धनासाठी उपयुक्त मानतात. ती पाण्याचे प्रवाह, भाताची खाचरे, रेल्वेमार्गावर बसलेली तटबंदी पकडून ठेवतात. म्हणूनच कोकणातील रेल्वेमार्गाला लागून असलेल्या डोगरांवर जागोजागी वाळ्याचे गवत लावलेले आहे. वाळ्याची ताटे वाहत्या पाण्याचा वेग कमी करतात. त्यामुळे तेथील जमिनीत पाणी शोषले जाण्याचे प्रमाण वाढते. वाळा पिकांचेही संरक्षण करते. खोड पोखरणाऱ्या कीटकांना ती आकर्षित करते, जे वाळ्यावर अंडी घालतात. वाळ्याच्या पानांवरील रचनेमुळे कीटकांचे डिंभ (अळ्या) पानांवरून खाली पडतात आणि मरून जातात. कॉफी,
कोको, चहा यांच्या मळ्यात वाळ्याचा पाला खत म्हणून वापरतात. पाल्यापाचोळ्यापासून या वनस्पतींना पोषक घटक उपलब्ध होतात. वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यांत उष्णतानाशक गुणधर्म असतात. त्यामुळे उष्णताशामक सरबते बनवण्यास व उन्हाळ्यापासून आडोसा देणाऱ्या ताट्या बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो.
व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे. या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलाबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताच्या बांधावर, उताराला वाळा (खस) गवताची लागवड केली जाते. त्यामुळे वाळा या बहुउपयोगी वनस्पतीची लागवड शेतक-यांसाठी फायदेशीर आहे.
हवामान:
उबदार व दमट हवामानाच्या प्रदेशात या गवताची चांगली वाढ होते. हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. विशेषत: तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळाची चांगली वाढ होत असून, मुळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते.
औषधी उपयोग:
1. वाळा हा बाहेरून वापरण्यासाठी आणि पोटातून घेण्यासाठी औषध म्हणून वापरला जातो.
2. शरीरातील दाह कमी करण्यासाठी तसेच त्वचेचा रंग उजळ होण्यासाठी याच्या लेपाचा वापर केला जातो.
3. घरातील उष्णता उन्हाळ्यात कमी करण्यासाठी वाळ्याचे पडदे लावतात.
4. वाळा, नागरमोथा व धने यांचे चूर्ण थंड पाण्यात कालवून तो लेप उन्हाळ्यात घामोळ्या आल्या असतील तर त्यावर लावला जातो, तसेच उन्हाळ्यात शरीराची आग होत असेल तर वाळा व चंदन यांचा लेप करून तो शरीराला लावावा.
5. मळमळ, अजीर्ण यावर पाचक म्हणून वाळा वापरला जातो. तसेच जुलाब, उलटी होत असेल तर वाळा, मध व खडीसाखर यांचे मिश्रण देतात.
6. धने, वाळा, नागरमोथा, बेल, लाजाळू व सुंठ यांचा काढा मधाबरोबर घेतल्यास अपचन, जुलाब, ज्वर अशा रोगांना आराम मिळतो. त्याचप्रमाणे कफनाशक म्हणून वाळा वापरला जातो.
7. दमा, उचकी व खोकला या विकारांत वाळ्याचे चूर्ण वापरतात.
8. वाळ्यातील जो कडू रस असतो त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
9. काही प्रसूत स्त्रियांच्या दुधामध्ये दोष असतो, तसेच दुधाचे प्रमाण कमी असते. तर अशा वेळी वाळा दधातील दोष दूर करण्याचल दूधाचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो.
10. ज्येष्ठमध, वाळा, मनुका व चंदन या काढा मध व साखर यांच्याबरोबर घेतल्यास रक्तामधील दोष नाहीसे होण्यास मदत होते.
11. उन्हाळ्यात उन्हाळी लागणे, अंगाची आग होणे, पित्त होणे यावर वाळ्याचे सरबत प्यावे ज्यानेकरून आराम मिळतो. तसेच उन्हाळ्यातील होणाऱ्या मूत्रविकारात वाळा उपयोगी पडतो.
12. तसेच आयुर्वेदातसुद्धा वाळ्याचा उपयोग केला जातो.
13. वाळा व पिंपळमूळ यांचे समभाग चूर्ण गाईच्या तुपातून घेतल्यास हृदयरोगसुद्धा कमी होतो.
विविध उपयोग :
वाळ्यामध्ये शीत, मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड उत्तेजक व मूत्रल आहे. वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधी नाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. तसेच वाळ्याचे तेल अत्तरे, सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. बाजारात वाळ्याचे उशीरासव, पंडगोदक, उशीरादि चूर्ण मिळतात. वाळ्यात राळ, रंगद्रव्ये, आर्यन ऑक्साईड , आम्ल चुन्याचे प्रमाण असते. उन्हाळ्यात वाळ्याचा छोटा गठठा करून माठात टाकतात. त्यामुळे पाण्याला सुगंध येतो, आणि त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी छान लागते. वाळ्याच्या मुळ्या उपयोगी असतात याला एक प्रकारचा सुगंध येतो. वाळा हा शरीरातील उष्णता कमी करणारा म्हणून ओळखला जातो. वाळा चवीने थोडा पण गोड रसांचा आहे. अश्या प्रकारे आपण येथे वाळा विषयी बरीच माहिती पहिली आहे.
वाळ्याचे इतर उपयोग:
• सुगंधी तेल:
वाळ्याच्या मुळांपासून काढलेले तेल अत्यंत सुगंधी असते आणि त्याचा उपयोग विविध सुगंधी उत्पादनांमध्ये केला जातो.
• सौंदर्य प्रसाधने:
वाळ्याच्या तेलाचा वापर अत्तर (perfume), आणि इतर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.
• नैसर्गिक हवा फ्रेशनर:
वाळ्याच्या मुळांचा सुगंध नैसर्गिक हवा फ्रेशनर म्हणून वापरला जातो.
• मातीची धूप थांबवणे:
वाळ्याची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते.
• बांधकाम:
वाळ्याच्या गवताचा उपयोग घराच्या छतासाठी आणि भिंतींसाठी केला जातो.
• औषधी उपयोग:
वाळ्याच्या मुळांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, जसे की उष्णता कमी करणे. याचा उपयोग उष्णताशामक सरबतं बनवण्यासाठी होतो.
• कृषी उपयोग:
वाळ्याची लागवड केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि पाण्याची बचत होते.
वाळ्याची लागवड:
• ती नदीकाठच्या दलदलीच्या ठिकाणी चांगली वाढते.
• वाळ्याची लागवड बियाणे किंवा मुळांच्या तुकड्यांपासून करता येते.
• वाळ्याला जास्त पाण्याची गरज नसते आणि ती कमी पाण्यातही चांगली वाढते.
ज्या ठिकाणी मातीची धूप जास्त होते, तिथे वाळ्याची लागवड करणे फायदेशीर ठरते.
अशा पद्धतीने वापरावा वाळा:
वाळ्याची एक जुडी विकत आणून आपण वापरू शकतो. घरातील पिण्याच्या माठात ही जुडी आपण टाकून ठेवू शकतो. एक जुडी साधारण 3 दिवस पाण्यात चांगली राहू शकते. त्यानंतर माठ आणि त्यातील जुडी वाळवून घ्यावे, पुन्हा तीच वाळ्याची जुडी माठाच्या पाण्यात टाकून आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने साधारण 20 ते 25 दिवस वाळ्याची एक जुडी वापरू शकतो, असे वाळ्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने सांगितले. अशा पद्धतीने आपण आयुर्वेदातील घटकाचा वापर करून उन्हाळ्यात आपल्या शरीराला आणि परिणामी आपल्या मनाला थंडावा मिळवून देऊ शकतो. खस सरबत हे उन्हाळ्यात शरीराला कुलिंग इफेक्ट देणारं अप्रतिम असं पेय मानलं जातं. या काळात खसचं अथवा वाळ्याचं पाणी पिण्यामुळेही तुमचं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. कारण उन्हाची काहिली वाढू लागताच तुम्ही कितीही पाणी प्यायला तरी तुम्हाला सतत तहान लागत राहते.
हल्ली लोक वाळा वापरायला विसरत आहेत, पण ज्या काळात फ्रीज नव्हते त्या काळात लोक शरीराला थंडावा देण्यासाठी वाळा वापरत होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वाळाचा वापर करून तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
रासायनिक घटक:
वाळा (Vetiver) या वनस्पतीमध्ये विविध रासायनिक घटक आढळतात. त्यापैकी काही प्रमुख घटक:
वाळा (Vetiver) या वनस्पतीमध्ये विविध रासायनिक घटक आढळतात. त्यापैकी काही प्रमुख घटक: व्हेटिव्हरॉल, व्हेटिव्होन, खुसीमोन, खुसीमोल, खोसीटोन, टेरपेनेस, बेंझोइक ऍसिड, एपिजियानल, व्हेटिव्हरॅझ्युलेन, प्रीझिझेन आणि बीटा वेटिस्पायरिन. या सर्वांमुळे वाळ्यास सुगंध येतो. या सर्वांमुळे वाळ्यास सुगंध येतो.
संदर्भ:
मराठी विश्वकोश
गुगलवरील अनेक लेख
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
जगन्नाथ बुचडे यांचा लेख २०२१
कृषी विभाग महाराष्ट्र शासन
साईप्रसाद महेंद्रकर यांचा लेख
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
३०. ०७. २०२५


वाळा आपल्याला परिचित असुनसुद्धा त्या बद्दलची संपूर्ण माहिती लेखकाने परिश्रमाने या लेखात दिली आहे. तरी लेख जरूर वाचा.